सुरवातीचे चित्रपट

सुरवातीचे चित्रपट

इटालीतल्या बलोनी (Bologna) गावात एक चित्रपट उत्सव पार पडला. उत्साही मंडळी कित्येक महिने आधी नीटपणे ठरवून बलोनीच्या उत्सवाला   जातात.
तिथं गेली ३० वर्षं दरवर्षी जुलै महिन्यात Cineteca ही संस्था चित्रपट उत्सव भरवते. त्यात जीर्णोद्धार केलेले सिनेमे दाखवले जातात. Cineteca ही संस्था गेली पन्नास वर्षं चित्रपट जीर्णोद्धार करत आली आहे. बलोनीमधे या संस्थेच्या कचेरीसमोर फूटबॉल मैदानाच्या आकाराचा चौक आहे. तिथं उघड्यावर हा उत्सव होतो. भलामोठा पडदा लावला जातो. हज्जारो माणसं जमिनीवर बसून सिनेमा पहातात. परवाच्या जुलै महिन्यात झालेल्या उत्सवात लाखभर माणसांनी सिनेमे पाहिले.
जगभरात दोनेकशे चित्रपट उत्सव भरतात. युरोप, आफ्रिका, आशिया, चीन, जपान, अमेरिका, दक्षिण अमेरिका, सर्व ठिकाणी. भारतातही मुंबई, दिल्ली, कलकत्ता, गोवा, चेन्नई इत्यादी ठिकाणी उत्सव भरतात. प्रत्येक उत्सवाचं एकादं वैशिष्ट्यं असतं. शॉर्ट फिल्म्स, अॅनिमेटेड फिल्म्स, डॉक्युमेंटरी, आशियाई, जागतीक, सांगितीक, विशिष्ट भाषिक इत्यादी. कान, बर्लिन, टोरंटो, एडिंबरा, व्हेनिस, लंडन, दोहा, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी शहरांत भरणाऱ्या उत्सवात जगभरातले चित्रपट येतात. कान महोत्सवात सर्वसामान्य प्रेक्षकाला अगदीच कमी वाव असतो. व्यवसायातले, डेलेगेट्स, ज्युरी, पत्रकार इत्यादींना तिथं प्रवेश असतो. प्रत्येक उत्सवाला स्वतंत्र प्रतिष्ठा असते. तिथं चित्रपट दाखवला जाणं, जाणकारांनी दखल घेऊन त्याला गुण देणं याला महत्व असतं. माध्यमांतूनही चित्रपटांची वाखाणणी होते किंवा चंपी होते. सामान्यतः सर्वात शेवटी ऑस्करमधे चित्रपट पोचणं आणि त्याला बक्षिसं मिळणं ही या सर्व उत्सवांची शेवटली पायरी असते. कित्येक लोक मात्र तसं मानत नाहीत. ऑस्कर म्हणजेच सर्व काही असं त्यांना वाटत नाही. ऑस्करमधली गुण ठरवणारी यंत्रणा आणि प्रक्रिया सदोष आहे, परिपूर्ण नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. एक मात्र खरं. जगभरच्या  उत्सवांत गाजलेल्या चित्रपटांकडं ऑस्करमधल्या परीक्षकांचं लक्ष असतं.
काही उत्सव बक्षिसासाठी नसतात. ते प्रेक्षकांची चित्रपटांची जाण वाढावी, त्यांनी नाना प्रकारचे चित्रपट पहावेत या उद्देशानं  भरवले जातात. तिथं बक्षिसं  नाममात्र दिली जातात. खरी गंमत असते ती जमणाऱ्या प्रेक्षकांची, त्यांनी आपसात केलेल्या चर्चांची, त्या वातावरणात डुंबण्याची. बलोनी चित्रपट उत्सव या वर्गातील एक महत्वाचा उत्सव आहे.
बलोनीमधे Cinetecaच्या इमारतीत चित्रपट, यंत्रं, कॅमेरे, पुस्तकं इत्यादींचा संग्रह आहे. त्यात दरवर्षी भर पडत असते. चित्रपट कलेचा इतिहास बलोनीत अभ्यासता येतो. चित्रपट निर्मितीचं तंत्रज्ञान, यंत्रं इत्यादीच्या इतिहासाची जणू एक कार्यशाळाच महोत्वाच्या काळात घडते. जुने चित्रपट पहायला मिळतात.
यंदाच्या उत्सवाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे १८९९ साली तयार झालेला पहिला  प्रोजेक्टर दुरुस्त होऊन प्रेक्षकांसमोर आला.  १८९९ मधे दिव्याच्या जागी कार्बनच्या दोन कांड्या असत. या कांड्या एकमेकापासून थोड्या अंतरावर ठेवून त्यामधे वीज प्रवाह सोडला जात असे. दोन कांड्यांमधे हवा असे. हवा वीज प्रवाह विरोधी असल्यानं वीज प्रवाहाला विरोध होऊन   ठिणग्या पडत. त्या ठिणग्यांचा प्रकाश म्हणजे चित्रपट दाखवणारा प्रकाश.  त्या प्रकाशामुळं समोरच्या पडद्यावर चित्रपट दिसे. प्रकाश सारख्याच तीव्रतेचा आणि सतत नसे. मधे मधे प्रकाश मंद होत असे. त्या प्रकाशात सिनेमा पहाणं कष्टाचं असे.  
बलोनीतल्या चौकात लोकांनी अगदी तशाच रीतीनं त्या प्रोजेक्टवर ल्युमिये बंधूंनी केलेल्या ५० सेकंदांच्या फिल्मा पाहिल्या. या फिल्मा १८९५ मधे चित्रित केल्या होत्या. त्या बहुदा जगातल्या पहिल्या फिल्मा होत्या. लोकांनी त्या माना वाकड्या करकरून पाहिल्या.  वातावरण थरारलं होतं.
Cineteca नं चार्ली चॅप्लीन, बस्टर कीटन यांच्या फिल्मा सुधारून नव्या केल्या आहेत. त्याही उत्सवात दाखवल्या गेल्या. हज्जारो माणसं हातात धरलेले  आईसक्रीम कोन विसरून, बियरचे मग विसरून कित्येक तास पोट धरधरून हसली. सिनेमांनी पोटं भरल्यानं त्यांना इतर काही खावंसंही  वाटलं नसावं. १९२० ते १९४० या काळातल्या अनेक गाजलेल्या फिल्मा उत्सवींनी  पाहिल्या.
टे गार्नेटची हर मॅन ही १९३० सालची फिल्म बलोनी महोत्सवात लोकांनी पाहिली, त्या फिल्मचा आनंद घेतला. स्कोर्सेसे या फिल्मचं नेहमी कौतुक करतो. या चित्रपटातली स्टंट दृश्यं आणि विनोदी दृश्यं चित्रपट सृष्टीतले धडे झाले, टप्पे झाले, मैलाचे दगड झाले. दोन दारुडे या दीड तासाच्या चित्रपटात धमाल उडवतात. त्याच काळात चार्ली चॅप्लीन, बस्टर कीटन आणि जाड्या रड्या (लॉरेल-हार्डी) विनोद घडवत होते. टे गॅरेटनं विनोदाची एक गतिमान शैली या चित्रपटात निर्माण केली. 
या चित्रपटाचं वैशिष्ट्यं म्हणजे कॅमेऱ्याची हालचाल. आधीच्या काळात   कॅमेरा एका जागी स्थिर असे. टे गॅरेटनं कॅमेरा ट्रॉलीवर घालून, कॅमेरामनच्या खांद्यावर ठेवून फिरवला. त्या सिनेमात एका दृश्यात वेटर ट्रेमधे दारुचे ग्लास घेऊन बारटेंडरकडून निघतो आणि पार्टीत दीर्घकाळ लोकांमधून वाट काढत फिरतो. कॅमेरा त्या वेटर पाठोपाठ फिरतो, दीर्घ काळ.  एका दृश्यात हीरो  रस्त्यावरून जात असतो. वाटेत त्याला माणसं थडकतात, धडकतात. तो अनेकांना दूर सारत पुढं जात असतो. नंतर तो एका गुत्त्यात शिरतो. बराच काळ चालणारा शॉट. चित्रपटाच्या रचनेतला हा महत्वाचा टप्पा गार्नेटनं सुरु केला.
 चित्रपट पर्वाचा सुरवातीचा काळ असं म्हटलं की साहजिकच भारतात चित्रपट पर्व केव्हां सुरु झालं, त्या काळात काय घडलं असा विचार मनात येतो. 
जगात चित्रपट निर्मिती सुरु झाली त्याच्या फार तर एकाद दोन वर्षं पलिकडं भारतात चित्रपटांनी जन्म घेतला. भारत आणि ब्रीटन यातल्या संबंधांमुळं, लंडन आणि भारत यातील संबंधांमुळं ते घडलं.
१८९५ मधे ल्युमिये बंधूनी केलेल्या फिल्मा लंडनमधे दाखवल्या गेल्या. लगोलग १८९६ मधे त्या फिल्मा मुंबईतल्या मोजक्या प्रेक्षकाना पाह्यला मिळाल्या. त्या पाहून कोण्या एका एच एस भाटवडेकर नावाच्या माणसाच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो मलबार हिलवरच्या हँगिंग गार्डनमधे गेला. तिथं कुस्त्यांची स्पर्धा भरत असे. भाडवडेकरांनी ती स्पर्धा चित्रित करून दी रेसलर्स या नावाची डॉक्युमेंटरी तयार केली, दाखवली. ही भारतातली पहिली डॉक्युमेंटरी. साल होतं १८९९.
त्यानंतर तयार झाली ती तोरणे यांची फिल्म ‘ पुंडलिक ‘. १८ मे १९१२ रोजी कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ या मुंबईतल्या  सिनेमाघरात दाखवली गेली.  या फिल्मला भारतातली पहिली फिल्म मानलं जात नाही. कारण एक तर ही फीचर फिल्म नव्हती. ते पुंडलीक या नाटकाचं चित्रीकरण होतं.  नाटक चाललं असताना कॅमेरा समोर  स्थिर ठेवून चित्रीकरण केलं होतं. जॉन्सन या ब्रिटीश फोटोग्राफरनं चित्रीकरण केलं होतं. फिल्मचं प्रोसेसिंग लंडनमधे झालं होतं. 
पहिल्या फिल्मचा मान जातो तो दादासाहेब फाळकेंच्या राजा हरिश्चंद्रला. पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन फाळकेंचं होतं. प्रत्येक शॉट त्यांनी लिहिलेला, नियोजन केलेला होता. फोटोग्राफी त्रिंबक तेलंग यांची होती. रुळावर कॅमेरा सरकवून चित्रीकरण करण्यात आलं होतं.
राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी कोरोनेशनमधेच दाखवण्यात आला.
कोरोनेशन सिनेमाघर दादासाहेब फाळकेंचे मित्र नारायण गोविंद चित्रे यांनी १९१२ मधे बांधलं. नारायण चाळीच्या पटांगणात. पोर्तुगीझ चर्चकडून खोताच्या वाडीकडं निघाल्यावर उजव्या  हाताला ही नारायण चाळ होती. चौपाटीपासून इथपर्यंत पोचणाऱ्या रस्त्याचं नाव होतं सँडहर्स्ट रोड. कोरोनेशन सिनेमापासून काही अंतरावर सेंट्रल सिनेमा होता. कालांतरानं कोरोनेशन सिनेमा जाऊन त्या ठिकाणी मॅजेस्टिक सिनेमा तयार झाला, अगदी अलिकडं तो सिनेमाही गेला आणि त्या ठिकाणी कचेऱ्या आणि रहाण्याच्या जागा सामावणारी टोलेजंग इमारत आहे. पलिकडचा सेंट्रल सिनेमा मात्र आजही आहे.
नारायण चित्रेंना सिनेमाघर बांधावंसं कां वाटलं? 
दादासाहेब फाळकेंनी सिनेमा करायला घेतला तेव्हां प्रश्न असावा की त्यांचा सिनेमा कोण पहाणार आणि कुठं पहाणार. त्या वेळी मुंबईमधे थेटरं होती पण त्यात गोरे लोक जात, देशी माणसं जात नसत. ती थेटरं सिनेमासाठी तयार झालेली नव्हती. तिथं संगिताचे जलसे होत आणि ऊच्चभ्रू गोरे लोक तिथं जात. बोरीबंदरसमोर कॅपिटल होतं (१८७९), बाँबे सेंट्रलला आल्फ्रेड होतं. त्यानंतर इंपिरियल (१९०५) होतं. या ठिकाणी कोण मराठी-हिंदी माणसं सिनेमे पहाणार होती? नारायण चित्रेंनी कोरोनेशन उभारलं.
कालांतरानं कॅपिटल, आल्फ्रेड, इंपिरियल थेटरात सिनेमे दाखवले जाऊ लागले. आज कॅपिटल थेटर बंद पडलंय. आल्फ्रेडमधे गेली कित्येक वर्षं मारधाडी-पिवळे सिनेमे दाखवले जातात. इंपिरियल अजूनही भडकमकर रोडवर उभं आहे.  त्या सिनेमाघरात आत जायचं दार वेगळं आणि बाहेर जायचं दार  वेगळं होतं. बाहेर पडायच्या दारात दोन मोठे हत्ती होते, अजूनही आहेत.  घराचा  पत्ता सांगताना इंपेरियल सिनेमा असं न सांगता दोन हत्ती जवळ असा पत्ता आजही लोक सांगतात. एकादा सिनेमा इतका गाजे की इंपिरियलमधे तो दोन तीन वर्षं सतत चालत राही. 
कॅपिटल, इंपिरियल, कोरोनेशन, सेंट्रल या सिनेमाघरांचा इतिहास म्हणजे जवळपास भारतीय चित्रपटाचा इतिहास ठरेल.एका  डॉक्युमेंटरीला चांगला विषय आहे.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *