ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

  
ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?
THE WORST PRESIDENT IN HISTORY
THE  LEGACY OF BARACK OBAMA    
MATT MARGOLIS & MARK NOONAN
Victory Books
डोनल्ड ट्रंप एक भीषण माणूस आहे. स्वतःचा ब्रँड तयार करणं हे त्याच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट आहे. घटं विंद्यात, पटं छिंद्यात. लोकांचं लक्ष वेधणं हेच तंत्र. तो पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्याचा कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही. व्यवसायातही लोकांना फसवण्याचा त्याचा इतिहास आहे. देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्याजवळ नाहीत. सुरवातीलाच त्यांनी सांगून टाकलं की मेक्सिकन लोक बलात्कारी असतात, व्यसनी असतात, स्मगलिंग करतात. ओबामांचं जन्मसर्टिफिकेट खोटं आहे असं ते आजही म्हणतात. नऊ अकराच्या घटनेनंतर न्यू जर्सीत हज्जारो मुसलमानांनी जल्लोष साजरा केला असं ते बोलले. आपल्याजवळ पुरावे नाहीत, आपण तसं ऐकलं होतं असं खुश्शाल सांगतात. नुकतंच ते म्हणाले की ओबामा आयसिसचे संस्थापक आहेत.जाहीर सभेमधे ते म्हणाले की ” आपलं लिंग भरपूर मोठं आहे, विरोधकांनी त्याची काळजी करू नये “. खुद्द त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या विरोधात असतात. 
तरीही करोडो लोकांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि लोकप्रियतेत ते बरेच वेळा हिलरी क्लिंटन यांच्या पुढं असतात.
हा काय प्रकार आहे?
त्यांच्या लोकप्रियतेचं रहस्य ओबामा यांच्या कारकीर्दीच्या अपयशामधे दडलेलं आहे. ओबामा यांच्या कारकीर्दीत अमेरिकन अर्थव्यवस्था ढेपाळली, सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती खालावली. काळे गोरे दरी त्यांच्या कारकीर्दीत रुंदावली. बेकारीचा फटका गोऱ्यांनाही बसला. त्यामुळ ना काळे सुखी ना गोरे सुखी अशी स्थिती झाली. ओसामा बिन लादेनला टपकवणं, इराणशी संबंध सुधारणं आणि शेवटी शेवटी क्यूबाशी संबंध प्रस्थापित करणं या अमेरिकन माणसाच्या सुखाशी थेट संबंधित नसलेल्या मोजक्या कामगिरींव्यतिरिक्त ओबामांच्या जमेच्या बाजूला फारशा गोष्टी नाहीत. ओबामा केअर ही सामान्य माणसासाठी तयार केलेली विमा-आरोग्य   व्यवस्था महत्वाकांक्षी जरूर होती परंतू ओबामांना ती पूर्णपणे यशस्वी करणं जमलं नाही.
फारसं काहीही घडलेलं नसलं तरी माध्यमांनी ओबामांवर टीकेची झोड उठवली नाही.  आठेक वर्षं ओबामांच्या विरोधात फारसं काही कानावर आलं नाही.   पहिलाच काळा माणूस राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं माणसं क्षमाशील झाली असावीत. त्यांच्या कारकीर्दीत आर्थिक भ्रष्टाचार, सेक्स स्कँडल, भानगडी झाल्या नाहीत. आठही वर्षं ओबामा सभ्यपणे वागले, सुसंस्कृत वागले. त्यांची पत्नी, त्यांच्या मुली, त्यांचे सहकारी यापैकी कोणावरही किटाळ उडालं नाही. म्हणून कदाचित त्यांच्या कारकीर्दीचं तटस्थ विश्लेषण घडलं नाही. 
” काही कां असेना.काही गोष्टी भले जमल्या नसतील. निदान जगाचं आणि देशाचं भलं करण्याची भाषा तरी करत होता. निदान सभ्य आणि बुद्धीमान तरी होता.त्यांनी खूप प्रयत्न केला पण काही कारणानं त्यांना जमलं नसेल ” असं जगभरच्या जनतेला वाटल्यानं कदाचित त्यांच्या कारकीर्दीचा जमाखर्च मांडला गेला नसेल.
 २०१० साली म्हणजे निवडून आल्यावर दोन वर्षांनी एका सभेत व्हेल्मा हार्ट या आफ्रिकन महिलेनं ओबामाना थेट सांगितलं ” तुमचं समर्थन करता करता मी थकलेय. तुमच्या प्रशासनाचं समर्थन करता करता थकलेय. तुमच्या कारकीर्दीबद्दल मी निराश आहे. काही घडत नाहीये.”
या सभेनंतर व्हेल्माची नोकरी केली. कशी बशी दुसरी नोकरी मिळाली. २०११ साली व्हेल्माची मुलाखत गार्डियनच्या बातमीदारानं घेतली. व्हेल्मा म्हणाली ” आम्ही ओबामाला मतं दिली ती त्यांनी आम्हाला मिठ्या माराव्यात आणि आम्हाला किस करावं यासाठी नाही. आम्ही मतं दिली आमच्या कुटुंबाच्या, आमच्या समाजाच्या सुखासाठी.  त्यातलं फारसं काही घडत नाहीये. ओबामा ठाम निर्णय घेत नाहीत..” ओबामा  निर्णय अमलात आणत नाहीत, नुसतं बोलतात, छान बोलतात.
मार्गलिस आणि नूनन यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकात  ओबामांचं अपयश   ठळकपणे मांडलं आहे. ओबामांवर तीव्र टीका ऐकण्याची सवय नसल्यानं जगभरचे वाचक निश्चितच बुचकळ्यात पडतील. 
लेखकांनी मांडलेले मुद्दे असे-
*ओबामा २००८ साली अध्यक्ष झाले तेव्हां अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. आर्थिक प्रगतीचा वेग – ०.९२टक्के  झाला होता. २०१६ साली ओबामांची कारकीर्द संपताना अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग फक्त १.३ टक्के आहे. म्हणजे आठ वर्षांच्या खटपटीनंतर फक्त ०.४ टक्केच वाढ  ओबामांना शक्य झाली आहे.
*ओबामांच्या कारकीर्दीच्या सुरवातीला गरीबी (poverty rate)  १२.५  टक्के होती ती २०१६ साली १४.५ टक्क्यावर स्थिरावली आहे. २००८ ते २०१२ या काळात गरीब मुलांची संख्या १७ लाखानी वाढून २.४२ कोटी म्हणजे एकूण मुलांच्या एकतृतियांश झाली.२०१४ साली ६५ टक्के  मुलं सरकारी मदतीवर जगणाऱ्या कुटंबातली होती.
*ओबामांची कारकीर्द सुरु झाली तेव्हां २७ आठवड्यांपेक्षा जास्त काळ बेकार असणाऱ्यांची संख्या २६लाख होती. २०१० साली ती संख्या ६८ लाख होती. परिस्थिती सुधारल्यावर ती संख्या २०१४ साली २८ लाख झाली. म्हणजे परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. बेकारीच्या संदर्भातली आणखी एक माहिती  अशी. सोळापेक्षा जास्त वयाच्या कामावर असलेल्या माणसांचं  प्रमाण २००७ साली ६६ टक्के होतं, ओबामांची कारकीर्द संपताना ते प्रमाण ६२.९ टक्के झालं. २००८  साली अमेरिकेत ५.८  टक्के बेकारी होती, २०१५साली ती  ५.० टक्के झाली. लेखकांचं म्हणणं आहे की अल्प काळ कामावर असलेले आणि काम करायचं थांबलेले discouraged workers त्यात मिळवले तर खरी बेकारी १०.४ टक्के होते.
ओबामांच्या कारकीर्दीत तूट वाढली,कर्जं वाढली, विद्यार्थ्यांचं कर्जबाजारीपण आणि फी वाढली, सामान्य आणि मध्यम वर्गीय माणसाचं उत्पन्न घटलं, काळे आणि गोरे यांच्यातली विषमता वाढली, मध्यमवर्ग आक्रसला आणि अमेरिकन समाजातली एकूण विषमता वाढली, सामान्य माणसावरचे कर वाढले आणि श्रीमंत कॉर्पोरेन्सवरचे कर कमी झाले इत्यादी गोष्टी लेखकांनी आकड्यानिशी मांडल्या आहेत.
 लेखकांचे निष्कर्ष पुराव्यांवर आधारलेले आहेत. अधिकृत आकडेवारी लेखकांनी पुस्तकात मांडली आहे. पुस्तकं आणि सरकारी प्रकाशनं यांचे ११०० संदर्भ लेखकांनी दिले असून पुस्तकाची ४८ टक्के पानं संदर्भसूचीसाठी खर्च केली आहेत.  
२०१४साली वॉल स्ट्रीटवरच्या निदर्शनांनी सिद्ध झालं की समाजातल्या १ टक्का लोकांकडं देशातली  २० टक्के संपत्ती आहे आणि त्या एक टक्क्यांतही दहा टक्क्यांकडं जास्त संपत्ती गोळा झालीय. ओबामांच्याच पक्षाचे उमेदवार बर्नी सँडर्स यांनी विद्यार्थ्यांचं कर्जबाजारीपण, वाढलेली विषमता आणि बेकारी यांवर बोट ठेवलं. औषधांच्या किमती भरमसाठ वाढवणाऱ्या लोभी औषध कंपन्यांवर पुराव्यासहित हल्ला सँडर्स यांनी केला. चारातला एक माणूस औषध न परवडण्यानं मरतो असं विधान सँडर्स यांनी केलं. ओबामा अपयशी झाले आहेत असं न म्हणता सँडर्स म्हणाले की ओबामा आरोग्य व्यवस्थेत खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
   गेल्या आठ वर्षात गोऱ्या पोलिसांनी काळ्यांना निष्कारण मारलं. काळ्यांनी चिडून ठरवून गोऱ्या पोलिसांना गोळ्या घातल्या. प्रमाणाबाहेर काळी माणसं तुरुंगात आहेत. काळे गोरे दरी वाढल्यानंच दी ब्लॅक लाईव्ज मॅटर ही संघटना अमेरिकेत सक्रीय झालीय. 
आज अमेरिकेतल्या काळे, लॅटिनो माणसांची स्थिती वाईट आहे. गेल्या आठ वर्षात ती सुधारली नाही, उलट खालावली. ५५ टक्के गोऱ्यांमधेही मध्यम वर्गातल्या आणि कामगार वर्गातल्या गोऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत.चिनी लोक स्वस्तातली उत्पादनं अमेरिकेत विकत असल्यानं आपली बेकारी वाढतेय, बाहेरून आलेले लॅटिनो कमी पैशावर काम करत असल्यानं आपल्या नोकऱ्या जाताहेत असं गोऱ्या अमेरिकन तरुणांना वाटत आहे.
ओबामा प्रशासनाला वरील प्रश्न हाताळणं जमलं नाही. आर्थिक प्रगती व्हावी व ती प्रगती समाजाच्या सर्व थरात झिरपावी अशी ओबामांची इच्छा होती. त्यांची इच्छा फलद्रूप झाल्याचं अमेरिकन लोकांना पहायला मिळालं नाही. २००७ सालच्या संकटाला कारणीभूत असलेल्या लोभी आणि गुन्हेगार बँकिंग माफियावर ओबामा यांनी कारवाई केली नाही, एकही माणूस तुरुंगात गेला नाही. उलट त्या संकटाचा फटका लाखो मध्यम वर्गीयांना बसला. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी फी आणि कर्ज व्यवस्थेमधे ओबामांनी सुधारणा सुचवल्या. प्रत्यक्षात उलटंच घडलं, शिक्षण महागलं, बेकार शिक्षितांची संख्या वाढली, कर्जाचा डोंगर विद्यार्थ्यांच्या बोडक्यावर बसला. 
अमेरिकन समाजाची एक घडी बसली आहे. जबरी धनीक, कॉर्पोरेशन्स, वकील, नोकरशहा आणि विद्यापीठं यांची एक माफिया टोळी अमेरिकेत तयार झाली आहे. याच टोळीच्या मदतीवर अमेरिकन अध्यक्ष निवडून येतो. ओबामा वरील टोळीच्या दबावाखाली दबले असावेत. त्यामुळं त्यांच्या वैचारिक-मानवी इच्छा फलद्रूप होऊ शकल्या नाहीत.
जनतेला रुपये आणे पैच्या हिशोबात सुखं हवी असतात. शांतता, बंधुभाव, समानता, न्याय इत्यादी शब्दांचं उच्चारण पुढारी जेव्हां करतात तेव्हां भाषण चांगलं झालं असं म्हणून लोक टाळ्या वाजवतात आणि माध्यमं स्तुती करतात. पण त्याचा परिणाम बहुतांश लोकांच्या दैनंदिन जगण्यावर झालेला दिसायला हवा.
याचाच फायदा ट्रंप यांना मिळतो आहे.
अमेरिकेची स्थिती चिंताजनक आहे.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *