‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो? व्हेलबेक या फ्रेंच कादंबरीकारानं तशी कल्पना करून फ्रेंच समाज कसा बदलू शकतो याचं वर्णन सबमिशन या कादंबरीत लिहिलंय. २०१५ शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या संपादकांना आयसिसच्या जिहादींनी पॅरिसमधे ठार मारलं त्याच दिवशी ही कादंबरी  फ्रेंचमधे प्रसिद्ध झाली. आता या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालंय.
।।
 व्हेलबेकच्या कादंबरीचा काळ आहे, २०२०. त्या वर्षी फ्रान्समधे सार्वत्रिक निवडणुका होतात. चार पक्ष निवडणुकीत उभे असतात. कोणालाच बहुमत मिळत नाही. पक्षांमधली फूट वापरून, पक्षांच्या आपसातल्या मारामारीचा उपयोग करून मुस्लीम ब्रदरहूड हा राजकीय पक्ष आघाडी स्थापन करतो, सरकार स्थापन करतो.  महंमद बेन अबेस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो. राष्ट्रपती झाल्यानंतर  पॅरिसमधील ऐतिहासिक सॉरबॉन विद्यापीठ एक सौदी श्रीमंत माणूस विकत घेतो. सौदी पेट्रोडॉलर ओतून.  इस्लामी वळणाचे अभ्यासक्रम विद्यापीठात सक्तीचे होतात.
 सौदी शेख प्राध्यापकांना अगदीच भरपूर पगार देतो रहायला उत्तम आणि मोठ्या जागा देतो. कॅथिलक, फ्रेंच प्राध्यापकांना सतत मद्यपान आणि स्वैर सेक्सची सवय असते. या दोन्ही गोष्टी करायची सोय विद्यापीठ करतं. चार लग्न किंवा काँट्रॅक्ट लग्न इस्लामला मंजूर असतात. सॉरबॉनमधल्या इस्लामी अभ्यासक्रमात स्त्रियांना माध्यमिक शिक्षणापलिकडं शिकायला परवानगी नसते. त्यानी नोकऱ्याही करायच्या नसतात. पतीला हवं असेल तसं आणि तेव्हां सुख देणं आणि मुलं वाढवणं हेच त्यांचं काम आहे हे त्यांना इस्लामनं पटवून दिलेलं असतं. लग्न हवी तेव्हां मोडायला आणि नवी लग्न करायला इस्लामची मुभा असते. फ्रेंच प्राध्यापकांना यापेक्षा जास्त काय हवं असतं? त्यांच्या मते हीच तर फ्रेंच संस्कृती असते. त्यामुळं प्राध्यापक विद्यापीठातली नोकरी आनंदानं घेतात. कादंबरीचा कथानायक कादंबरीच्या शेवटी इस्लाम स्वीकारतो. 
 सबमिशन ही कादंबरी आहे. तो धार्मिक किंवा राजकीय पाठ नाही.   कादंबरीतलं मुख्य पात्र आहे एक साहित्याचा प्रोफेसर. हुसमान्स नावाच्या एका कादंबरीकारावर  कथानायक प्राध्यापकानं संशोधन केलं आहे. कादंबरीत हुसमान्स आणि त्याचे समकालीन फ्रेंच कादंबरीकार, फ्रेंच तत्वज्ञ, फ्रेंच राजकीय विचारक यांच्यावर भरपूर चर्चा आहे. अकॅडमिक रीतीची.  चर्चा काही ठिकाणी इतकी लांबते की साहित्य या विषयावरच ही कादंबरी आहे असं वाटतं. पॅरिस शहरातलं खाणं पिणं, फॅशन्स, भौगोलिक खाणाखुणा यांची रेलचेल आहे. हा कादंबरी जगातले इतर वाचकही वाचतील अशी अपेक्षा लेखकानं केलेली नाही.फ्रेंच संस्कृती, साहित्य, तत्वज्ञान यांचा परिचय नसणाऱ्या माणसाला पानं उलटून पुढं सरकावं लागतं इतकी खोलातली साहित्य चर्चा.
कादंबरी म्हटली की कथानक येतं, पात्रं येतात आणि शैली येते. सबमिशन वाचवते. पण कादंबरीला खास शैली नाही. फ्रेंच संस्कृती म्हटल्यावर त्यात सेक्स ही गोष्ट जवळपास अटळ असते. सेक्स उपभोगाची वर्णनं कादंबरीत आहेत. परंतू टीएच लॉरेन्स (लोलिता) सारखी सेक्स चवीनं खायला देणारी शैली या कादंबरीला नाही.
  सबमिशनमधे कथानायक आणि त्याच्या विद्यार्थिनी यांच्यातल्या सेक्सक्रियांची तपशीलवार वर्णनं आहेत. कथानायक वेश्यांकडंही जातो. सेक्ससाठी मैत्री करणाऱ्या स्त्रियाही कादंबरीत आहेत, वर्णनं आहेत. सेक्स उपभोग अगदी तपशीलात आहेत.  ही वर्णनं उपरोधिक आणि विनोदी होतात. कादंबरीतला सेक्स केवळ सेक्ससाठी नसून तो एकूण समाजाच्या स्थितीचा पर्सपेक्टिव समजावा यासाठी कादंबरीत येतो.
एका सिनेमाची आठवण होते. जेरी मेंझिलचा क्लोजली ऑबझर्व्ड ट्रेन्स नावाचा सिनेमा आहे. त्याला उत्तम सिनेमाचं ऑस्कर मिळालं होतं. सिनेमाचं कथानक तसं गंभीर. नाझींची   दारुगोळा घेऊन जाणारी गाडी उडवायचा बंडखोरांचा कट. कट शिजत असतो, तडीला जातो. कटात सामिल असतात रेलवेचे कर्मचारी. त्यांचं जगणं सिनेमात समांतर पातळीवर दिसत असतं. सेक्सबाबत अपेशी ठरलेला एक तरूण मुलगा आहे. रेलवे स्टेशनात सेक्स चालतो तो त्यानं पाहिलेला असतो. तरूण मुलगाही प्रयत्न करतो.  त्याला सेक्सगंड असतो. आपल्याला सेक्स जमत नाही असं त्याला वाटत असतं. या बाबतीतला अनुभवी स्टेशनातला एक मध्यमवयीन कर्मचारी सेक्सचं शास्त्र त्याला सांगतो. हा वेडा मुलगा म्हाताऱ्या बाईकडंही सेक्स मागायला जातो.
 सिनेमात सेक्स दिसतो. खळखळून हसवणारा. जेरी मेंझिलच्या बहुतेक सिनेमात सेक्सची गंमत पहायला मिळते.
व्हेलबेकची सेक्स हाताळण्याची एक पद्धत, जेरी मेंझेलची आणखी एक वेगळी पद्धत. सेक्स नावाची मूलभूत नैसर्गिक मानवी प्रेरणा प्रत्येक माणसाच्या शरीरात असते,   मनात असते. ती प्रेरणा हाताळण्याची व्हेलबेक-जेरी मेंझेलची पद्धत लक्षात रहाते. 
सबमिशन या  कादंबरीत एक राजकीय स्टेटमेंटही आहे. एकूण फ्रेंच जगण्याचा राजकीय अंश त्या स्टेटमेंटमधून बाहेर येतो. फ्रेंच बुद्धीजीवी बेजबाबदार आहेत असं लेखक निवेदनात म्हणतो.  उजवे असोत की डावे  की आणखी कोणी. सभोवतालचं वास्तव (इस्लामचा प्रसार) त्यांना कळत नाही. फ्रेंच संस्कृती म्हणजे केवळ मद्य, सेक्स आणि स्वैराचार असं बुद्धीजीवींना वाटतं. पश्चिमी संस्कृतीच्या मुळात मानवी स्वातंत्र्य, समता, आधुनिकता, लोकशाही ही मूल्य आहेत हे बुद्धीजीवींना समजत नाही असं लेखक सुचवतो. विविधता (मल्टीकल्चरिझम) या कल्पनेचा खरा अर्थ फ्रेंचांना कळत नाही, ती कल्पना मतं मिळवून सत्तेत जाण्यापुरतीच अमलात आणली जाते.  त्यातून इस्लामी परंपरा-दहशतवाद वाढतोय हे बुद्धीवादी लोकांच्या लक्षात येत नाही असं लेखक तिरकसपणे, आडवळणानं, उपरोधी शैलीत सांगतो. सबमिशन म्हणजे शरण जाणं. फ्रेंच बुद्धीजीवी अयोग्य संस्कृतीला शरण जातातेत असं लेखक सुचवतो. इस्लाम या शब्दाचा अर्थही शरण जाणे असा आहे.
  व्हेलबेकच्या  प्लॅटफॉर्म या कादंबरीची आठवण येते. या कादंबरीत एक फ्रेंच माणूस आणि एक अरब मुसलमान बँकॉकच्या हॉटेलमधे असतात.त्यांच्यात चर्चा चालते. फ्रेंच माणूस अरबाला म्हणतो ‘ तुम्ही तरी काय माणसं आहात. अरे सुंदर मादक बायका आणि दारू मिळावी यासाठी तुम्ही जिहाद करता, माणसांना मारता. जिहाद केल्यावर स्वर्गात तुम्हाला त्या गोष्टी मिळायच्या असतात. कशाला यासाठी मरायचं, येवढा खर्च करायचा. पाच दहा डॉलरमधे इथं समोर वाट्टेल ती बाई मिळते आणि वाट्टेल ती दारू मिळते. अरे स्वर्ग इथंच तर आहे. पैसे खर्च करा आणि स्वर्ग उपभोगा. त्यासाठी विनाकारण माणसं मारू नका.’
साहित्य हे फिक्शन असतं, ते कल्पित असतं. सभोवतालचं वास्तव लेखक त्याच्या पद्धतीनं पहातो, पचवतो. साहित्यिकाकडं प्रतिभा नावाची एक दुर्मिळ गोष्ट असते. वास्तव समजून घेणं, ते घुसळणं, पचवणं या प्रक्रियेत प्रतिभा हा घटक प्रभावी असतो. एकच घटना सामान्य माणूसही पहातो आणि कलाकारही. पण त्या घटनेची सामान्य माणसाची प्रतिक्रिया आणि कलाकाराची प्रतिभानिर्मिती प्रतिक्रिया यात कायच्या काय फरक असतो. या प्रक्रियेचं अंतीम रूप म्हणजे कादंबरी किंवा कथा किंवा कविता किंवा नाटक किंवा सिनेमा. 
वाचकाला एकादा राजकीय विचार शिकवणं, एकादा धर्म त्याच्या गळी उतरवणं इतक्या छोट्या गोष्टीसाठी चांगला लेखक साहित्य निर्मिती करत नाही. तशा हेतूनं लिहिणारे लेखक जरूर असतात आणि तसं लिहिण्याचा त्यांचा अधिकारही असतो. परंतू असं साहित्य अभिजात ठरत नाही. साहित्य वाचकाला सभोवतालच्या जगाचं एक भान देतं, विचार करायला लावतं, वाचक तयार करतं.  वाचकानं पुढं काय करायचं ते त्या वाचकाचा स्वतंत्र प्रश्न असतो.
व्हेलबेकची कादंबरी विद्यमान फ्रेंच जीवन, फ्रेंच परंपरा, फ्रेंच संस्कृती या गोष्टींचं भान आणून देतो. व्हेलबेकला त्याची मतं आहेत. ती कादंबरीत व्यक्त होतात. हळूच. ती मतं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यानं कादंबरी लिहिलेली नाही. 
संघर्षग्रस्त फ्रेंच समाज समजायला कादंबरी  मदत करते. कादंबरी वाचकाला चक्रावून टाकते, विचार करायला लावते. 
।।।
Submission.
Michel
Houellebecq.
Groupe Flammarion publication.

3 thoughts on “‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

  1. That may happen, may not be in 2020, but 15-20 year later. The scenario may be brutal and not as benign as it has been painted. Just look at the plight of people of other religions in Muslim countries round the world. Can you name countries wherein others can –leave aside prosper– survive? Malaysia is the last fig leaf, it too is loosing this characteristic.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *