इराणींचं संस्कृत प्रेम
मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी धाडकन जाहीर करून टाकलं की केंद्रीय विद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या जर्मन या तिसऱ्या भाषेच्या बदली संस्कृत ही भाषा शिकवली जाईल. त्या इतर कोणाशी बोलल्या नाहीत, विचारवंतांना विचारलं नाही की सार्वजनिक चर्चा केली नाही.
भारत सरकारनं १९६१ साली कोठारी आयोगाच्या सुचनांचा विचार करून शाळांसाठी त्रिभाषा सूत्र तयार केलं. हिंदी राज्यांमधे हिंदी, भारतातली एकादी इतर भाषा ( तामिळ, तेलुगु, कनड, मराठी इ. ) आणि इंग्रजी शिकवली जावी अशी सूचना केली. इंग्रजीच्या बदल्यात एकादी आधुनिक जागतीक भाषाही शिकावी असं सुचवण्यात आलं. बिगर हिंदी प्रदेशात स्थानिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी शिकवावी असं ठरलं. शिक्षण हा संयुक्त सूचीतला विषय असल्यानं राज्यांना त्यांचं स्वतंत्र त्रिभाषा सूत्र निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. हा झाला देशातला एकूण शिक्षणातला भाषा विषयक विचार.
त्रिपुरा, तामिळनाडू या व इतर काही राज्यानी हिंदी शिकवायला नकार दिला. हिंदी प्रदेशांत दक्षिणी भाषा शिकवण्याची सोय केली गेली नाही. परिणामी दक्षिणेत हिंदी भाषा वाढली नाही आणि उत्तरेत दक्षिणी भाषेबाबत माणसं अनभिज्ञ राहिली.
केंद्रीय विद्यालय ही एक स्वतंत्र व्यवस्था असते. देशात सर्वत्र केंद्रीय विद्यालयं असतात आणि त्यांचा अभ्यासक्रम देशभर सारखा असतो. तो राज्य सरकारच्या हाती नसतो. केंद्रीय शाळांच्या व्यवस्थापक बोर्डानं २०१० साली निर्णय घेऊन जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी इत्यादींपैकी एक भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवायचा निर्णय घेतला. २०११ साली जर्मनीशी करार झाल्यानं जर्मन भाषा शिकवण्याची सोय झाली, केंद्रीय विद्यालयात जर्मन भाषा शिकवली जायला लागली. जगात पुढं जायचं असेल तर एकादी परदेशी भाषा येणं विद्यार्थ्यांच्या हिताचं होतं. जगात इंग्रजीबरोबर जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि चिनी भाषांना महत्व आलं आहे कारण ते देश प्रगत झाले आहेत. तिथलं ज्ञान, तंत्रज्ञान, तिथली बाजारपेठ, इत्यादी गोष्टी आपल्या विकासाला उपयोगी पडू शकणार असल्यानं त्या पैकी एकादी भाषा शिकणं योग्य होतं. इतर कोणा देशाच्या तुलनेत जर्मनीनं पटापट व्यवस्था केल्यानं जर्मन शिकवायची व्यवस्था झाली.
इराणी बाईंना जर्मन ऐवजी संस्कृत शिकवायचं आहे. संस्कृत भाषेबद्दल प्रेम असणं वाईट नाही. परंतू ती भाषा मेलेली भाषा आहे. जुनं वाड्.मय वाचणं, कालीदास वगैरेंचा आस्वाद घेणं, इतिहासाचा अभ्यास करणं या दृष्टीनं ती भाषा शिकणं आणि जतन करणं योग्य आहे. परंतू ती भाषा व्यवहाराची भाषा नाही. गेल्या दोनेक हजार वर्षांत जगात झालेले बदल त्या भाषेत पोचलेले नाहीत. जगायचं असेल तर ती भाषा उपयोगाची नाही. दांडपट्टा आणि तलवारीनं एकेकाळी आपले पूर्वज लढले. छान. त्यांचा इतिहास अभ्यासावा, त्यांचे पोवाडे प्रेमानं ऐकावेत. परंतू लष्करी दृष्ट्या जगात टिकायचं असेल तर बाँबफेकी विमानं, रॉकेटं, अणुशस्त्रं इत्यादीच हाती घ्यावी लागतात. या गोष्टी इराणींना माहित तरी नाहीत, माहित असल्या तर मान्य नाहीत.
इराणींचं हे संस्कृत प्रेम त्यांची व्यक्तीगत लहर नाही. ते त्यांच्या हिंदुत्व वर्तुळाचं प्रेम आहे. उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांना मधे मधे संस्कृतची उबळ येत असते. ही मंडळी भले पदार्थविज्ञानाची डॉक्टरेट घेवोत वा तंत्रज्ञानाच्या पदव्या घेवोत, त्यांचं मन प्राचीनात रमतं. तेही रमायला हरकत नाही. पण त्यांच्या डोक्यात प्राचीन गोष्टी पुन्हा जगायचा खुळेपणाही भरलेला आहे. परिणामी नरेंद्र मोदी हा त्यांचा सर्वात मोठा प्रवक्ता गणपती ही भारतीय बायोटेक्नॉलॉजीतली कामगिरी आहे असं म्हणतो.
गणपती हे एक मिथक आहे, ती एक दंतकथा आहे, ती एक कविकल्पना आहे हे साऱ्या जगाला समजलेलं वास्तव मोदींना समजत नाही. रामायण आणि महाभारत या अत्यंत कल्पक कथा, महाकाव्यं आहेत हे साऱ्या जगानं मान्य केलेलं सत्य मोदींना कळत नाही. गीताही महाभारतात प्रक्षिप्त आहे असं म्हणतात. महाभारत, रामायण इत्यादी महाकाव्यं, मिथकं वर्षानुवर्षं आकार घेत असतात. प्रत्येक काळातली, प्रत्येक स्थळातळी माणसं आपापलं जगणं त्या महाकाव्यात गुंफत जातात. म्हणूनच रामायणंही अनेक असतात, महाभारतंही अनेक असतात. ही महाकाव्य म्हणजे संस्कृती आणि साहित्यातला एक अमोल ठेवा आहे. परंतू तो इतिहास नाही, ते वास्तव नाही. मोठं युद्ध करायचं तर कायच्या काय शस्त्रं लागतील आणि गणपती तयार करायचे असतील तर अत्याधुनिक प्रयोगशाळा, नोबेल पारितोषिकं मिळवणारे वैज्ञानिक आणि स्टीव जॉब देशात व्हावे लागतील. तशी व्यवस्था असते म्हणूनच अमेरिका, जर्मनी, चीन किंवा जपान इत्यादी देश धडाधड पुढं जातात.
इराणी, मोदी इत्यादी माणसांची आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय संघ यांची मोठीच गोची आहे. त्यांना एक नवा भारत घडवायचा आहे पण तो भारत कधीही अस्तित्वात नसलेला भारत आहे. त्यामुळं भारत जसा कसा चालला आहे तसाही न ठेवता ही माणसं एकादेवेळेस खड्यातही घालू शकतील.