सिनेमे. मिस्ट्रेस डिस्पेलर

सिनेमे. मिस्ट्रेस डिस्पेलर

 मिस्ट्रेस डिस्पेलर.

आधुनिक जगाचं एक लक्षण म्हणजे जोडप्यांतला बेबनाव.  

पती पत्नी एकमेकापासून तुटू लागण्याचं एक कारण असावं वेल्फेर स्टेट. 

साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर वेल्फेर स्टेट ही कल्पना साकार होत गेली. माणसं वाऱ्यावर सोडली जात नाहीत. माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, संकटकाळात मदतीसाठी स्टेट (सरकार) सरसावलंय. ज्या गोष्टी कुटुंब आणि परिवार सांभाळत होत्या त्या गोष्टी आता स्टेट (सरकार)करू लागलंय.

उदा. स्त्री. आता स्त्री शिकते, स्वतंत्रपणे पैसे मिळवते, पैसे मिळवणं ही आता पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. स्त्री एकटी हिंडू शकते. स्त्री एकटी कामाच्या ठिकाणी वावरू शकते (अपवाद अफगाणिस्तान). स्त्रीला कोणी छळलं तर पोलिस, कोर्टं मदतीला असतात. स्त्रिया स्वतंत्रपणे संसार, मुलंबाळंही सांभाळू शकतात. मोठ्या शहरात, लिबरल वातावरण असलेल्या देशशहरात तशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. भारतात अजून त्या शक्यता पुरेशा व्यवहार्य झालेल्या नाहीत. पण चीन, जपान, कोरिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांत स्त्री बरीच मोकळी झाली आहे.

स्त्री जशी मोकळी झाली तसंच पुरुषही मोकळा झाला. एकेकाळी स्त्रीपुरुष कुटुंब या संस्थेशी बांधलेले होते. आता कुटुंबाशिवाय जगता येण्याची शक्यता निर्माण झालीय. पैसे मिळवणं,शारीरीक गरजा इत्यादी सर्व घटक मोकळे झाल्यानंतर स्त्री पुरुषांनी एकत्र रहायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते वर उल्लेख केलेल्या समाजातल्या स्त्री पुरुषांना कळेनासं झालंय.

स्त्री पुरुष सुटे होणं या शक्यतेचा एक लक्षात येणारा परिणाम म्हणजे घटस्फोट.काहीही कारणानं दोघामधे दुरावा असेल तर आता पती पत्नी एकमेकापासून सुटे होण्याच्या प्रयत्नात असतात.  

चीनकडं पहा. चीनमधे दर हजार जोडप्यामधे तीन जोडप्यांमधे घटस्फोट होतो. भारतात ते प्रमाण लाख जोडप्यांत एक असं आहे. चीनमधे घटस्फोट मिळवून देणाऱ्या वकीलांची फौजच आहे, ढीगभर कंपन्या ते काम करतात. जोडप्यात मतभेद होतात. जोडप्यातल्या एकाचा दुसऱ्यावर संशय असतो की दुसरा बदफैली आहे. चला वकीलाकडं. वकील हेर नेमतो. पार्टनरबद्दल खरीखोटी माहिती काढतो. पुरावे गोळा होतात. घटस्फोट होतो.

 अशा चीनमधे संसार वाचवण्यासाठीही कंपन्या स्थापन झाल्यात यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही. संसारात घुसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला फुटवण्याच्या व्यवसाय या कंपन्या करतात. आपल्याकडं मच्छर भगाव अगरबत्त्या मिळतात, तशी त्या कंपन्यांकडं घूसखोर भगाव आयडिया अमलात आणण्याची कला आहे.

एलिझाबेथ लो या दिक्दर्शिकेनं मॅरेज डिस्पेलर ही फिल्म घूसखोर भगाव या विषयावर केलीय. 

श्रीमती ली या मध्यम वयीन बाई दुःखात आहेत कारण त्यांचे पती श्रीमान ली एका फे नावाच्या तरूण मुलीच्या प्रेमात पडलेत.

श्रीमान ली यांचं पत्नीवर प्रेम आहे, पण तरीरी त्यांना मिस फे हिच्याशी मैत्री संबंध ठेवायचेत. काही प्रमाणात शारीरीक, काही प्रमाणात मानसीक.

श्रीमती ली यांना ते सारं समजतंय, त्यांना श्रीमान ली बऱ्यापैकी समजलेत. तरी त्याना आणखी एक स्त्री नवऱ्याबरोब असावी हे पटत नाहीय. नवऱ्यावर राग आहे, प्रेमही आहे,  नवऱ्याला सोडायचं नाहीये. 

श्रीमती ली यांना घटस्फोट नकोय. तिकडं मिस फे यांना श्रीमान ली यांनी घटस्फोट घ्यावा असं तीव्रतेनं वाटत नाहीये. मिस फे एकटी आहे, तिला सहवास हवाय येवढंच. 

श्रीमती ली यांना नवरा आणि संसार वाचवायचाय, त्यासाठी फे या बाईला लोचे न करता दूर करायचंय. 

 वेंग या बाईंची एक कंपनी आहे. त्या लोकांचे संसार वाचवतात. दोघांच्या संसाराचा त्रिकोण झाला की त्यातला बाहेरून घुसलेला कोन वेंग या बाई दूर करतात. वेंग बाई श्रीमान, श्रीमती आणि मिस या तिघांनाही भेटतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना समजून घेतात, तिघांत संवाद घडवून आणतात, मैत्रीच्या वातावरणात मिसला दूर करतात.

हे एक  व्यावसायिक काम आहे. चीनमधे हे काम करणाऱ्या अनेक कंपन्या निघाल्यात. 

वेंग यांनी ली जोडप्याला कसं सोडवलं ते चित्रपटात दिसतं.  

गंमत अशी की श्रीमान आणि श्रीमती ली या चित्रपटातल्या भूमिका खरोखरच श्रीमान श्रीमती ली आहेत.  फे ही तरूण मुलगीसुद्धा खरीच फे नावाची मुलगी आहे.   लो हिनं सर्वांची परवानगी घेऊन चित्रीकरण केलं.   सर्व पात्रं जशी होती तशी नैसर्गिक वागली. त्यामुळं चित्रपटात कोणी अभिनय करतंय असं वाटलं नाही.

ली आणि फे एकाच सलोनमधे केशभुषा करायला, फेशियल करायला जातात. तिथं लो हिनं चित्रीकरण केलं.  

 बीजिंगमधली गर्दी. अमाप माणसं. अमाप जोडपी. प्रत्येक नसेल पण कित्येक कुटुंबात तणाव, अफेअर्स असणार. दिक्दर्शक सतत बीजींग हे मोठं शहर आपल्याला दाखवत रहाते. 

चित्रपटभर चर्चा दिसते. 

नवरा बायकोतला संघर्ष मांडतांना नाट्यमय प्रसंग चित्रपटानं तयार केलेले नाही. तणावाचं संगीत वापरलेलं नाही. 

एलिझाबेथनं हॉटेल २२ नावाची एक छोटी फिल्म याआधी केलीय.  

सॅन फ्रान्सिस्कोमधे  २२ नंबरची एक बस चोविस तास चालते. रात्री ११ नंतर या बसमधे बेघर लोक आपलं चंबुगवाळं घेऊन बसतात. बसच्या काचेवर डोकं टेकून, पुढल्या बाकावर डोकं ठेवून, डुलक्या घेत ती गरीब मंडळी रात्र काढतात. शेवटच्या स्टॉपवर उतरतात. दिवसभर तिथंच वेळ काढतात आणि रात्री पुन्हा २२ नंबरच्या बसमधे बसतात. ही बस म्हणजे त्यांच्यासाठी एक हॉटेलच असतं. विषय डॉक्युमेंटरीचा खरा पण दिक्दर्शिका बेघर माणसांबद्दल, एका शहराबद्दल बोलते, एक फीचर तयार करते.

एलिझाबेथ लो यांचा पिंड डॉक्युमेंटरीचा आहे. त्यांचं शिक्षण डॉक्युमेंटरी या विषयात आहे, त्यांनी टीव्हीसाठी डॉक्येमेंटरी केल्यात. 

एलिझाबेथ लो हाँगकाँगमधे वाढल्या, न्यू यॉर्कमधे शिकल्या, आता त्या अमेरिकेच्या रहिवासी झाल्यासारखं दिसतंय. 

|| 

Comments are closed.