खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.
खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.
।।
सलमान तासिर या राज्यपालांना मुमताझ काद्री या त्यांच्याच अंगरक्षकानं गोळ्या घालून ठार मारलं. त्या बद्दल काद्री याला पाकिस्तानी न्यायालयानं फाशी दिली. पण पाकिस्तानी जनतेला फाशी मंजूर नाही, त्यानं धर्मकर्तव्य केलं असं तिथल्या लोकांना वाटतं.
।।
मुमताझ काद्री या माणसाला १ मार्चच्या पहाटे इस्लामाबाद तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. सलमान तासिर या पाकिस्तानच्या राज्यपालाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा त्यानं केला होता. काद्री तासिर यांचा शरीररक्षक होता.
पाकिस्तानभर या फाशीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अफगाणिस्तानात तालिबान मंडळींनी काद्रीच्या फाशीविरोधात एक आत्मघाती स्फोट करून वीस पंचवीस माणसं मारली. लाखो माणसं पाकिस्तानात ठिकठिकाणी रस्त्यावर आली. काद्रीला फाशी द्यायला नको होती, काद्रीचा सन्मान करायला हवा होता, तो धर्मात्मा होता असं त्यांचं मत होतं.
फाशीच्या बाजूनं बोलायला माणसं रस्त्यावर उतरली नाहीत.
कोर्टमत आणि लोकमत यात किती फरक आहे हे या निमित्तानं सिद्ध झालं.
।।।
४ जानेवारी २०११ रोजी पंजाबचे राज्यपाल सलमान तासिर इस्लामाबादेतल्या कोशर मार्केट विभागात एका रेस्टॉरंटमधून जेवण घेऊन बाहेर पडताना मुमताझनं त्यांना २७ गोळ्या घातल्या. कोशर मार्केट या भागात मध्यम वर्गी माणसं रहातात. हा भाग अगदी सुरक्षित मानला जात असे.
मुमताझनं बंदुक खाली ठेवली. गुडघे जमिनीवर टेकून आपण धार्मिक कृत्य केलंय असं ओरडून म्हणाला.
तासिर यांचा गुन्हा असा की आसियाबीबी नावाच्या एका ख्रिस्ती शेतमजूर महिलेला झालेली धर्मनिंदा (ब्लाशफेमी) कायद्याखालची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी होती. धर्मनिंदा कायदा भोंगळ आहे, त्याचा गैरवापर होतोय म्हणून त्या कायद्यात सुधारणा करावी अशी तासिर यांची मागणी होती.
आसियाबीबीनं धर्मनिंदा केली म्हणजे काय केलं होतं? आसियाबीबी एक ख्रिस्ती भूमीहीन शेतमजूर. सहकारी मुस्लीम स्त्रियांशी तिचा वाद झाला. त्यावेळी आसियाबीबी म्हणाली की आपली ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा आहे आणि येशू जिवंत आहे. हे ऐकून आसपासच्या गावकऱ्यांनी पोलिसांत वर्दी दिली की आसियाबीबीनं धर्मनिंदा केली.आसियाबीबीवर खटला झाला, फाशी जाहीर झाली.
तासिर आसियाबीबीची बाजू घेतात आणि धर्मनिंदा कायद्यात सुधारणा मागतात यावरून पाकिस्तानी जनता चिडली. देशभरच्या मुल्लांनी पत्रकं काढून तासिर यांना धर्मनिंदक ठरवलं, फाशीची मागणी केली. मुल्लांनी तमाम मुसलमानांना आवाहन केलं की त्यांनी तासिर यांना मारून टाकावं.
।।
काद्रीचं शिक्षण शालांत परिक्षेपर्यंतच झालेलं होतं. त्यानं इस्लामचं धार्मिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. त्याला धर्मातलं हो का ठो कळत नव्हतं. इस्लामी परंपर न पाळता तो सफाचट दाढी करत असे. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध होते.
काद्रीवर तासिर यांना मारल्याचा खटला सुरु झाला. काद्री कोर्टात गेला की जमा झालेली माणसं गुलाबाच्या पाकळ्या उधळून त्याचं स्वागत करत. वकील आणि पोलिसही. कोर्टाच्या बाहेर मुल्ला मंडळीनी खूप माणसं जमवलेली असत. कोर्टात काद्री म्हणत असे की त्यानं गुन्हा केला नसून धर्मकर्तव्य केलं आहे. शिक्षा सोडाच, त्याचा सत्कार झाला पाहिजे असं त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं.
काद्रीची रवानगी रावळपिंडीतल्या अदियाला तुरुंगात झाली. काद्री तुरुंगाचा प्रमुख असल्यासारखा वागे. तो आज्ञा करी, तुरुंगातले अधिकारी त्याची आज्ञा ऐकत. याच तुरुंगातल्या एका बराकीत महंमद असगर आणि झफर भट्टी हे दोघं धर्मनिंदा कायदा मोडल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासी होते. एकदा मुमताझ त्या बराकीत गेला आणि ७० वर्षाच्या महंमद असगरला गोळ्या घातल्या. नंतर भट्टीलाही गोळ्या घातल्या. तुरुंगाधिकाऱ्यांनी मुमताझवर कोणतीही कारवाई केली नाही, उलट त्याचा सत्कारच केला.
काद्री तुरुंगातून पाकिस्तानातल्या आपल्या लोकांना धर्मनिंदकाना मारण्याची आज्ञा देत असे. कराची विद्यापिठातला प्राध्यापक शकील औजला गोळ्या घालण्यात आल्या. औजनं कोणतीही धर्मनिंदा केली नव्हती. तो हुशार होता. तो विद्यापीठातल्या गैरप्रकारांबद्दल बोलत असे. कॉपी करणं, कॉपी पेस्ट करून पीएचडी करणं वगैरे. त्यामुळं विद्यापीठातले लोक त्याच्या विरोधात होते. तो कुलगुरू होणार होता. त्याचं वागणं पसंत नसलेल्या लोकांनी त्याला धर्मनिंदक ठरवलं.
रशीद रहमानला नावाच्या वकीलाला कोर्टाच्या आवारात गोळ्या घालण्यात आल्या. तो धर्मनिंदा बळींची बाजू कोर्टात मांडत असे.
।।
खोमेनी यांनी सलमान रश्दींना मारून टाकण्याचं आवाहन साऱ्या मुस्लीम जगाला केलं होतं. सलमान रश्दीला मारणाऱ्या माणसाला या जगात आणि स्वर्गात बक्षीस मिळेल असं त्यानी जाहीर केलं. रश्दीनं सेटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी लिहून धर्मनिंदा केली होती असं खोमेनींचं म्हणणं होतं. सेटॅनिक व्हर्सेस इंग्रजीत होती. इंग्रजीत असल्यानं ती कादंबरी अगदीच नगण्य लोकांनी वाचली होती. भारतात ती न वाचलेल्या लोकांनी मोर्चे काढले. खोमेनींच्या फतव्यापुढं मान तुकवून भारत सरकारनं सेटॅनिक व्हर्सेसवर बंदी घातली. धर्मनिंदेची फाशीची शिक्षा देण्याची जबाबदारी खोमेनी यांनी प्रत्येक मुसलमानावर सोपवली. फाशी किंवा ठार मारणं हे प्रत्येक मुसलमानाचं धर्मकर्तव्य ठरत असल्यानं कोणीही मुसलमान व्यक्ती ते करू शकत होत्या.
एकादी गोष्ट बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार धार्मिक राज्यात धर्माकडं असतो, कोर्टाकडं नसतो. कारण त्या देशांत धर्माचं म्हणणं चालतं, कायद्याचं नाही. ख्रिश्चॅनिटीमधे धर्माचं उल्लंघन झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार धर्मानं चर्च या संस्थेला आणि पोप या सर्वोच्च धर्मनेत्याला दिला आहे. इस्लाम या धर्माला संघटित संस्थेचं रुप नसल्यानं इस्लाममधे संस्था नाही. कोणीही माणूस धर्मोपदेशक होऊ शकतो, निका लावू शकतो, धर्मप्रवेश वा धर्मबाह्यता ठरवू शकतो. अगदीच अडाणी, नुसतं कुराणाचं वाचन करणारा माणूसही धर्माबाबत निर्णय घेऊ शकतो. धर्माधिकारी कोण हे इस्लाममधे अगदीच भोंगळपणानं ठरत असल्यानं मुमताझ किंवा झिया उल हक, इस्लामचा हो का ठो माहित नसतांना इस्लामच्या वतीनं वाट्टेल ते करू शकतात. ही इस्लामची खासियत आहे.
।।
पाकिस्तानी फौजदारी कायद्यात धर्मनिंदेचं २९८ हे कलम झिया उल हक यांनी घातलं. इस्लामबद्दल अनुदार उद्गार, इस्लामला विरोध, इस्लामी माणसाचं मन दुखावणं, धर्मविरोधी वर्तन, धर्मात सांगितलेल्या गोष्टी न पाळणं, धर्मविरोधी बोलणं, धर्मविरोधी चित्र काढणं, इत्यादी गोष्टी धर्मनिंदा या कलमाखाली येतात. धर्मनिंदा म्हणजे नेमकं काय हे कधीच कायद्यात ठरवण्यात आलेलं नाही. सत्ताधारी म्हणतील ती धर्मनिंदा. धर्मनिंदा करणाऱ्याला फाशीची तरतुद या कलमात आहे.
इस्लाममधे हनाफी परंपरा आहे.या परंपरेत धर्मिनिंदेचा आरोप असणाऱ्यानं पश्चात्ताप व्यक्त केला तर फाशी देऊ नये अशी तरतूद आहे. धर्मनिंदा करणारी व्यक्ती इस्लामी नसेल तर त्या व्यक्तीला फाशी देऊ नये अशीही तरतूद आहे. झियांनी ही तरतुद केली तेव्हां आणि आसियाबीबीला फाशी झाली तेव्हां मुल्लांनी हनाफी परंपरेचा विचार करण्याची विनंती केली होती. हनाफी तरतूद मान्य करणं म्हणजे पश्चिमी समाज, इतर धर्मीय आणि सेक्युलर यांच्यापुढं सरकार झुकलं असा अर्थ घेतला जाईल अशी सबब सांगण्यात आली.
गेल्या १० वर्षात शेकडो माणसं धर्मनिंदेच्या नावाखाली मारली गेलीत. राजकीय विरोध, जमिनीवरून भांडण, पैशावरून भांडणं, अनैतिक वागण्यावरून भांडण, व्यक्तिगत वैर, एकाद्या विषयावरील मतभेद अशा कोणत्याही कारणावरून धर्मनिंदा झाली असा परस्पर निर्णय घेऊन खून केला जातो किवा खटला भरला जातो. खटल्यात फाशी होते.
हे धर्मनिंदा प्रकरण राजकीय कारणांसाठी वापरलं जातंय हे लक्षात घेऊन बेनझीर भुत्तो आणि मुशर्रफ दोघांनीही तो कायदा दुरुस्त करावा असं अनेक वेळा म्हटलं. पण येवढं बोलल्यावरून त्यांच्याही विरोधात मुल्लांनी धर्मनिंदेचा फतवा काढून त्याना मारून टाकण्याचं आवाहन केलं.
१९८० पासून २०१६ पर्यंत धर्मनिंदा कायद्यात बदल झालेला नाही.
।।
धर्मनिंदा प्रकरण व्यवहारात कसं घडतं त्याचं एक उदाहरण.
४ जुलै २०१२. ठिकाण बहावलपूरमधील पोलिस चौकी. पोलिस चौकीत आहे एक मलंग. त्याच्यावर धर्मनिंदा केल्याचा आरोप आहे.
मलंग म्हणजे अवलिया, भटक्या, भणंग. हे मलंग सुफी संतांच्या समाधीच्या आसपास असतात. रंगीबेरंगी भरपूर घोळ असलेला ड्र्स. डोक्यावर लाल फेटा. अंगावर नाना चिन्हं, लोटा, लाकडी वस्तू टांगलेल्या. दाढी वाढलेली. या मलंगानं कित्येक दिवस आंघोळ केली नसावी. मशिदीतून किंवा गावातल्या लोकांकडून मिळणाऱ्या भिक्षेवर जगे. करत काहीच नव्हता. स्वतःशीच बडबड करत फिरे. असंबद्ध बोले. सामान्य माणसं अशा माणसाला वेडचाप म्हणतात किंवा स्क्रू ढिला आहे असं म्हणतात. यांचा उपद्रव नसतो. आपल्याच नादात असतात. कधी कधी गाणीबिणी म्हणतात.तर असा हा मलंग लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोठडीत ठेवला होता.
मलांगाविरोधात लोकांची तक्रार होती की त्यानं कुराण अपवित्र केलं. म्हणजे काय केलं? कुराणाची प्रत फाडली? जाळली? की कुराणाचं पावित्र्य नष्ट करणारे काही उद्गार काढले? मुळातच मलंग असंबद्ध असतात. ते काय बोलतात ते कळतही नाही. त्यांच्या बोलण्यात अनंत विसंगती असतात. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागत नाही. म्हणून तर त्याला लोक वेडा असं म्हणतात. मलंग मुसलमान असतात, सुफी असतात. तेव्हां अशा माणसानं केलं तरी काय? माणूस ठिकाणावर नसतो हे माहित असताना त्यानं विचारपूर्वक कुराण अपवित्र केलं असं कसं म्हणायचं? त्याच्या कृत्याचे कोणतेही पुरावेही लोकांकडं नव्हते.
बाहेर जमलेले लोक म्हणत होते की मलंगाला आमच्या हातात सोपवा.
पोलिस म्हणत होते की त्याच्यावर धर्मनिंदेचा खटला होईल, कोर्ट निकाल देईल, लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये.
जमाव ऐकत नव्हता. हिंसक झाला. जमाव येवढा मोठा होता की गोळीबार करणंही शक्य नव्हतं. पोलिस हतबल झाले.
जमावानं कोठडीचे दरवाजे फोडले, मलंगाला बाहेर काढलं. रस्त्यावर आणून त्याला बुकल बुकल बुकलं. मलंग मेला.
जमाव शांत झाला आणि अल्ला हो अकबरच्या घोषणा देत पांगला.
।।
चिकित्सा ही मानवी ज्ञानाची वाट आहे. माणूस चिकित्सा करायला लागला त्यातूनच धर्म निर्माण झाला. सभोवतालच्या स्थितीचे अर्थ लावणं, सभोवतालच्या घटनांमधला कार्यकारण संबंध शोधणं या माणसाच्या खटपटीतूनच धर्म जन्मला. चिकित्सा हा धर्माचा मुख्य आधार आहे. प्रत्येक काळात धर्माची चिकित्सा होणं हे मुळात धर्मातच अपेक्षित आहे.
पाकिस्तानी जनता चिकित्सेला तयार नाही. धर्मापासून फटकून असलेले पाकिस्तानमधले डावेही इस्लामबद्दल फारच सावधगिरीनं, गुळमुळीत बोलतात. गवगवांकित पुरोगामी कुराण अंतिम आहे अशी भूमिका घेतात.
धर्मनिंदा कायदा कुठून आला? शरियात तो कसा आणि केव्हां गुंफला गेला? वेळोवेळी राज्यकर्त्यांनी आणि बाहुबलींनी अनेक प्रथा आणि परंपरा इस्लाममधे घुसडल्या आणि त्यामुळंच त्या विद्वानांनी मान्य केल्या हे खरं की खोटं? अरबस्तानात किंवा आणखी कुठं तरी निर्माण झालेल्याच प्रथा खऱ्या इस्लामी, भारतात तयार झालेला प्रथा इस्लामी नाहीत हे ठरवण्यात तर्क कोणता?
शरिया या शब्दाचा अर्थ पाणवठ्याकडं जायची वाट असा आहे. अरब जनजीवनात पाणी, पाणवठा या गोष्टींना एक विशिष्ट भौगोलिक आणि वहिवाटीचा संदर्भ आहे. कोकणात किंवा गंगेच्या काठावरच्या पाणवठ्याकडं जाणाऱ्या वाटा वेगळ्या असतात. गंगेच्या काठची किंवा कोकणातली वाट ही शरीया कां मानायची नाही? अरब सांगतात तीच वाट म्हणजेच धर्माची वाट हे कां मानायचं?
इस्लाम सोडा, धर्म नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे. एकविसाव्या शतकात जगभरातली माणसं एकूणच धर्म या संकल्पनेची आणि व्यवहाराची चिकित्सा करत आहेत. पश्चिमी जगात चर्चमधे न जाणारे, देव आणि येशूला न मानणारे ख्रिस्ती आता खूप आहेत. त्यांना ख्रिस्ती परंपरेतल्या समाजातल्या काही गोष्टी आवडतात म्हणून ते ख्रिस्ती असतात. नस्सीम निकलस तालेब हा लेखक-फायनान्स जाणकार म्हणतो की चर्चमधलं धीरगंभीर संगीत आणि सूर, उदबत्त्यांचे वास, वातावरण आवडतं म्हणूनच तो चर्चमधे जातो, बाकी त्याला ना देव मंजूर ना ख्रिस्ती धर्म. माणसावर प्रेम करावं या एकाच अनेक जण स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, बायबल वगैरे गोष्टी त्यांच्या लेखी महत्वाच्या नसतात. पोप कोण लागून गेला, आमचे आम्ही स्त्रियांना प्रीस्ट-बिशप करू असं म्हणून अमेरिकेत, ब्रीटनमधे, अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी परंपरा धाब्यावर बसवून स्त्रियांना बिशप केलंय. या बिशप स्त्रिया ख्रिस्ती लोकांची लग्न लावतात, मुलांना बाप्तिस्मा देतात, चर्चमधे प्रार्थना करतात आणि व्याख्यानं देतात. त्या म्हणतात भले पोपनी आम्हाला धर्मबाह्य म्हणावं, आम्ही पोपांचं ऐकत नाही, आम्ही ख्रिस्ती आहोत.
धर्म आणि धर्मनिंदा, धर्मात घेणं आणि धर्माबाहेर ढकलणं, धर्मपालनाच्या तरतुदी अशा एकूणच धर्मप्रकरणाचा विचार जगभर चालला आहे, व्हायला हवा. पाकिस्तानातही.
।।
8 thoughts on “खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.”
I do not think that there is any 'gondhal' ( confusion ) in the minds of Pakistani. Explore if it is Islamic Tradition. Confusion is in the minds of non-Muslims. They expect Muslims to follow traditions unacceptable to Islam. This is unlikely to happen in even one Islamic country in the world. Be realistic.
गोंधळ असा शब्द मी वापरला कारण इस्लामी जनतेत खूपच गोधळ आहे. सर्वोच्च न्यायालयानं काद्रीला धर्मात्मा न ठरवता खुनी ठरवलं याचा अर्थ काय होतो? त्यांना ब्लाशफेमी किंवा हुदूद कायद्याखाली सलमानलाच मारून टाकता आलं असतं. आसियाबीबी अजूनही तुरुंगात आहे, तिला फाशी दिलेली नाही. मुशर्रफ यांच्या कालात तमाम वकिलांनी आंदोलन करून राज्यघटना सुधारण्याची, ती लोकशाहीवादी करण्याची मागणी केली होती. जगातल्या घडामोडींचा परिणाम म्हणून अनेक इस्लामी लोक कुराण, सुन्ना यांचे नव्यानं अर्थ लावायला हवेत असं म्हणतात. इस्लाममधे स्त्रीवर अन्याय होतो असं म्हणून स्त्रीवादी विचारही इस्लामी माणसांमधे फोफावतांना दिसतो.अडचण अशी की गोठलेल्या मुल्लांच्या प्रभावातून बाहेर पडायला इस्लामी माणसं तयार नाहीत. तथाकथित इस्लामी तत्वांच्या शंभर टक्के विरोधात वर्तन करायचं पण अधिकृतरीत्या इस्लाम उचलून धरायचा असं आखाती देशात घडत असतं. खूप खूप गोंधळ आहेत. प्रबोधनाची गरज आहे. प्रबोधन होणं हे एकूण जगासाठीच उपयुक्त आहे.
आणि भारतातही!
कळतंय पण वळत नाही अशा मानसिकते मुळेच समाजातील काही घटक गोंधळलेले असावेत…..धर्म हा जीवन जगण्याचा मार्ग व धार्मिक ग्रंथ हे त्याचे संविधान असे असायला हवे परंतु सांप्रत युगामध्ये प्रथेलाच प्राधान्य देण्यात येत असल्याचे आढळून येत आहे….
कठीण आहे. पाकिस्तानात ’जमाव’ ही एक अधिकृत शक्ती आहे, असं दिसतं. धर्मनिंदेचं नाव घेऊन ही शक्ती हवं ते करते आणि त्याला दुसरी कुठलीही ’civilised' शक्ती वा संस्था अडवू शकत नाही. या लेखात वर्णन केलेल्या घटना पाहाता मला यात कुठे धर्म वा श्रद्धा यांचा संबंध असलेला दिसत नाही. मागे ’अक्षर’मध्ये आम्ही ’लोकांच्या मनातली धार्मिकता’ असा खास विभाग केला होता. सर्वांशी सौजन्याने वागणं, हे धर्मिक वर्तनाचं प्रथम लक्षण आहे, असं विविध धर्माच्या सर्वसामान्य लोकांशी बोलल्यावर लक्षात आलं होतं. हे फक्त भारतातच असेल, असं मला वाटत नाही. हे पाकिस्तानात नसेलच, असं तर बिलकुल वाटत नाही. ’व्यवस्था’ – order – नष्ट व्हायला लागली, की तिची जागा घ्यायचे प्रयत्न सुरू होतात, त्याचाच हा एक आविष्कार आहे, असं मला वाटतं. सर्वात सोयीचं म्हणून धर्माचा आधार घेण्यात आला असावा. पाकिस्तानात एकूण परस्पर व्यवहारातली व्यवस्था कोसळून पडू लागली आहे का? समाज अशी काही नियमबद्ध व्यवस्था विरून जात आहे का? पश्चिम आशियातल्या काही ठिकाणीसुद्धा असंच होत आहे का?
आणि शेवटी असं भारतात होण्याचा धोका किती आहे? केवळ दादरीमध्ये नाही; छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात परिस्थिती अशी झाली / होत चालली आहे का? विविध कारणांमुळे असंतुष्ट झालेल्यांना इस्लाम हा एक सोयीस्कर भोज्या मिळाला आहे.
that is the reason many people call religion as 'Opium of the people' religion has to be a sigh of oppressed . solace to people in difficulty and should inspire people to love human beings as he or she is a creation of GOD! as per all reigons! but politics of power and religion is a dangerous mixture! Indians be aware!
Generalisation of Pakistani people as religious fanatics may not be right. In any society there will be a section opposing to such killings. It is necessary to support them at global level.
इस्लाममध्ये सुधारणा चळवळ यायची असेल तर त्यासाठी इस्लामेतरांना इस्लामी समाजाशी जोडुन घ्यावं लागेल. विनोबा वाचावे लागतील!