नेटफ्लिक्सनं नार्कोज या मालिकेचा तिसरा सीझन दाखवण्याचं जाहीर केलंय. नार्कोज ही एक स्पॅनिश भाषेतली इंग्रजी उपशीर्षकाची मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी दहा भागांचे दोन सीझन्स झाले आहेत. आता तिसरा सीझन सुरु होतोय. ही मालिका लोकांना तुफ्फान पाहिली कारण ती कोलंबियातल्या पाब्लो एस्कोबार या नशाद्रव्य टोळीच्या प्रमुखावर आहे.
कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतल्या देशात पाब्लो एस्कोबारचं नशाद्रव्यांचं उत्पादन आणि वितरणाचं मोठ्ठं साम्राज्य होतं. कोलंबियात द्रव्यं तयार करून ती अमेरिकेत चोरून पाठवणं आणि तिथून ती जगभर पाठवण्याचा व्यवसाय पाब्लोनं केला. हज्जारो माणसांची यंत्रणा त्यानं उभी केली होती. विमानं, बोटी, ट्रक्स यांचे ताफे त्याच्याजवळ होते. सशस्त्र फौज त्याच्याजवळ होती. त्याला पकडायला जाणाऱ्या पोलिसांना तो मारून टाकीत असे. त्याच्या माणसांवर ज्या कोर्टात घटला उभा रहाणार असे तो कोर्ट तो बाँब लावून उडवत असे. एक वेळ अशी होती की पोलिस किंवा सैनिक त्याच्या वाटेला जात नसत, न्यायाधीश त्याच्या विरुद्द खटला दाखल करून घेत नसत.वाटेत येणारे पोलीस, सैनिक, पुढारी, न्यायाधीश, वकील, मंत्री इत्यादी सर्व लोकांना तो बेधडक मारून टाकत असे. सरकार त्याच्यापुढं शरण होतं. मिळालेले पैशांपैकी काही पैसा तो गरीबांना वाटत असे. त्यानं दवाखाने, शाळा आणि चर्चेसही उभारली होती. त्याला आपण मोठे नेते आहोत असं वाटत असे. राजकीय पक्षाचे भ्रष्ट आणि खुनी लोक देशाची वाट लावत असल्यानं निवडणुक लढवून स्वतः देशाचा अध्यक्ष होऊन देशाचं कल्याण करायची त्याची योजना होती. तो निवडणुकीला उभा राहिला. त्यानं भरमसाठ पैसे वाटले. तो भरघोस मतांनी निवडूनही आला.
नार्कोजच्या उद्योगांचं सविस्तर चित्रण नार्कोजच्या वीस भागात करण्यात आलंय. पाब्लो मारला गेला या बिंदूवर दुसरा सीझन संपला. पाब्लोचा प्रतिस्पर्धी कॅली याच्यावर आणि उरलेल्या नशाद्रव्य टोळ्यांवर पुढला सीझन असेल. प्रचंड हिंसा पडद्यावर दिसते. गाळीबार, स्फोट, रक्त या मालिकेत भरपूर आहे. सेक्स तर विचारायलाच नको.
चित्रण, एडिटिंग उत्तम आहे, प्रत्ययकारी आहे. कोणत्याही चित्रपटात कास्टिंग महत्वाचं असतं. अगदी छोट्या भूमिकेपर्यंत. माणसं गाठणं, त्यांच्याकडून अभिनय करवून घेणं हे मोठंच काम. अनेक चित्रकलाकारांना स्वाभाविकपणे वाटतं की आपण दिसतो थोर, आपला आवाज थोर, आपला अभिनय थोर. तेचतेच दिसणं, तोचतोच अभिनय, त्याच त्याच लकबी प्रत्येक भूमिकेत छापून ही कलाकार मंडळी स्वतःवर खुष असतात. दिग्दर्शक नटांना व्यक्तीमत्व व लकबींच्या चौकटीबाहेर काढून पात्रांच्या भूमिकेत बसवतो. हे कसब फारच मोठं. नार्कोज पहातांना पात्रं पहात असताना ते दिसतं. कित्येक दृश्यं रस्त्यावर घेतलेली आहेत. शेकडो हज्जारो माणसं दृश्यांत दिसतात. ती कॅमेऱ्यात पहात नाहीत. लहान मोठ्या अमेक भूमिकेतली पात्रं अगदी छान वागत असतात, ती नट आहेत असं वाटत नाहीत.
नार्कोजमधली काही मासलेवाईक दृश्यं अशी:
- पाब्लो निवडणुकीचं भाषण करताना भ्रष्ट राजकारण्यांवर टीका करतो. मंचाच्या खाली पाब्लोचे लोक पैसे वाटत असतात.
- सरकारनं फारच लावून धरल्यानं पाब्लो अज्ञातवासात असतो. त्याची बायको त्याला सांगते की त्यानं शरण जावं, तुरुंगात जावं. तुरुंगवास पत्करून बाहेर पडला की त्याचा नेल्सन मंडेला होईल, तो राष्ट्रपती होईल, सारं जग त्याला मान्यता देईल.
- बायकोची ही सूचना पाब्लो अज्ञातवासात आपल्या सेवकाला सांगतो. त्याचा सेवक विचारतो- हा मंडेला कोण. असो.
नार्कोजच्या आधी बोर्जिया नावाची मालिका झाली. तीस भागांची. पंधराव्या शतकातला एक व्यसनी आणि गुन्हेगार पोप या मालिकेत रंगवला आहे. रोम, व्हेनिस, मिलान, पॅरिस इत्यादी लोकेशन्स असल्यानं मालिकेला देखणेपण आणि भव्यता आली आहे. भव्य चर्चेस आणि राजवाडे दिसतात.तिथलं ऐश्वर्य दिसतं. तिथली गुन्हेगारी आणि चैन दिसते. हे पोप महाशय बिनधास्तच होते. अनेक बायकांशी संबंध. पैशाच्या चोऱ्या करायचे. लाचबाजी करूनच ते पोप झाले होते. रोमच्या विकासासाठी लोकांकडून गोळा केलेल्या कराचे पैसे खाऊन रोमचे कार्डिनल गब्बर होतात आणि त्यांना लाच देऊन पोप निवडला जातो. पोप घाऊक प्रमाणावर खून करतो. कार्डिनल सर्रास वेश्यागृहात सापडतात.सारं काही देवाच्या नावानं. पोप आणि त्याचं राज्य म्हणजे माफियाचं राज्य असतं.
बोर्जिया निर्माण करणारी सगळी माणसं ख्रिस्ती. बोर्जिया पहाणारे करोडो लोकही ख्रिस्ती. कोणी मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली नाही, दगड फेकले नाहीत, आंदोलनं केली नाहीत. ऑस्कर मिळवणाऱ्या स्पॉटलाईट सिनेमात हज्जारो ख्रिस्ती धर्माधिकारींनी लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण दाखवलं. ख्रिस्ती माणसं सारं काही निमूट पहातात.
बोर्जियाच्या आसपास ट्युडॉर ही पंधराव्या शतकातल्या ट्युडॉर घराण्यातल्या (इंग्लंड) आठव्या हेन्री या राजावर मालिका झाली. हेन्रीनं जाम लफडी केली. पाच सहा लग्नं केली. लग्नाला किंवा मनमानी कारभाराला विरोध करणाऱ्यांना त्यानं उकळत्या पाण्यात लोटलं, जिवंत जाळलं, त्यांची डोकी उडवली. कॅथिलक चर्चचं- पोपचं वर्चस्व झुगारून इंग्लंडचं स्वतंत्र चर्च तयार केलं आणि स्वतःच त्या चर्चचा प्रमुख झाला. बरं हे सारं कशासाठी तर आधीचं लग्न मोडायला आणि नवं लग्न करायला रोमचं चर्च परवानगी देत नव्हतं म्हणून. आपल्या हाती निरंकुष सत्ता यावी यासाठी चर्चला आणि देवाला हुसकून लावतांना न कळत त्यानं लोकशाहीचा पाया घातला. संसद जन्माला घातली. धर्म ही पायातली एक बेडी हेन्रीनं तोडली.
इंग्लंडमधे एक तृतियांश जमीन चर्चकडं होती. चर्च आणि चर्चचे पुरोहीत या जमिनींचे आर्थिक व्यवहार करत, कुळांना-कामगारांना लुबाडत. देवाच्या नावानं. दाद विचारायची सोय नाही. चर्चशी भांडण करण्याच्या नादात हेन्रीनं जमिनी चर्चच्या हातून काढून घेतल्या. चर्चेस उध्वस्थ केली, चर्चची संपत्ती लुटली.
एक महत्वाची गोष्ट हेन्रीच्या नकळत घडली. धर्म आणि ऐहिक व्यवहार या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. धर्म आणि राजसत्ता वेगळ्या झाल्या. पोप राजासारखाच वागत असे. पोपसत्ता, धर्मसत्ता देवाच्या नावानं कर गोळा करत असे, लढाया करत असे, त्यासाठी सैन्य बाळगत असे, लढाईसाठी लोकांकडून कर वसूल करत असे. हेन्रीनं तो सारा प्रकार संपवला.
हेन्ही हे उद्योग करत होता तेव्हां चर्च मुळातूनच हादरवणारी मार्टिन लूथरची प्रोटेस्टंट क्रांती घडत होती. पादरी आणि पोप भ्रष्ट आहेत, धर्माच्या नावानं लोकांना लुटत आहेत असं मार्टिन लुथर सांगत होता. लोकाना न कळणारं लॅटिन बायबल त्यानं लोकांना कळणाऱ्या इंग्रजीत भाषांतरीत केलं. बायबल आणि माणूस यांच्यात थेट संबंध असावा, मधे पोप किंवा चर्च असू नये असं त्यानं लोकाना समजावलं. हेन्री विद्वान आणि विचारवंत वगैरे अजिबात नव्हता. संपट, स्वैराचारी आणि भ्रष्ट होता.स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच त्यानं मार्टिन लूथरच्या विचारांचा उपयोग केला.
ट्युडॉर आणि बोर्जिया या मालिका पहाताना इतिहासाचा अभ्यास होतो, एक भान येतं.
मार्को पोलो हीही मालिका नेटफ्लिक्सनं सादर केली. तीही बोर्जिया, ट्यूडॉरसारखी देखणी, विशाल.
नेटफ्लिक्सनं दाखवलेल्या मालिका हे दृश्यकलेच्या अंगणातलं एक नवं प्रकरण आहे. टीव्ही आणि सिनेमा या दोन प्रकारांचं मिश्रण या मालिकेत झालेलं आहे. टीव्हीच्या पडद्यावर दाखवलेला एक भव्य आणि दीर्घ सिनेमा. टीव्हीच्या पडद्यावर माणसं जवळून दिसतात, पाच दहा माणसं. मोठ्या पड्यावर मोठ्ठा कॅनव्हास, युद्ध, शेकडो नव्हे हजारो माणसांच्या हालचाली इत्यादी गोष्टी दिसतात.
टीव्हीवर दीर्घ मालिका असतात. दोन चार वर्षं चालणाऱ्या. त्यात एक चमचा कथानक आणि हौदभर पाणी असला प्रकार असतो. नेटफ्लिक्सवरच्या मालिका हा एक स्वतंत्र कलाप्रकार झाला आहे. एकेक तासाचा एक स्वतंत्र चित्रपट असल्यागत मालिका तयार होते. एकाच कथानकाचे पन्नास चित्रपट. पटाचं कथानक गुंत्याचं, दीर्घकाळात पसरलेलं असतं. खूप तपशील असतात. एक मोठ्ठा काळ आणि विषय प्रेक्षकासमोर उलगडतो.
टीव्ही मालिका दररोज पहावी लागते, नेटफ्लिक्सची मालिका स्ट्रीमिंग असल्यानं केव्हांही पहाता येते. स्ट्रीमिंग असल्यानं कोणी डीव्हीडी वगैरे घेण्याच्याही भानगडीत पडत नाही. चित्रपटघरात न जाता घरात सिनेमा पहाता येतो. घरात जर मोठा स्क्रीन असेल, चांगली ध्वनीव्यवस्था असेल तर सिनेमागृहाचा अनुभव घेता येतो. नेटफ्लिक्सवरची मालिका हा सिनेमागृहातला सिनेमा आणि टीव्हीवरची मालिका यांना एक पर्याय झाला आहे.
।।