पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आयएसचा प्रवेश

कार्लोट्टा गॉल या पत्रकार २००० ते २०१२ या काळात अफगाणिस्तान पाकिस्तानात मुक्काम करून होत्या. त्यांनी दी राँग एनेमी नावाचं पुस्तक लिहिलंय. अमेरिकेचा खरा शत्रू तालिबान नसून पाकिस्तान आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. तालिबान फोफावलं याला पाकिस्तानच कारणीभूत आहे असं त्या आपल्या पुस्तकात सविस्तर उदाहरणं देऊन मांडतात. 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात आता आयएस डोकं वर काढत आहे यालाही पाकिस्तानलाच जबाबदार धरायचं काय?
।।
क्वेट्ट्यात सिविल हॉस्पिटलमधे बलुचिस्तान बार संघटनेचे अध्यक्ष बिलाल अन्वर कासी सकाळी तिथं भरती झाले होते.त्यांना दोन मोटारबाईकवर स्वार जिहादींनी गोळ्या घातल्या होत्या. हॉस्पिटलमधे यायच्या आधीच ते वारले असावेत. ही बातमी पसरल्यावर क्वेट्ट्यातले शेकडो वकील सिविल हॉस्पिटलमधे पोचले होते. दोन जिहादी तिथं पोचले. त्यांच्या अंगावर आठ किलो स्फोटकं होती. ती फोडून त्यांनी आसपासच्या ७२ वकिलांना ठार मारलं आणि इतर १२० लोकांना जखमी केलं.
अमाक या इस्लामिक स्टेटच्या  (आयएस) न्यूज एजन्सीनं, कैरोमधून पत्रक काढून स्फोटाची जबाबदारी घेतली. पत्रकात एजन्सीनं म्हटलं ” जोवर पाकिस्तानात शरीया लागू होत नाही तोवर अशा घटना होत रहातील.”
क्वेट्ट्यात एका वकीलाला मारण्यात आलं होतं. तहरीके तालिबानच्या एका फुटव्यानं-जमातुल अहरार- खून केला होता. त्या खुनाचा निषेध कासी यांनी केला. त्याना मारलं. त्यांना श्रद्धांजली वहायला गेलेल्या ७२ वकिलांना मारलं. वकील लोक काही अंशी आधुनिक असलेल्या पाकिस्तानी कायद्यानुसार काम करतात. ते तहरीके तालिबान आणि आयएसला मान्य नाही. त्यांना पाकिस्तानात शरीयावर आधारित व्यवस्था हवी आहे.
ही ऑगस्ट २०१६ ची घटना. त्या आधी काही दिवस काबूलमधे हझारा जमातीच्या लोकांनी काढलेल्या मिरवणुकीवर आत्मघातकी हल्ला झाला, त्यात ८० पेक्षा जास्त माणसं मारली गेली. या हल्ल्याची जबाबदारी आयएसनं घेतली. खोरासान गट या नावानं आयएसचा एक गट अफगाणिस्तानात काम करतो. त्यांचं दाबिक या नावाचं एक मुखपत्र आहे. त्या मुखपत्रानं जाहीर केलं की अफगाणिस्तानातलं सरकार इस्लामी नाही, ते अमेरिका या काफिर सरकारच्या मदतीवर चालतं, आयएसला ते सरकार उलथवून लावून अफगाणिस्तानात शरीयाचं राज्य स्थापन करायचं आहे.  
हजारा जमातीची हज्जारो माणसं आर्थिक मागणी घेऊन काबूलमधे जमा झाली होती.त्यांना तुर्कस्तानातून अफगाणिस्तानात जाणारी तेलाची पाईप लाईन त्यांच्या भागातून जायला हवी होती जेणेकरून त्या तेलामुळं त्यांच्या मागास विभागाचा विकास होईल. हजारा जमात शिया असल्यानं आयएसच्या मते ती इस्लामी  माणसं नाहीत, त्यामुळं त्यांना जगण्याचा अधिकार नाही. 
अगदी काल परवापर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अमेरिका म्हणत होते की त्या विभागात आयएसचं अस्तित्व नाही. वरील दोन घटना दर्शवतात की आयएसचा केवळ प्रसार आहे असं नव्हे तर तो अधिक प्रभावी होत चालला आहे. 
आयएसला पाकिस्तानात वाव नव्हता कारण जिहादी-शरीयावादी इस्लामी लोकांसाठी पाकिस्तानात अऩेक संघटना सक्रीय आहेत. तहरीके तालिबान या छत्रीखाली त्या संघटना पाकिस्तानात स्फोट घडवत असतात. या इस्लामी संघटनांना पाकिस्तानात शरीया लागू करायचा आहे. पाकिस्तान सरकार शरीया लागू करत नाही म्हणून ते सरकारही उलथवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिया आणि अहमदी हे इस्लामबाह्य पंथ नष्ट करण्याचा प्रयत्न या संघटना सतत करत असतात. त्यामुळं आयएसची जरुरच नाही असं पाकिस्तानातले जिहादी म्हणत असत. 
अफगाणिस्तानात थोडी वेगळी  स्थिती आहे. तिथं तालिबान प्रभावी आहे. अफगाण समाज जमातींवर आधारलेला आहे, अफगाण संस्कृतीवर आधारलेला आहे. इस्लाम किंवा शरीया हा त्या समाजाचा पाया नाही. पश्तुन या सर्वात मोठ्या जमातीच्या आधारे तालिबान उभी आहे. अफगाण संस्कृतीपलिकडची संस्कृती, धर्म,  अफगाण माणसं स्वीकारत नसल्यानं आयएसची  शरीयाआधारित, जागतीक पातळीवर इस्लामचा विचार करणारी, संघटना अफगाण समाज स्वीकारणार नाही असं अफगाण माणसं म्हणत असत. मुल्ला उमर या तालिबान प्रमुखाचा मृत्यू झाला, त्यानंतर नेमला गेलेला प्रमुख मुल्ला अख्तर मंसूरही वारला आणि आता त्याच्या जागी मुल्ला हिबतुल्ला अखुंडझा याची नेमणूक झाली. त्याच्या नेतृत्वाखाली तालिबान अफगाणी आणि अमेरिकी सैन्यावर हल्ले करत असते. त्यामुळंही आयएसला अफगाणिस्तानात  वाव नाही असं निरीक्षक म्हणत असत.
दोन्ही देशातल्या स्थानिक जिहादींना दूर सारून आयएस पसरते आहे. ही जिहादी संघटनांच्या निर्मितीची आणि विकासाची दिशा आहे. अरब जगामधे वहाबी-सलाफी विचारांचा एक गट होता. त्यांच्या मते महंमदांची कबर बांधणं, कबरीची  पूजा करणं म्हणजे मूर्तीपूजाच होती. वहाबी गटातनच  पुढं अल कायदाचा फुटवा निघाला. अल कायदानं महंमदांच्या काळातला इस्लाम जसाच्या निर्माण करायचं ठरवलं. त्या प्रयत्नात अल कायदा अफगाणिस्तानात गेली. तालिबान ही संघटना अफगाण देशाचाच विचार करते म्हणजे खरी इस्लामी संघटना नाही असं अल कायदाचं, बिन लादेनचं मत होतं. अफगाणिस्ताननंतर अल कायदा इराक आणि सीरियात पसरली. अल कायदा पुरेशी इस्लामी नाही असं म्हणत अल नुस्र हा अधिक हिंसक पण इराक-सीरियापुरता मर्यादित फुटवा निघाला. अल नुस्र कमी हिंसक आहे आणि फार मर्यादित आहे,  सर्व अरब विभागात इस्लाम आणायचा म्हणत अल बगदादीनं आएस काढलं. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या जिहादीना त्यांच्या स्थानिक संघटना अपुऱ्या आणि कमी प्रभावी वाटायला लागल्यावर ती माणसं आयएसकडं वळत आहेत.
एक निरीक्षण असं की तालिबान असो की अल कायदा की आता आयएस, सर्व संघटनांना पाकिस्तानी लष्कराच्या आयएसआयनं खतपाणी घातलं, वाढवलं. पाकिस्तानच्या लष्कराचं उद्दिष्टं पाकिस्तानच्या सीमांचं रक्षण करणं येवढ्यापुरतंच मर्यादित नाही. इस्लामचा प्रसार, इस्लाम वाचवणं हे पाकिस्तानच्या लष्कराचं एक उद्दिष्ट आहे. पाकिस्तानमधल्या प्रभावी इस्लामी विचाराची मुळं मौदुदी यांच्या विचारांत आहेत. कुराण आणि इस्लाम या दोन गोष्टी सर्वसमावेशक, कुठल्याही काळात उपयुक्त असल्यानं विज्ञान,तंत्रज्ञान, लोकशाही, इत्यादी कशाकशाचीही आवश्यकता नाही असं मौदुदी म्हणत. झिया उल हक यांनी मौदुदींचा विचार लष्करात गुंफला. लष्करातल्या बढत्या सैनिकाच्या इस्लामी ज्ञान आणि बांधिलकीशी संबंधित केल्या गेल्या. अभिनंदन आणि बक्षीस दोन्हीसाठी झिया मौदुदींची पुस्तकं देत असत. 
पाकिस्तान लष्करानंच अफगाणिस्तानात तालिबान आणि अल कायदा निर्माण केल्या आणि वाढवल्या. अमेरिकेला ही सत्य उमगलं नाही. उमगलं असलं तरी राजकारणाच्या सोयीसाठी अमेरिकेनं पाकिस्तानी सैन्याच्या उद्योगांकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळंच तालिबानवर कितीही हल्ले केले तरी तालिबान शिल्लक राहिलं कारण पाकिस्तान त्यांना रसद, शस्त्रं, माणसं पुरवत होतं. आजही तीच परिस्थिती शिल्लक आहे.
अमेरिकेनं तालिबानला शत्रू मानलं हीच पाकिस्तानची मोठी चूक झाली, अमेरिकेचा खरा शत्रू पाकिस्तान होता. चुकीच्या शत्रूच्या मागं लागून अमरिकेनं पाकिस्तानला वाढवलं आणि पाकिस्ताननं तालिबानला वाढवलं. तालिबान टिकण्यात पाकिस्तानचा हितसंबंध होता हे अमेरिकेनं लक्षात घेतलं नाही. अमेरिकेनं सारी ताकद तालिबानवर खर्च केली आणि अपयश पदरी घेतलं असं कार्लोट्टा गॉल यांचं म्हणणं आहे. तसं त्यांनी आपल्या दी राँग एनिमी या पुस्तकात स्पष्टपणे मांडलं आहे.
गॉल यांनी त्यांच्या पुस्तकात पाकिस्ताननं तालिबानला कसकसं वाढवलं याची किती तरी उदाहरणं दिली आहेत. अमेरिकेला मामा बनवून पाकिस्ताननं (झियांपासून, मुशर्रफ)  पैसे, शस्त्रं, विमानं, गनीम, मुजाहिद इत्यादी गोष्टी  तालिबानला दिल्या. येवढंच नव्हे तर युनिफॉर्ममधले आणि युनिफॉर्म न घातलेले हजारो सैनिक पाकिस्ताननं अफगाणिस्तानात पाठवले. सुरवातीला या पाकिस्तानी सैनिकांनी रशियन सैन्यावर आणि नंतर अमेरिकन सैनिक तळावर हल्ले केले. 
गॉल यांनी एक  उदाहरण दिलं आहे. २००१ च्या नोव्हेंबरमधे अमेरिकी सैन्यानं, उत्तरी मोर्चानं  तालिबानला नेस्तनाबूत केलं. तालिबान सैन्य कुंडुझला अडकून पडलं होतं. अमेरिकी-उत्तरी मोर्चाचं सैन्य त्या ठिकाणावर हल्ले करून तालिबान पूर्ण नष्ट तरी करणार होतं किंवा त्यांना युद्धकैदी करून कायमचं पंगू करणार होतं. कुडुंझमधे हज्जारो तालिबान आणि पाकिस्तानी सैनिक अडकले होते. कुंडुझचा विमानतळ आणि तिथली विमानविरोधी यंत्रणा पाकिस्तानी सैन्यानं उभारली होती, चालवली होती. पाकिस्तानचा तालिबानशी असलेला संबंध कुंडुझमधे उघडा पडणार होता.
मुशर्ऱफनी अमेरिकेला अंधारात ठेवून उत्तरी मोर्चाचे जनरल दोस्तुम यांच्याशी संपर्क केला. गपचुप पाकिस्तानी सैनिकांना पळून जायला मदत करा आणि तालिबांना शस्त्रं टाकून पळून जायला मदत करा असं मुशर्ऱफनी सांगितलं. करार झाला. पाकिस्तानची विमानं दररोज अनेक उड्डाणं करून पाकिस्तानी सैनिकांना पाकिस्तानात घेऊन गेली आणि काही हजार तालिबान सैनिक पळून गेले. पुढं चालून याच माणसांनी नंतर अमेरिकन-अफगाण सैन्याला छळलं. 
मुल्ला फझल आणि मुल्ला नुरी  यांना अमेरिकेनं पकडलं आणि ग्वांटानामो बे तुरुंगात टाकलं.  फझल आणि नुरी यांनी ग्वांटानामो तुरुंगात मुशर्ऱफ -तालिबान संबंध सुरवातीपासून कसकसे होते ते सारं सविस्तर सांगितलं. पाकिस्ताननं बलुचिस्तानमधे क्वेट्ट्यात तालिबानला एक वस्तीच उभारून दिली होती. मुल्ला उमर तिथंच मुक्काम करून होता. या भागाला पश्चुनिस्तान म्हणत. कार्लोट्टा गॉल तिथं जाऊन तालिबांच्या मुलाखती घेत असत. गार्डियन, बीबीसी, यांचे प्रतिनिधी तिथं जाऊन तालिबान आणि आयएसआय काय करतात यावर वृत्तांत प्रसिद्ध करत होते. इतकं सारं जाहीर असूनही अमेरिकेनं कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि पाकिस्ताननं तालिबान वाढवलं. 
तालिबान-पाकिस्तान गुंता शिल्लक असतानाच आता आयएसनं अफगाणिस्तान-पाकिस्तानात पाय रोवला आहे. हे सारं फारच भयसूचक आहे.
THE WRONG ENEMY
CARLOTTA GILL

।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *