चार्ली लुसियानो या गुन्हेगाराचं चरित्र. दारुबंदी, गुन्हे आणि सत्ता.

चार्ली लुसियानो या गुन्हेगाराचं चरित्र. दारुबंदी, गुन्हे आणि सत्ता.

प्रसिद्ध गॉडफादर या कादंबरीचा नायक, चार्ली लुसियानो.
।।
The Last Testament of Lucky Luciano
Martin Gosch
।।
 चार्ली लुसियानो या सिसिलियन माफिया भाईचं हे चरित्र आहे.  
चार्ली लुसियानो हा न्यू यॉर्कमधल्या गुन्हेजगताचा अनभिषिक्त बादशहा अमेरिकेत प्रसिद्ध होता. १९६२ साली तो वारल्यावर त्याच्या जीवनावर लिहिलं जाऊ लागलं. कधी आडून, कधी थेट. १९६९ साली मारियो पुझ्झोची गॉडफादर ही कादंबरी प्रसिद्ध झाली. डॉन कॉरिलोन ही काल्पनिक व्यक्तिरेखा या कादंबरीच्या मध्यभागी आहे. चार्लीवर ते बेतलेलं आहे असं म्हणायला वाव आहे. कारण चार्ली  त्याच्या मृत्यूनंतर एक  आख्यान, लेजंड झाला होता. गॉडफादर या कादंबरीनंतर १९७५ साली चार्लीचं अधिकृत चरित्र प्रसिद्ध झालं. मार्टिन गॉशला चार्लीनं आपली जीवनकथा सांगितली. सहा महिने मुलाखती चालल्या होत्या. त्या कथनाच्या आधारावर दी लास्ट टेस्टमेंट हे पुस्तक उभं राहिलं. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती पुन्हा प्रसिद्ध झालीय.
१९२० ते १९३३ या काळात न्यू यॉर्कमधे दारुबंदी होती.  चार्लीनं कॅनडा, आयर्लंड, स्कॉटलंडमधून स्कॉच व्हिस्की आयात केली आणि न्यू यॉर्कमधल्या धनिकांना चोरून विकली. बाटल्या आयात करायच्या आणि जशाच्या तशा श्रीमंतांना भरपूर किमतीत विकायच्या.
लोकांची मागणी अफाट होती, स्कॉटलंडमधून येणारी स्कॉच अगदीच अपुरी पडत असे. चार्लीनं आयडिया केली. न्यू जर्सीच्या कारखान्यात तयार होणारा अल्कोहोल गोळा केला. त्यात स्कॉचसारखा रंग मिसळला, स्कॉचसारखा वास आणि चव मिसळली. हा अल्कोहोल देवार, हेग, जॉनी वॉकर इत्यादी नामांकित ब्रँडच्या बाटल्यात भरला. या बाटल्याही हुबेहूब स्कॉटलंडमधल्या बाटल्यांसारख्या तयार केल्या. स्कॉच बाटलीवर असतात तशीच हुबेहूब लेबल्स त्यानं छापून घेतली. येवढंच नव्हे तर स्कॉटलंडमधून स्कॉचच्या बाटल्या भरून येणारे खोके आणि त्यातलं गवतही त्यानं हुबेहूब स्कॉटलंडसारखंच तयार केलं. अगदी स्वस्तातलं अल्कोहोल  महाग स्कॉचच्या भावात विकलं.
लोकंही पुरेसे गाढव होते.
खुद्द चार्ली एकाद्या अती श्रीमंत माणसाच्या घरी पार्टीसाठी दारूचे खोके घेऊन जायचा. पिणाऱ्यांपैकी एकादा म्हणायचा की स्कॉच खरी वाटत नाहीये. चार्ली म्हणायचा, कदाचित कमी प्रतीचा माल आला असेल, थांबा, अस्सल माल घेऊन येतो. खाली जाऊन नव्या बाटल्या आणायचा. किंवा दुसऱ्या ब्रॅँडची स्कॉच घेऊन येऊन जास्त किमतीत विकायचा. खरं म्हणजे एकच अल्कोहोल असायचा फक्त रंग आणि चव बदललेली असायची. बदलून आणलेली बाटली पिणाऱ्यांना आवडायची, ते खुष व्हायचे, जास्त पैसे द्यायचे.
स्कॉचची वहातूक, बाटल्या तयार करणं, लेबलं तयार करणं, लेबलं छापण्यासाठी छापखाने असे अनेक उद्योग चार्लीनं सुरु केले. आपली स्कॉच कोणी चोरू नये म्हणून सशस्त्र गुंड तैनात केले. दुसऱ्यांची स्कॉच लुटण्यासाठी सशस्त्र गुंडांच्या टोळ्या वापरल्या. अनेक कामगिऱ्यावर चार्ली स्वतः बंदूक घेऊन बाहेर पडत असे, प्रसंगी माणसं मारत असे.
चार्लीनं सुरवातीला स्थानिक पोलिस, स्थानिक नगरपिते यांना लाच देऊन आपल्या पदरी तैनात केलं. पण नंतर व्यवहार येवढा वाढला की एकेका पोलिस-पुढाऱ्याला सांभाळणं जड जाऊ लागलं. चार्ली दर आठवड्याला हज्जारो डॉलर मुख्य पोलिस कमिशनरकडं पोचवत असे, नंतर कमीशनर   इतर पोलिसांना पैसे वाटे. आपल्या माणसांना त्रास होऊ नये, आपल्याला त्रास देणारे कायदे होऊ नयेत, त्रास देणारे कायदे अमलात येऊ नयेत यासाठी चार्लीनं नगरपिते, सेनेटर्स, काँग्रेसमन अशी सर्व थरातली पुढारी मंडळी घाऊक प्रमाणावर विकत घेतली, कित्येकांना त्यानंच निवडून आणलं.
अमेरिकेत महामंदी आली तेव्हां  बँका कोसळल्या. बँका कोणालाही कर्जं देऊ शकत नव्हत्या. चार्लीकडं करोडो डॉलर होते. अव्वाच्या सव्वा व्याज दर लावून चार्लीनं सावकारी केली. 
चार्लीनं ड्रग्ज विकली.
चार्लीनं वेश्याव्यवसायही चालवला. 
चार्लीचं एक साम्राज्यच न्यू यॉर्कमधे उभं राहिलं.
आपण गुन्हेगारांवर कारवाई करतो असं नाटक पोलिस आणि पुढाऱ्यांना करावंसं वाटे. चार्लीला अटक होई. दोनेक तास जबानी घेतली जाई. चार्ली नोटांचं पुडकं देई. पोलिस आरोप मागं घेत, ” चुकलो, माफ करा ” म्हणत. चार्ली बाहेर येई. कित्येक वेळा पोलिस अधिकाऱ्यांना पगार वाढवून हवे असत किंवा हप्ता वाढवून हवा असे. चार्लीला अटक केल्यानं नाटक होई. चार्ली आणि पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यातल्या एकाकी खोलीत बसत. बाचचित होई. दोन तासांनी पुन्हा ” निर्दोष ” चार्ली बाहेर येई.
  दारुबंदीचा कायदा चार्लीच्या मागणीवरून करण्यात आला होता, असं म्हणतात.
न्यू यॉर्कमधे इतरही टोळ्या होत्या. चार्लीला प्रतिस्पर्धी होते. मारामाऱ्या होत होत्या. चार्ली ड्रग व्यवहारात पडल्यावर त्याची अवनती झाली. ड्रगविरोधी पोलिस भ्रष्ट नव्हते. त्यांनी चार्लीवर खटले भरले. शेवटी वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली चार्लीला ५० वर्षाची शिक्षा झाली आणि देश सोडून जावं लागलं.
चार्लीचे वडील मेहनती आणि सद्वर्तनी होते. ढोर मेहनत करून ते पैसे वाचवत, कॉटखाली ठेवलेल्या बाटलीत साचवत. त्याच्या आईनं ते पैसे घेतले, त्यात कर्जाऊ रकमेची भर घातली आणि कुटुंबाला न्यू यॉर्कमधे आणलं.पुढं स्कॉचच्या बाटल्यांतून चार्लीनं पैसे मिळवले. गुडमन नावाच्या सद्वर्तनी व्यापाऱ्यानं चार्लीला सज्जनपणाचे धडे दिले. चार्लीवर परिणाम झाला नाही. गल्लीत छोटी भाईगिरी करत करत तो न्यू यॉर्कचा प्रमुख भाई, बॉस झाला. तो अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत माणसांमधे गणला गेला.
 चार्ली १९६२ साली इटालीत मरण पावला.
चार्लीच्या नाट्यमय जीवनावर १० चित्रपट झाले. काही चित्रपट त्याच्या चरित्रावर बेतलेले होते. काही चित्रपटात न्यू यॉर्कच्या भूमीगत गुन्हेगारी जीवनाचं चित्रण होतं आणि त्यात चार्ली हे एक प्रमुख पात्र होतं. चार्लीच्या जीवनावर किमान चार टीव्ही मालिका झाल्या.  आजवर त्याच्यावर किमान ३ पुस्तकं प्रसिद्ध झालीत.
१९६२ साली त्याच्या जीवनानर सिनेमा काढायचं ठरलं होतं. परंतू त्या वेळी त्याच्या टोळीतली अनेक माणसं न्यू यॉर्कच्या गुन्हेगारीत सक्रीय असल्यानं त्यांचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळं १ लाख डॉलरची रॉयल्टी घेतली असूनही चार्लीनं सिनेमा काढायला परवानगी नाकारली.   
गॉशचं पुस्तक वाचतांना सतत गॉडफादर कादंबरी आणि चित्रपट डोळ्यासमोर येतो. चार्लीचं कार्यक्षेत्रंही न्यू यॉर्क. गॉशचं पुस्तक वाचत असताना गॉडफादरमधे चार्लीचंच जीवन रंगवलंय असं पदोपदी वाटत रहातं. गुन्हेगारी जगात फॅमिली असते. सिसिलीमधल्या लोकांची गुन्हेगारांची टोळी. या फॅमिलीचा प्रमुख आपल्या टोळीतल्या लोकांची काळजी घेतो. अशा अनेक टोळ्या. त्या टोळ्यांतलं युद्ध. डॉन हा सर्व टोळ्यांमधे समन्वय साधणारा सूपरभाई. या सगळ्या गोष्टी प्रस्तुत पुस्तकात दिसतात.
गुन्हेगारी जग जगाला कसं विळखा घालतं, सारं जग कसं व्यापतं ते प्रस्तुत पुस्तकात दिसतं. समाजाच्या सर्व थरातली माणसं गुन्हेगार अंकित करून ठेवतात. गुन्हेगारांना समाजात प्रतिष्ठा असते. एक वेळ अशी येते की गुन्हेगारच समाजाचे धुरीण होतात. चार्लीच्या बाबतीत ते घडलं, काही प्रमाणात गॉडफादरमधल्या डॉन कॉर्लिओनच्या बाबतीत ते घडू पहात होतं.
एक समांतर उदाहरण कोलंबियातल्या पाब्लो एस्कोबारचं. त्यानंही गल्लीतल्या भाईगिरीपासून सुरवात करून मादकद्रव्याचा जगातला सर्वात मोठा व्यापार उभा केला. त्यानं प्रचंड संपत्ती गोळा केली. सरकार, पोलिस, न्यायव्यवस्था त्याच्यासमोर नतमस्तक असे. त्याच्या विरोधात कोणी ब्र काढला तर त्याची थेट यमसदनास रवानगी. अगदी दिवसाढवळ्या, उघड आणि सर्व जनतेसमोर तो लोकांना गोळ्या घालून ठार मारत असे. अमेरिकेतल्या लोकांना मादक द्रव्यं हवी होती म्हणून एस्कोबारचा धंदा चालत होता. लोकांना दारू हवी होती म्हणून चार्ली लुसियानोचं साम्राज्य उभं राहिलं. लोकांना मादक द्रव्यं हवी होती म्हणून एस्कोबारचं साम्राज्य उभं राहिलं.
चार्ली आणि एस्कोबार, दोघानीही सरकारला वाकवलं. एस्कोबार तर कोलंबियाचा अध्यक्ष व्हायला निघाला होता.
एस्कोबारच्या जीवनावर नार्कोज ही एक भलीमोठी अनेक तासांची मालिका नेटफ्लिक्सनं तयार केली, ती गाजली. आता त्या मालिकेचा पुढला भाग नेटफ्लिक्स करणार आहे.
चार्लीचं जग न्यू यॉर्कपुरतं मर्यादित होतं. एस्कोबारनं तर सगळा देशच ताब्यात घेतला होता.
चार्ली आणि एस्कोबार. दोघांनाही आपण समाजाचं भलं करत आहोत असं वाटत असे. आपण नीतीमत्ता पाळतो असं दोघानाही ठामपणानं वाटत होतं. चार्लीचं म्हणणं की त्यानं प्रत्यक्षात एकही खून केला नाही, पण असंख्य खून घडवून आणले. एस्कोबार तर स्वतःचा लोकांना मारत असे. हे खून नैतिक होते असं दोघांचंही मत होतं. राजकारणातली माणसं काही वेगळं करत नाहीत असं त्यांचं मत होतं. 
चार्ली आणि एस्कोबार.
दोघांचा वापर  वापर राजकारणी लोकांनी केला.
 दोघांनी राजकारणी लोकांचा वापर करून घेतला.
प्रस्तुत पुस्तक, गॉडफादर ही कादंबरी, गॉडफादर सिनेमा यांची एक  शैली आहे. पात्रं आणि घटना रंगवल्या जातात. प्रवचनं,नीतीमूल्यांची चर्चा, समाजात थोर काय आणि वाईट काय, समाजानं कोणते आदर्श डोळ्यासोर ठेवावेत वगैरे कथनात येत नाहीत.

।।

3 thoughts on “चार्ली लुसियानो या गुन्हेगाराचं चरित्र. दारुबंदी, गुन्हे आणि सत्ता.

  1. अद्भूत हे वास्तवातून जन्म घेतं आणि अनैतिकतेला नैतिक अधिष्ठान असावं लागतं, त्याशिवाय ती फोफावत नाही; अशी दोन विधानं या इंटरेस्टिंग टीपणातून करता येतील.

  2. Ban on Alcohol has never worked anywhere in the world. It is a great way(One such) politicians make their money. I am very keen to see the efforts made by Nitish Kumar & Jayalalitha & Chandy on banning liquor in their respective states.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *