मलाला आणि कैलास सत्यार्थी
कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई या दोघाना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालंय.
कैलास ‘बचपन बचाव’ आंदोलनाचे निर्माते आहेत. मुलांना शिक्षण मिळालं तर त्यांचा विकास होईल. गरीब घरातली माणसं मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात तेव्हां ती गरीबी वाढवत असतात. मुलाला शिक्षण मिळालं तर पुढं त्यांचा चांगला विकास होतो, गरीबी नष्ट होते असं ते म्हणतात.
दोन प्रकारची कामं ते करतात. एक म्हणजे जिथं जिथं मुलांना कामावर ठेवून, बेकायदेशीर रीत्या त्यांच्याकडून कामं करवून घेतात त्या संस्थांवर छापा मारतात. त्या संस्थांना शिक्षा करतात, मुलांना सोडवतात, त्याना शाळेत पाठवतात. तसंच ज्या संस्था बालकामगार वापरतात त्या संस्थांची माहिती जगभर कळवून त्या संस्थांचे प्रॉडक्ट्स लोकांनी घेऊ नयेत असं जाहीर करतात. तसंच ज्या संस्था बालकामगार वापरत नाहीत त्यांच्या प्रॉडक्टवर तसं शिफारपत्र जोडतात.
दुसरं काम आहे बालकस्नेही गावांची निर्मिती. ते गावात जातात. लोकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व पटवतात. लोकांना ते पटलं की गावातले लोक सर्वच्या सर्व मुलांना शाळेत घालतात, त्यांना कामं करायला लावत नाहीत. भारतात ११ राज्यात अशी ३५६ बालकस्नेही गावं त्यांनी तयार केली आहेत. राजस्थान आणि झाडखंडात त्यांचं काम अधिक सघन आहे.
त्यांचं हे काम पश्चिमी देशात अधिक माहित आहे. कारण पश्चिमी जगात अशा िवषयांवर जागृती करण्यात आली आहे. नाईकी या कंपनीचं प्रकरण गाजलेलं आहे. ही कपनी गरीब देशात ( वियेतनाम, बांगला देश, कंबोडिया इ.) वेठबिगारी करत, अगदी कमी पगार देत आणि अत्यंत आरोग्यविघातक परिस्थितीत कामगारांकडून कामं करवून घेत. या विरोधात कैलासजींसारख्या लोकांनी आवाज उठवला. युरोप आणि अमेरिकेत आता माणसं एकादा प्रॉडक्ट घेताना त्याच्या उत्पादनात शोषण झालेलं नाही याची खात्री करून घेतात. अशी शिफारपत्रं देणाऱ्या संस्था तिथं आहेत. तिथली सरकारंही या प्रयत्नांना मदत करतात. मध्यंतरी बांगला देशात एका कारखान्याला आग लागली, कामगार मेले. कारखाना स्वस्तात कपडे विकण्याच्या नादात अत्यंत धोकादायक रीतीनं काम करत असे. हे उघड झाल्यावर पश्चिमी देशात ओरड झाली. त्याचा एक परिणाम बांगला कामगारांना योग्य वेतन आणि आरोग्यदायक परिसर िमळू लागला.
भारतात बालकांचं शोषण होतं, त्यांच्याकडून तयार केलेले गालिचे परदेशात विकले जातात. कित्येक ठिकाणी बालकांची विक्रीही होते. कैलासजींनी या प्रश्नी डॉक्युमेंटरी फिल्म प्रसारित केल्या, आंदोलनं केली, माध्यमातून मोहिम चालवली. याची दखल पश्चिमेनं घेतली. पश्चिमेत कित्येक माणसं अशा रीतीन तयार झालेले प्रॉडक्ट आता विकत घेत नाहीत. हे झालं संघर्ष-आंदोलनात्मक काम. कैलासजींनी बालस्नेही खेडी तयार करून त्यानी एक विधायक उपक्रमही चालवला. या बद्दलच त्यांचं कौतुक आहे.
कैलासजीच्या बरोबरच मलाला युसुफझाईलाही नोबेल मिळालंय. २०१२ साली तिच्यावर तिच्या मिंगोरा या खैबर पख्तुनख्वा (पाकिस्तान) विभागातील गावात हल्ला झाला. तालिबांनी हल्ला केला. खैबर आणि स्वात खोऱ्यात तालिबाननं शरीया राज्य चालवलं होतं. त्या राज्यात स्त्रियाना शिक्षण घ्यायला, घराबाहेर पडायला परवानगी नव्हती. अवघी १५ वर्षंाची छोटी मलाला मुलींना शिक्षण मिळावं यासाठी चळवळ चालवत होती. ते तालिबानला (पािकस्तानी तालिबान ) पसंत नव्हतं. म्हणून तिच्यावर हल्ला झाला.
मरणाच्या दारातून ओढून तिला ब्रीटनमधे नेण्यात आलं. अनेक शस्त्रक्रिया इत्यादी करून तिला ब्रिटीश डॉक्टरनी वाचवलं. मलाला बरी झाली. पण ती पाकिस्तानात परतू शकत नव्हती. ती ब्रीटन, अमेरिका, युरोपातले देश या ठिकाणी शिक्षण प्रसाराचा प्रचार करत फिरू लागली. तिच्या धाडसाबद्दल तिला युरोपीयन युनियननं नोबेलच्या तोडीचं पारितोषिक दिलं. नंतर गेल्या वर्षी तिचं नोबेलला नामांकन झालं होतं.
मलाला शिक्षणाचं महत्व सांगत जगभर फिरते आहे आणि तालिबानला उघडं पाडत आहे. हेही मोठंच काम आहे. पण तिला पाकिस्तानात जाता येत नाहीये. पाकिस्तानी जनतेत तिच्याबद्दल नाना मतं आहेत. तालिबान, जमात उद्दवा, जैशे महंमद, सिपाहे साहेबा इत्यादी संघटनांनी फतवा काढून ती परत आल्यास तिचा खून करा असं जाहीर केलं आहे. तिला ब्रीटनमधेही संरक्षणातच वावरावं लागतं. बऱ्याच लोकाना वाटतं की नोबेल पारितोषिक हा पश्चिमी इस्लाम विरोधी देशांचा कट आहे. पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी हे सारं केलं जातंय. अनेकांचं म्हणणं आहे की मलालाचं काम आणि विचार चांगले आहेत. परंतू तसं चांगलं काम करणारे इतरही लोक पाकिस्तानात आहेत. त्यांच्याबद्दल पश्चिमी देश काही बोलत नाहीत, मलालाचा गौरव करतात, हे बरोबर नाही.
बांगला देशानं तसलीमा नसरीनला बाहेर काढलं आहे, पाकिस्ताननं मलाला युसुफझाईला.
कैलासजीनी मलालाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. मलालाच्या येण्यानं मुलींचं बळ जरूर वाढेल. भारतात मुलींच्या शिक्षणाला कोणाचाही विरोध नाही. भारतात महर्षी कर्वे, महात्मा फुले, महादेव रानडे इत्यादी व्यक्तींनी मुलींच्या शिक्षणाचा पाया एकोणिसाव्या शतकापासूनच घातला. मलालाच्या भारतात येण्यानं मुलींचं शिक्षण, त्यांचे अधिकार यांना बळकटी येईल.
कैलासजी मलालाला फोन करून भारतात बोलावणार आहेत म्हणाले. बोलता बोलता ते म्हणाले की ती आल्यानंतर आम्ही भारत पाकिस्तान मैत्री आणि शांततेचा प्रयत्न करू.हा काय प्रकार आहे? कैलासजीचं काम मोठं, उपयुक्त, आवश्यक आहे. त्यानी ३६५ खेडी बालस्नेही केली आहेत. अजून लाखो खेडी बालस्नेही होण्याचं बाकी आहे. भारत पाकिस्तान शांतता हे भयंकर किचकट प्रकरण आहे. त्याला फार गुंत्याची अंगं आहेत. निव्वळ सदिच्छा, उपोषणं, गळाभेटी इत्यादीनी ते साधत नाही. ते काम झालं तर बरंच पण त्यात कैलासजीनी न पडणं बरं. त्या उद्योगात ते पडले तर त्यांनी चालवलेलं मोठ्या कामावर परिणाम होईल.