व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?
व्यंकटरमण सुब्रमण्यम ब्रीटनमधल्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले आहेत. त्या आधी२००९ मधे त्यांना मॉलिक्युलर बायॉलॉजी विषयातलं नोबेल पारितोषिक (इतर दोन वैज्ञानिकांसह) मिळालं होतं. या दोन्ही घटना व्यंकटरमण यांचं जगातलं स्थान दाखवतं.
वरील दोन्ही गोष्टी त्यांनी अमेरिका आणि ब्रीटनमधे साधल्या.ते वडोदऱ्यात जन्मले, तिथंच त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांना आयआयटीत प्रवेश हवा होता. मिळाला नाही. त्यांना संशोधन करायचं होतं, त्यांचे आई वडील दोघंही संशोधक होते. व्यंकटरमण अमेरिकेत पोचले. तिथं त्यांनी ओहायो विश्वशाळेत डॉक्टरेट केली. नंतर येल विश्वशाळा, ब्रुकलीन इन्सटीट्यूट या ठिकाणी त्यांनी मॉलिक्युलर बायॉलॉजी या विषयावर संशोधन चालू ठेवलं, संशोधन प्रबंध लिहिले.
रायबोझोनची रचना आणि कार्य हा त्यांचा विषय. माणसाच्या पेशीत असणारा रायबोझोम माणसाच्या जगण्याला आवश्यक प्रथीनांची निर्मिती करत असतो. रायबोझोमचं कार्य आणि रचना कळल्यामुळ पुढल्या काळात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बिघडलेल्या रायबोझोमची दुरुस्ती करणं शक्य होईल, त्यामुळं माणसाच्या जगण्यात क्रांतीकारक बदल होतील. रायबोझोममधे काही गडबड झाली रे झाली की दुरुस्त करा अशा रीतीनं वैद्यक वागत राहिलं तर रायबोझोम कधीच मरणार नाही आणि माणूसही अमर होऊ शकेल.
रिचर्ड फेनमननं एका प्रबंधात लिहिलं की जीवशास्त्रामधे मरण नावाची कल्पना कुठंच नाहीये. तिथून जीवशास्त्राच्या संशोधनाला वेगळं वळण मिळालं. माणसाच्या पेशीची दुरुस्ती करणाऱ्या संशोधनाला गती मिळाली. कंप्यूटर आणि नॅनोटेक्नॉलॉजी या दोन शाखांनी पेशींची दुरुस्ती शक्य करून दाखवली. माणसाच्या पेशीतल्या गुणसुत्रातले घटकगुण कात्रीनं कापून, वेगळे करून, दुरुस्त करून, पुन्हा जोडून एक नवं गुणसूत्र तयार करण्याची शक्यता निर्माण झाली. त्या दिशेन सध्या काम चालू आहे. गुणसूत्र वेगळी करणारी कात्री म्हणजे एक यंत्र-उपकरण, नॅनो उपकरण. नाना उपयोगांची नाना प्रकारची यंत्र निर्माण होऊ घातली आहेत. रेणूचे घटक वेगळे करून, त्यात इतर रेणूंचे घटक भरती करून एक नवा रेणू तयार करता येतो आहे. तेही एका यंत्राचंच काम. त्यातून आता स्मार्ट धातू, नवे धातू तयार होत आहेत. माणूस आणि यंत्रं एकजीव होऊन जातील, एकत्र काम करतील आणि त्यातून माणसाचं आयुष्य अडीचशे ते पाचशे वर्षांपर्यंत वाढेल असं रे कुर्झवेल सांगतो आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं संशोधन कोणा एका माणसामुळं होत नाही. अनेकानेक संशोधकांच्या साखळीतून संशोधन होत असतं. एकला चालो रे वगैरे गोष्टी विज्ञान-तंत्रज्ञानात नसतात. तिथं सहजीवन असतं. माणसाच्या जगण्यात होऊ घातलेले क्रांतीकारक बदल करणाऱ्या अनेकानेक वैज्ञानिकांच्या अनेकानेक साखळ्यांतली व्यंकटरमण, सर व्यंकटरमण, ही एक कडी आहे.
आपली समजूत सुधारावी म्हणून, आपल्याला काही शिकता यावं म्हणून एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. व्यंकटरमण यांची कारकीर्द, त्यांनी केलेलं सर्व काम, अमेरिकेतलं आणि ब्रीटनमधलं आहे. असं कां व्हावं? व्यंकटरमण असोत की सीव्ही रामन की खुराणा, ही माणसं भारतात जन्मतात, भारतात शिकतात, त्यांची मूळ वाढ भारतातच होते. परंतू त्यांच्या हातून होणारं काम मात्र परदेशातच होतं. असं कां होतं?
थोडं तपशिलात जायला हवं.
रॉयल सोसाटीपासून सुरवात करू.
१६४५ मधे ही संस्था स्थापन झाली. अनौपचारिक रूपात. नंतर १६६२ मधे तिला राजमान्यता मिळाली. विज्ञान म्हणजे प्रयोगातून सिद्ध झालेल्या गोष्टी हा सिद्धांत तेव्हां पुढं आला होता. त्या सिद्धांताच्या आधारे विज्ञान आणि ज्ञान मिळवणं असं या संस्थेचं उद्दीष्ट होतं. संस्थेनं आपला उद्देश Nullius in verba ‘ कोणाचाही शब्द जसाच्या तसा घेऊ नका’ या वाक्यात कोरून ठेवला.दर आठवड्याला ठराविक दिवशी ठराविक वेळी वैज्ञानिक जमत. आपला सिद्धांत आणि प्रयोग वैज्ञानिक या सभेत मांडत. त्यावर चर्चा होई, तपासणी होई. त्याला मान्यता दिली जाई. नंतर या सिद्धांतावरचा निबंध सोसायटीच्या जर्नलमधे प्रसिद्ध केला जाई.रॉबर्ट बाईल, रॉबर्ट हुक इत्यादी त्या काळातले वैज्ञानिक सुरवातीपासून संस्थेच्या कामात सहभागी असत. रॉबर्ट बॉईलनी संस्थेतल्या कामाबद्दल लिहिलेल्या एका पत्राचा काही भाग असा
”About the year 1645, while I lived in London (at a time when, by our civil wars, academical studies were much interrupted in both our Universities), … I had the opportunity of being acquainted with divers worthy persons, inquisitive natural philosophy, and other parts of human learning; and particularly of what hath been called the New Philosophy or Experimental Philosophy. We did by agreements, divers of us, meet weekly in London on a certain day and hour, under a certain penalty, and a weekly contribution for the charge of experiments, with certain rules agreed amongst us, to treat and discourse of such affairs.”
रॉयल सोसायटीची स्थापना हवेत, अपघातानं झाली नाही. फ्रान्सिस बेकन या विचारवंत वैज्ञानिकानं मांडलेला संशोधनाचा सिद्धांत या सोसायटीच्या निर्मितीला कारणीभूत आहे. विचारपूर्वक प्रयोग उभा करायचा, त्याचे निष्कर्ष मांडून सिद्धांत तयार करायचं ही ज्ञानाची वैज्ञानिक पद्धत बेकननं मांडली. प्रयोगातून तयार झालेलं ज्ञान म्हणजे विज्ञान हा तो सिद्धांत. माणसं प्रयोग करू लागली आणि रॉयल सोसायटीत ते प्रयोग मांडून चर्चा करू लागली, प्रयोगाचं खरंखोटेपण सिद्ध करू लागली.
एक उदाहरण. १७७० च्या सुमाराचं. स्मीटन नावाचा एक प्रयोग करणारा माणूस रॉयल सोसायटीत आपली निरीक्षणं आणि प्रयोग मांडू लागला. स्मीटन हा जेम्स वॅटचा समकालीन. त्या काळात उत्तर युरोपात धरणं,कालवे, पाण्याचं वितरण, पाण्यापासून वीज तयार करणं इत्यादी गोष्टी घडत होत्या. स्मीटननं त्या सर्वाचा अभ्यास करून जलव्यवस्थेचा सिद्धांत मांडला. तंत्रज्ञान परिभाषित केलं, जलव्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक मॅन्युअल्स लिहिली. त्यातून एक हायड्रॉलिक्स हे शास्त्र तयार झालं, सिविल इंजिनियरिंगची एक शाखा सुरु झाली. स्मीटननं लििहलेली पुस्तकं आणि मॅन्युअल्स वापरून जगभर त्यानंतर पूल, बंदरं, कालवे, वाफेची इंजिनं इत्यादी गोष्टी उभ्या रहायला लागल्या. गंमत म्हणजे स्मीटन शिक्षणानं इंजिनियर नव्हता. तो वकील होता. फ्रान्स जलशास्त्रात आघाडीवर होतं. सारी पुस्तकं फ्रेंचमधे. स्मीटनला ती अनुवादित करून वाचावी लागली. वगैरे.
त्यानंतर १७५० सालची गोष्ट. आता वाफेची यंत्रं सरसकट वापरली जाऊ लागली. परंतू त्यात काही दोष होते, कार्यक्षमता आणि उत्पादनाची किमत यावर त्या दोषांचा परिणाम होत असे. जॉन देसाग्युलर्स हा माणूस भलीमोठी यत्रं घेऊन सोसायटीत भाषण करी. या यंत्रात कोणते दोष आहेत आणि ते कसे दूर करता येतील यावर तो तांत्रिक भाषणं देत असे. त्याच्या सोबतच अॅडम वॉकर हा माणूस mechanics, hydrostatics, penumatics, chemistry, optics, electricity and general properties of matter या विषयावर भाषण करत असे. या भाषणांना लोक गर्दी करत. भाषणांना त्या काळात आजच्या काळाच्या हिशोबात १५ हजार रुपयांचं तिकीट काढावं लागत असे. शिवाय भाषणांसाठी त्यांना भरभक्कम मानधनही दिलं जायचं.
भाषणांना व्यापारी, उद्योजक हजर असत. या मंडळींचा वापर ते आपले उद्योग, यंत्रं, कारखाने अद्यावत-कार्यक्षम करण्यासाठी करत असत. तत्कालीन ब्रीटनमधे, स्कॉटलंड आणि मँचेस्टरमधे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, मेकॅनिक, प्राध्यापक, बँकर्स, राजकीय पुढारी, व्यापारी इत्यादी मंडळी एकत्र येत. उद्देश एकच, आर्थिक विकास. विश्वशाळा, इंजिनियरिंग शाळा इत्यादी सुरु करण्यासाठी व्यापारी सढळ हातानं देणग्या देत. त्यातूनच पुढं औद्योगीक क्रांती सिद्ध झाली. औद्योगिक क्रांती सिद्ध होण्यासाठी लागणारा सामाजिक-राजकीय पायाही लोकानी तयार केला. माणसाला संपत्तीचा उपभोग घेणं शक्य होईल असे कायदे केले, बँकिंग-इन्शुरन्स इत्यादी संस्था सुरु केल्या.
सोसायटी एक वैज्ञानिक जर्नल चालवते. या वर्षी हे जर्नल ३५० वर्षांचं होत आहे. या जर्नलमधे प्रकाशित झालेले काही प्रबंध असे.
सुरवातीला रक्त देण्याच्या – ब्लड ट्रान्सफ्युजन – प्रक्रियेचा वृत्तांत (१६६६).
आयझॅक न्यूटन- प्रकाश किरण आणि रंग यांचं स्वरूप (१६७२).
बेंजामिन फ्रँकलिन- ढगात वीज असते (पतंग उडवून). (१७५२)
हॅन स्लोन-देवीची लस.(१७५५)
मोत्सार्ट हा अलौकिक बुद्धीमत्तेचा संगीतकार आहे. वैज्ञानिक अभ्यास. (१७७०)
कॅरोलिन हर्शल- धूमकेतूचा शोध.(१७९४)
मॅक्सवेल-प्रकाशाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म. (१८६५)
डायसन,एडिंग्टन- आईनस्टाईन यांचा जनरल रिलेटिविटीचा सिद्धांत.(१९२०)
स्टीफन हॉकिंग- ब्लॅक होल. (१९८०)
रॉयल सोसासटी या संस्थेला महत्व आणि प्रतिष्ठा आहे त्या मागं बराच इतिहास आणि खटपट आहे.
अशा संस्था भारतात कां उभ्या/चालत्या नाहीत?
व्यंकटरमण यांचा मॉलिक्युलर बायॉलॉजीचा अभ्यास येल विश्वशाळेमधे झाला.
येल विश्वशाळेची सुरवात एका कॉलेजपासून झाली. १७०१ साली प्रेसबिटेरियन चर्चमधल्या पुरोहितांना धर्मशास्त्र शिकवण्यासाठी येल कॉलेज सुरु झालं. १७७७ मधे कॉलेज धर्मशास्त्रापासून दूर गेलं, विज्ञान विषय शिकवला जाऊ लागला. १९१० नंतर एंब्रियॉलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, इकॉलॉजी या विज्ञानशाखा उघडल्या गेल्या. १९२० मधे वैज्ञानिक वैद्यकी या शाखेला सुरवात झाली. संशोधन हा या शाखेचा मुख्य फंडा होता. कमीत कमी लेक्चर्स, कमीत कमी परिक्षा आणि पूर्णवेळ शिक्षक अशी शिक्षण पद्धत सुरू झाली. या पद्धतीचं नावही येल पद्दत असं पडलं. येल विद्यापीठातून शिकलेले, तिथं शिकवणारे यांच्या यादीत ५२ नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
१८६१ मधे बॉस्टनला एमआयटी स्थापन झाली आणि १८८५ साली स्टॅनफर्ड विश्वशाळा सुरु झाली. येल विश्वशाळेत संशोधनावर भर असतो तर एमआयटी आणि स्टॅनफर्डमधे संशोधनातून उत्पादनं तयार करण्यावर भर असतो. आजच्या जगाच्या वापरात असलेल्या वस्तूंपैकी बहुसंख्य वस्तूंच्या उत्पादनाच्या मुळाशी वरील दोन विश्वशाळा आहेत. उदाहरण- इंटरनेट, सेल फोन, लॅपटॉप, आय फोन, आय पॅड.
स्टॅनफर्डनं जोर धरला १९४० ते १९५५ मधे डीन असलेल्या फ्रेडरिक टर्नर यांनी घेतलेल्या निर्णयांपासून. स्टॅनफर्डकडं प्रचंड जमीन होती. टर्नर यांनी आपल्याच विश्वशाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना जमीन भाडेपट्टयावर देऊ केली, उत्पादनांचं डिझाईन तयार करण्यासाठी. विश्वशाळेतलं ज्ञान, उत्साही प्राध्यापक- संशोधक- विद्यार्थी यांचं सान्निध्य आणि पैसे गुंतवू पहाणारे व्यापारी अशा तिघांच्या सहकार्यातून हेवलेट पॅकार्ड सारख्या कंपन्या सुरु झाला. तिथून स्टार्ट अप संस्थांचं पेव फुटलं. मायक्रोचिप्स आणि त्यांचा वापर करून तयार होणारी उपकरणं हा उद्योग तिथं जन्मला. गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल इत्यादी संस्था इथंच काम करतात. सारा उद्योग चिपवर, म्हणजे सिलिकॉन चिपवर आधालेला असल्यानंच या विभागाला सिलिकॉन व्हॅली असं नाव पडलं.
एमायटीचंही तसंच. १८६१ साली ही विश्वशाळा स्थापन झाली. संशोधन आणि वर्कशॉपमधे काम करून उत्पादनं तयार करणं या जर्मन विचारावर ही संस्था आधारली. विद्यार्थी अवस्थेतच विद्यार्थ्यानं हातपाय पसरायला पुरेल इतक्या जागेतही उत्पादनाचं डिझाईन आणि प्रोटोटाईप करायला विश्वशाळा प्रोत्साहन देते. या उद्योगामधे पैसे घालायला उद्योगपती तयार होतात. म्हणजे विश्वशाळा, संशोधक आणि उद्योगक अशांची साखळी तयार होते.
एमआयटीमधे १० हजार विद्यार्थी आणि १ हजार शिक्षक आहेत. विद्यार्थी शिक्षक प्रमाण १०:१. आजवर ५० नोबेल पारितोषिक विजेत या संस्थेमधून बाहेर तरी पडलेत किवा त्यांनी या संस्थेत शिकवलय. या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी २५,८०० उत्पादक संस्था काढल्यात. त्यात ३० लाख लोकाना रोजगार मिळालाय. या संस्थांचं एकत्र उत्पन्न १.९ लाख ट्रिलियन डॉलर आहे. या विद्यार्थ्यांनी काढलेल्या उद्योगांचा एकादा भौगोलिक देश असता तर उत्पादनाच्या हिशोबात तो जगात अकराव्या क्रमांकावर असता.
व्यंकटरमण ओहायोत, येलमधे, ब्रुकलीनमधे संशोधन करू शकले कारण असं संशोधन करण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुंतवणूक अमेरिका करू शकतं. गुंतवणूक करण्यासाठी लागणारा बख्खळ पैसा अमेरिका मिळवतं. पैसा कसा मिळवायचा याचं गणित त्याना सापडलंय. हे गणित सतराव्या शतकाच्या सुरवातीला ब्रीटन आणि युरोपमधे तयार झालं. तिथं औद्योगीक क्रांती झाली. सार्वत्रिक शिक्षण आणि उपयुक्त ज्ञानावर आधारलेलं संशोधन हा ब्रिटीश-युरोपीय विकासाचा पाया होता. फालतू संशोधन करून पीएचड्यांचा कारखाना काढण्याला तिथं किमत नाही. माणसाचं जगणं समृद्ध करणाऱ्या वस्तू व प्रक्रियांचं संशोधन करणाऱ्या संशोधनाला तिथं किमत दिली जाते. संशोधन, उत्पादन आणि समृद्धी. ब्रीटनमधे तयार झालेलं ते गणीत नंतर अमेरिकेत गेलं.
व्यंकटरमण, रामन, खुराणा हे भारतात जन्मतात. पण त्यांच्या डोक्याचा आणि क्षमतांचा उपयोग करण्याची क्षमता अमेरिकेनं अंगीकृत केली आहे.
ती क्षमता भारतात कशी तयार होईल?
One thought on “व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?”
I am confused a bit here – please see this link http://en.wikipedia.org/wiki/Venkatraman_Ramakrishnan