सिनेमे आय एम नेवेंका

सिनेमे आय एम नेवेंका

गोवा चित्रपट महोत्सवातला एक वेधक चित्रपट

 आय एम नेवेंका

नेवेंका नावाची तरूण मुलगी. माद्रीद या शहरातली. ती पॉनफेरेडा या गावाच्या नगरपालिकेत नोकरीसाठी येतेय. मेयर इस्माईल तिला पंखाखाली घेतो, तिच्यावर महत्वाच्या कामगिऱ्या सोपवतो, तिला भाव देतो. तिला आपलंसं करतो. जवळीक करतो. लगट करतो. बलात्कारही करतो. नेवेंका नकार देते. मेयर ब्लॅक मेलिंग करतो. नेवेंका धिटाईनं प्रतिकार करते. शेवटी मेयर उघडा पडतो, त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते.

  मी टू चळवळ सुरु झाल्यापासून खूप महिलांनी धिटाईनं त्यांच्यावर झालेल्या बलात्कारांना वाचा फोडली. माध्यमांत साऱ्या गोष्टी उघड झाल्या,  कोर्टात अनेकांना शिक्षाही झाल्या. हा विषय आता नवा नाही. कोण अशा विषयावर चित्रपट करेल? अगदी बलात्काराची दृश्यंही दाखवली तरी चित्रपट पहावासा वाटणार नाही इतका हा विषय चर्चिला गेलाय.

अशा चाकोरीतल्या बोथट झालेल्या गोष्टीवर चित्रपट करणं हे धाडसच म्हणायचं. ते धाडस आय एम नेवेंका चित्रपटात झालं आहे.

कथानक खरंखुरं आहे. एक मेयर खरोखरच होता, त्यानं खरोखरच छळवाद मांडला होता, त्याला खरोखरच शिक्षा झाली होती. ही कथा म्हटलं तर डॉक्युमेंटरी आहे. पण दिक्दर्शक इसियार बोलेननं तिचा चित्रपट केलाय. राजकारणी लोक जनतेला कसं घोळात घेतात; त्यांच्या वरलिया रंगा जग कसं भुलतं; त्यांचा आतला रंग कसा असतो हा सारा गुंतागुंतीचा मामला बटबटीत होऊ न देता चित्रपटातून उघड होतो.  

मेलोड्रामा आहे.  मानवी क्रौर्याच्या, मानवी धाडसाच्या सगळ्या तीव्र छटा कथानकात आहेत. ते सारं चित्रपटात आहे, तरीही चित्रपट बटबटबटीत होत नाही. सामान्य प्रेक्षक गुंतेल अशा जागा चित्रपटात आहेत.मधेच गळा दाटून येऊ शकतो, मधेच त्वेष निर्माण होतो, मधेच सरकारी वकीलाच्या किंवा मेयरच्या कानाखाली जाळ काढावासा वाटतो. बॉक्स ऑफिसवर चालावा असे अनेक घटक चित्रपटात आहेत. तरीही चित्रपट त्या पलिकडं जातो, कलेच्या सर्व घटकांमधे वावरतो.

  प्रेक्षक चित्रपट संपेपर्यंत खुर्चीला चिकटतो. कारण चित्रपटातल्या प्रत्येक नाट्यमय टप्प्यावर, प्रत्येक वळणावर नेवेंकाची भूमिका  करणाऱ्या मीरिया ओरियोल या नटीचा अभिनय.

इस्माईलची बायको मेल्यानं तो एकटा पडलाय, त्याला सहवास देणं योग्य आहे असं एक अटळ पण मानवी भाव नेवेंकाच्या चेहऱ्यावर दिसतो. इस्माईल नेवेंकाला महत्वाची कामं देतो,पदं देतो, नेवेंका सुखावते. सुखावलेल्या क्षणी इस्माईल नेवेंकाशी लगट करतो. नेवेंकाला हे जाणवतं की ही लगट विषारी आहे; पण शेवटी ती तरूण स्त्री आहे. स्पॅनिश-युरोपियन आहे. सेक्सबाबत स्पॅनिश स्त्रिया बऱ्याच मोकळ्या असतात, शरीरसुख मिळालं तर त्याचा त्या आनंद घेतात. शरीर सुखावतंय पण त्यात थोडासा विषारीपणाही आहे हा भाव नेवेंकाच्या चेहऱ्यावर सेकंद दोन सेकंदात येऊन जातो.

नेवेंकावर बलात्कार होतो. बलात्कार होत असताना तिच्या लक्षात येत असतं की आपलं आयुष्य संपतंय, निरर्थक होतंय. नेवेंकाला प्रचंड त्रास होतोय. पण बलात्कार करणारा माणूस एक मोठ्ठा पुढारी आहे, त्याच्यापुढं आपण हतबल आहोत हेही नेवेंकाला समजतंय. नेवेंकाच्या चेहऱ्यावर हे भाव काही सेकंदातच येऊन जातात.

सार जग नेवेंकाला सांगत असतं की तू सारं गपचूप सहन कर. इस्लाईल दुष्ट माणूस आहे, तो वाट्टेल ते करेल. आई वडील तसं सांगतात. सहकारी तसं सांगतात. पेपरवाले तसं सांगतात. ते ऐकताना प्रत्येक वेळी नेवेंकाच्या अभिनयात स्वतंत्र भाव दिसतात. ‘मला समजतंय.पण मी काय करू?’ असा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसतो.

खरोखरच तिला वाट सापडलेली नसते. चित्रपटाच्या शेवटी तिचा वकील आणि प्रियकर तिला समजून देतो. तेव्हां तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आत्मविश्वास पहाण्यासारखा असतो.

ब्लॅक मेलिंग,फोनवरून सतत छळणं, धमक्या देणं, इत्यादी गोष्टींबद्दल आपण पेपरात वाचतो पण ते सोसणाऱ्या स्त्रीला काय वाटत असेल याची कल्पना आपल्याला नसते. ‘आय एम नेवेंका’ मधे मीरिया ओरियोलच्या अभिनयातून ती कल्पना येते.

नेवेंका,इस्माईल, नेवेंकाचा वकील, इस्माईलचे सहकारी यांच्यातले संवाद हलक्या आवाजात पेश केलेत. आवाजाची  एक पट्टी, एक थर, चित्रपटात सांभाळलाय. नेवेंका धुमसत असते पण तरीही आक्रस्ताळी होत नाही. इस्माईल जाम कातावलाय, त्याची डांग उघडी पडलीय, तो फोनवरून दमदाटी करतो; आवाजाची पट्टी आणि तीव्रता नियंत्रणात ठेवून. चित्रपटात संवाद उच्चारले जाताना पार्श्वसंगीत नाही, सारंगीचे किंवा व्हायोलीनचे करूण तीव्र स्वर नाहीत.

पालिकेच्या बैठकी एका प्रायोगीक थिएटराचा हॉल वाटावा इतक्या छोट्या सभागृहात होतात. नगर सेवकांच्या पार्ट्या होतात, तिथं त्यांना फुकट दारू पाजली जाते. मेयरची चेंबर. इस्माईल जिथं नेवेंकावर बलात्कार करतो ती खोली. 

या सर्व जागा क्षेत्रफळाच्या हिशोबात लहान आहेत. चित्रपटात त्या जागा कमी प्रकाशात दिसतात. अंधार नाही आणि प्रकाशही नाही. गडद ब्राऊन छटा. भ्रष्टाचार अंधुक प्रकाशात घडतो.

नेवांका तिचा छळ उघड करते त्या जागा; कोर्ट आणि पत्रकार परिषद; तिथं भरपूर प्रकाश असतो. नेवांकाच्या गोष्टीत टप्पे आहेत. नेवांकांचा छळ हळू हळू गडद होत जातो. छळाचा नवा थर आधीच्या थरावर चढत जातो. नंतर अगदी गडद थर हळू हळू निवळत जातो. शेवटी नेवेंका पूर्ववत होते तिथं चित्रपट संपतो. चित्रातली रंगसंगती आणि चित्रांची गती या दोन्ही गोष्टी संकलन करताना नीट सांभाळल्या  आहेत.

  इस्माईलची भूमिका उरको ओलाझबाल यानं केलीय. नेवेंकाच्या वकीलाची भूमिका कार्लोस सेरानो यानं केलीय. पात्रं बटबटीत होत नाहीत. इस्माईलची  खलनायकी अगदी हळूहळू, हलकेच स्पष्ट होत रहाते; त्याला शिंग आहेत असं वाटत नाही. वकील हे पात्र नेवेंकाला वकीली कौशल्य आणि हळवी जवळीक अशा दोन भिन्न बाजूनी हाताळतं. काय मोठा तीर मारलाय अशा ‘उज्वल निकमी’ थाटात तो वावरत नाही.  

||

Comments are closed.