अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब-आखाती-सुन्नी जगातलं अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था कतारनं ढवळून काढली हे कतारवरच्या बहिष्काराचं मुख्य कारण आहे.

सौदी अरेबिया, येमेन, बहारीन, इजिप्त आणि अरब अमिराती या देशांनी कतार बरोबरचे संबंध तोडले आहेत. केवळ दूतावास बंद करून ते देश थांबलेले नाहीत, त्यांनी कतारच्या सरहद्दी बुजवल्या आहेत, बहुदा व्यापार आणि दळणवळण थांबवलं आहे. एका परीनं कतारची कोंडीच करण्यात आली आहे. आपल्याच प्रयत्नामुळं हे सारं घडलंय असं ट्रंप यांनी ट्वीट केलंय. हा निर्णय होण्याआधी नेटके काही दिवस ट्रंप यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता.

कतार दहशतवादाला खतपाणी घालतं असा अरब देशांचा आरोप आहे. मुस्लीम ब्रदरहूड, हमास आणि हेझबुल्ला या तीन दहशतवादी संघटनांना कतार पैसे पुरवतं, शस्त्रं पुरवतं असं अरब देशांचं म्हणणं आहे. दहशतवादी संघटनांना मदत करताना कोणीही पुरावे मागे ठेवत नसतं. सगळा मामला गुप्त असतो. त्यामुळं कतारच्या दहशतवादात गुंतल्याचे पुरावे नाहीत. गंमत अशी की सौदी अरेबियाही दहशतवाद्यांना मदत करत असतो. सुरवातीला सौदीनं अल कायदाला मदत केली. नंतर आताही इराक, सीरिया, येमेन या ठिकाणच्या शिया विरोधी दहशतवादी गटांना सौदी मदत करतात.

ब्रदरहूड ही इजिप्तमधे निर्माण झालेली आणि वाढलेली संघटना इजिप्शियन राजकारणात सक्रीय आहे. महंमद मोरसी हे ब्रदरहूडमधे वाढलेले गृहस्थ एकदा इजिप्तचे राष्ट्रपती झाले होते.

हेझबुल्ला ही संघटना लेबनॉनमधे जन्मली.इराण-कतार यांनी ही संघटना जन्माला घातली, तिला पैसे आणि शस्त्रबळ पुरवलं. लेबेनॉनमधलं इस्रायलचं अस्तित्व संपवणं हे या संघटनेचं कर्तव्य होतं. हेझबुल्ला ही शिया  संघटना नंतर लेबेनॉनची हद्द ओलांडून सीरिया आणि इराकमधे शिरली. सीरियात या संघटनेनं असद यांना मदत केली.

सीरियातलं घनघोर युद्ध गुंत्याचं आहे. सीरियातली असद यांची राजवट शिया राजवट मानली जाते, तिला इराणचा पाठिंबा आहे कारण इराण शिया आहे. असद   राजवट क्रूर आहे, अमानुष आहे, तिनं सीरियामधला असंतोष अमानवी पद्धतीनं चिरडला. धर्माच्या पलिकडं जाऊन नागरीक या नात्यानं आपल्याला स्वातंत्र्य हवंय असं म्हणणाऱ्या लोकांना असद यांनी विषारी वायूचा वापर करून मारलं. तेव्हां सीरियातल्या असंतुष्ट विरोधकांना मदत करायला अमेरिका आणि अमेरिकामित्र सौदी अरेबिया पुढं सरसावले. सौदी अरेबियाला लोकशाहीचा पुळका आहे अशातला भाग नाही. असद हे शिया आहेत, असद यांना इराणचा पाठिंबा आहे म्हणून सौदी या युद्धात पडले. इराण हा शिया देश जगभरच्या मुसलमानांममधे आपला प्रभाव वाढवू पहातो हे सौदीला मंजूर नाही.   खोमेनींच्या दहशतीकडं मुसलमान आकर्षित व्हायला लागल्यावर सौदी अस्वस्थ झाले होते. इराणला पायबंद घालण्यासाठी म्हणूनच सौदी सीरियात उतरले, असद  विरोधकांना पाठिंबा-पैसा-शस्त्र देऊ लागले.

असदविरोधक म्हणजे एक परस्पर विसंगतांचं गाठोडं आहे. त्यात लोकशाहीवादी आहेत, अरब जमाती आहेत, सैन्यातले बंडखोर आहेत, आयसिस आहे, अल कायदा आहे. या लोकांचं आपसात बिलकुल पटत नाही. प्रत्येकाला सत्ता हवी आहे. असद विरोध हा एकच  त्यांच्यात समाईक मुद्दा आहे. असद यांच्या बाजूनं हेझबुल्ला आहे. म्हणजे सैन्यातले बंडखोर वगळता विरोधक दहशतवादी आहेत आणि असद व त्यांच्या मागं उभं असलेला हेझबुल्ला हेही दहशतवादी आहेत. म्हणजे सीरियातला लढा दोन दहशतवादी विरोधात तीन दहशतवादी असा  आहे.

कतार हेजबुल्लाला म्हणजे असदला मदत करत आहे असा सौदीचा आरोप आहे. कतारनं हा आरोप खरा नाही असं जाहीर केलंय.

तिकडं पॅलेस्टाईनमधे हमासनं इस्रायलविरोधात लढाई चालवलीय. हमासलाही कतारचा पाठिंबा आहे असं सौदीगटाचं म्हणणं आहे. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा असल्यानं नाईलाजानं कां होईना पण सौदीगट हमासवर नाराज आहे.

येमेनमधे सौदी अरेबिया आपलं बाहुलं सत्तास्थानावर बसवण्याच्या नादात आहे. इराणला त्यांचं बाहुलं तिथं हवंय. इराण आणि सौदी अरेबिया तिथं चाललेल्या यादवीत आपापल्या गटाला गनीम, शस्त्रं, दारूगोळा आणि पैसा पुरवत आहे. तिथंही कतारची इराणला मदत आहे हे सौदीचं दुखणं आहे.

थोडक्यात असं की पश्चिम आशियातल्या अरब-आखाती प्रदेशातल्या घालमेलीमधून कतारवरची कारवाई जन्मली आहे. मारामारी आहे ती सुन्नी आणि शिया गटांमधली. सौदी, इजिप्त, बहारीनं, येमेन इत्यादी सुन्नी देशांना आखाती-अरब प्रदेशाचं नायकत्व हवं आहे. इराण हा शिया देश त्या नायकत्वाला आव्हान देतोय. कतार इराणला मदत करतोय हे कतार कोंडीचं मुख्य कारण आहे.

दुसरंही एक कारण आहे. सौदी आणि कतार राज्यकर्ते स्वतःला अब्दुल वहाबचे वंशज म्हणवतात. पण सौदी राज्यकर्त्यांना वाटतं की कतार राज्यकर्ते वहाबी नाहीत, कमी प्रतीचे आहेत. त्यामुळं शक्य होईल तेव्हां कतारींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सौदी उत्सूक असतात.

अमेरिकेनं म्हणजे ट्रंप नावाच्या एका चक्रम रिअलिटी शोवाल्या माणसानं या कोंडीत सौदीच्या बाजूनं माप टाकलं आहे. या भानगडीत मुसलमान देश आपसात भांडून अशक्त होणार असतील तर बरंच झालं असा एक विचार असावा. शिवाय या भानगडीत अमेरिकेची शस्त्रंही खपत आहेत. ट्रंप सौदीला हज्जारो करोडो रुपयांची शस्त्रं विकत आहे. यातून एकीकडं अमेरिकेत लाखो रोजगार होतील. पण दुसरीकडं ही शस्त्रं सौदीगट बहुतांशी आपल्या विरोधकांना खतम करण्यासाठीच वापरणार आहे. म्हणजे येमेन, सीरिया, इराक, इजिप्तमधे ब्रदरहूड-हमास-हेजबुल्ला यांच्या विरोधात वापरणार आहे. हमास-हेझबुल्लाना नेस्तनाबूत करणं म्हणजे इस्रायलला मदत करणं. हे अमेरिकेच्या हिताचं आहे. एकूणात अमेरिकेला फायदाच फायदा असा हिशोबही या भानगडीत दिसतो.

कतार कोंडीला काहीशी आर्थिक बाजूही अर्थातच आहे. कतारमधे जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे. कतार आणि इराण हे नैसर्गिक वायूचे अड्डे आहेत. सौदी, कुवैत इत्यादी देश तेल अड्ड्यांचे मालक आहेत. सौदीच्या तेल अड्ड्याला कतारच्या वायू अड्ड्याचं आव्हान असंही काहीसं स्वरूप या कोंडीला आहे. तेलाच्या किमतींना काही प्रमाणात वायूच्या किमती शह देऊ शकतात.

एक अगदी स्वाभाविक प्रश्न पडतो की कतार हा सुन्नी देश सौदीगटातल्या सुन्नी देशांच्या विरोधात कां? इराण हा शिया देश असूनही कतार हा सुन्नी देश त्यांच्याबरोबर कसा? शिया सुन्नी हे इस्लामच्या जन्मापासून चालत आलेलं वैर सुन्नी-शिया देशांना, इराण आणि कतार या देशांना कसं एकत्रं आणू शकतं? प्रश्न चमत्कारिक आहे खरा. पण त्याचं उत्तर सैद्धांतिक नसून व्यवहारामधे सापडण्यासारखं आहे. सौदी गटातले देश आणि कतार यांच्या घडणीमधे वरील प्रश्नाची काही उत्तरं सापडतात.

कतारचे सध्याचे राज्यप्रमुख अल थानी हे या सगळ्या भानगडींचे निर्माते आहेत. कतार हा एक हाताच्या आंगठ्यासारखा देश त्यांनी बलवान केलाय. आपल्या वडिलांना सत्तेतून हाकलून ते देशप्रमुख झाले तेव्हां कतार हा देश इतर आखाती देशांसारखा, सौदी गटातला देश असल्यासारखंच होतं. एकूण आखातातल्या इतर अरब-सुन्नी देशांप्रमाणंच कतारची आर्थिक-राजकीय-सामाजिक परिस्थिती होती. एका जमात प्रमुखाचं खानदानी राज्य असं कतारचं स्वरूप होतं. वायूतून मिळालेला पैसा जनतेत वाटून जनतेला सुखी ठेवायचं. काही कारणानं जनतेत असंतोष असेल तर तो चिरडून टाकायचा या उपकारशाही (फ्यूडल) पद्धतीनं कतारचं राज्य चाललं होतं. परदेशातून कामगार आणि विशेषज्ञ आणून, परदेशातून तंत्रज्ञान आणि शस्त्रं आणून कतारचा कारभार चालत असे.

अल थानी हा माणूस हा एकदमच विचित्र निघाला, अरब-आखाती-सुन्नी या चाकोरीच्या बाहेर पडला. अल थानी यांनी जगातल्या उदारमतवादी परंपरा, शिक्षण, आधुनिकता या गोष्टी कतारमधे निर्माण करायचं ठरवलं. १९९६ साली त्यांनी सरकारी पैसा (म्हणजे आपला व्यक्तिगत पैसा) गुंतवून अल जझिरा ही वाहिनी सुरु केली. बीबीसी हे या वाहिनीचं रोल मॉडेल होतं. अरब जगातल्या घडामोडी तटस्थपणे मांडायच्या असं या वाहिनीचं धोरण ठरलं. अरब समाजातली उपकारशाही, अरबांचा घराणेवाद, अरबांना असलेलं लोकशाहीचं वावडं इत्यादी गोष्टींचा बातम्या देतांना येणारा अडथळा दूर करून काही एका तटस्थपणे, वेगळ्या रीतीनं अरब जग अल जझिरावरून दिसू लागलं.  ताजं तंत्रज्ञान आणि तटस्थ माध्यमनीती या दोन घटकांमुळं   कमी काळात अल जझिराला जगात प्रतिष्ठा आणि मान्यता मिळाली. अरब जगातल्या चाकोरीला कंटाळलेल्या तरूणांना अल जझिरानं जगण्यासाठी उमेद मिळवून दिली. बहुसंख्य अरब जगातल्या रोजगार आणि सुखी जीवन या गरजा अल जझिरानं अरब मुलांसमोर ठेवल्या.

अल जझिरा चालवत असतानाच अल थानी यांनी कतारमधे अनेक लोकशाहीवादी, उदारमतवादी संस्था आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. आपल्याच घराण्याचं फाऊंडेशन वापरून आरोग्य व्यवस्था उभी केली. शैक्षणिक संस्था आणि थिंक टँक यांचा वापर करून आधुनिकता या विषयावर, लोकशाही या विषयावर थानी यांनी कतारमधे चर्चा घडवून आणल्या. जगभरातली नामांकित-जाणकार माणसं या चर्चांमधे सामिल होती. आपल्या घराण्याचं वर्चस्व, घराणेशाही  टिकवून थानी यांनी काही सुधारणा केल्या. घटनेत सुधारणा करून कतार पालिकेत निवडणुक घेतली. स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, निवडून येण्याचा अधिकार दिला, त्याना चक्क कार चालवायची परवानगी दिली. जगाला या गोष्टी अगदीच किरकोळ वाटत असल्या तरी अरब जगामधे लोकांनी भुवया उंचावल्या.

आज अमेरिका कतारच्या कोंडीला पाठिंबा देत आहे. याच अमेरिकेतला अरब जगातला मोठा लष्करी तळ थानी यांनी कतारमधे उभारून दिला आहे. कतारमधे आधुनिकता, उदारमतवाद, ज्ञान या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी कतारनं अमेरितेल्याच माध्यमांची मदत घेतली आहे.

अरब स्प्रिंग या चळवळीचं मूळ अल जझिरा आणि कतारच्या कारवायांमधे आहे. येमेनचे झोटिंग अब्दुल्ला साले यांना हाकला अशी उघड मागणी अल थानी यांनी केली. साले यांचा गैरकारभार अल जझिरानं वेशीवर टांगला आणि तरुणांच्या व्यथांना वाट मोकळी केली. इजिप्तमधली मुबारक यांची हुकूमशाही आणि भ्रष्टाचार अल जझिरानंच बाहेर काढला. बंड येमेनपासून सुरु झालं आणि नंतर ते इजिप्तवाटे साऱ्या अरब जगात पसरलं. या बंडाच्या बातम्या अल जझिरानं पसरवल्या. अरब जग, सौदी-सुनी राज्यकर्त्यांची घराणेशाही हादरली.

अर्थात हेही खरं की अल थानी हे काही सरळ, थेट लोकशाहीवादी आहे असं नाही. राजकारणातल्या त्यांच्या खेळी फारच नागमोडी आहेत. येमेन, इजिप्तमधील व्यथा त्यांनी उघड केली पण इराणमधल्या दादागिरीवर ना ते कधी बोलले ना अल जझिरानं माहिती दिली. इसरायलच्या नाकात दम आणणाऱ्या हमासला ते पाठिंबा देतात पण त्याच इसरायच्या शिमॉन पेरेस यांना कतारमधे बोलावून त्यांच्याशी ते व्यापारी करार करतात. तालिबानशी समझौता करून त्यांना अफगाणिस्तानातल्या सत्तेत सामिल करण्यासाठी कतारनं प्रयत्न केले. त्यांचं राजकारण बुचकळ्यात पाडणारं आहे.

जे असेल ते असो पण अल थानी यांच्या उद्योगांमुळं अरब जगाची, त्या जगातल्या पारंपरीक घराण्यांची सत्ता विसकटली.

म्हणून तर सारं अरब जग कतारला नेस्तनाबूत करायला निघालं आहे.

।।

 

 

 

3 thoughts on “अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

  1. On June 15 2017, a day before this article, Qatar has signed a $12bn deal to buy F-15 fighters jets from the US. The sale was finalised at a meeting in Washington between US defence chief Jim Mattis and his Qatari counterpart.
    It comes days after US President Donald Trump accused Qatar – a major US ally – of funding terrorism “at a very high level” – a charge Qatar denies.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *