ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले
माध्यमांचं भाकित, अंदाज, अभ्यास खोटे ठरले.
डोनल्ड ट्रंप निवडून येणार नाहीत असं अमेरिकन आणि युरोपिय माध्यमांना वाटत होतं. लॉर्ड मेधनाद देसाई या बहुदा एकट्याच पत्रकारानं ट्रंप निवडून येतील असं भाकित केलं होतं. ट्रंपना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा दोन लाख मतं कमी पडली हे खरं. ते इलेक्टोरल व्होट या चमत्कारिक अमेरिकन निवडणुक पद्धतीमुळं प्रेसिडेंट झाले हेही खरं. परंतू इतकी मतं ट्रंप यांना मिळतील असं कोणीही माध्यमातलं माणूस माणूस म्हणत नव्हतं.
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकतील असं माध्यमं म्हणत होती. भरघोस मताधिक्य मोदींना मिळणार नाही, थोड्याशा मताधिक्यानं, निसटता विजय मोदींना मिळेल असं माध्यमं म्हणत होती. मोदींच्या सॉलिड मतांनी माध्यमांना खोटं ठरवलं. पाठोपाठ दिल्लीच्या निवडणुका. माध्यमं म्हणत होती की केजरीवाल हरतील, फार तर फार हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच जागा केजरीवालांना मिळतील. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवून ऐतिहासिक विजय मिळवला. पाठोपाठ बिहारच्या निवडणुका. नितीश कुमार यांची आघाडी हरेल, फार तर फार भरुपूर जागा पण सत्ता स्थापन करण्यासाठी अपुऱ्या जागा मिळतील असा माध्यमांचा अंदाज होता. तोही खोटा ठरला.
ट्रंप यांना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा फक्त दोन लाख मतं कमी पडली. लोकांना आश्चर्य वाटतंय ते अशाचं की इतकी मतं ट्रंप यांना कशी पडली. काळे, आशियाई, लॅटिनो यांची बहुतेक मतं क्लिंटनना पडतील आणि ट्रंप यांच्या स्त्री विषयक वाह्यात वक्तव्यांमुळं गोऱ्या स्त्रियांची मतंही क्लिंटन यांना पडतील असा माध्यमांचा अंदाज होता. ट्रंप यांना केवळ मध्यम वर्गीय आणि गरीब गोऱ्यांची मतं मिळतील असं माध्यमांना वाटत होते. पण तसं घडलं नाही. काही प्रमाणात काळे आणि लॅटिनो यांनीही ट्रंपना मतं दिली. मुख्य म्हणजे गोऱ्या लोकांनी सरसकट ट्रंपना मतदान केलं, त्यात गोऱ्या स्त्रियाही होत्या असं दिसतंय.
गोऱ्या स्त्रियांनी ट्रंपना मतं कशी काय दिली आणि काळे-लॅटिनोंनीही ट्रंपना मतदान कसं काय केलं याचा उलगडा होत नाहीये. वरील मतं क्लिंटनना न जाता ट्रंपकडं जातील याचा अंदाज आपल्याला कसा काय नाही आला याचा विचार माध्यमं करत आहेत.
माध्यमं पक्षाच्या घोषणा, कार्यक्रम, उमेदवार, प्रचार, पूर्वेतिहास इत्यादी घटकांचं विश्लेषण करून अंदाज व्यक्त करतात. नरेंद्र मोदी, केजरीवाल,नितीश कुमार, ट्रंप यांचं राजकीय व्यक्तिमत्व आणि ताकद, त्यांच्या पक्षांची ताकद, काँग्रेस-रिपब्लीकन व इतर पक्षांचे कार्यक्रम आणि ताकद, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून तीनही निवडणुकांचे अंदाज माध्यमांनी बांधले.
माध्यमं मतदारांशी नाना प्रकारे संपर्क साधून त्यांच्या मनाचा आणि मतांचा अंदाज घेतात. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की विविध टप्प्यांवर माध्यमं लोकमताची पहाणी करतात. नंतर मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या मतदारांशी बोलून त्यानी कोणाला मत दिलंय ते ठरवतात. या दोन घटकांचा एकत्र विचार करून माध्यमं निवडणुकीत कोणाला किती मतं मिळणार याचा अंदाज जाहीर करतात.
कार्यक्रम, पक्ष-उमेदवाचं चरित्र, मोहिम इत्यादी गोष्टींचं रूपांतर प्रत्यक्ष मतदानात किती होईल याचे अंदाज म्हणजे एक जुगार असतो. प्रचार मोहिम सुरु झाल्यावर राजकीय पक्षांकडून वापरले जाणारे दबाव आणि मतदार क्षेत्रातली बदलती समीकरणं यांचा कोणता परिणाम मतदानावर होईल ते सांगता येत नसतं. भारतात पैसे वाटून, जात आणि धर्माचा वापर करून मतदारांचे गठ्ठे तयार केले जातात. ही बांधाबांध गुप्तपणे आणि बेकायदेशीर रीतीनं होत असते. पक्षाची आणि उमेदवाराची लोकहित साधण्याची क्षमता आणि इच्छा या गोष्टी तोंडी लावण्यापुरत्याच असतात, इतर दबावांखालीच मतदार मतदान करत असतात. त्यामुळं मतदानाचं रूप कसं असेल याची कुणकुण माध्यमांना लागते पण पक्के अंदाज बांधता येत नाहीत. कारण मतदानाच्या आधी अठ्ठेचाळीस तासातही मतदार संघातलं वारं फिरतं. त्यामुळं पक्ष, कार्यक्रम, लोकहिताची क्षमता इत्यादी गोष्टीवर आधारलेलं भाकित अंदाजपंचे दाहोदरसे या रुपाचं असतं.
डेमॉक्रॅटिक उमेदावर आणि हिलरी क्लिंटन यांचे कार्यक्रम मतदारांना पसंत पडतील आणि ट्रंपचे कार्यक्रम पसंत पडणार नाहीत असं पत्रकाराला-जाणकाराला वाटलं पण मतदाराला तसं वाटलं नाही. ट्रंप स्त्रैण आहेत, ट्रंप अनैतिक आणि बेकायदेशीर वागतात, ट्रंप खोटारडे आहेत, ते ढ आहेत, त्यांच्याकडं कार्यक्रम नाहीत असं जाणकार आणि पत्रकारांना वाटलं. ट्रंप यांचे स्त्रीविषयक विचार आणि वागणं यांची चर्चा माध्यमांनी केली. मुस्लीम, लॅटिनो, काळे यांच्याबद्दलची ट्रंप यांची भूमिका माध्यमांनी उघड केली. देशांतर्गत आणि परदेश विषयक निश्चित धोरण ट्रंप यांच्याकडं नाही हे माध्यमांनी सिद्ध केलं. ट्रंप यांच्याकडं कोणतंच ठाम धोरण नसून ते प्रसंगी जे सुचेल ते बोलतात हेही माध्यमांनी दाखवून दिलं. ट्रंप कसेही असोत परंतू ते गोरे आहेत, ते ख्रिस्ती आहेत, ते गोऱ्या बेरोजगार तरूणांची काळजी घेणार आहेत या कारणांसाठी आपण त्याना मतदान करणार आहोत हे गोऱ्या स्त्रियांनी ठरवलं असावं. आपलं मत त्यांनी माध्यमांना सांगितलं नाही. कदाचित माध्यमांनी त्या बाजूनं त्यांना विचारलंही नसेल. ट्रंप भले वाईट असले तरी त्यांना स्त्रिया मतदान करतील ही शक्यताच माध्यमांनी लक्षात घेतली नाही. भारतातही स्त्रिया त्यांची मतं व्यक्त करत नाहीत आणि अनेक निवडणुकांचा अनुभव आहे की स्त्रियांची मतं निवडणुकीचा निकाल फिरवतात.
ट्रंप यांच्यावरचे आरोप खरे असले तरीही आम्हाला त्यांनाच मत द्यायचं आहे कारण तेच बदल आणू शकतील असं मतदारांना वाटलं. हा पत्रकार आणि मतदार यांच्या समजुतीतला फरक आहे. हा समजुतीतला फरक कां आणि कसा असतो हे आता माध्यमांनी अभ्यासायला हवं.
अनेक गोऱ्यांना कुचंबणा जाणवत असावी. ट्रंप हा योग्य उमेदवार नाही पण आपल्याला त्याला मत द्यायचं आहे असं मत व्यक्त करणं गोऱ्यांना प्रशस्त वाटलं नाही. ट्रंप पक्षाबाहेरून आलेले असल्यानं आणि त्यांचं वर्तन प्रक्षोभक असल्यानं त्यांना जाहीर पाठिंबा देणं अनेक रिपल्बिकन मतदारांना योग्य वाटत नव्हतं. काळे आणि हिस्पॅनिक यांच्यावर ट्रंप यांनी टीकेची झोड उठवली होती तेही पक्षाच्या अधिकृत विचाराशी विसंगत होतं. पॉल रायन असोत की जॉन मॅक्केन दोघांनीही ट्रंप यांच्यावर जाहीर टीका केली होती. पोलिटिकल करेक्टनेसच्या हिशोबात त्यांना टीका करणं भाग होतं. परंतू वरील मताच्या लोकांनी आपल्या जाहीर भूमिकेला टांग मारून ट्रंप यांना मतदान केलं. हा व्यवहारही माध्यमांना समजला नाही.
मुलाखती, पहाण्या आणि एक्झिट पोल ही साधनं वापरून तयार केलेले अंदाज खोटे ठरले. यामधे काही शक्यता दिसतात. लोकमत जाणून घेण्याची साधनं अपुरी आणि अकार्यक्षम ठरत असावीत. समाजातले खूप मतदार त्यांची मतं माध्यमाकडं व्यक्त करत नसावेत. मतदार त्यांचं खरं मत माध्यमांना सांगत नसावेत. माध्यमं ‘ त्या ‘ मतदारांपर्यत पोचत नसावीत.
समाजातल्या कित्येक गटात आणि टापूत काय घडतं ते माध्यमांना कळत नाहीये अशीही शक्यता आहे. माध्यमं एका पारंपरीक रीतीनं पारंपरीक गटांत जातात आणि तिथली मतं गोळा करतात. ते काम परंपरेनं सोपं झालेलं असतं. व्यापार, फॅशन, कला, फायनान्स, सैन्यदलं, परीघ आणि परिघाचा परिसर अशी अनेक क्षेत्रं माध्यमाच्या आवाक्यात नाहीत.
अनेक अमेरिकन मतदारांनी सांगितलं जुलैमधे दोन्ही उमेदवार पक्के झाल्यावरच, पुढली प्रचार मोहिम सुरू व्हायच्या आधीच त्यांनी मतं पक्की केली होती. हिलरी क्लिंटन यांच्या सरकारी ईमेल हाताळण्याची चौकशी एफबीआयनं ऑगस्ट उलटून गेल्यानंतर खूप आठवड्यांनी उकरून काढली. बायकांची शारीरिक हाताळणी कशी करावी या बाबतच्या ट्रंपच्या जुन्या उद्गारांची स्फोटक माहिती ऑगस्ट उलटून गेल्यानंतरच माध्यमांनी प्रसिद्ध केली. त्याचा काहीही परिणाम त्या मतदारांवर झाला नाही. हे वास्तव माध्यमांना कळलं नाही.
उमेदवारांबद्दलची माहिती मतदारांपर्यंत पोचवणं आणि मतदारांना निर्णय घ्यायला मदत करणं हे माध्यमाचं काम असतं. माध्यमांनी ते केलं. क्लिंटन किंवा ट्रंप यांच्याबद्दलची त्यांनी प्रसारित केलेली माहिती योग्य होती, साधार होती. पण त्याचा परिणाम मतदारांवर झाला नाही. याचा अर्थ माहितीची परिणामकारता कमी होती असा होतो.
माहिती परिणामकारक करता आली नाही की लोकांची माहिती (सत्य) स्वीकारण्याची तयारी नव्हती? ट्रंप याचं चारित्र आणि क्षमता संशयास्पद आहे असं सांगणारे पुरावे माध्यमं सतत प्रसिद्ध करत होती. जितके जास्तीत जास्त पुरावे माध्यमांनी मांडले तितकं ट्रंप समर्थकांचा ट्रंप यांचा पाठिंबा अधिकाधीक पक्का होत गेला. ज्या अर्थी माध्यमांना ट्रंपांची अयोग्यता ठसवण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतोय त्या अर्थी ट्रंप खरोखरच योग्य आहेत असं ट्रंप समर्थक मानू लागले.
वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकानं निक्सन यांचं वॉटरगेट वर्तन उघड केलं. किती तरी महिने पोस्ट बातम्या देत होतं. निक्सन यांचे पाठिराखे सतत पोस्टवर पक्षपाती असण्याचा आरोप करत होते. पक्की माहिती हा पोस्टचा आधार होता. शेवटी निक्सन यांचा भ्रष्टाचार मान्य झाला आणि परिणामी निक्सन यांना सत्ता सोडावी लागली. बॉस्टन ग्लोब या वर्तमानपत्रानं ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या हीन वागणुकीवर पुरावे गोळा करून कित्येक आठवडे मोहिम करून माहिती प्रसिद्ध केली. ख्रिस्ती अमेरिका हादरली, ग्लोबवर धर्मनिंदेचे, पक्षपाताचे आरोप झाले. शेवटी जनतेनं सत्य स्विकारलं.
ट्रंप यांच्या विरोधात माध्यमांनी एकतरफी मोहिम चालवली हे खरं आहे. परंतू त्या मोहिमेला सत्याचा आधार होता. ट्रंप युनिवर्सिटी ही ट्रंप यांची संस्था बोगस, अनैतिक आणि बेकायदेशीर होती. विद्या, शिक्षण या कल्पनांच्या चिंधड्या ट्रंप युनिव्हर्सिटी उडवत होती. अमेरिकन शिक्षण खात्यानं त्या संस्थेची चौकशी करून संस्थेवर खटला भरला. हे सारं माध्यमांनी प्रसिद्ध केलं. आता बातमी आहे की ट्रंप आता कोर्टाबाहेर २.५ कोटी डॉलर देऊन मांडवळ करणार आहेत. मांडवळ कां? सत्य जर ट्रंप यांच्या बाजूचं असेल तर त्यांनी खटला लढवायला हवा.
अजूनही ट्रंप यांनी आपल्या आर्थिक व्यवहाराची, कर भरण्याची माहिती जाहीर केलेली नाही. अजूनही ओबामांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही या आपल्या विधानाला ट्रंप चिकटून आहेत. प्रचार मोहिमेत ते म्हणाले की त्यांनी अनेक डिटेक्टिव या कामी लावले असून त्यांच्या हाती ओबामा यांच्या जन्माबाबतचं सॉलिड सत्य त्यांच्या हाती लागलं आहे. आजवर ते सत्य त्यांनी जाहीर केलेलं नाही. तरीही लोकांनी ट्रंप यांनाच मतं द्यायचं ठरवलं असलं तर माध्यमं काय करणार?
माणूस निवडून आला की त्याला पवित्र करण्याची एक प्रथा समाजात रूढ होऊ पहात आहे. माध्यमांनी ज्याच्यावर टीका केली तो माणूस निवडून आला याचा अर्थ माध्यमं चुकीची असतात असं म्हणून निवडून आलेल्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचीही एक रीत रूढ होऊ पहात आहे. फिलिपिन्सचा अध्यक्ष जाहीरपणे म्हणाला की ओबामा हा एका वेश्येचा मुलगा आहे. माध्यमं खवळली. त्यांनी त्यांच्याकडं खुलासा मागितला. गडी खुलासा द्यायला तयार नाही. फिलिपिन्सचा अध्यक्ष भले बहुमत मिळवून निवडून आला असेल. तरीही तो माणूस जसा कसा आहे तसा तो असतोच आणि माध्यमं त्याचं असणं प्रसिद्ध करत असतात. तो निवडून आला आहे याचा अर्थ तो थोरच असतो असं मानायचं कारण नसतं. निदान माध्यमांनी तरी तसं मानता कामा नये.
ट्रंप यांना मतं द्यायचं लोकांनी ठरवलं होतं. माध्यमांना या लोकमताचा अंदाज आला नाही हे खरं आहे. लोकमत आजमावण्याची आपली साधनं या निमित्तानं माध्यमांनी तपासली पाहिजेत. परंतू लोकमताचा नेमका अंदाज आला नाही याचा अर्थ लोकमत शंभर टक्के योग्य असतं असंही मानायचं कारण नाही. हिलरी क्लिंटन यांच्यावर लोकांचा राग होता. ओबामा यांच्या आठ वर्षाच्या कारकीर्दीत देशाची परिस्थिती बिघडली होती. बेकारी वाढली होती, विषमता वाढली होती, आरोग्य व्यवस्था बिघडली होती, शिक्षण व्यवस्था बिघडली होती. ओबामांचीच धोरणं पुढं चालवण्यात अर्थ नव्हता. अशा परिस्थितीत उपलब्ध पर्याय लोकांनी निवडला. ट्रंप यांच्या जागी रुबियो किंवा जेफ बुश किंवा कोणी तरी असता तरीही कदाचित लोकांनी त्यांना निवडलं असतं. क्लिंटन यांच्या जागी बर्नी सँडर्स उभे असते तर कदाचित रिपब्लिकन लोकांनीही त्यांना निवडून दिलं असतं. सँडर्सना क्लिंटननी हुसकलं आणि चौदा प्रतिस्पर्ध्यांना ट्रंप यांनी हुसकलं. दोन बेकारांमधल्या एकाला निवडलं येवढंच.
माध्यमांची लोकमत जाणण्याची साधनं काहीशी अपुरी आणि अकार्यक्षम आहेत असाच या निवडणुकीचा अर्थ होतो. परंतू माध्यमं चुकली, ती पक्षपाती होती असं मानणं बरोबर नाही.
।।