मुंबईत ग्रँट रोड स्टेशनसमोर एक रेस्तराँ होतं. परवापरवापर्यंत. शंभरवर्ष झाली त्या रेस्तराँला. इमारत जुनी झाल्यानं ती पाडून तिथं नवी इमारत उभी रहाणार असल्यानं मेरवान बंद झालंय.
मुंबईतल्या किती तरी पिढ्यांनी मेरवानचे केक, पुडिंग, बनमस्कार, खारी आणि चाय पचवलेत. पत्रकार, विचारवंत, वकील, विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, कवी, लेखक, भणंग इत्यादी लोकांना मेरवानमधे आश्रय होता. गोल टेबलं, लाकडी खुरच्या, मोठ्ठे गरगरते पंखे, आरसे, मेन्यूच्या पाट्या, वेटरनं दिलेल्या पदार्थांच्या ललकाऱ्या, वेटरनं खांद्यावरच्या कापडानं फलकारे मारून साफ केलेलं टेबल आणि अर्थातच चहा, बनमस्का, दट्ट्या ओढून ग्लासात फसफसत ओतलेलं ऑरेंज. सारं काही खास इराणी. मेरवान किंवा कोणाही इराण्याकडं एक चहा घेऊन कितीही वेळ बसलं तरी कोणी हाकलून देत नव्हतं. तिथं गिऱ्हाईकं माणसं असत, माणसांना तिथं एक स्पेस असे. माणसाला आपल्या चिंता, दुःखं, कोलाहल, बशीत ओतलेला चहा फुरके मारत पीत सारं काही स्वतःजवळ ठेवत, कधी मित्रांशी वाटून घेत मेरवानमधे बसता येत होतं. खुर्चीमागं उभं राहून कोणी आपण केव्हां जातोय याची वाट पहात उभं रहात नसे. गाठीभेटींचं हमखास ठिकाण. तरूण तरुणींना चोरून प्रेम करण्यासाठी एक फॅमिली रूमही.
इराणमधल्या झोटिंगशहानी जीणं मुश्कील केल्यानं देशोधडीला लागलेल्या येझ्द या प्रांतातले इराणी. अंगावरच्या कपड्यांनिशी मुंबईत आले. मुंबईत आधीच स्थाईक झालेल्या इराणी पारशांच्या घरी चहा घेऊन जात. पारशांनी त्यांना सुचवलं की त्यांनी चहा घरोघरी पोचवण्यापेक्षा चहाचं दुकानंच काढावं. झालं. त्यातून इराण्याची हॉटेलं मुंबईत सुरु झाली. सुरवातीला मुंबईतली माणसं इराण्याकडं चहा पिणं निषिद्ध मानत. मस्का लावलेला पाव खाणं म्हणजे बाटणं असं मानत. इराणी लोकांच्या चहाची चटक लागते कारण ते चहात अफू घालतात अशी दंतकथा तर अगदी कालकालपर्यंत सांगितली जात असे. खरं म्हणजे तसं काहीही नव्हतं. चहाच्या पावडरींचं एक विशिष्ट मिश्रण ते वापरत, दिवसभर उकळत ठेवलेल्या दुधाची एक दाट चव त्यांच्या चहाला असे. तर असा चहा, पानी कम चहा. घोटभर, कधी पोटभर. काऊंटरवर बसलेला काळी टोपी घातलेला इराणी स्वतःच्याच नादात असे. वेटरनं चहा, ब्रून मस्का अमूक रुपये असं ओरडायचं, गिऱ्हाईकानं पैसे काऊंटरवर पसरायचे, या इराण्यानं ते यंत्रवत घ्यायचे, उरलेली चिल्लर परत करायची. यंत्रासारखं. तत्वज्ञ माणसासारखा तो निर्विकार असे.
तर मेरवान आता काही काळ बंद असेल. तो नव्यानं केव्हां सुरु होईल, कुठल्या रुपात आणि कुठं सुरु होईल ते माहित नाही.
वाट पाहूया
सोबतच्या व्हिडियोत मेरवान पहाता येईल.