बबन घोलप इत्यादी लोकांवर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याला आधार होता माहिती अधिकाराचा वापर करून गोळा केलेल्या कागदपत्रांचा, पुराव्यांचा. अण्णांच्या अनेक सहकाऱ्यांनी अनेक वर्षं चिकाटीनं माहिती गोळा केली. अण्णा आणि खैरनार ९८-९९ मधे म्हणाले होते की ट्रकभरून पुरावे सादर करेन. शरद पवारांसह सर्वांनी अण्णांची टिंगल केली. खरोखरच ट्रक भरतील इतके पुरावे होते. त्यातले कित्येक पुरावे मी स्वतः पािहिले आहेत कारण त्या वेळी मी अण्णांच्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो. सोबत काळे या कार्यकर्त्याचा फोटो आहे. त्याचं घर पुराव्यांच्या फायलीनं भरलं होतं. त्याची पत्नी रागावत असे कारण घरात इतर वस्तू ठेवायला जागा नव्हती इतक्या फायली गोळा झाल्या होत्या. काळे यांना मारहाण झाली, त्यांच्या घरावर दगडफेक झाली. काळे डगमगले नाहीत. अण्णांचे दुसरे सहकारी अशोक सब्बन. त्यांचंही घर पुराव्यांनी भरलं आहे. आजही ही माणसं कशाचीही अपेक्षा न बाळगता होणाऱ्या अनेक त्रासांना आनंदानं तोंड देत भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत.