‘ वांटेड १८ ‘ दहशतवादी गायी

‘ वांटेड १८ ‘ दहशतवादी गायी

Wanted 18.
गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते? 
  इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली होती, पोस्टवर गायीचं चित्रं. ही पोस्टरं भिंतोभिंती डकवण्यात आली होती.
हाच विषय घेऊन आमेर शोमाली (पॅलेस्टिनी) आणि पॉल कोवन(कॅनडा) यांनी केलेली वाँटेड १८ नावाची फिल्म २०१५ मधे प्रदर्शित झाली. कॅनडा, अमेरिका, युरोप, पॅलेस्टाईन इत्यादी प्रदेशांत फिल्म लोकांनी पाहिली. अनेक महोत्सवांत ती दाखवली गेली, ऑस्करसाठीही पाठवण्यात आली.
चित्रपटाला म्हटलं तर राजकीय नेपथ्य आहे. १९८० च्या दशकात पॅलेस्टाईनच्या लढ्यानं तीव्र स्वरूप धारण केलं होतं. हा लढा इंतिफादा या अरेबिक नावानं ओळखला जातो. इंतिफादा या शब्दाचा अर्थ झटकून टाकणं. एकादी पाल  किवा झुरळ अंगावर पडलं की माणूस अंग झटकतो, त्या प्राण्यांना दूर सारतो. इंतिफादाचा अर्थ इसरायलची सत्ता झटकून टाका. इसरायल सरकारनं पॅलेस्टाईन व्यापलं होतं. बेकायद्शीर रीत्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करून पॅलेस्टाईनमधल्या गावांचा ताबा इसरायली सैनिक घेत होते. इसरायलचा कब्जा नाहिसा व्हावा यासाठी पॅलेस्टिनी लोकांनी हिंसक, अहिंसक, सनदशीर इत्यादी अनेक वाटांचा अवलंब करून पाहिला. इसरायल हटेना. अशा स्थितीत झटकून टाका आंदोलन सुरु झालं.
पॅलेस्टिनी गावातील लोकांनी इसरायल सरकारशी असहकार सुरु केला. कर देणं बंद केलं. कर स्वतःच्या सरकारला द्यायचा असतो, आक्रमकांना नव्हे असं पॅलेस्टिनीनी जाहीर केलं. इसरायली मालावर त्यानी बहिष्कार घातला. भडकलेल्या इसरायलनं दडपादडपी करायला सुरवात केली. कर न भरल्याबद्दल पॅलेस्टिनी नागरिकांची घरं, दुकानं, दवाखाने, मालमत्ता, गाड्या जप्त करायला सुरवात केली. पॅलेस्टिनी नागरीक विरोध करत. इसरायली पोलिस संचारबंदी जाहीर करून लोकांना घरात डांबून ठेवत. कित्येक दिवस. त्या काळात घरोघरी जप्ती अमलात येत असे. जप्तीच्या आड येणाऱ्यांना तुरुंगवास सहन करावा लागे. पॅलेस्टिनी रस्त्यावर येऊन निदर्शनं करत. पोलिस गोळ्या घालत.
बेट साहूर या गावातल्या लोकांनी इसरायली मालावर बहिष्कार घातल्यावर स्वावलंबी व्हायचं ठरवलं. वर्गणी काढून त्यानी इसरायलमधूनच १८ गायी विकत आणल्या. पॅलेस्टिनी लोकाना गाय काय असते ते माहित नव्हतं, ती कशी पाळायची ते माहित नव्हतं. त्यांनी एक तरूणाला अमेरिकेत पाठवलं,  गोपालन आणि दुधव्यवसायाचं प्रशिक्षण दिलं,  कामाला जुंपलं. गाव दुधाबाबत स्वयंपूर्ण झालं. गाय हे पॅलेस्टिनी अस्मितेचं प्रतिक झालं. सारं गाव गायींची सेवा करत असे. शाळेतली मुलं सहल काढून गोठ्यात जात. गावातल्या लोकांना गायींचा लळा लागला.
इसरायलं दुखावलं. पॅलेस्टिनी माणसं स्वायत्त होताहेत याचं त्यांना दुःख झालं. त्या विभागाचा गव्हर्नर गावात आला आणि म्हणाला की गायी सरकारकडं सुपूर्द करा. लोकांनी कारण विचारलं. इसरायलच्या सुरक्षिततेला गायींचा धोका आहे असं गव्हर्नर म्हणाला.लोक खो खो हसले. गव्हर्नर चिडला. म्हणाला की चोविस तासात गायी सूपूर्द नाही केल्यात तर गावावर कारवाई करावी लागेल. गायी सुपूर्द तरी करा नाही तर खाटकाकडं पाठवून  मारून तरी टाका.
गाव तर गायींच्या प्रेमात पडलेलं. त्यांनी गायी लपवायचं ठरवलं. गावाबाहेरच्या एका पडीक दुमजली घरात त्या गायीना लपवलं. गायींवर पांघरुणं घातली. गायी हंबरल्या तर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात संगित वाजवलं. पोलिस गायी शोधत. सापडेनात. पोलिस हैराण. गावातले लोक दुधदुभत्यात सुखी दिसतात. गायी नाहीत तर दूध कुठून येतं? पोलिस हैराण. गोठा कुठं आहे, दुधाचं वितरण कसं होतं याचा शोध पोलिस घेत. गावात एक डॉक्टर होता. त्याची एक अँब्युलन्स होती. डॉक्टर अँब्युलन्समधे दुधाच्या बाटल्या लपवायचा. पोलिसांनी अँब्युलन्स अडवली की डॉक्टर म्हणायचा की तो रोग्यांना तपासायला जातोय.  
कित्येक महिने  गाय आंदोलन चाललं होतं. अमेरिकेचे प्रेसिडेंट बिल क्लिंटन यांनी इसरायल आणि पॅलेस्टाईनमधे समझौता घडवून आणल्यावर इंतिफादा आंदोलनाची आवश्यकता उरली नाही. मधल्या काळात गायींचं पोषण नीट झालं नाही.  एकाच जागी लपवून ठेवल्यानं त्यांचं आरोग्य बिघडलं. गायी मेल्या. फक्त चार गायी उरल्या. या चार गायी सांभाळणं परवडत नसल्यानं शेवटी डेअरी बंद करायचं ठरलं. मग या गायींचं काय करायचं? गावातल्या बायकांनी दुःखानं गायी खाटकाकडं पाठवायला परवानगी दिली.
गायी ट्रकमधून खाटकाकडं जात असतांना एक वासरू ट्रकमधून उडी मारून पळालं. असं म्हणतात की ते वासरू गावाबाहेरच्या उजाड-उध्वस्थ परिसरात विसावलं.  चित्रपटातला सूत्रधार या पळून गेलेल्या गायीचा शोध घेत वाळवंटात फिरतांना दिसतो आणि चित्रपट संपतो.
प्रत्यक्ष घटनेवर ही फिल्म आधारलेली असल्यानं हिचं वर्णन डॉक्युमेंटरी असं करता येईल. परंतू फिल्म हाताळताना दिद्गर्शकांनी गंमती केल्या आहेत. गावातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, डॉक्यूमेंटरीसारख्या. संकटात सापडलेल्या स्त्रियांही दिसतात. परंतू बरेचवेळा मुलाखती आणि त्या स्त्रिया कॉमिक पुस्तकातल्या चौकोनात दिसणाऱ्या रेखाचित्रांसारख्या वाटतात. आमेर शोमालीला मुळात एक कॉमिक शैलीचं  पुस्तक करायचं होतं. त्याची कल्पना कॅनडियन लोकांना आवडली आणि त्यांनी पुस्तकाऐवजी फिल्म करायचा आग्रह केला. त्यामुळं चित्रपटाला मधे मधे कॉमिकची ट्रीटमेंट आहे.
वास्तवाच्या कचाट्यातून सुटलेल्या चित्रपटाला फीचर फिल्म म्हणतात. फीचर फिल्मला एक कथानक असतं. बेट सहूरमधे तर प्रत्यक्ष घटनाच होत्या. दिद्गर्शकांनी गायींना पात्रं बनवून डॉक्यूमेंटरीचं रुपांतर फीचर फिल्ममधे केलं.
सिनेमात गायी आपसात बोलतात. इसरायलमधे ट्रकवर चढवलेल्या या गायी पॅलेस्टाईनमधे जायला तयार नसतात. 
एक सीनियर गाय म्हणते “मला बाई ते पॅलेस्टिनी अजिबात आवडत नाहीत. काsssही काम करत नाहीत. नुसती आंदोलन करत असतात, इंतिफादा करत असतात.” 
ट्रकवरची एक तरूण गाय पॅलेस्टाईनमधे टीव्ही पहायला मिळेल की नाही या मुद्द्यावर खंतावलेली असते. तिला फूटबॉल आवडत असतो. ती मेराडोनाची फॅन असते. इसरायलमधे ती ज्या दूधकेंद्रात होती तिथं तिला टीव्ही पहायला मिळत असे. 
एक तरूण गाय गाभण असते. पॅलेस्टाईनच्या रखरखाटात बाळंत व्हायची तिची तयारी नसते. बेट सहूरमधे ती बाळंत होते तेव्हां इतर अकरा जणी तिला सतत धीर देत असतात, जोर कर, धीर धर अशा सूचना करत असतात.
  अनुभव नसलेला पॅलेस्टिनी दूध काढायला बसतो तेव्हां ती गाय त्याला सांगते “धसमुसळेपणा करू नकोस. मी यंत्र नाहीये, गाय आहे. नीट दूध काढ.”
ट्रक गायींना घेऊन खाटकाकडं निघालेला असतो तेव्हां सीनियर गाय  वासराला सांगते “पळ. निघून जा, जीव वाचव.” त्या छोट्या वासराला आपण खाटकाकडं जातोय म्हणजे काय होतंय ते कळत नसतं. ते खोळंबून रहातं. सीनियर गाय त्याला ट्रकबाहेर ढकलते.
गायींची दृश्यं अॅनिमेशन करून दाखवली आहेत. काही वेळा माणसंही अॅनिमेशनमधेच दाखवली आहेत. कॉमिक आणि फिल्म या दोन तंत्रांचं मिश्रण दिग्दर्शकांनी साधलं आहे.
बेट सहूर गाव आणि इंतिफादा आंदोलनाची काही दृश्य खऱ्या डॉक्यूमेंटरीमधून घेऊन चित्रपटात मिसळली आहेत.
फिल्म पहाताना चार्ली चॅप्लीनच्या पटांची आठवण येते. समोर पात्रांची धांदल चालत असते. धांदल आपल्याला हसवते. पण त्यातलं कारूण्य लपत नाही. हसता हसता डोळ्याच्या कडांमधे पाण्याचा एक थेंब थबकलेला असतो. वाँटेड १८ मधे गायीना दहशतादी ठरवणं, त्यांचे फोटो काढून ते फोटो घेऊन पोलिसानी गावात फिरणं प्रेक्षकाला फार काळ हसवू शकत नाही. गायींचे हाल, पॅलेस्टिनी लोकांचे हाल. 
चित्रपटात अलंकरण नाही. चित्रपट रंगीत नाही. पात्रं, प्रसंगांची गुंफण, प्रसंगांचं चित्रिकरण ओबड धोबड आहे. २०१५ सालात सिनेमाचं तंत्र कायच्या काय पुढं गेलेलं असताना हा चित्रपट अगदी प्राथमिक तंत्रानं तयार केलाय. कदाचित हाताशी पैसे नसल्यानं सोपं तंत्र वापरलं असेल. कदाचित विचारपूर्वक तसं केलं असेल. चित्रपट महोत्वाच्या कुशल चित्रटांच्या गर्दीत    तो वेगळा वाटतो, अंगावर येतो. स्वतंत्रपणे संदेश वगैरे देण्याची आवश्यकता उरत नाही. 
एकूण चित्रपट पहाता तो महिना दोन महिन्यात सहज उडवता येण्यासारखा आहे असं वाटतं. तरीही पाच वर्षं लागली. कारण एक दिग्दर्शक कॅनडात आणि दुसरा पॅलेस्टाईनमधे. आमेर शोमालीला इसरायल सरकारनं प्रवास करायला परवानगी नाकारली होती, व्हिजा दिला नव्हता. एकमेकापासून हज्जारो मैल दूरवर राहून दोघांनी सिनेमा केला.सिनेमा अनेक महोत्सवांत दाखवला गेला तेव्हांही आमेर तिथं जाऊ शकला नाही.
इसरायली पारतंत्र्यात दूध डेअरी चालवून बेट सहूरनं दूधस्वातंत्र्य मिळवलं.
आमेरनं पॅलेस्टाईमधेच वास्तव्य करून फिल्म तयार केली.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *