स्टॅनफर्ड विश्वशाळेत झालेला बलात्कार

स्टॅनफर्ड विश्वशाळेत झालेला बलात्कार

           जून २०१६ च्या पहिल्या आठवड्यात ब्रॉक टर्नर या स्टॅनफर्ड विश्वशाळेतल्या  विद्यार्थ्याला एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याबद्दल सहा महिन्याची शिक्षा झाली. कायद्यातल्या तरतुदींनुसार १४ वर्षाची शिक्षा होऊ शकत असताना इतकी किरकोळ शिक्षा झाल्याबद्दल अमेरिकन जनतेनं नाराजी दाखवलीय, निकाल देणाऱ्या न्यायाधिशाला बडदर्फ करण्याची मागणी केलीय.
           17 जानेवारी 2015 ची मध्यरात्र. (की मद्यरात्र?)
स्टनफोर्ड विश्वशाळा. मुलांनी पार्टी केली. पी पी प्याले. इंग्रजीत याला बिंगे ड्रिंकिंग म्हणतात. ब्रॉक टर्नर हा वीस वर्षाचा विद्यार्थी दुसऱ्या एका विद्यार्थिनीबरोबर पार्टीतून फिरायला बाहेर पडला.  विद्यार्थिनीही फार प्याली  होती. फिरता फिरता कचरा एका कुंडीजवळच्या एकांतात दोघं पोचले. येव्हाना विद्यार्थिनीची शुदध हरपली. ब्रॉक मात्र इतका प्याला असूनही लडखडत्या शुद्धीवर होता. त्यानं बलात्कार केला. 
झाला  प्रकार त्या जागेजवळून जाणाऱ्या  दोन विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला हलवलं, पोलिसांना खबर दिली. खटला दाखल झाला. कलिफोर्नियाचे न्यायाधिश पर्स्की यांच्यासमोर. जबान्या झाल्या. पुरावे सादर झाले. सुनावणी झाली. ज्यूरींनी खटला ऐकला. 
सुनावणीच्या दरम्यान ब्रॉकच्या  पित्यानं न्यायाधिशाला एक दीर्घ पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यानी ब्रॉकला  दोषी ठरवू नका, दारूला दोष द्या असं लिहिलं. ज्या वातारणामुळं हा गुन्हा घडला त्या वातावरणाला दोषी धरा असं लिहिलं. ब्रॉकच्या पित्यानं लिहिलेल्या पत्रात “ culture surrounded by drinking and promiscuity” अशा शब्दात शाळेतल्या वातावरणाचं – संस्कृतीचं  वर्णन केलंय.आपला मुलगा सालस आहे, गुणी आहे, मेहनती आहे, घडलेली गोष्ट दुर्दवी असल्यानं त्याला कमीत कमी शिक्षा द्या असं त्यानी पत्रात म्हटलं. बलात्काराच्या गुन्ह्याला 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
 पत्रात त्यांनी ब्रॉकचं वर्णन केलं होतं. ब्रॉक पोहणारा होता, त्याला पोहण्यातच करियर करायची होती.  त्याला ऑलिंपिकमधे जायचं होतं. त्यासाठीच स्टनफर्ड या विश्वशाळेत तो दाखल झाला होता. या विख्यात शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यानं खूप मेहनत केली होती. शाळेत गेल्यावर तिथल्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला.   तिथं खूप स्पर्धा होती. जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेचा प्रचंड तणाव आणि दबाव त्याच्यावर होता. ब्रॉकला तणाव सहन होत नसे. आपल्याला कॉलेज सोडावंसं वाटतंय असं ब्रॉक रडून रडून सांगत असे. 
लेस्ली रासमुसेन या ब्रॉकच्या बालमित्रानंही न्यायाधिशांना एक पत्र  लिहिलं. त्यांनंही ब्रॉक कसा चांगला होता याचे किस्से त्यानं  लिहिले. त्याचं म्हणणं असं की ब्रॉकला विश्वशाळेनं बिघडवलं.   लेस्ली म्हणतो “ these universities market themselves as the biggest party schools in the country….they encourage drinking…” . या वातावरणाचा परिणाम ब्रॉकवर झाला असं लेस्लीचं म्हणणं. पिणं ही फॅशन झाली होती. ब्रॉक खूप प्याला, प्यालेल्या अवस्थेत त्याचा तोल जाणं अटळ होतं असं लेस्लीचं म्हणणं. लेस्ली बलात्कार झाल्याचं मान्य करतो. पण त्या मुलीलाही तो अप्रत्यक्षपणे जबाबदार  धरतो. मुलीलाही कळू नये? तंग कपडे, दारुची नशा हे एक प्रकारे बलात्काराला आमंत्रणच होतं असं लेस्ली सुचवतो. 
खटल्याच्या दरम्यान ब्रॉकनं पश्चात्ताप व्यक्त केला. आपल्या हातून जे काही घडलं त्याचं आपल्याला  खूप वाईट वाटतंय. न्यायालयानं मला संधी द्यावी. मी तरूण पिढीला दारू व इतर दोषांचे परिणाम सांगून परावृत्त करणार आहे आहे असं त्यानं न्यायाधिशांना सांगितलं.
दोन्ही पत्रं ब्रॉकला क्षमा व्हावी, त्याची शिक्षा कमी असावी असं म्हणत होती.
कुठलाही खटला चालावा तसा हा खटला चालला. वकिलांनी डावपेच लढवले. घटनेचे तपशील अशा रीतीनं मांडले की कोर्टानं बलात्कार नव्हे तर लैंगिक हल्ला हा आरोप ठेवला. 
 न्यायाधीश पर्स्की यानी जून 2016 मधे दिलेल्या निकालात ब्रॉकला सहा महिन्यांची शिक्षा दिली. अत्याचाराच्या कलमाखाली त्याला दोषी ठरवण्यात आलं.  शिक्षा झाल्यावर दोन वर्षं परिक्षेचा काळ. त्या काळात त्याच्या वागणुकीवर पोलिस आणि न्यायालयाचं लक्ष. तो पूर्ण झाल्यानंतर ब्रॉक मोकळा. मोठ्या शिक्षेची आवश्यकता नाही असं न्यायाधिशांनी म्हटलं. आयुष्यभर एक गुन्हेगार अशी नोंद कपाळावर लिहिली जाणं हीच एक मोठी शिक्षा आहे, ती पुरेशी आहे असं न्यायाधिश म्हणाले. अधिक काळ तुरुंगात ठेवण्यानं आरोपीवर फार दुष्परिणाम होईल असं न्यायाधिशानी निकालपत्रात म्हटलं.
जनता चिडली. लाखो लोकांनी सह्या करून न्यायाधिशाला  बडतर्फ करण्याची मागणी केली आणि खटला नव्यानं चालवून मोठ्या शिक्षा देण्याची मागणी केली. बलात्कार करणाऱ्याला इतकी किरकोळ शिक्षा दिली जाणं म्हणजे बलात्काराला प्रोत्साहन देणं आहे असं लोकांनी म्हटलं. अशानं कुणाही स्त्रीला रस्त्यावरून मोकळं फिरणं अशक्य होईल असं असंख्य लोक वेगवेगळ्या माध्यमात म्हणाले.
जनतेनं सह्या जमवून, माध्यमांत ओरड करून न्यायाधिशांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
अमेरिकन राज्यात अनेक वाटांनी न्यायाधिश नेमले जातात. एक वाट म्हणजे राज्याचा गव्हर्नर त्यांना नेमतो. वकिली ज्ञान आणि राजकीय कल याचा विचार करून गव्हर्नर आपल्या पक्षाला हवा असलेला माणूस न्यायाधिशपदी नेमतात. ही नेमणूक राजकीय असते. दुसरी वाट म्हणजे राज्य विधीमंडळ उमेदवाराची पात्रता लक्षात घेऊन न्यायाधिश नेमतं. यातही राजकीय घटक असतोच. तिसरी वाट म्हणजे थेट निवडणुक, जनता मतदान करून न्यायाधिश निवडते. पण याही निवडणुकीत उमेदवार पक्षाच्या यादीतले असतात. चौथी वाट म्हणजे अपक्ष निवडणुक. या निवडणुकीत उमेदवार जाहीर करतात की आपण कुठल्याही पक्षाचे नाही.
गव्हर्नर न्यायाधिशाला काढून टाकू शकतो. विधीमंडळ न्यायाधिशावर अभियोग चालवून, त्याची चौकशी करुन दोन तृतियांश बहुमतानं बडतर्फी करू शकते. न्यायालयीन व्यवस्थाही कमीटी नेमून चौकशी करून कारवाई करू शकते. जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांच्या अर्ध्या सख्येनं मतदार एकत्र येऊन न्यायाधिशाला काढून टाकू शकतात.
पर्स्कीची नेमणूक २००३ साली डेमॉक्रॅट गव्हर्नर डेविस यांनी केली. जूनमधे ही न्यायाधिशाची जागा रिकामी होऊन त्या ठिकाणी निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणुक अपक्ष असेल. अजूनपर्यंत इतर कोणाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला नसल्यानं पर्स्की पुन्हा बिनविरोध न्यायाधीश होणार आहेत.
या स्थितीत जनतेनं कौल लावून पर्स्की यांना हटवण्याचं ठरवलं आहे. ज्या काऊंटीतून ते निवडून गेले तिथल्या ८१ हजार मतदारांनी सह्या करून त्यांना परत बोलावण्याची मागणी केली तर पर्स्की बडतर्फ होतील. बहुसंख्यांनी मतदान करून घालवलं तर अर्थातच पुढल्या निवडणुकीत ते निवडले जाणार नाहीत. पुरेशा सह्या गोळा झाल्या नाहीत तर इतर वाटा उरतील. पण त्या वेळ खाणाऱ्या असतील.
न्यायाधिश भले कायद्यानुसार वागले असतील, तरीही बलात्कारासारख्या गुन्ह्याला किरकोळ शिक्षा होणं ही  गोष्ट न्यायाला धरून  नाही.  जबर  शिक्षा दिली पाहिजे या बाजूला जनमत आहे.  
 ब्रॉक टर्नर हा ओहायो या राज्यातल्या  ओकवूड  या  गावाचा रहिवासी. एक समृद्ध आणि स्वच्छ अमेरिकन गाव. टुमदार. बहुतेक सर्व कुटुंबं सुखवस्तू आणि श्रीमंत वर्गातली. गावात चहूकडं हिरवळ,  झाडं, निवांतपणा. याच गावातल्या एका शिक्षिकेनं वर्तमानपत्राला पत्र लिहून आपल्या गावाची हकीकत सांगितली. पार्टी, दारू पिणं आणि धिंगाणा घालणं अशी एक परंपरा – फॅशन गावात रूढ झाली आहे.शाळकरी  मुलही वीकेंडला, सुटीच्या दिवसात पार्ट्या करतात. एकाद्या पित्यानं आपल्या मुलाला किंवा मुलीला पार्टीत जाऊ नकोस असं सांगितलं तर मुलं रागावतात. असं करणं म्हणजे मागे पडणं असं मुलांना वाटतं. पार्टीत धिंगाणा झाला तर पोलीसही काणाडोळा करतात, अगदीच खून वगैरे झाला नाही म्हणजे बास झालं असं पोलिसांचं मत झालंय.
मुलांना आता नकार ऐकायची सवय राहिलेली नाही.पालकही ‘ नो ‘ म्हणायला तयार नसतात. बलात्कार करणं, बळजोरी करणं यात चूक नाही, यात गुन्हा नाही, म्हटलं तर त्यात मर्दानगी आहे असं बऱ्याच मुलांना वाटतं. सर्वाना तसं वाटत नसेलही पण बऱ्याच जणांना वाटतं. ही समजूत दूर करण्याचा प्रयत्न समाजात होताना दिसत नाही. पालक मुलांना बलात्कार वा पिण्याला प्रोत्साहन नक्कीच देत नाहीत. परंतू या दोषांपासून परावृत्तही  करत नाहीत असं ओकवूडमधल्या शिक्षक बाईचं म्हणणं आहे.
विद्यार्थिनी दारू प्याली, प्रमाणाबाहेर. ही तिची चूक. अशा परिस्थितीत मित्रापासून अंतर ठेवलं नाही हीही चूकच. पण या होत्या चुका, गुन्हे नव्हेत. ब्रॉकनं बलात्कार केला ही चूक नव्हती, तो गंभीर  गुन्हा होता. रस्त्यात एकांतात भले पूर्ण नग्न स्त्री समोर असेल. तिचं शारीरीक आणि मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेणं हा मोठा गुन्हा आहे. तो ब्रॉकनं केला. तेव्हां हे कृत्य धिक्कार करण्यायोग्य  आहे, त्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे.
अमेरिकन समाजाची घडण स्वातंत्र्य आणि संधी  या पायावर झाली आहे. माणसाला विचाराचं आणि आचाराचं स्वातंत्र्य आहे. पुरुषाना आहे आणि स्त्रियांनाही. पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना संधी आहे. स्वतःचा व्यक्तिशः विकास, सार्वजनिक ठिकाणची वर्तणुक याचं  स्वातंत्र्य अमेरिकन समाजानं स्त्रीला दिलं आहे. असा विचार आणि परंपरा जगातल्या इतर समाजात कमी आहेत, कमी प्रमाणात अमलात येतात. हे स्वातंत्र्य अर्थवाही पद्धतीनं टिकवणं आणि विकसित करणं  अमेरिकन स्त्री पुरुषांच्या हाती आहे. हे स्वातंत्र्य अमेरिकन कसं टिकवणार? स्त्रीला स्वतःचं आयुष्य बेतण्याचं स्वातंत्र्य उपभोगू देणं, तरीही बलात्कारासारखा अमानवी प्रकार न घडू देणं हे अमेरिकन समाज कसं साधणार आहे?
ब्रॉकला जबर शिक्षा तर व्हायलाच हवी. परंतू विश्वशाळेमधे जीवघेण्या स्पर्धा असणार नाहीत, स्वातंत्र्य असेल पण स्वैराचार असणार नाही याचीही काळजी विश्वशाळेला घ्यायला हवी. आचाराचं स्वातंत्र्य पुरुष आणि स्त्रियांना असेल.  त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी होता कामा नये ही नीती समाजात रुजवायला हवी.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *