‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा
पृथ्वी थेटर
पावणे नऊ झाले होते. माणसं दरवाजाबाहेर रांग करून उभी होती. शांतपणे. हातात फादर या नाटकाचं ब्रोशर. दहाएक मिनिटांनी दरवाजा उघडणार होता. गोंगाट नव्हता, माणसं आपसात किंवा सेलफोनशी कुजबुजत होती, ओठ हालत होते, ध्वनी उमटत नव्हता.
दरवाजा उघडला. माणसं अलगतपणे थेटरात पोचली. रंगमचाच्या जमिनीवर रूंद पांढऱ्या चिकटपट्ट्यांनी खोल्यांच्या भिंतींची जागा आखली होती. तीन खोल्या. एक किचन. एक लिविंग रूम आणि एक अशीच खोली. पाच ते सहाच फर्निचर वस्तू मंचावर. मंद प्रकाश. मंचाच्या तीन बाजूंनी बसायची सोय. ट्रेनमधे पूर्वी असत तशी हिरव्या रंगाच्या कुशननं मढवलेली बाकं. खुला रंगमंच.
शांतता. सेलफोन बंद करा अशी घोषणा. नऊ वाजता दरवाजे बंद झाले. त्यानंतर कोणालाही थेटरात प्रवेश नाही. मंचाच्या डाव्या कोपऱ्यातून अभिनेते अवतरले. दोघं जणं मंचावर उरली, बाकीची मंच ओलांडून प्रेक्षकांमधूनच थेटराच्या बाहेर गेली. मंचावर दिवे प्रकाशमान झाले आणि नाटक सुरु झालं.
फ्लोरियन झेल्लरच्या फादर या फ्रेंच नाटकाचं ख्रिस्तोफर हँम्टन यांनी केलेलं इंग्रजी रुपांतर नसिरुद्दीन शहांनी सादर केलं. नसीरचं दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका.
आंद्रेला विस्मरणाचा त्रास सुरु झालाय. डिमेंशिया किंवा अल्झायमरची सुरवात. आंद्रेच्या मुलीनं, एननं, आंद्रेची काळजी घेण्यासाठी त्याला आपल्या घरी आणलंय. एक नर्स ठेवलीय. वास्तव काय, कल्पित काय, मनातलं काय आणि खरं काय याच्या गोंधळात आंद्रे सापडलाय. मुलगी आणि नर्स यात कधी कधी त्याचा घोटाळा होतो. जावई आणि आरोग्य सहाय्यक यांच्यात त्याचा घोटाळा होतो. आंद्रेला वाटतंय की त्याची बुद्धी, कार्यकुशलता इत्यादी सगळ्या गोष्टी शाबूत आहेत, घोटाळा आहे तो मुलीचाच. तो मुलीला सांगतो की तिचीच स्मृती गडबड करतेय.
मुलीला बापाबद्दल प्रेमही आहे पण बापाचं करता करता तिच्या नाकी नऊ येताहेत, तिचं स्वतःचं जगणं सुरकुतू लागलंय. बापाच्या हितासाठीच त्याला नर्सिंग होममधे ठेवायच्या खटपटीत ती आणि तिचा मित्र असतात. आंद्रे नर्सिंग होममधे दाखल होतो तिथं नाटक संपतं.
विस्मरण, खरं काय आणि मनातलं काय हा विभ्रम मंचावरच्या वस्तू नाहिशा करून, त्यांची रुपं बदलून दाखवलाय. बसायच्या सोफ्यावरची चादर नाहिशी होते. एक खुर्ची नाहिशी होते. एक टेबल नाहिसं होतं. हे नाहिसं होणं प्रेक्षकाला दिसत असतं आणि आंद्रेलाही. प्रेक्षक बुचकळ्यात पडतो, खरंच वस्तू नाहिशा झाल्यात की आंद्रेला भास होतोय. नाटकभर अशी गंमत दिद्गर्शक नसीरुद्दीन शहांनी केलीय.
आंद्रे, त्याची मुलगी, नर्सेस, आंद्रेचा मित्र, सहाय्यक सगळ्याच भूमिका चांगल्या वठल्या. पण अर्थात नसीर सर्वाना खाऊन टाकतो.
नाटकाच्या सुरवातीचं दृश्य. घरी घालायच्या चपला पायात सरकवतांना आंद्रेचा घोटाळा होतो. पाऊल एकीकडं, चपला दुसरीकडं, चपला शोधण्याची पायाची आणि आंद्रेची धडपड. पहिल्या झटक्यातच आंद्रे हे काय प्रकरण आहे आणि नाटक साधारणपणे काय असेल याची कल्पना येऊ लागते. आपण फिट आहोत, जग आपल्याला अनफिट दाखवण्याचा कट रचतय हे आंद्रेच्या प्रत्येक मिनिटाच्या वागण्यात नसीर दाखवतो. नाटकाच्या शेवटाला नर्सिंग होममधे आपण अडकलोय ही जाणीव, त्रागा, संताप, अगतीकता नसीर गडाबडा लोळून व्यक्त करतो.
नसीरचा फादर दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील, प्रेक्षकांना पछाडून टाकेल.
नाटककारानं नाटक फार तरलतेनं लिहिलंय. या विषयावर झालेले कित्येक हिंदी मराठी सिनेमे पहाता डिमेंशिया, अल्झायमर हे विषय मांडताना नाटक कारूण्याकडं जाण्याची शक्यता फार असते, नाटक मेलोड्रॅमॅटिक होण्याची फार शक्यता असते.किवा कधी कधी नाटक एक वैचारीक डोसही होण्याची शक्यता असते. रोग्याचं दुःख, त्याच्या नातेवाईकांना होणारा त्रास इत्यादी गोष्टी साधारणपणे हा विषय मांडणारे लेखक, दिग्दर्शक फार गंभीर, काळजं चिरणारा करतात. झेल्लरनं नाटक हळूवार, खालच्या पट्टीत, भावना आटोक्यात ठेवून लिहिलंय. विषयाचं गांभिर्य आणि गुंता शिल्लक ठेवूनही नाटक मध्यम पट्टीत रहातं, प्रेक्षकाला असह्य करून टाकत नाही, रंजक होतं. अर्थात ते तसं ठेवणं यात दिद्गर्शकाचा वाटाही मोठा आहे.
नसीर प्रत्येक प्रसंगातली प्रत्येक बारीक सारीक हालचाल फार बारकाव्यानं दाखवतो. एकदा त्याच्या लेंग्याची नाडी सुटते आणि लेंगा घसरतो. नर्स लेंगा वर सरकवून नाडी बांधते. नसीरला वाटत असतं “ कुठं लेंगा घसरलाय? काही तरीच.” नर्सनं लेंगा वर सरकवलाय याची दखलही नसीर घेत नाही.
मध्यंतरी आकाशवाणीवरच्या एका मालिकेत सई परांजपे यांनी त्यांच्या स्पर्श या चित्रपटाच्या निर्मितीतले किस्से सांगितले. अंध व्यक्तीची भूमिका नसीरनं केली होती. नसीर कित्येक आठवडे अंध होण्याच्या खटपटीत होता, त्यासाठी चोविस तास अंधांबरोबर वावरत होता. सई सांगत होत्या की तो इतका त्या अंधांबरोबर असायचा की फक्त त्यांच्याबरोबर संडासात जाणं तेवढं बाकी होतं.
नाटक संपल्यावर प्रेक्षक नसीरला मंचामागं भेटले. प्रेक्षक भारावलेले, मंतरल्यासारखे होते, नसीर मात्र एकदम आरामात. पंधरा मिनिटांपूर्वी हा माणूस त्र्याग्यानं गडागडा लोळला होता असं नसीरकडं पाहून वाटत नव्हतं.कौतुक करायला आलेल्या प्रेक्षकाना नसीरनं सांगितलं की नाटकात निर्माण होणारे तणाव प्रेक्षकांच्या खांद्यावर टाकून नसीर मोकळा होतो. मंच सोडला की नसीर नसीर होतो.
नसीरनं आपली अभिनय कहाणी काही दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितली होती.
नाटक म्हणजे नाटक. भूमिका करायचं म्हटलं की नसीर नाटकाचा, भूमिकेचा फारफार विचार करणार, भूमिका समजून घेणार. भूमिकेला काय हवंय याचा विचार करणार आणि त्या भूमिकात जाण्यासाठी आपले हावभाव, आपलं बोलणं इत्यादी कसे घडवावे लागतील याचा विचार करणार. कित्येक दिवस, कित्येक आठवडे, कित्येक महिने दुसरा विचार नाही.
हसणं, रडणं, चिडणं, किंचाळणं, धडपडणं. सगळं व्यावसायिक कसब असतं. अभ्यास आणि कष्ट केल्यानंतर प्रत्येक गोष्ट क्षणार्धात करता येते. गांधी, मंडेला, आइनस्टाईन, गालिब वगैरेंची भूमिका करायची म्हणजे स्वतः गांधी किवा मंडेला व्हायचं नसतं. तसं असेल तर खुन्याची भूमिका करताना खुनी व्हायला हवं. भूमिका करत असताना ते पात्रं समजून घेऊन तसं साकारणं म्हणजे अभिनय. आपण ते पात्रं होणं नव्हे. नट हा नटच असतो, तो भूमिकेत शिरतो आणि पुन्हा भूमिकेतून बाहेर येऊन नटमाणूस रहातो. अभिनयाच्या वेळी ती ती पात्रं रंगवायची, त्या त्या पात्रांत जायचं. पडदा पडला, कॅमेरा बंद झाला की नसीर नसीर.
लोकसत्तानं आयोजित केलेल्या मुलाखतीमधे मुलाखतकार नसीरचं कलाकारपण अनावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. ओघात प्रेक्षकांमधून काही प्रश्न आले. मुलाखत होत होती तो दिवस जागतीक अंध दिवस होता. स्पर्शमधली नसीरची अंध भूमिका लक्षात घेऊन एका प्रेक्षकानं विचारलं की माणसानं अंधांसाठी काय केलं पाहिजे.
नसीरची आवाजाची आणि विचारांची धार तळपली. वर्षभर काहीही करायचं आणि एक दिवस अंधदिवस म्हणून इवेंट कां करायचे असं नसीरनं विचारलं. वर्षभर क्रूरतेनं वागायचं, इतरांचं जीवन कवडीमोल ठरवायचं आणि एकदिवस आपण कसे सहृदय आहोत हे दाखवायचं हे आपल्याला मंजूर नाही, असल्या इवेंटमधे आपण जात नाही असं नसीरनं सांगितलं.
मी नट आहे, तेच माझं काम आहे, ते मला करू द्या, इतर गोष्टी भले चांगल्या असतीलही, पण त्यात मला गुंतवू नका असं नसीर म्हणाला. माझ्याबरोबरचे नट, सहकारी, नाट्य विश्व, हीच माझी सामाजिक जबाबदारी आहे असं नसीरनं सांगितलं.
आईनस्टाईन नाटक करत असताना आईनस्टाईनचं एक वाक्य नसीरनं फेसबुकवर टाकलं होतं. त्यावरून नसीरला खूप मिडिया त्रास देण्यात आला. तो मुसलमान आहे अशी जाणीव त्याला करून देण्यात आली, पाकिस्तानात जा असा आदेशही सोशल मिडियातून देण्यात आला होता. अगदी मोजक्या पण अत्यंत धारदार शब्दात नसीरनं त्याचं म्हणणं सांगितलं. तोल राखत नसीर म्हणाला की काळ कठीण आहे पण समाज त्यातून वाट काढेल.
हे सारं नसीर अगदी कमी शब्दात, धारदार शांतपणे बोलला, कुठंही आक्रस्ताळेपणा नाही.
नसीर दरवर्षी कणकवलीच्या आचरेकर नाट्य महोत्सवात हजेरी लावतो. दोन दिवस नाटकं करतो. कणकवलीतले कार्यकर्ते पैशाची चणचण असताना केवळ नाटकाच्या प्रेमाखातर त्रास सहन करून महोत्सव करतात हे नसीरला आवडतं. म्हणून खर्चही न घेता नसीर तिथं जातो आणि परतताना देणगी देतो. या बद्दल नसीर स्वतः काहीही बोलत नाही, वाच्यता करत नाही, वाच्यता करणाऱ्याला झापतो.
‘ फादर ‘ मधला नसीर कलाकार होता.
मुलाखतीतला नसीर नसीर नावाचा एक माणूस होता.
नसीर दोन गोष्टी एकमेकात मिसळू देत नव्हता.
।।
13 thoughts on “‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा”
सुंदर
सुंदर
मस्त लेख
अप्रतिम आणि प्ररणादायी
उत्सुकता: अश्या गंभीर आणि क्लेशमय विषय आणणाऱ्या वास्तवधारी नाटकांना कितपत गर्दी होते आणि याचे किती प्रयोग झाले त्याबद्दल कृपया माहिती देणे. नसरुद्दीन शहा हे उत्तम मराठी बोलू शकतात कां? की सदर नाटक इंग्रजी अथवा हिंदीतून होते? त्यांचा हिंदी चित्रपटातील अभिनय अप्रतिम असतो -हे अनुभवले आहे परंतु तुम्हां मराठी वाचकांप्रमाणे माझे संबंधित ज्ञान थिटे आहे -म्हणून वरील आवाहन.
एरवी लेख अप्रतीम आहे व सारांशाने नसरुद्दिन हे किती विनम्र आणि श्रेष्ठ कलाकार आहेत ते निळूभाऊंनी असे सादर केलेले आहे की वाचक जणू कांही ते नाटक स्वतः पाहात असल्याचा भास होतो. हे विशेष इथे अधोरेखित करावेसे वाटले.
अभिनंदन!
After re-reading I understood that it was an English version of a French novel. However, upon exploring internet I did realize that Nasuruddin had been taking Marathi lessons from his wife, herself being a Maharashtrian acress in films. Not surprisingly though, he finds Marathi to be a language not so easy to grasp. I believe him because he has acted only in one Marathi film Deool and is ignored by Marathi film directors for this same reason.
नाटक इंग्रजी भाषेत सादर झाले. नसिरूद्दीनना मराठी समजतं पण अभ्यास किती आहे माहित नाही.
sir, khup chan lihile aahe. nasiruddin shahanchya vyaktimatvacha aalekh, vedh changala ghetala aahe..
खुपच छान…
It’s a good article but leaves one hungry to read more about the play. You could have added something on Naseer’s group, Motely & the plays he performed earlier . That would have made it complete.
Nasir Uddin has always given us the true life experience through his theatre. Sounds like this piece is just another jewel. I hope theatre lovers in the U.K. get to see this sometimes.
छान आहे
अप्रतिम…….