कामसूत्र.

कामसूत्र.

 कामसूत्र. जगाला भारताचं सांस्कृतीक योगदान.
THE MARE’S TRAP, NATURE AND CULTURE IN KAMSUTRA हे वेंडी डॉनिजर यांचं पुस्तक  २०१५ मधे प्रसिद्ध झालं आहे. अर्थशास्त्र हा कौटिल्याचा ग्रंथ अभ्यासल्यानंतर कामसुत्राचे नव्याने समजलेले संदर्भ लेखिकेनं या पुस्तकात मांडले आहेत.
वात्स्यायनाचं कामसूत्र इसवी तिसऱ्या शतकात पाटलीपुत्रमधे (पाटणा) प्रसिद्ध झालं. तेराव्या शतकात यशोधरानं कामसूत्रावर ‘जयमंगल’ ग्रंथातून भाष्य केलं. १८८३ साली रिचर्ड बर्टननं कामसूत्राचं इंग्रजीतलं भाषांतर लंडन आणि बनारसमधे प्रसिद्ध केलं. त्यानंतरचं डॉनिजरांचं हे पुस्तक. 
  इसवी पू. २ मनु – धर्मशास्त्र-मनुस्मृती
इसवी १ कौटिल्य – अर्थशास्त्र.
इसवी ३       वात्स्यायन – कामसूत्रं.
इसवी १३ यशोधर-कामसूत्र भाष्य, जयमंगल.
इसवी १७९४ विल्यम जोन्स – मनुस्मृती इंग्रजीत.
इसवी १९०४ शामशास्त्री – अर्थशात्र इंग्रजीत
इसवी १८८३ रिचर्ड बर्टन – कामसूत्र इंग्रजीत.
        इसवी २०१५  वेंडी डॉनिजर – कामसूत्र भाष्य.
 वेंडी डॉनिजर हे नाव इतिहासाच्या अभ्यासकांना माहित आहे. त्या शिकागो विद्यापिठात भारतीय आणि आफ्रिकी धर्माचा इतिहास  शिकवतात, त्यावर संशोधन करतात. The Hindus: Anlternative History; On Hinduism; Siva, The Erotic Ascetic; Hindu Myths; Rig Veda (translation) ही त्यांची हिंदू धर्मावरील प्रसिद्ध पुस्तकं. भारतात उपलब्ध आणि प्रसिद्ध असलेल्या संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन, मुळातले संस्कृत भाषेतले ग्रंथ वाचून, ते ते संदर्भ देऊन डॉनिजर यांनी लेखन आणि संशोधन केलं आहे. इतिहासाला मान्य असलेले संदर्भ त्यांनी वापरले आहेत. 
भारतीय तत्वज्ञानावरील साहित्यात कामसूत्र या पुस्तकाचं  स्थान काय आहे ते वेंडी डॉनिजर सांगतात.
 भारतीय तत्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले आहेत. इसवी सनापूर्वी दुसऱ्या तिसऱ्या शतकात मनूनं मनुस्मृती, धर्मशास्त्र लिहिलं. त्यात काम या प्रेरणेला केवळ पुनरुत्पादनासाठी होणारी क्रिया येवढंच स्थान दिलं आहे. काम या प्रेरणेबद्दल तत्वज्ञानात असलेली द्विधा स्थिती तिथून सुरु होते. 
नंतर येतं इसवी पहिल्या शतकातलं कौटिल्याचं अर्थशास्त्र. 
 कौटिल्याच्या अर्थशास्त्रात काम या भावनेबद्दल तटस्थ भूमिका आहे. काम हा माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे, त्यात पुढली पिढी जन्माला घालणं आणि थरार या दोन्ही गोष्टी आहेत असं अर्थशास्त्रं म्हणतं आणि मामला तिथंच सोडून देतं. व्यभिचाराला फार कडक शिक्षा मनुनं सांगितल्या, ठेचून मारणं वगैरे. अर्थशास्त्राची त्या शिक्षेला ना नाही पण नवऱ्यानं क्षमा केली तर व्यभिचारी स्त्री आणि जार दोघांना सोडून द्यावं इतपत अर्थशास्त्र उदार आहे.   काम या भावनेचा वापर राजानं करून राज्याचं हित साधायला हरकत नाही असंही अर्थशास्त्र सांगतं.
त्यानंतर येतं वात्स्यायनाचं कामसूत्रं. त्यात काम या क्रिया-भावनेबद्दलचा द्विधाभाव पूर्ण नष्ट होतो.काम केवळ पुनरूत्पादनासाठी नसून त्यातल्या आनंदासाठीही आहे असं वात्स्यायन निःसंदिग्धपणे लिहितो. पुरुषानं स्त्रीला, स्त्रीनं पुरुषाला आकर्षून घेणं;  पुरुष आणि स्त्री दोघांनीही   गुणी आणि कलासक्त असणं; संभोग ही आनंददायक घटना घडण्याच्या आधी आणि नंतरचं आनंददायक वातावरण; ज्या समाजात वा शहरात कामजीवन सिद्ध होत असतं तो समृद्ध समाज इत्यादी गोष्टींची वर्णनं कामसूत्रात आहेत. 
निरामय कामजीवन कसं सिद्ध करावं याच्या सूचना कामसुत्रात आहेत. तिसऱ्या शतकात किंवा त्या आधी अवंतिका, पाटलीपुत्र इत्यादी भारतीय नगरांतलं नागरी जीवन कसं होतं याचं चित्रण  कामसुत्रात आहे. कामजीवन ही एक सुंदर, प्रसन्न, मूलभूत गोष्ट आहे हे कामसुत्रात कळतं.
कामसूत्रात संभोगाची वर्णनं आहेत पण एकूण पुस्तकाचा तो एक अगदीच लहान अंश आहे. कामसूत्र म्हणजे संभोगशास्त्राचं पुस्तक नाही.
कामसुत्रं अनीती आणि व्यभिचाराचं समर्थन करत नाही पण कामजीवन हे मानवी जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्यात पाप नाही, स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामजीवनात समान अनुभव मिळतो असं कामसुत्रं सांगतं. पुरुषानं (विवाहित असला तरीही) इतर स्त्रियांना कशा प्रकारे आकर्षिक करावं याच्या सूचना कामसुत्रात आहेत. पुरुषांना वश करण्यासाठी स्त्रियांनी काय काय करावं तेही सांगितलं आहे. परंतू परस्त्री आणि परपुरुषाशी संबंध ठेवण्यातून नुकसान कसं होतं तेही सांगितलं आहे.
कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी. एक प्रेमी युगुल नाहिसं झालेलं असतं त्याच्या शोधाला वात्स्यायन बाहेर पडतो. प्रवासात त्याला जे दिसतं, जे कानावर पडतं ते वात्स्यायन मांडतो. त्यात कामजीवनाबद्दलच्या कथा गुंफलेल्या आहेत. शैली कामसुत्राची पण विसाव्या शतकातल्या मराठी वाचकाला समजेल अशा रीतीनं नावं, स्थळं, रुपकांची मांडणी मोकाशींनी केली आहे. (महाराष्ट्र, कर्नाटक असे राज्यांचे उल्लेख आहेत, तिसऱ्या शतकात अशी राज्यं नव्हती). आपल्या घरात उघडपणे वाचावी अशी ही कादंबरी आहे. अश्लील अजिबात नाही.  
कामसूत्र म्हणजे अश्लीलता असं भारतात एकोणिसाव्या शतकापर्यंत मानलं जात नव्हतं. कामजीवनाला समाजात एक वास्तव आणि नैसर्गिक स्थान होतं. काम या प्रेरणेला पुरुषार्थात स्थान मिळालं याचं कारण भारतीय समाजातच कामजीवन हा एक मोकळा व्यवहार होता. 
वेंडी डॉनिजर दाखवून देतात की राणी व्हिक्टोरियाच्या काळात भारतात रिचर्ड बर्टनचं आगमन झाल्यानंतर भारतीय समाजामधे काम या घटकाला एक लाजीवरवाण्या गोष्टीचं स्थान दिलं गेलं. ख्रिस्ती विचारात काम हा गुन्हा मानला गेला असल्यामुळं तसं घडलं. रिचर्ड बर्टननं लिहिलेलं, रूपांतरीत केलेलं कामसुत्रं चुकीचं आहे, मुळ ग्रंथातले उतारे त्यांनी गाळले आहेत, चुकीचं भाषांतर त्यांनी मुद्दाम केलं आहे असं डॉनिजर पुराव्यानिशी मांडतात. व्हिक्टोरियन ख्रिस्ती मूल्यं लादण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला असं डॉनिजर यांचं म्हणणं आहे.
भारतातल्या साक्षर वर्गानं व्हिक्टोरियन दृष्टी ब्रिटिशांच्या नादाला लागून स्वीकारली. कामजीवन, संभोग या गोष्टी विकृत आहेत, लाजीरवाण्या आहेत असं भारतातले लेखन करू शकणारे लोक मानू लागले. मोकळेपणानं कामजीवन अनुभवणं त्यामुळं दुरापास्त झालं. रस्त्यावर हातात हात घालून फिरणं हेही अश्लील मानलं जाऊ लागलं. पायापासून डोक्यापर्यंत स्त्रीला कपड्यात लपवणं सुरू झालं. शतकानुशतकं मोकळं कामजीवन जगण्याची सवय निपटून काढायच्या प्रयत्नामुळं कामजीवनाबद्दलचे विकृत आणि अनैसर्गिक विचार समाजात पसरू लागले. त्यातूनच संभोगाची अनेक आसनं रेखाटलेली पिवळ्या कव्हरची पुस्तकं बाजारात दिसू लागली. कामसूत्रांची मोकळेपणानं चर्चा करणाऱ्या स्त्री पुरुषांचा समाज अस्ताला गेला आणि विकृत आसनांची पुस्तकं चोरून वाचणारा समाज विकसित झाला. त्यामुळंच मूळ ग्रंथ न वाचताही भारतातली माणसं आजही कामसूत्रं हे पुस्तक घरात लपवून ठेवतात.
 हिंदू समाज परिपूर्ण होता, त्यात कामजीवनाकडं निरोगी आणि आनंदी पद्धतीनं पाहिलं जात होतं, ती हिंदू समाजातली कित्येक शतकांची परंपरा होती, ती एकोणिसाव्या शतकात नष्ट झाली याचं दुःख डॉनिजर यांना आहे.
कामसूत्र पुस्तकाची गोष्टही उद्बोधक आहे.
रिचर्ड बर्टननं हे पुस्तक, कामसूत्राचं इंग्रजी भाषांतर, १८८३ साली प्रसिद्ध केलं. पुस्तकावर बंदी येईल या भीतीनं त्यानं पुस्तक खाजगी वितरणासाठी आहे असं पहिल्या पानावर लिहिलं. अस्तित्वात नसलेल्या कामशास्त्र सोसायटी ऑफ लंडन अँड बनारस या संस्थेचं नाव प्रकाशक म्हणून टाकलं. असा कोणताही पत्ता बनारसमधे नव्हता. जगातलं सर्वात जास्त चोरून प्रसिद्ध झालेलं पुस्तक (पायरेटेड) अशी या पुस्तकाची ख्याती झाली. १९६२ पर्यंत हे पुस्तक इंग्लंड आणि अमेरिकेत अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेलं नव्हतं.
हे पुस्तक बर्टनच्या नावावर असलं तरी काही प्रतींवर बर्टनबरोबर Forster Fitzgerald यांचंही नाव आहे. नंतर काही प्रतींवर Fitzgeraldचं भाषांतर असा उल्लेख आहे. खरं म्हणजे हे भाषांतर भगवानलाल इंद्रजीत आणि शिवराम परशुराम भिडे या दोघांनी केलं आहे. पण तशी नोंद पुस्तकात कुठंही नाही. हे भाषांतर आपण केले नसून दोन भारतीयानी केलं आहे असं Fitzgerald नं  आपल्याला शिक्षा होईल अशी भीतीनं १९८५ साली एका निवेदनात सांगितलं. 
।।

4 thoughts on “कामसूत्र.

  1. Wendy Doniger's work sounds more like a political history of sexuality and Kamasutra in India. Blaming everything on the British is a bit far fetched. Other influencers also need to be taken into account. We need to accept a lot of this blame. Sudhir Kakar's work on sexuality in India seems far more interesting.

  2. is it true to say that in maratha time (pre-british),sexual life in indian society was free? I dont think India enjoyed this state esp after caste-barriers became rigid and prevention of intercaste sexual affairs was paramount on society's mind, esp after moslem era of invasions etc. However in Konark temple times (1000 yrs back) society perhaps allowed it more free across castes. There is no great historical evidence on this.

  3. साहित्यकृतीकडं इतिहास, समाजशास्त्र, साहित्य, मानसशास्त्र, राज्यशास्त्रं इत्यादी अनेक दृष्टीकोनांतून पाहता येतं.
    कामसूत्रातमधे वर्णन केलेला समाज कधी काळी असण्याची शक्यता आहे. स्थिती उपकारक होती, कामसुत्रांत सांगितलेलं जीवन समाजाला पेलत आणि शक्य होतं त्या काळात कामसुत्रात वर्णन केलेला समाज असेल. स्थिती बदलते. कामसुत्रात वर्णिलेलं जीवन समाजाला परवडत नाही, उपयुक्त ठरत नाही. तेव्हां समाज नव्या प्रकारचं जीवन साकार करतो. नरमादी संबंध असलेला मानवी समाज एकेकाळी होता. आता केवळ नर मादी असं न पहाता भाऊ बहीण, आई मुलगा, बाप मुलगी अशी नाती समाजानं स्वीकारली आहेत. कामसुत्रात वर्णन केलेला समाज स्थलकालनिरपेक्षा कायम असावा अशी अपेक्षा बाळगू नये. तसा समाज आज कां नाही असा प्रश्न विचारू नये. कामसुत्रात वर्णन केलेला समाज एकेकाळी होता येवढंच मनाशी घ्यावं. तो समाज आदर्श होता, तो इस्लामी-ब्रिटीश-जातीय इत्यादी राजवटींनी घालवला असे हिशोब मांडण्यात अर्थ नाही. तो समाज आदर्श होता तसाच समाज कायम असायला हवा होता असं मानण्याचं काहीच कारण नाही.

  4. आपण या पुस्तकाचा परिचय देताना असं म्हटलं आहे की हे पुस्तक कसं आहे हे अनुभवायचं असेल तर दि. बा. मोकाशी यांची "वात्सायन" ही कादंबरी वाचावी. मी ही कादंबरी फार पूर्वी वाचली असली तरी मला असं वाटतं की आपण त्यापेक्षा डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या "निरामय कामजीवन" या पुस्तकाचा उल्लेख करायला हवा होता. मराठीतलं या विषयावरील ते एक असं पुस्तक आहे की कोणत्याही शास्त्रीय परिभाषेचा अतिरेक केलेला नाही. ते पुस्तक वाचकांना आवडलं. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या तेहत्तीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत.
    मंगेश नाबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *