लंडन ते यिवू, १२ हजार किमीचा रेलमार्ग

लंडन ते यिवू, १२ हजार किमीचा रेलमार्ग

लंडनहून १० एप्रिल २०१७ रोजी निघालेली रेलगाडी २९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पश्चिम चीनमधल्या यिवू शहरात पोचली. १२ हजार किमीचा प्रवास या गाडीनं पार पाडला. गाडी दोन दिवस आधीच यायला हवी होती, वाटेतल्या अडचणींमुळं उशीर झाला. गाडीमधे ८८ कंटेनर्स होते. कंटेनर्समधे ब्रीटनची खासमखास स्कॉच व्हिस्की होती, काही यंत्रसामग्री होती, औषधं होती, डिझायनर लोकांनी तयार केलेले खासमखास कपडे होते.

चीनमधल्या श्रीमंत लोकांना स्कॉच आवडते आणि लंडनमधे डिझाईन झालेले कपडे आवडतात. वाट्टेल ती किमत मोजायला चिनी माणसं तयार असतात. हा सारा माल बोटीनं पाठवला असता तर ३० ते ४५ दिवस लागले असते. बोटीनं माल उशीरा पोचला असता पण किमत कमी झाली असती. कारण एका बोटीवर १० ते २० हजार कंटेनर माल चढवता येतो. त्या मानानं येवढा प्रवास करून ८८ कंटेनर पोचवणं तसं महागच पडतं. आणि समजा स्कॉच दीड महिना उशीरा पोचली तर काय मोठंसं बिघडणार होतं? काहीसा आतबट्ट्याचा असला तरी व्यवहार पार पाडण्यात चीन आणि ब्रीटनला इंटरेस्ट होता कारण दोन देशांमधला रेल व्यवहार सुरु होणार होता.

ब्रीटन युरोपियन युनियनच्या बाहेर पडतंय. गेली दोनेक वर्षं ब्रीटनमधली जनता आपलं मन त्या दिशेनं तयार करतेय. ब्रिटीश व्यापारी आणि राज्यकर्त्यानी युरोपियन बाजाराच्या बाहेर पडण्याची पूर्वतयारी करून ठेवलेलीय. युरोपच्या पलिकडं जाऊन जगभरच्या बाजारपेठांशी संबंध प्रस्थापित करायला ब्रीटननं सुरवात केलीय. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे लंडन-यिऊ रेलवे वहातुक.

चीननं हुशारीनं जग काबीज करण्याची आखणी १९९० पासूनच सुरु केलेली दिसते. चीन वरवर जगाशी भांडतं. रशियाबरोबर भांडण; युरोप आणि अमेरिकेशी भांडण.  युरोप अमेरिकेशी भांडणाला लोकशाही आणि मानवी अधिकाराची  झालर. अमेरिकेबरोबरच्या भांडणात अमेरिकन बाजारपेठ काबीज करणं हा एक मुद्दा. ही भांडणं सुरु असली तरी भांडणात गुंतलेल्या देशांशी चीन व्यापार मात्र सुरु ठेवतं.  १९८० च्या दशकात  देंग यांच्या कारकीर्दीत औद्योगीक उत्पादन वाढवायचं आणि जगाच्या बाजारात चिनी माल उतरवायचा असा विचार चीननं केला. रशियातला सैबेरियापार रेलवे रस्ता वापरणं आपल्या फायद्याचं आहे असा विचार चीननं केला. १९१५ पासून अस्तित्वात असलेल्या  वलाडिवोल्सोक ते मॉस्को या  ९००० किमी लांबीच्या रेलवेला आपली रेलवे जोडून युरोपात पाय ठेवायचं चीननं ठरवलं. राजकीय मारामाऱ्या चालत असतानाही आतल्या आत चीननं रशियाशी रेलसंबंध वाढवले.

चीन आणि बाकीचं जग यामधे नानाविध संबंध इसवी सनापूर्वी दोनेक हजार वर्षांपासून होते. चीनमधून सडकेच्या वाटेनं आशिया आणि युरोपमधे मालाची ये जा होत असे. ठराविक असा रस्ता नसला तरी युरोपकडं जाणाऱ्या या वाटेला  रेशमी वाट म्हणत कारण चीनमधे होणारं रेशीम या वाटेनं युरोपात पोचत असे.

रोमन साम्राज्य मोडलं. बायझंटाईन साम्राज्य लयाला गेलं. नंतर ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला. एका मोठ्या साम्राज्याच्या जागी अनेक देश अशी स्थिती झाली. प्रत्येक देश आपल्या हद्दीतून जाणाऱ्या मालावर जकाती घालू लागला.सडकेनं वाहतूक अशक्य झाली. जलवहातुकीचं तंत्रज्ञान विकसित झालं. युरोपातल्या मोठाल्या बोटी आफ्रिकेला वळसा घालून चीनकडे येजा करू लागल्या तशी  रेशमी वाट कोणी वापरेनासं झालं. मधल्या काळात चीनची रेशमाची एकाधिकारशाही संपली आणि औद्योगिक उत्पादनात युरोप आघाडीवर गेलं. युरोपीय देशांनी रेशीम वाट सोडली, जलवाट वापरायला सुरवात केली.

परंतू १९८० नंतर चीननं प्राचीन रेशीम वाटेचं महत्व ओळखलं. कित्येक शतकं जगापासून एकाकी पडलेल्या चीननं १९८० नंतर औद्योगिक उत्पादनात उचल खाल्ली. उत्पादनाची प्रचंड क्षमता आपल्यात आहे आणि पूर्वीसारखाच चीन हा देश एक बलाढ्य श्रीमंत देश होऊ शकतो हे देंग यांना समजलं. दळणवळण ही समृद्धीची पूर्वअट असते हे ओळखून चीननं रेलवे विस्ताराचा आणि रस्त्यांचं जाळं विणण्याचं ठरवलं. रशियात आधीपासून असलेल्या वलाटीवोस्टोक-मॉस्को रेलवेला  चिनी रेलवे तर चीननं जोडलीच. परंतू स्वतंत्रपणे युरोपातल्या शहरांना, बाजारपेठांना जोडणाऱ्या रेलवे वाटा चीननं तयार करायला घेतल्या.

रेलवे वाटा तयार करत असतानाच समांतर पातळीवर चीननं औद्योगिक प्रगतीला वेग दिला. पूर्व किनाऱ्यावर काही निवडक शहरांचा विकास चीननं सुरु केला. परदेशातून भांडवल आणि तंत्रज्ञान आणून चीननं जगाच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या मालाचं महाकाय उत्पादन सुरु केलं. पूर्वेकडल्या शहरांचा विकास करत असतानाच चीन सरकारनं  पश्चिम चीनमधी यिवू (चाँगकिंग) हे शहर  खास खटपट करून विकसित केलं. यिवूच्या परिसरात कोळसा आहे, लोखंड आहे, बॉक्साईट आहे. अगदी अलिकडं टीव्ही-कंप्यूटरचे मॉनिटर-स्क्रीन तयार करण्यासाठी आवश्यक असणारं मूलद्रव्यंही तिथं विपुल प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन चीननं यिवू विकसित केलं. यिवूत काय होत नाही? मोटारी, विमानं, रेलगाड्या, ट्रक, कंप्यूटर, इत्यादी इत्यादी सर्व तिथं होतं. औद्योगिक उत्पादनासाठी लागणारं तंत्रज्ञान चीननं विकत घेतलं, आपले विद्यार्थी अमेरिकेत शिकवून आणून त्यांच्या करवी नवं तंत्रज्ञान चीननं वापरलं. आज यिवू शहराचा विकास येवढा झालाय की  यिवूकडं विमान झेपावतं तेव्हां प्रवाशाला क्षणभर आपण न्यू यॉर्कमधे उतरतोय असा भास होतो.

यिवूची उभारणी जमिनीला समांतर न करता काटकोनात करण्यात आली. दोनेक कोटी माणसं छोट्या शहरात रहायची तर उंच इमारतींशिवाय गत्यंतर नाही. पण रेलवेही आवश्यक होती. रेलवेचे रूळ आणि इमारती यांची सांगड कशी घालायची? टोलंजंग इमारती दाटीवाटीनं उभ्या केल्यामुळं रेलवे उभारतांना अडचणी आल्या.  इमारतीमधून रेलवे नेण्यात आली. पंचवीस मजली इमारतीच्या बाराव्या पंधराव्या मजल्यांच्यामधून रेलवे गेली. इमारतीतल्या रहिवाशाना रेलेवेच्या धावण्याच्या आवाजाचा आणि हादऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणून एक तांत्रीक व्यवस्था करण्यात आली.

चिनी कार आणि ट्रक युरोपात जायला हवेत. वाटेत कझाकस्तान, ताजिकिस्तान इत्यादी देशातही जायला हवेत. बोटीनं त्या वस्तू पाठवायच्या म्हणजे वेळ लागतो. शिवाय एका बोटीला पुरेल येवढा म्हणजे फार मोठा ऐवज तयार करावा लागतो. त्या मानानं रेलवेनं कमी संख्येनं माल पाठवणं शक्य होतं.  चीननं नव्या रेलवे रेशीम वाटेची योजना आखली. युरोपातल्या ८ मोठ्या शहरात पोचण्यासाठी रेलवे मार्गांची योजना चीननं आखली आहे.  गाड्या यिवूपासून सुरू होतील. सध्या यिवू आणि हँबर्ग रेलवे रस्ता तयार आहे. याच वाटेनं ह्यूलेट पॅकार्ड कंपनीनं आपले लॅपटॉप आणि टीव्ही चीनमधे पाठवले. माद्रिद ते यिवू असाही मार्ग तयार झाला आहे. यंदा या वाटेनं स्पेनमधलं ऑलिव्ह तेल चीनमधे पोचलं आहे. एक वाट तुर्की आणि इराणमार्गे युरोपात नेण्याची खटपट चालली आहे. चीनमधली १२ शहरं रेलवेनं युरोपला जोडली जाणार आहेत. त्यासाठी चीननं १५ लाख कोटी डॉलर गुंतवायची तयारी ठेवली आहे. सध्या युरोपातला माल चीनमधे जातोय. जेव्हां चिनी माल युरोपात जाऊ लागेल तेव्हां जगाचा व्यापारी तोल बदलून जाईल.

यिवूपासून जर्मनी, स्पेन, ब्रीटननधे जाणारा काही हजार किलोमीटरचा मार्ग कझाकस्तान, ताजिकिस्तान, किरगिझीस्तान, आर्मेनिया, रशिया, बेलारूस या देशांतून जातो. युरोपातल्या रेलमार्गाची रुंदी ब्रॉड गेज म्हणजे ४ फूट साडे ८ इंच आहे. परंतू रशियातल्या रेलवेमार्गाची रुंदी अरूंद म्हणजे ३ फूट ६ इंच आहे. जिथं रुंदी बदलते तिथं कंटेनर एका गाडीतून उचलून दुसऱ्या गाडीत ठेवावे लागतात. बरीच कटकट आहे.  ही कटकट अजून नीटशी आटोक्यात आलेली नसल्यानंच प्रवास दोन तीन दिवसानी लांबतो आहे.

वाटेत अनेक देश आणि अनेक सरहद्दी आहे. म्हणजे परवानग्या आल्याच. वाटेत बराच वैराण भाग आहे, त्या भूभागांना  लुटमारीचा इतिहास आहे.  सशस्त्र पहाऱ्यांची सोय करून  रेलवे कंपन्यानी सुरक्षेची व्यवस्था केली आहे. यिवू ते युरोप रेलवेची व्यवस्था चिनी आणि जर्मन कंपन्या संयुक्तपणे हाताळतात. काय गंमत आहे पहा. रशिया युक्रेन गिळायच्या प्रयत्नात आहे. रशियाच्या युक्रेन आक्रमणाला जर्मनीचा विरोध आहे. जर्मनीनं त्या बाबत रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. जर्मनी आणि रशियात तणाव आहेत. पण चीन आणि जर्मनीमधला व्यापार रशियातून होऊ द्यायला रशिया तयार आहे.  राजकीय भांडणं एका बाजूला ठेवून  चीन-रशिया-जर्मनी-ब्रीटन हे देश आपापले   व्यापारी संबंध व्यवस्थित जपतात.

।।

 

2 thoughts on “लंडन ते यिवू, १२ हजार किमीचा रेलमार्ग

  1. राजकीय भांडणं बाजूला ठेवून आपापले व्यापारी संबंध व्यवस्थित जपावे हे या ४ देशानी दाखवून दिलं आहे हा आपला निष्कर्ष आवडला. नेहमीप्रमाणे एकूण लेखच वाचनीय आहे.
    मंगेश नाबर

  2. Does india have the guts to take back POK & Aksai Chin?? Even China knows that India is never going to take back this Kashmiri portions, so they built cpec through POK this is called GUTS. this is not their arrogance this is our failure. Does we have vision like one belt one road? No !! Then india should stop worrying about this n should support OBOR like other 28 heads of government. जा ईगो, राजकीय भांडणे बाजुला ठेवा व्यापारी संबंध प्रस्थापित करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *