अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

कॅनडातलं वातावरण वेगानं बदललय. लोकांना उदारमती (लिबरल) राजकारण नकोय. त्यांना देशीवादाची भुरळ पडलीय.जगभर उमटलेल्या उजव्या लाटेत कॅनडा सापडला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपली  कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच आपल्या पदाचा राजिनामा देऊन मोकळे झाले. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आपण पक्षप्रमुख आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलो तर निवडणुकीत पराभव होईल याची खात्री त्यांना पटली. त्यांनी राजीनामा देताना पक्षानं दुसरा पंतप्रधान निवडावा असं म्हटलं आहे.  त्यांच्या जागी त्यांचा लिबरल पक्ष नवा नेता निवडेल आणि तो माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊन पुढील निवडणुकीला तोंड देईल. 

ट्रुडो आठ वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधानपदावर होते. त्यांचे वडीलही पूर्वी १० वर्षं पंतप्रधान होते. खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी त्याना पदावर दीर्घकाळ किंवा आयुष्यभर रहाण्यासाठी उपयुक्त होत्या. त्यांना सत्तेत राहून आपल्या पक्षातल्या आणि बाहेरच्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून छुपी हुकूमशाही प्रस्थापित करता आली असती.

ट्रुडो याना हुकूमशहा व्हावंसं वाटलं नाही. त्यांच्या पक्षात लोकशाही आहे, पक्षातल्या लोकांनीच त्यांना सत्तेपासून दूर केलं.  सत्तांतर कोणतही वादळ न होता पार पडलंय. कॅनडातले नागरीक, राजकीय पक्षातले कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे पेपर, जागरूक असतात. प्रश्नांची, सरकारच्या यशापयशाची मोकळी चर्चा कॅनडात होते. ट्रुडो सवंग लोकप्रियतेच्या मागं लागले आहेत असं नागरीक आणि पेपर म्हणू लागले. यातून योग्य तो अर्थ ट्रुडोंनी घेतला. कॅनडात आता पर्यंत २३ पंतप्रधान झाले. कोणीही दोन टर्मपेक्षा जास्त, दहा वर्षापेक्षा जास्त काळ टिकलेलं नाही.

ब्रिटीश पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन म्हणत की राजकारण स्थिर नसतं. आठवडा उलटला की लोकमत बदलतं, पाच वर्ष म्हणजे अतीच झालं.लोकांना बदल हवा असतो. चर्चिलनी दुसरं महायुद्ध जिंकलं आणि ब्रीटनला नष्ट होण्यापासून वाचवलं. ‘जन्मभर आम्ही तुमचे ऋण फेडत राहू, तुम्हाला पंतप्रधानपदावर ठेवू’ असं ब्रिटीश नागरीक म्हणाले नाहीत. युद्ध संपल्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी चर्चिलना घरी पाठवलं.

ज्यो बायडन यांची आठवण होते. ते उमेदवार होते. भाषण करतांना अडखळले यावरून त्यांच्याच पक्षातल्या लोकांना वाटलं की त्यांना निवडणुक पेलवणार नाही, ते उभे राहिले तर पडतील. काय झालं? बायडन यांनी माघार घेतली, त्यांच्या जागी आयत्या वेळी कमला हॅरिस उभ्या राहिल्या आणि पडल्या. 

ट्रुडो यांच्या जागी समजा त्यांच्या नंतर दोन नंबरवर असलेल्या  फ्रीलँड उभ्या राहिल्या तर जिंकतील? सांगता येत नाही. एकूण परिस्थिती पहाता  त्यांनाही निवडणुक जडच जाणार आहे.

  ट्रुडो यांची धोरणं पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देणार नाहीत असा विचार करून पक्षानं त्यांचं नेतृत्व झुगारलं आहे. नागरीकांना आणि  त्यांची उप पंतप्रधान,अर्थमंत्री फ्रीलॅंड यांनाही ट्रुडो यांची धोरणं पसंत नाहीत. फ्रीडलँडनी आपली नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिल्यानंतर हादरलेल्या ट्रुडो यांनी राजीनामा दिला.  

 ट्रुडो यांनी नोकरीत असणाऱ्यांना  सरसकट २५० डॉलर देण्याचं जाहीर केलं. आधीच अर्थव्यवस्था तोट्यात आहे, तिजोरी रिकामी होतेय, कर्जाचा बोजा वाढतोय, त्यात ट्रुडो असा पैसा खर्च करताहेत हे त्यांच्या पक्षाच्या लोकांना आवडलेलं नाही. ट्रुडो सेल्स टॅक्सही कमी करू पहात होते. 

या योजना लोकांना खुष करण्यासाठी योजलेल्या होत्या. निवडणुक उंबरठ्यावर असल्यावर लोकांवर आमिषांची आणि पैशाची खैरात करणं हा कुठल्याही पक्षाचा आवडता कार्यक्रम असतो. यात ट्रुडो काही फार मोठा गुन्हा करत आहेत अशातला भाग नाही. दुसरा कोणी पंतप्रधान असता तरी त्यानं काही वेगळं केलं नसतं. पण या घडीला लोकांना वाटतं की लोकानुनयाची धोरणं देशाला तारणार नाहीत. घरांची टंचाई आहे, लोकांना घरं हवीयत. कॅनडात घरं महाग झालीयत, भाडी वाढलीत. एकेकाळी रहायला चांगला देश अशी कॅनडाची कीर्ती होती, आता कॅनडातली घरं न्यू यॉर्क, पॅरिस, टोकियोपेक्षा महाग झालीत. घरांकडं दुर्लक्ष करायचं आणि रेवड्या वाटायच्या हे धोरण लोकाना पसंत नाहीय.  

त्यात भरीस भर म्हणून डोनल्ड ट्रंपनी घोटाळा केलाय. 

ट्रंप म्हणतात की कॅनडा स्वस्त माल अमेरिकेत ओतून अमेरिकेचा घात करत आहे. कॅनडा  अमरिकेचं शोषण करत आहे असं ट्रंप म्हणत आहेत. ट्रंपनी धमकी दिलीय की कॅनडाची कोंडी केली जाईल. ट्रंपनी कॅनडातल्या मालावर  २५ टक्के जकात लावली आहे. परिणामी कॅनडाची निर्यात घटेल, कॅनडातलं उत्पादन घटेल, बेकारी वाढेल, महागाई वाढेल. ट्रंप या संकटाला ट्रुडो तोंड देऊ शकणार नाहीत असं लोकांना वाटतंय.

 लोकप्रियतेत ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला मागं टाकणाऱ्या कंझर्वेटिव पक्षाकडं देशाला तारणारी धोरणं आहेत काय? पियू पॉलियेवरा हे कंझर्वेटिव निवडणूक जिंकून पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्यांचं धोरण काय आहे?

पॉलियेवरा ट्रंपचेच धाकटे भाऊ आहेत. सवंग भाषणं करतात, भंपकबाजी करतात. कॅनडातल्या गोऱ्या जनतेतली सांस्कृतीक अस्वस्थता ते वापरून घेत आहेत. कॅनडामधे गेल्या १० वर्षाच्या काळात खूप परदेशी स्थलांतरीत आहेत. हे विस्थापित गोरे नाहीत, ख्रिस्ती नाहीत, युरोपीय नाहीत. गोऱ्यांना वाटतंय की कॅनडाच्या  बिकट झालेल्या  अर्थव्यवस्थेला ही बाहेरची माणसं कारणीभूत आहेत. भले ती माणसं अल्पसंख्य असतील. भले त्या माणसांनी गोऱ्यांचे रोजगार हिरावून घेतले नसतील. पण बरेच गोरे तर्कशुद्ध विचार करायला तयार नाही, कातर झालेले आहेत, त्यामुळं सर्व प्रश्नांचं मूळ बाहेरून आलेली माणसंच आहेत असं त्यांना वाटतंय. कंझर्वेटिव पक्षाचं म्हणणं आहे की ट्रुडो यांच्या पक्षांच या बाहेरच्याना कॅनडात घेतलंय. या बाहेरून आलेल्या लोकांची वोट बँक ट्रुडोनी तयार केलीय असा कंझर्वेटिव मंडळीचा दावा आहे. तोच त्यांचा प्रमुख मुद्दा झालाय. 

कॅनडात मनुष्यबळ कमी पडतंय. जन्मदर कमी होतोय, माणसांचं आयुष्मान वाढत चाललंय. वृद्धांची संख्या वाढतेय, कामं करायला माणसं कमी पडत आहेत. विस्थापितांचा उपयोग होईल असा विचार ट्रुडोनी केला. युरोपात जर्मनीनंही हाच विचार करून सीरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणच्या लोकाना दारं उघडली.   

विस्थापितांना सामावून घेणं ही माणुसकी आहे. जगातल्या बहुतेक देशांनी विस्थापितांना आश्रय देण्याच्या आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या आहेत. कॅनडाही त्यापैकीच एक. कित्येक देशांनी करारावर सह्या केल्या पण कराराचा अमल केला नाही. ट्रुडो यांनी उत्साहानं कराराचं पालन केलं. २०२३ साली १० लाख विस्थापितांना कॅनडात आश्रय मिळाला. तेच लोकांच्या रागाचं कारण आहे.

ट्रंप म्हणतात की कॅनडातली जनता नीट वागली नाही, म्हणजे त्यांनी ट्रुडो सारख्या लिबरल लोकाना हाकललं नाही तर ट्रंप कॅनडा बरखास्तही करतील, कॅनडाला अमेरिकेत सामिल करून घेतील. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. आजचा युनायटेड स्टेट्स घडवत असताना अमेरिकेनं राज्याची खरेदी एके काळी केली आहे. ट्रंप बनिया आहे. ते उद्या खरोखरच कॅनडाची बोली लावतीलही. आताच ते ट्रुडो यांना कॅनडाचे गव्हर्नर म्हणतात. अमेरिकेत प्रत्येक राज्याला एक गव्हर्नर असतो, कॅनडा हे आपलंच ५२वं राज्य आहेत असंच जणू ट्रंप मानत आहेत. 

कॅनडातला कंझर्वेटिव पक्ष लोकप्रीय होतोय. त्यांची लोकप्रियता ७० टक्क्याच्या घरात पोचली आणि लिबरल पक्षाला २५ ते ३० टक्क्यांचा पाठिंबा आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत कंझर्वेटिव उमेदवारानं ट्रुडो यांच्या उमेदवाराला पाडलं.

 हा इशारा लक्षात घेऊनच ट्रुडो  यानी राजिनामा दिलाय.

।।

Comments are closed.