तंदूरबाबा उत्तरार्ध

तंदूरबाबा उत्तरार्ध

 तंदूरबाबा आश्रम.
 मंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर तंदूरबाबा बसला आहे. गुबगुबीत. देखणा. मानेवर रुळणारे केस. उघडा बंब. 
त्याच्या भोवती एकशेऐंशी कोनात बारा पुरोहित उभे आहेत. पुरोहितांच्या मागे  पुरुषभर उंचीची चांदीची पिंपं आहेत. पिंपाला कमंडलू लटकले आहेत.
दूरवर दोन खांबांना एक मोठा फलक लटकावलेला आहे. त्यावर ‘ शीतोष्ण अभिषेक सोहळा ‘ असे शब्द लिहिलेले आहेत.
मंडपात दहाएक हजार माणसं जमलेली आहेत. सगळ्या वयाची.  तरुणींचा भरणा लक्षात रहाण्यासारखा. छतावर कॅमेरे लटकेलेल आहेत. वर्ल्ड कपच्या मॅचेसमधे घारीसारखे फिरणारे कॅमेरे वापरले जातात. तीच टेक्नॉलॉजी इथं वापरण्यात आलीय. सोहळ्याची नाना अँगल्सची दृश्यं मंडपभर पसरलेल्या स्क्रीन्सवर दिसतात. 
कॅमेऱ्याच्या मागं उभा असलेला पत्रकार माईकवरून आपल्या प्रोड्युसरला विचारतो,  ‘ अरे यार, तू तर मला सांगितलं होतंस की आश्रमात एक शीतोष्ण देवाच्या भल्या मोठ्य़ा शिळेवर  अभिषेक होणार आहे. इथं तर दगड दिसत नाहीये. इथं तर एक बंब्या दिसतोय. मी चुकीच्या जागी तर नाही ना आलोय?’
‘ सुन यार. मी जरा चौकशी करून सागतो. तू तूर्तास रेकॉर्डिंग चालू ठेव. मी सध्या ते लाईव करणार नाही.’
‘ मग तोवर मी इतर दृश्य घेतो.’
कॅमेरा एका स्मार्ट मुलीवर जातो.  स्वतःचे गाल दोन्ही हातात गच्च धरून किंचाळतेय. तंदूरबाबाकडं पहात. ‘ किती क्यूट. किती कूल.’
तुताऱ्या वाजतात.
 एका मागोमाग एके पुरोहित मागच्या पिंपात कमंडलू बुडवायचा आणि मंत्र म्हणत तंदूरबाबाच्या अंगावर मोकळा करायचा. एक जण दूध ओतायचा. दुसरा मध. तिसरा पाणी. चौथा पुन्हा दूध.
एक पिंप संपलं की लगबगीनं दुसरं पिंप त्या जागी यायचं.
‘सुन. संपादक म्हणतोय की तू कशाला काळजी करतोस तो बंब्या आहे की दगड. तू शूट कर. दगड असो की बंब्या, लोकं त्याच्याकडं भक्तीभावानंच पहाणार आहेत. तू कंटिन्यू कर.’ 
दूध, मध, पाणी तंदूरबाबाच्या अंगावरून ओघळायचं, चौथऱ्यावरून खाली सरकायचं. खालच्या हौदात गोळा व्हायचं. हौदाच्या भोवती उभी असलेली माणसं तो द्रव प्यायची. कोणी ओंजळीतून, कोणी भाडं भरून. झुंबड. रेटारेटी. द्रव पिणाऱ्यांना मागली माणसं खेचून दूर करायची आणि त्यांच्या जागी जाऊन द्रव प्यायची. 
पवित्र द्रव वाहून नेणारी पन्हळ झऱ्यासारखी वाहत होती. टोकाला एके ठिकाणी दोन माणसं तो द्रव प्लास्टिकच्या ड्र्ममधे भरत होती.   ड्रम तंदूरबाबांचे भारतभरच्या  आणि अमेरिका-युरोपातल्या भक्तांसाठी होते. ते तडक विमानतळावर पोचत होते, उभ्या असलेल्या चार्टर विमानानं दिल्लीला रवाना होत होते.
अत्यंत प्रोफेशनल व्यवस्था होती. अमदाबादच्या आयआयएममधून पहिल्या क्रमाकानं पास झालेला बिझनेस मॅनेजमेंटचा माणूस ही व्यवस्था सांभाळत होता.
मंत्रोच्चार आणि लोकांचा गोंगाट यांचं मिश्रण स्क्रीनवर ऐकायला येत होतं.
आश्रमाच्या बाहेर दोन तीन हजार माणसं गोळा झाली होती. घोषणा देत होती.   त्यांच्या हातात फलक होते. ‘ कामांध तंदूरबाबाचा निषेध असो.’ ‘ व्यसनी तंदूरबाबाना अटक करा.’
एक पुरोहित अभिषेक करत असताना तंदूरबाबाच्या कानात पुटपुटला. ‘ पेपरात दोन दिवसांपासून बातम्या आल्यात. कोणी तरी आंदोलन उचकवलंय.’ 
तंदूरबाबानं हात वर केला.
पुरोहितानं सेलफोन तंदूरबाबाच्या हातात ठेवला. सेलफोनवर दूध, मध, पाण्याचा अभिषेक होत होता. सेलफोनवर त्याचा काहीएक परिणाम नाही. अमेरिकेतून आणलेला लिक्विड प्रूफ सेलफोन. समुद्राच्या तळाशीही त्यावरून बोलता येतं.
तंदूरबाबा फोनवर बोलतो.
बाहेर निदर्शकांची संख्या वाढते. त्यांचा कल्लाही वाढतो.
तंदूरबाबा फोनवर बोलतो.
बाहेर सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या येतात. गोलाकार करून पसरतात. त्यातून पोलिस उतरतात. जमावाच्या सभोवताली पसरतात.
एका लाल दिव्याच्या वाहनातून अधिकारी उतरतो. जिल्हा पोलिस प्रमुख. तो निदर्शकांशी बोलतो.
निदर्शकांच्या घोळक्यातून पोलिस प्रमुख बाहेर पडतो, आश्रमात कूच करतो.  त्याच्या भोवती पोलिसांचं कडं. पोलीस रेटारेटीतून वाट काढत पोलिस प्रमुखाला तंदूरबाबापर्यंत नेतात.
बाबाचे भक्त गोंधळतात. कोणी तरी त्यांना सांगितलय की बाबाला अटक होणार आहे. भक्त व्हायोलंट होतात. पोलिस प्रमुखाच्या भोवती उभ्या असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करू लागतात. ‘ पकडलत तर याद राखा अख्खा गाव जाळून टाकू, विधानसभा जाळून टाकू, मुख्य मंत्र्यांना मारून टाकू ’ असं म्हणू लागतात.
गोंधळ.
कॅमेरे आणि माईक  पोलिस प्रमुखासमोर येतात.  स्क्रीनवर पोलिस प्रमुख दिसू लागतो.
‘ तुम्ही लोक शांत व्हा. मी अटक बिटक करणार नाहीये. मी बाबांना प्रश्न विचारायला आलोय. त्यांची चौकशी करायला आलोय. येवढंच. मी माझं सरकारी कर्तव्य पार पाडतोय. माझ्या कामात व्यत्यय आणू नका.’
भक्तांचा आवाज कमी झाला, कुजबूज पातळीवर आला.
पोलिस प्रमुखांनी बाबाकडं पाहिलं. हातानं ‘ हा खेळ आता थांबवा. माझ्या बरोबर या ’ असं खुणावलं.
बाबा थंड. हातवारा करून त्यानं उत्तर दिलं ‘ मुळीच नाही ’
पोलिस प्रमुख जाम कातावला. त्यानं पुरोहितांकडं डोळे वटारून पाहिलं. कंबरेचं रिव्हॉल्वर हातात घेतल्याचा आविर्भाव केला. 
 ‘ बंद करा अभिषेक.’ पोलिस प्रमुख म्हणाला.
अभिषेक बंद झाला.
पोलिस प्रमुख चौथऱ्यावर गेला. बाबाच्या कानाजवळ तोंड नेऊन त्यानं एक इरसाल शिवी आणि धमकी दिली.  बाबाचा चेहरा खर्रकन उतरला.
‘चल. पुरे कर नाटक.अंगावरचं दूध आणि मध  पुसून टाक. सभ्य कपडे घाल आणि तयार हो. मी तुझ्या घरात वाट पहातो.’ 
पोलिस प्रमुख चौथऱ्यावरून उतरला. मंडपाबाहेर आला. मंदिराच्या मागच्या तंदूरबाबा निवासाकडं गेला.
अभिषेक थांबला. तंदूरबाबानं अंग पुसलं. चौथऱ्यावरून उतरला. निवासाकड रवाना झाला.
पोलिस प्रमुख एका दालनात पोचले. 
दालनाच्या एका टोकाला सिंहासन. समोरच्या मोकळ्या जागेत खुर्च्या ओळीनं मांडलेल्या. एकूण थाट दरबारासारखा. 
पोलिस प्रमुख एका खुर्चीत जाऊन बसले.
तंदूरबाबा पोचला. त्याच्या सोबत त्याचे चार सहकारी. सिंहासनावर बसला. 
खाली एका खुर्चीवर पोलिस प्रमुख. 
दोघांमधे कित्येक फुटांचं अंतर.
‘ इतक्या अंतरावरून बोलायचं तर माईक आणि स्पिकरची व्यवस्था करावी लागेल. त्यापेक्षा तुम्ही माझ्या बाजूला बसा नाही तर सिंहासनाच्या बाजूला माझ्यासाठीही एक सिंहासन ठेवा.’ पोलिस प्रमुख.
तंदूरबाबाचे सहकारी एकमेकाकडं पहातात, बाबाकडं पहातात. दुसरं सिंहासन नसतंच मुळी.
बाबा खाली उतरून पोलिस प्रमुखाच्या बाजूला येऊन बसतात.
‘ हं. विचारा.’ तंदूरबाबा.
पोलिस प्रमुख नाडीनं बांधलेली फाईल उघडतात. तिच्यात काही कागद आणि वर्तमानपत्राची कात्रणं आहेत.
” तुम्ही ल ग्रांडे या हॉटेलात तीन दिवस राहिला होतात. तुमच्या सोबत xx xxx xxx ही महिला होती. हॉटेलच्या बिलावर तुम्ही काय खाल्लं प्यालात त्याची नोंद आहे. दीड लीटर व्हिस्की तुमच्या खोलीत पाठवल्याची नोंद आहे. तीन वेळा तंदुरी चिकन पाठवल्याची नोंद आहे. काही लोकांनी तुमचं चित्रण सेल फोनवर केलं आहे. त्यात तुमचं एकूण रुप, कपडे इत्यादी गोष्टी दिसत आहेत. “
पोलिस प्रमुख फायलीतले कागद चाळत बोलत होते.
तंदूरबाबा ऐकत होते. 
मागं उभे असलेल्या चार माणसांचे चेहरे निर्विकार.
” तुमचं सगळं ऐकून घेतलंय. हे सारं खोटं आहे. तुमच्याकडं पुरावे आहेत?”
” तुमच्यासमोर ते पुरावे घेऊनच मी बसलो आहे. फोटो आहेत. हॉटेलची बिलं आहेत.”
तंदूरबाबा मान थोडीशी तिरकी करतो. मागं उभा असलेला माणूस वाकून त्याचे कान बाबाच्या तोंडासमोर आणतो. 
” ऑफिसर. फोटोशॉपनं हल्ली माणसाला कपडे घालता येतात. कपडे घातलेला माणूस नागडा दाखवता येतो, लुंगी नेसलेल्या माणसाला जीन्स घालता येतात. बिलामधे दारू, चिकन असं काहीही घुसवता येतं. “
पोलिस प्रमुख हसले.
” आम्ही सारी तपासणी केलीय. हॉटेलचे रेकॉर्ड तपासलेत. सेल फोन ताब्यात घेऊन मूळ चित्रं तपासली आहेत. तुमच्या वरचे आरोप खरे दिसतात.”
तंदूरबाबा गप्प.
पोलिस अधिकारी गप्प. पुढं काय?
” तुम्ही काय करणार आहात? मला अटक करणार आहात? कोणत्या कायद्याखाली अटक करणार आहात? समजा मी दारू प्यालो. त्यात कोणता गुन्हा केला? मी सज्ञान आहे. माझ्याकडं दारु पिण्याचं लायसन्स आहे. मी जीन्स वापरल्या. कोणत्या कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. हल्ली माणसं सर्रास जीन्स वापरतात. मी चिकन खाल्लं. काय चुकलं? आणि एका मुलीबरोबर मी होतो. ती मुलगी स्वखुषीनं माझ्याकडं आली होती. ती माझी भक्त आहे. तिनं मला तिचं सर्वस्व अर्पण केलंय. ” 
” मी अटक बिटक करणार नाहीये. वर्तमानपत्रात आलेला मजकूर खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा करणं हे माझं काम आहे. तुमच्या काही भक्तांनी तुमच्या वागण्याला आक्षेप घेतलाय. धार्मिक माणसानं दारु पिता कामा नये असं त्यांचं म्हणणं. अद्यात्मिक माणसानं सेक्स करता कामा नये असं त्यांचं म्हणणं. “
” ते लोक अज्ञानी आहेत. त्यांनी भारताच्या प्राचीन परंपरांचा अभ्यास केलेला नाही. तुम्ही ज्याला गुन्हा म्हणताहात त्या सगळ्या गोष्टी प्राचीन काळात सर्रास चालत असत. देवादिकांच्या दारू-सेक्सच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ओरिसा, मध्य प्रदेशातल्या गुहांतली, देवळातली चित्रं पहा. त्यात देवांनी सेक्स कसा एंजॉय केलाय त्याचं चित्रण आहे, त्याची शिल्पं आहेत. तेव्हां मी काही विपरीत करतोय, भारतीय परंपरेशी प्रतारणा करतोय असं नाहीये.  भक्त लोकांना वाईट वाटू नये म्हणून मी या गोष्टी आश्रमात करत नाही. दूरवर जाऊन हॉटेलांत त्या करतो. पण त्यात मी काहीही चूक करत नाहीये. भक्त लोक मस्त दारू पितात, व्यसनं करतात. त्यांच्या हज्जार सेक्स भानगडी असतात. ते चिकन खातात, मटण खातात, मासे खातात. त्यानी मजा करायची आणि मी मात्र त्या गोष्टी करायच्या नाहीत. तुमच्याकडं ज्या कोणी भक्तांनी तक्रार केलीय त्यांना तुम्हीच जाऊन माझा निरोप द्या. मी दारु बंद करेन, मांसाहार बंद करेन, अगदी सेक्स करणंही बंद करेन. पण आधी या गोष्टी त्यांनी बंद कराव्यात.” 
पोलिस प्रमुखांनी शांतपणे सारं ऐकलं.
” हे पहा. तुमच्या भक्तांना भेटणं हे माझं काम नाहीये. वरिष्ठांनी हे प्रकरण काय आहे ते तपासण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली, संबंधितांचे जबाब घ्यायला सांगितलं. मी ते काम केलंय. मी माझा जबाब वरिष्ठांना देईन. “
पोलिस प्रमुखांनी फाईल बंद केली. उठू लागले.
तंदूरबाबांनी त्यांना थांबवलं. 
” तुम्ही तुमचं काम केलंत. तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणूनच हा देश चाललाय. मी तुमचं अभिनंदन करतो. तुमचा पाहुणचार करणं हे माझं कर्तव्य आहे. “
पाहुणचार असा शब्द उच्चारल्यावर पोलिस प्रमुख हादरलेच. 
त्यांच्या नजरेसमोर हॉटेल ल ग्रांडे, दारुचे ग्लासेल, ताटलीतलं चिकन आणि उत्सूक महिला यांच्या प्रतिमा झर्रकन सरकल्या.
 ‘ तुमचा पाहुणचार मला परवडणार नाही, माझी नोकरीही जाईल.’
तंदूरबाबा हसले. म्हणाले ” अहो पाहुणचार म्हणजे चहा आणि समोसे. गरम गरम समोसे. गरिबाच्या  साध्या पाहुणचाराचा स्विकार करा.”
” नको. मी सकाळच्या चहानंतर दिवसभर चहा घेत नाही. दोन वेळच्या जेवणापलिकडं काहीही खात नाही. धन्यवाद. मी जातो.” 
पोलिस प्रमुख उठले. अबाऊट टर्न करून बाहेर पडले.
बाहेर हज्जारो भक्त तंदूरबाबाची वाट पहात ताटकळत होते. त्यांच्यातून वाट काढून पोलिस प्रमुख आश्रमाबाहेर पडले.
आंदोलकांनी पोलिस प्रमुखांना घेरलं आणि प्रश्न विचारायला सुरवात केली. पत्रकारांनी मुसंडी मारून पोलिस प्रमुखांच्या निकटची जागा काबीज केली. टीव्हीचे माईक आणि कॅमेरे पोलिस प्रमुखांवर रोखले गेले.
सर्वांचा एकच गिल्ला होता. ‘ तंदूरबाबांनी काय सांगितल? तुमचं काय बोलणं झाल? सरकार तंदूरबाबावर कारवाई करणार आहे की नाही?’ 
‘ मी बाबाचा जबाब घेतला आहे. गोळा झालेली माहिती मी वरिष्ठांकडं पाठवणार आहे. येवढंच मी करू शकतो.’
पोलिस प्रमुखांच्या उत्तरानं पत्रकारांचं आणि निदर्शकांचं समाधान झालं नाही. ते वरच्या पट्टीत प्रश्न विचारू लागले. एकाच वेळी अनेक माणसं प्रश्न विचारीत होती. पोलिस प्रमुखांचं म्हणणं त्या गोंधळात विरून जात होतं. 
पोलिस प्रमुख लोकांना दूर सारत आपल्या गाडीकडं पोचले. हुश्श करत गाडीत बसले. गाडीत त्यांचा उपप्रमुख त्यांची वाट पहात होता.
गाडीचे दरवाजे खाडखाड बंद झाले.  शेवटची संधी गाठण्यासाठी माध्यमांचे कॅमेरे आणि माईक गाडीच्या खिडकीतून आत जायचा प्रयत्न करू लागले.
पोलिसांनी काचा वर केल्या.
पोलिस प्रमुखांनी हुश्श केलं.
उपप्रमुख म्हणाले ” सर. आता वायरलेसवर निरोप आला होता. डीजी साहेबांचा. तुमची बदली झालीय, तुम्हाला भुवनेश्वरला पाठवण्यात आलंय.”
पोलिस प्रमुखांनी उपप्रमुखाकडं पाहिलं.
उपप्रमुख चाचरत बोलले ” सर. डीजीपी म्हणत होते की तंदूरबाबाची चौकशी करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं. ते रागावल्यासारखे वाटत होते.”
पोलिस प्रमुख ” ठीक आहे ” येवढंच म्हणाले.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *