पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक
Books
Living History
Martyn Lyons
।।
बुक्स, लिविंग हिस्टरी या पुस्तकात लेखक मार्टिन लियॉन्स म्हणतात ” छापील पुस्तकाला बॅटरी लागत नाही. त्याला व्हायरसही लागत नाही. पुस्तक बंद करताना ते सेव्ह करावं लागत नाही, कारण त्यातल्या मजकूर कायम सेव्ह्ड असतो.”
।।
वाचक हल्ली टॅब, रीडर,सेलफोन अशा उपकरणावर पुस्तकं वाचतात. त्या उपकरणावर पुस्तकं ऐकताही येतात. इकॉनॉमिक्स या साप्ताहिकाचा सगळा अंक ऐकता येतो. यू ट्यूबवर लेखकांची त्यांच्या पुस्तकांवरची भाषणं ऐकता येतात. दीड दोन तासाच्या भाषणात किंवा वाचकांच्या चर्चेत लेखक आपल्या पुस्तकाबद्दल बोलतात. वरील दिसणारा-ऐकू येणारा मजकूर कित्येक वेळा कित्येक पुस्तकांच्या बाबतीत भरपूर माहिती देतो.
एलेक्ट्रॉनिक साहित्य छापील पुस्तकं नष्ट करेल अशी भीती बऱ्याच लोकांना वाटते. टॅबवर, लॅपटॉपवर,सेल फोनवर वाचण्यापेक्षा छापलेलं पुस्तक वाचण्यात एक वेगळी मजा असते, ती मजा जाणार काय असं खूप वाचकांना वाटतं.
टीव्ही आणि इंटरनेटचा छापील वर्तमानपत्रांवर परिणाम झाला आहे, त्यांचा खप कमी झाला आहे. वर्तमानपत्रं एकूणातच क्षणभंगूर असतात, तिथला मजकूर मिनिटामिनिटाला शिळा होत असतो. छाप्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक मजकूर सतत ताजा असल्यानं वाचक छापा टाळून नेटवर बातम्या पाहतात, अलीकडं टीव्हीवरच्याही बातम्या टाळून नेटवर वेळोवेळी बातम्या वाचायची सवय लोकांना लागते आहे. थोडक्यात असं की छापा धोक्यात आला आहे.
पुस्तक हे मुळातच शांतपणे रवंथ करायचं प्रकरण असल्यानं तिथं घाई नावाचा प्रकार नाही. पुस्तक उघडावं. एकादी ओळ वाचतांना विचारात पडावं. पुस्तक तसंच उघडं रहावं. भानावर आल्यावर पुढलं वाचन सुरु करावं. वाटल्यास पानात खूण घालून पुस्तक बंद करावं. वाटल्यास पेन्सिलीनं खुणा कराव्यात, मार्जिनमधे गिचमिड अक्षरात प्रतिक्रिया टिपावी. शेजारी ठेवलेल्या छोट्या वहीत टिपण काढावं, स्वतःच्या अक्षरात. यातल्या बऱ्याच गोष्टी टॅबवर करता येतात. टॅब अगदी पुस्तकासारखा करण्याचा प्रयत्न चाललाय. त्यावर पानं उलटता येतात, टिपणं घेता येतात, मजकूर अधोरेखित करता येतो. ते खरं. पण पुस्तकाची मजा येत नाही. टॅब पुस्तकासारखाच करण्याचा प्रयत्न करतात, याचाच अर्थ पुस्तक विसरता येत नाही.
एलेक्ट्रॉनिक पुस्तकं जागा व्यापत नाहीत. एका छोट्या टॅबमधे, किंडलमधे शे दोनशे पुस्तकं मावतात, ती बरोबर घेऊन हिंडता येतं. म्हणजे आपलं पुस्तकालय कायम सोबत. त्यात सोय आहे. घरं लहान असतात. घरात अनेक वस्तू गर्दी करतात, एकमेकांशी लठ्ठा लठ्ठी करतात. फर्निचर.व्यायामाची साधनं. देव्हारा आणि तसविरी. वाद्यं. सजावटीच्या वस्तू आणि फुलदाण्या. या सगळ्यात पुस्तकांना जागा द्यावी लागते. गडबड उडते. पुस्तकांना जागा कमी पडते.
पुस्तकं बालक-वृद्धांसारखी असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यांना धुळीचा त्रास होतो. त्यांना दमट हवेचा त्रास होतो. उघडझाप न करता अनेक दिवस ठेवलं तर त्यांचे कणे-सांधे अवघडतात, दुखतात. चांगले कपडे घालून, नटून थटून पुस्तकं वाचकाला आपल्याकडं आकर्षित करत असतात. जेवढी पुस्तकं जास्त तेवढं तिकडं जास्त लक्ष द्यावं लागतं. टॅब ही एकच वस्तू. सांभाळायला सोपी.
तरीही माणसं हौसेनं, प्रेमानं पुस्तकं घरी आणतात, बाळगतात. म्हणूनच एलेक्ट्रॉनिक आक्रमण होऊनही पुस्तकांचा खप कमी होत नाहीये. खप सतत संथ गतीनं वाढतच जातो आहे.
टिकून असलेल्या पुस्तकाची कहाणी प्रस्तुत पुस्तकात लेखकानं सांगितली आहे. लेखक इतिहास या विषयाचे अभ्यासक-प्राध्यापक आहेत. अलिकडं नुसतं इतिहास म्हटलं तर ऐकणाऱ्याचं समाधान होत नाही. त्याला अर्थाशास्त्राचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास, तंत्रज्ञानाचा इतिहास, वाचायचा असतो. लेखकानं पुस्तकाचा इतिहास अभ्यासला आहे.
इजिप्तमधे ओल्या मातीच्या चकत्यांवर मजकूर खोदला जाई आणि नंतर त्या चकत्या-विटा उन्हात वाळवल्या जात. या चकत्या विटा आजही शिल्लक आहेत. चीनमधे सुरवातीला जनवरांच्या कवट्या आणि कासवाच्या पाठीवर लिहिलं जात असे. नंतर लाकडी ठोकळ्यांवर लिहीत. भारतात ताडपत्रं, चर्मपत्रांवर लिहिलं जात असे. दोनेक इंच रुंदी आणि पाच सात इंच लांबीची एक पट्टी. एकेक पट्टी म्हणजे एकेक पान. मधे भोक पाडून या पट्ट्या दोरीत गुंफल्या जात असत. अशा गुंफल्या गेलेल्या पट्ट्यांचं पुस्तक होई. अनेक पानं एकत्र करून पुस्तक तयार करण्याची कल्पना प्राचीन भारतात विकसित झाली. इजिप्त, चीन इत्यादी ठिकाणी पानं (विटा, चकत्या,ठोकळे इ.) सुटी असत.
त्यानंतर बऱ्यापैकी टिकणाऱ्या ‘ कागदाची ‘ निर्मिती सुरु झाल्यावर गुंडाळी करता येण्यासारख्या कागदावर मजकूर लिहिला जाऊ लागला. पुस्तकाचा हा टप्पा युरोपात विकसित झाला. मजकूर तीसेक फूट लांबीच्या कागदावर लिहिलेला असे, त्याची गुंडाळी केलेली असे. तीस फूट लांब आणि एकाद फूट रूंद गुंडाळी. पपायरस, जनावरांची कातडी यापासून ‘कागद’ तयार केलेला असे. चीनमधे रेशमापासून तयार केलेल्या कापडाची गुंडाळी असे. गुंडाळी उलडून वाचत रहाणं हा कष्टकारक प्रकार होता.
पुंगळी वाचायला कठीण होती. सार्वत्रिक शिक्षण नसल्यानं वाचणारी माणसंही कमीच होती. राज्याचा हिशोब ठेवणारे, टिपणं ठेवणारे आणि धर्मजीवी माणसंच लिहत-वाचत. बाकीची जनता? एक माणूस पुंगळी उलगडून जाहीर वाचन करत असे. वाचन करणारे व्यावसायिक होते. शहरात एकादी खोपटी किंवा टपरी उभारून त्यात वाचणारा माणूस बसे. समोर पुस्तक ऐकणारी माणसं बसत.घरामधली माणसं वाचणाऱ्याभोवती गोळा होऊन पुस्तक ऐकत.
गुटेनबर्गनं टाईपचा शोध लावल्या. एका कागदावर लिहिलेल्या मजकुराच्या शेकडो, हजारो प्रती छापायची सोय झाली. पुस्तकं हातानं लिहिणं बंद झालं. पानं एकत्र करून पुस्तक तयार करण्याची पद्धत सुरु झाली. पुंगळीची जागा अनेक पानांच्या पुस्तकानं घेतली.
तिथून वैयक्तिक वाचन सुरु झालं. जाहीर वाचन बंद झालं. माणूस पुस्तक घेऊन शांतपणे, निवांतीनं वाचन आणि चिंतन करू लागला. वाचून दाखवणारा माणूस इतिहास जमा झाला. एकेकाळी ख्रिस्ती धर्मगुरू बायबल वाचून दाखवत. माणसं स्वतंत्रपणे बायबल वाचू लागल्यावर धर्मगुरु खवळले. त्यांनी व्यक्तिगत वाचन हे पाखंड आहे असं जाहीर केलं. ख्रिस्ती माणसं धर्मगुरूंना टांग मारून वाचू लागली.
इस्लामी संस्कृतीच्या सुरवातीच्या काळात वाचण्यासारखा मजकूर म्हणजे कुराण. कातीब म्हणजे मजकूर लिहिणारे कसबी कारागीर हातानं चर्मपत्रावर हातानं लिहून कुराणाच्या प्रती काढत. गुटेनबर्गचा छापखाना युरोपभर पसरला पण इस्लामी जगानं तो स्वीकारला नाही. कुराण कागदावर छापायला ऑटोमन राज्यात परवानगी नव्हती. १८४० मधे महंमद पाशानं कुराण छपाईवरची बंदी उठवली आणि पहिल्या प्रथम कुराणाच्या प्रती कागदावर छापल्या गेल्या.
छपाईसाठी कागदाचा वापर प्रथम चीनमधे तयार झाला. चिंध्यांचा लगदा तयार करायचा, तो लगदा जाळीवर पसरून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर तो घट्ट दाबून पातळ करायचा आणि वाळवायचा.
लाकडी ठोकळे वापरून छपाई करायची कला गुटेनबर्गच्या किती तरी शतकं आधी चीनला माहित होती. चीनमधे चित्राक्षरं होती. लक्षावधी चित्रं वापरून लिहावं लागत असे. रोमन, इंग्रजीमधे २६ अक्षरांचा मामला होता. त्यामुळं लाकडी ठोकळ्यांचा वापर करून अनेक प्रती काढणं शक्य झालं. पहिल्यांदा गुटेनबर्गनं बायबल झापलं. टाईप सेटिंग करून पुस्तक छापायला दोन वर्षं लागली. दोन वर्षात १८० प्रती छापल्या. पैकी १५० कागदावर आणि ३० चर्मपत्रावर. बायबलची एक प्रत तयार करायला तीन वर्षं लागत.
छपाईचा वेग वाढल.नंतर औद्योगीक क्रांती झाली. पुस्तकं स्वस्त झाली. माणसं खूप वाचू लागली. वाचन ही श्रीमंतांची मिरासदारी बरखास्त झाली. छोटीछोटी रंजक पुस्तकांची भरमार झाली.डिकन्सच्या कादंबऱ्या लाखो माणसं वाचू लागली. पुस्तकांचा खप कायच्या काय वाढला. रंजक कथा आणि कादंबऱ्या माणसं वाचू लागली. वर्डस्वर्थ हा कवी नाराज झाला. त्याची कवितांची पुस्तकं खपेनात. वर्डस्वर्थ म्हणू लागला की लोकांची अभिरुची बिघडलीय.
पुस्तकं वाचल्यानंतर लोक विचार करू लागले. विचार करू लागले आणि प्रश्न विचारू लागले. फ्रान्समधे धनिक लोक घरात निरक्षर नोकर ठेवत. कारण निरक्षर माणूस प्रश्न विचारत नसे. फ्रेंच समाजात वाचन वाढल्यावर राजवटींना प्रजा जाब विचारू लागली. फ्रेंच राज्यक्रांती झाली.
पुस्तकं विचार पसरवतात. वेगळा विचार आपल्या समाजात येता कामा नये असं राजवटींना वाटतं. पुस्तकांवर बंदी घातली जाते. पुस्तकं जाळली जातात.
प्राचीन काळापासून ते इंटरनेटच्या आक्रमणापर्यंतचा काळ लेखकानं या पुस्तकात मांडलाय. पुस्तकातली विपुल चित्रं आहेत, माहितीपूर्ण आणि देखणी. कबरीवर दगडामधे कोरलेल्या पुस्तकाचं शिल्पाचं छायाचित्र पुस्तकात आहे. चर्मपत्रं, ताडपत्रं यावर लिहिलेल्या मजकुराची चित्रं पुस्तकात आहेत. चिनी पुस्तकं आणि इजिप्शियन पुस्तकाची चित्रं पुस्तकात आहेत. गुटेनबर्गचा छापखाना पुस्तकात आहे. पुस्तकाची बांधणी, टाईप, सजावट यामधे काळानुरूप झालेले बदल या पुस्तकात सुंदर चित्रांत दाखवलेले आहेत.
पुस्तक देखणं आहे, वाचनीय आहे. वाचतांना विचार करायला लावतं.
लेखकाची इतर काही पुस्तकं अशी.
History of Reading and Writing in the Western World.
The writing culture of ordinary pepole in Europe.
The History of Books in Australia.
Post revolution Europe.
Reading culture and writing practices in France
Ordinary Writings, Personal Narratives; writing practices in 19th and early 20th century Europe.
।।
One thought on “पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक”
I appreciate you sharing this article post. Much obliged.