सिनेमा/माहिती पट. बाळकृष्ण विठ्ठल दोशी
बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांचं आर्किटेक्चर
❖
पारंपरीक नक्षीकाम नाही पण सूत्र हरवलेलं अत्याधुनिकही नाही असं आधुनिक आर्किटेक्चर दोशी यांनी केलं.
❖
मुंबईत आर्किटेक्ट लोकांनी एक चित्रपट जत्रा भरवली होती. त्यात आर्किटेक्चर या विषयाभोवती चित्रपट दाखवले गेले. चित्रपट म्हणजे माहितीपट होते. त्यातला एक माहितीपट होता बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांच्यावर. दोशी २०२३ साली एक्याण्णवाव्या वर्षी वारले. दोशी पुण्यात जन्मले, अहमदाबादेत वाढले, मुंबई, लंडन आणि पॅरिसमधे शिकले, दिल्ली-बंगलोर-अहमदाबाद-इंदूरमधे त्यांनी वास्तू बांधल्या.
माहितीपटात दोशी अहमदाबादच्या दाट वस्तीत फिरताना दिसतात. वय झालेलं असल्यानं एक मदतनीस त्यांच्यासोबत आहे. पण ते त्या माणसावर अवलंबून नाहीत, ते स्वतंत्रपणे आणि ताठपणे हिंडतात. हिंडताना ते लहानपणी कुठं वाढले, त्यांनी कुठल्या इमारती बांधल्या ते दाखवतात. आपल्याला दिसतं की वाटेत त्यांना माणसं ओळखतात, त्यांच्याकडं आदरानं पहातात. खांद्यावर ठेवलेला कॅमेरा त्यांच्यासोबत गर्दीतून वाट काढत हिंडतो.
दोशी त्यांनी निर्माण केलेल्या शाळेत आपल्याला घेऊन जातात. हळवेपणानं शाळेत आपल्याला हिंडवतात. शाळेची रचना आपल्याला कळते. खेळ, अभ्यास, डबा खायची जागा, मोठे हॉल. अगदी सहज प्रत्येक जागा आणि स्पेसमधे प्रवेश करता येतो. वाटेत मोकळ्या जागा असतात, झाडं असतात. दरवाजे नाहीत. ऊंच छतं. भरपूर प्रकाश आणि हवेची येजा. मुलांना बेभान हुंदडता येईल अशी स्पेस. अभ्यास हेही हुंदडणं.
अशी शाळा आपल्याला पहायला मिळत नाही.
दोशींनी इंडॉलॉजी संस्थेची इमारत बांधली. इमारतीचा आकार बोटीसारखा आहे. इमारतीचे खांब आणि छतं डिझाईन करताना स्ट्रक्चरल इंजिनियरांनी आक्षेप घेतले. दोशी डिझाईनवर ठाम राहिले. खांबांची रचना करतांना बऱ्याच नव्या गोष्टी त्यांनी साधल्या.खांब काँक्रीटचे केले. प्रत्येक खांबाचं डिझाईन बदललं, दोन खांबांचा मिळून एक सपोर्ट तयार होईल अशी रचना केली. दोन खांबांमधे अंतर ठेवलं आणि सर्विसिंगचे पाईप वगैरे त्या मधल्या जागेत ठेवले. दोशीची प्रत्येक इमारत स्वतंत्र असे, एक दुसरीसारखी नसे, प्रत्येक इमारतीत काही तरी नाविन्य असे.
इंडॉलॉजी संस्थेची इमारत एक म्युझियम आहे. या म्युझियममधे त्यांनी वाचन, चिंतन, चर्चा, अभ्यास याचीही सोय केली. जमिनीखाली तळघरात म्युझियम, वरच्या मजल्यांवर बाकीच्या सोयी.
म्युझियम तळधरात कां योजलं?
हा प्रकल्प अगदी सुरवातीच्या काळातला होता. कस्तुरभाई लालभाई हे प्रख्यात उद्योगपती दोशीना भेटले. म्हणाले की त्यांच्याकडं जैन मुनींच्या पोथ्या आहेत. त्या जपून ठेवायच्या आहेत, त्यासाठी एकादं म्युझियम तुम्ही बांधा. ते बांधण्यासाठी अमेरिकेत जाऊन या. तिथं ड्युक युनिव्हर्सिटीतली म्युझियमची इमारत पाहून याच. दोशींनी अमेरिकेत जाऊन ती इमारत पाहिली. तिथं जमिनीखाली बांधलेल्या दालनात वस्तू जतन केलेल्या होत्या.
दोशीना ती कल्पना पसंत पडली. कारण जमिनीखाली बांधलं तर तापमान नियंत्रीत होतं. दोशी निसर्गप्रेमी होते. एयर कंडिशनिंग ही गोष्ट वातावरणाचा नाश करतं अशी त्यांची धारणा होती. एकूणातच आधुनिक तंत्रज्ञानं कमीत कमी वापरावीत, कल्पकरीत्या वापरावीत असं त्यांना वाटत होतं. इन्सटिट्यूट ऑफ इंडॉलॉजीच्या इमारतीत हवा खेळती ठेवण्यात आलीय, नैसर्गिक प्रकाश दिवसभर इमारतीत रहातो. अगदीच आवश्यक त्या ठिकाणी एसी वापरण्यात येतो. दिवसा पंखे, दिवे लागत नाहीत.
दोशींच्या इमारतींत, घरांत, उजेड आणि हवा भरपूर.
दोशी म्हणतात की दार नावाची गोष्ट हद्दपार झाली पाहिजे. दार हा अडथळा असतो, दार अडवाअडवी करतं. आर्किटेक्चर कॉलेजची त्यांनी बांधलेली अहमदाबादली इमारत माहिती पटात दिसते. छत आणि भिंती यामधे भरपूर अवकाश मोकळा ठेवून दोशीनी प्रकाशाला मुक्त वाव दिला आहे. विद्यार्थी मुक्तपणे हिंडूफिरू शकतात, त्यांच्या कामाच्या जागीही आसपास खूप मोकळी जागा असते.एक गंमत. विद्यार्थ्यांची संख्या भरपूर. प्रवेशासाठी खूप ऐसपैस पायऱ्यांची रचना केलीय. एका बाजून जावं, दुसऱ्या बाजूनं खाली उतरावं. तरूण मुलं झाडाभोवती फिरतात. तसं जिन्यात फिरता येतं. दारं नाहीत.
दोशींनी इंदूरमधे मध्यम वर्गीय आणि गरीब लोकांसाठी घरं बांधली. माहिती पटात ती दिसतात. तळ मजला, वरचा मजला. वरच्या मजल्यावर जायला बाहेरून जिना. घराला लागून घर. घरांची वसाहत, घरांचा गुच्छ. वस्तीचं नाव आहे अरण्य. १९८२ साली ही वस्ती त्यांनी बांधली. आजही ती वस्ती चांगल्या स्थितीत आहे. ८२ साली जशी होती तशी आता राहिलेली नाही, लोकांनी आपापल्या गरजा आणि आवडीनुसार घरांत बदल केलेत.
दोशींचं म्हणणं असं की माणूस एकटा नसतो, माणूस समूहाचा (कम्युनिटीचा) भाग असतो. माणूस भवतालात मिसळत असतो, भवतालाशी त्याचा संवाद असतो. म्हणून वास्तू ही भवताल आणि कुटुंब यांच्यात संवाद आणि गाठीभेटीला वाव देणारी असायला हवी. इंदूरची वस्ती त्यांनी म्हणूनच घराला लागून घर अशी कल्पिली. माणूस घराबाहेर पडला तर घरच्यांची काळजी शेजारी घेतील याची खात्री माणसाला असायला हवी, शेजाराशी आणि वस्तीशी माणसाचा जिवंत संपर्क असायला हवा.
दोशीनी केवळ एकेका माणसासाठी/कुटुंबासाठी घरं बांधली नाहीत. संस्थांसाठी इमारती बांधल्या, वस्त्या तयार केल्या. दोशींचं स्वतःचं घरही भवतालाला सामावून घेणारं आहे.
दोशींनी सुमारे १०० वास्तू बांधल्या. त्यातल्या महत्वाच्या वास्तू माहितीपटात दिसतात. जत्रेत दाखवलेला माहितीपट सोडा, यु ट्यूबवर दोशींच्या कामावर वीसेक तरी माहितीपट आहेत. त्यातून दोशी समजतात.
दोशींनी पाचपन्नास मजल्यांचे टॉवर उभारले नाहीत. काँक्रीट आणि ग्लास यावर आधारलेलं अत्याधुनिक आर्किटेक्चर त्यांनी केलं नाही. एकाद दोन मजल्यांच्या इमारती त्यांनी केल्या. दोशींचं म्हणणं असं की माणूस जमिनीपासून दूर जातो, वरवर जातो तसतसं त्याला असुरक्षित वाटू लागतं, तसतसा त्याच्यामधे एक न्यूनगंड तयार होतो,एक विकृती तयार होते.
दोशींच्या इमारती पहा. त्यात सजावट, कलाकुसर दिसणार नाही. त्या वास्तू माणसाला सुखकारक असतात, सोयीच्या असतात. पारंपरीक नक्षीकाम नाही पण सूत्र हरवलेलं अत्याधुनिकही नाही असं आधुनिक आर्किटेक्चर दोशी यांनी केलं.
।।