तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.
तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.
१५ जुलैचा सूर्य मावळल्यानंतर साडेसात वाजता इस्तंबूलच्या रस्त्यावर रणगाडे फिरू लागले, त्यांनी काही रस्ते अडवले. सात वाजून पन्नास मिनिटांनी हवाई दलाची लढाऊ विमानं आकाशात फिरू लागली.आठ वाजता पंतप्रधान यिलडिरीम यांनी जाहीर केलं की लष्करातली काही माणसं अनधिकृत कारवाई करत असून जनतेनं शांत रहावं. नऊ वाजता काही लष्करी अधिकाऱ्यांनी सेना प्रमुखाना ताब्यात घेतलं आणि अंकारामधे टीव्ही स्टेशनवर ताबा मिळवला. सव्वा नऊ वाजता टीव्हीवरच्या बातम्यांत निवेदकानं जाहीर केलं की लष्करानं मानवी अधिकार आणि लोकशाही स्थापनेसाठी सरकार बरखास्त करून देशाचा कारभार हाती घेतला आहे.साडेनऊ वाजता
अध्यक्ष एर्डोगननी ट्विटरवरून जाहीर केलं की काही लष्करी लोकांनी उठाव केला असला तरी सरकार शाबूत असून लोकांनी शांत रहावं, रस्त्यावर यावं आणि लष्कराला विरोध करावा.
जनता रस्त्यावर उतरली. हवाई दल आणि पोलिस एकत्र झाले आणि त्यांनी मिळून लष्कराला विरोध केला. लष्करी हेलिकॉप्टर पाडली , काही रणगाडे नष्ट केले. रात्रीच्या बारा वाजता घाईघाईनं अध्यक्ष एर्डोगन देशात परतले. त्यांच्या स्वागताला हजारो नागरीक इस्तंबूल विमानतळावर होते. पोलिस-हवाई दलांची कारवाई सुरु राहिली. दोन वाजता कारवाई संपली. दोनेकशे माणसं मेली. अध्यक्ष एर्डोगन आपल्या कार्यालयात सुखरूप पोचले. त्यांनी जाहीर केलं की बंड थंड झालं असून त्यांचं सरकार सुरक्षित आहे आणि बंडखोरांवर सूड उगवला जाणार आहे.
पहाट उजाडेपर्यंत पोलिस आणि इंटेलिजन्सच्या माणसांनी धाडी घालायला सुरवात केली. बंडाला पाठिंबा देणारे लष्करी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश यांना अटका झाल्या.
आजवर तुर्की सरकारनं ८० हजार माणसांवर कारवाई झाली असून ६ हजारांना नोकरीतून काढून टाकलं आहे. त्यात चार हजार लष्करी अधिकारी आहेत आणि पाचेक हजार न्यायाधीश आहेत. यांच्यापैकी काही जणांना फाशी होण्याची शक्यता आहे.
बंड संपलं.
सत्तेसाठी झालेला उठाव केवळ तीनच तासात विरघळण्याचं दुसरं उदाहरण जगाच्या इतिहासात नाही.
अमेरिकेत स्थायिक झालेले इमाम ग्युलेन यांनी उठावाला चिथावणी दिली असा एर्डोगन यांचा आरोप आहे. अमेरिकन सरकारनं त्यांना तुर्की सरकारच्या हाती सोपवावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
निरीक्षक आणि अभ्यासक बुचकळ्यात पडलेत. शे दोनशे रणगाडे, पाच पन्नास हेलिकॉप्टर्स, दोन पाच हजार सैनिक आणि पाच दहा जनरल इतक्या लोकांनी उठाव करणं ही काही साधी गोष्ट नाही. असा उठाव केवळ तीन तासात थंड होणं हे खरं नाही. हे एक नाटक होतं, एक डाव होता असं निरीक्षकांना वाटतं.
एर्डोगन इस्लामी आहेत. तुर्की लष्कर सेक्युलर आहे. १९२३ मधे केमाल पाशांनी लष्करी क्रांती करून इस्लामी ऑटोमन सत्ता बरखास्त करून सेक्युलर सत्ता स्थापन केली होती. आजवर सेक्युलर परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न लष्कर करत आलं आहे.१९८० नंतर तुर्कस्तानात सेक्युलर परंपरा दूर सारून इस्लामी सत्ता स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. लष्करानं ते हाणून पाडले. एर्डोगन यांनाही एकदा लष्करानं सहा महिने तुरुंगात घातलं होतं.
२००३ साली पंतप्रधान झाल्यापासून एर्डोगन सतत या ना त्या वाटेनं आपण इस्लामी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. केमाल पाशांनी बंद केलेले मदरसे त्यांनी सुरु केले. दारुबंदी आणली. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घ्यायला बंदी घातली. रमझानच्या काळात दारू तर बंदच पण कॅफे, बार इत्यादी ठिकाणी दिवसा जेवणाखाणाला बंदी घातली. आपण तुर्कस्तानला कमाल पाशाच्या सेक्युलर-इस्लामेतर प्रभावातून मुक्त करून तुर्कस्तान इस्लामी करत आहोत आणि लष्कर आपल्याला ते करू देत नाहीये असं भासवण्याचा एक प्रयत्न एर्डोगन यांनी या निमित्तानं केला आहे.
मुद्दा असा की तुर्की समाज इस्लामी आहेच, तो अधिक इस्लामी करणं म्हणजे काय?
१९६० सालापासूनची अधिकृत माहिती सांगते की तुर्कस्तानात ८३ टक्के पुरुष आणि ९७ टक्के स्त्रिया कधीच दारू पीत नव्हत्या. १६ ते २४ या वयोगटातल्या ८३ टक्के तरूण-तरुणींनी दारुला कधीच स्पर्श केलेला नाही. केमाल पाशांनी तुर्की समाजाला पश्चिमी बनवलं असं म्हटलं जातं, त्या समाजात वर्षाला सरासरी जेमतेम १.५ लीटर दारू प्याली जाते. पश्चिमी युरोपीय वर्षाला १५ लीटर दारू पितात. तुर्कीत शंभरातली जेमतेम १७ माणसं दारु पितात. अशा समाजात दारुबंदीचा ढोल वाजवून इस्लामीपण ठसवायचं याला काय म्हणायचं?
तुर्की समाज अर्धा युरोपीय आहे आणि अर्धा अरब. इस्तंबूल शहराची विभागणीही युरोपीय इस्तंबूल आणि आशियाई इस्तंबूल अशी होते. ऑटोमन साम्राज्य होतं त्या काळातही युरोपीय वागण्याची पद्दत काही प्रमाणात तुर्कस्तानात होतीच. सौदी-अरब लोक तर नेहमीच म्हणत असतात की तुर्की मुसलमान हा फिक्कट मुसलमान आहे, गडद मुसलमान नाही. खुद्द एर्डोगान एकदा मक्केत गेले असताना तिथल्या मुफ्तींनी त्यांना तुम्ही कमी प्रतीचे मुसलमान आहात असं हिणवलं होतं. तुम्हाला प्रार्थनाही नीट करता येत नाही असं सुनावलं होतं.
केमाल पाशांनी दोन गोष्टी केल्या. एक, कायदा आणि शिक्षण या दोन व्यवस्था आधुनिक केल्या, शरीयापासून तोडल्या. केमाल पाशांनी मदरसे बंद केले म्हणजे इस्लामी शिक्षण बंद केलं. केमाल पाशांनी फ्रेंच कोडप्रमाणं कायदे अमलात आणले म्हणजे शरीया दूर ठेवला. मुल्ला मंडळींना त्यानं वठणीवर आणून सरकारी धोरणानुसार वागायला लावलं, शरीयानुसार वागायची परवानगी दिली नाही.
तुर्कस्तानी समाज निधर्मी किवा नास्तिक झाला नाही, इस्लामीच राहिला. मशिदी शिल्लक होत्या, प्रार्थना होत होत्या, रमझानचे उपास होत होते. धर्म व्यक्तीगत पातळीवर ठेवला, माणसाला इस्लामचं आचरण करण्याची सोय ठेवली, सार्वजनिक जीवनात इस्लाम दूर केला. आजही त्याला सरकारची, कोणाचीच आडकाठी नाही. राज्यव्यवहार शरीयावर आधारित नाही येवढंच. केमाल पाशांनी घडवलेले बदल तुर्की समाजानं मान्य केले.
केमाल पाशानं फेझ टोपीवर बंदी घालून युरोपीय हॅट वापरायला सांगितलं, बुरखा बंद केला. हा बदल प्रतिकात्मक होता. त्याचा खरं म्हणजे इस्लामशी संबंध नव्हता. इस्लाममधे कुठंही अमूक प्रकारची टोपी घाला असं म्हटलेलं नाही आणि बुरखाही इस्लामच्या मूळ तत्वात नाही. बुरखा ही इस्लामी माणसाची एक सांस्कृतीक परंपरा आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही. जगभरात करोडो स्त्रिया बुरखा न घालता वावरतात.
थोडक्यात असं की तुर्की समाज केमाल पाशांच्या काळातही कर्मकांडाच्या हिशोबात पुरेसा इस्लामी होता आणि आजही आहे. दारू न पिणाऱ्या इस्लामी समाजावर दारुबंदी घालून फरक पडत नाही.
मग एर्डोगन हे इस्लामचं नाटक कां करतात?
एर्डोगन राजकारण करत आहेत. त्यांना निरंकुष सत्ता हवी आहे. २००० साली ते पंतप्रधान झाले. या पदाला तेव्हांच्या तुर्की राज्यपद्धतीत संसदेशी जुळवून घ्यावं लागत होतं. एर्डोगननी राज्यघटनेत बदल करून अध्यक्षीय पद्धत सुरु केली, स्वतः अध्यक्ष झाले. मिळालेली सत्ता त्यांना अजूनही अपुरी वाटतेय. त्यांनी राज्यघटनेत आणखी बदल सुचवलेत. लष्कर, परदेश धोरण अध्यक्षानंच ठरवावं, संसद आणि मंत्रीमंडळ केव्हांही बरखास्त करण्याचा अधिकार अध्यक्षाला मिळाला पाहिजे, देशद्रोही-दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर स्वतंत्रपणे विनाअडथळा कारवाई करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी केली पाहिजे अशा मागण्या ते आता करत आहेत.
अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे, अध्यक्षाला निर्णायक अधिकार आहेत. परंतू त्या अधिकारांवरही अमेरिकन संसद आणि न्यायव्यवस्थेचा अंकुश आहे. एर्डोगन यांना निरंकुष अध्यक्ष व्हायचं आहे.
तुर्की समाजात एक जागरूक वर्ग आहे. तो प्रशासनात आहे, न्यायव्यवस्थेत आहे, बुद्धीवंतांत आहे, शिक्षक वर्गात आहे, पत्रकारांत आहे. त्यांना लोकशाही हवी आहे, निरंकुष हुकूमशहा नको आहे. हा वर्ग एर्डोगनना विरोध करतो. एर्डोगन यांच्या जाचक विरोधाला कंटाळून अमेरिकेत स्थायिक झालेले इमाम ग्युलेन धार्मिक आहेत, त्यांना बहुपक्षीय लोकशाही आणि आधुनिकता हवी आहे. म्हणूनच एर्डोगन यांना ते सलत आहेत. अशा सर्वांची गठडी वळून निरंकुष सुलतान होण्याची एर्डोगन यांची इच्छा आहे. पत्रकार मंडळी तुरुंगात आहेतच, आता आणखी वीस पंचवीस हजार मंडळी तुरुंगात रवाना होत आहेत. हे सारं भविष्यात सुरळीत करता यावं असा त्यांचा प्रयत्न आहे.
तुर्कस्तानची परिस्थिती बिकट आहे. दहशतवाद आणि कुर्डांचं स्वातंत्र्य आंदोलन या दोन गोष्टी तुर्कस्तानची वाट लावायला निघाल्या आहेत. युरोपियन युनियन तुर्कस्तानला प्रवेश द्यायला तयार नाही. आर्थिक विकास आणि रोजगार या दोन आघाड्यांवर तुर्कस्तान घसरू लागलं आहे. दहशतवादी आयएसबद्दल त्यांचं धोरण स्पष्ट नाही. आयएस ही सुन्नी संघटना आहे आणि तुर्कस्तान सुन्नी आहे, त्यामुळं एर्डोगन यांना आयएसबद्दल सहानुभूती आहे असं निरीक्षकांचं म्हणणं आहे.
तुर्कस्तानात कुर्डांचं प्रमाण वीस टक्के आहे. त्यांच्याशी सामोपचारानं बोलून प्रश्न सोडवायला एर्डोगन तयार नाहीत.आयएसशी हात मिळवणी करून ते कुर्डांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं एकीकडं अमेरिका-युरोपीय देश वैतागले आहेत आणि दुसरीकडं कुर्ड मंडळीही संतापली आहेत.
तुर्कस्तानातली आर्थिक आणि सामाजिक स्थिती बिघडलीय. ती दुरुस्त करण्याचं विधायक मानस आणि कसब एर्डोगन यांच्याकडं नाही. धर्माचं बुजगावणं वापरून विरोधकांना पळवून लावायचं आणि कसंही करून सत्ता टिकवायची असा एर्डोगन यांचा प्रयत्न आहे.
जे जगात तेच तुर्कस्तानात.
One thought on “तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.”
excellent analusis of the situation in turkey, lesson for secular India!