मध्यंतरी महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉमवर मी गाझा हल्ल्यावर एक पोस्ट टाकली होती. तीच पोष्ट माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरही टाकली होती. माझ्या स्वतःच्या ब्लॉगला आलेल्या प्रतिक्रिया समतोल आणि सभ्य होत्या. महाराष्ट्र टाईम्सवर आलेल्या प्रतिक्रिया अगदीच असभ्य, विषयाला सोडून, द्वेषमूलक इत्यादी होत्या. त्यातल्या काही मुस्लीमद्वेषी आणि इसरायलप्रेमी होत्या. आणखी एक. प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी काही जणांना माझ्याबद्दल काही माहिती होती, त्यातून त्यांनी काही समजुती करून घेतल्या होत्या. त्यांच्या आधारे ते मला टोले मारत होते, विषयाशी संबंध नसतांना. उदा. गाझाचा विषय असताना मी लवासाचा म्हणजे शरद पवारांचा समर्थक-अनुयायी आहे असं एकानं लिहिलं होतं. विचार करण्याची ही पद्धत  अयोग्य आहे. एक तर माणसं न वाचता, विचार न करता आततायी प्रतिक्रिया व्यक्त करतात. नव्या तंत्रज्ञानानं जाहीर बोलणं सोपं करून टाकल्यानं, जाहीर लिहिणं सोपं करून टाकल्यानं लिहितांना विचार करायचा असतो, लिहितांना काही जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात हा नियम ही माणसं पाळत नाहीत. दुसरं म्हणजे माहिती ताडून न पहाता, वाचन न करता माणसं बेधडक लिहून मोकळी होतात. वाचन, चिंतन, विचार तयार करण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही पद्धत त्यांना माहित नाही.
असो.
तर गाझा, इसरायल आणि माझा व्यक्तिगत लवासा हा विषय याबाबतची माहिती वाचकाला उपयुक्त ठरावी म्हणून खालीप्रमाणं टीप टाकतो आहे.
मी रूढार्थानं समाजमान्य असलेला धर्म मानत नाही. परमेश्वर ही गोष्ट ज्या विचारप्रणाली किंवा आचारप्रणालीच्या मध्यभागी आहे ती प्रणाली मी मानत नाही. ती मानणाऱ्यांचा मी शत्रू नाही. फक्त  कोणतीही विचार प्रणाली माना पण दुसऱ्याचा जीव घेणं, दुसऱ्याचे हक्क हिरावून घेणं कोणत्याही धर्म वा देवाच्या नावे हे मला मान्य नाही. जगण्याचा अधिकार माणसाला  कोणी देत नाही, तो त्याला जन्मानं मिळत असतो. माणसानं कसं वागावं हे माणसं ठरवू शकतात आणि ते ठरवण्यासाठी आवश्यक आणि लवचिक पैस लोकशाहीत आहे. फाशी आणि युद्ध अशा दोन गोष्टी लोकांचे जीव घेत असतात. लोकशाहीत या दोन गोष्टीवरही खूप चर्चा होते, विचार होतो, त्यात पारदर्शकता अपेक्षित असते आणि सार्वजनीक विचारांती वरील िनर्णय घेतले जातात. देवाधारित प्रणालीत ही सोय नसते कारण देवाला काय वाटतं आणि काय नाही ते कळणं कठीण असतं. काही माणसंच देवाच्या वतीनं बोलतात आणि तिथं घोटाळा संभवतो. या विषयावर जगभर खूप विचारविनिमय झालेला आहे होतो आहे. या विषयावर खूप पुस्तकं आहेत. पुरोगामी, प्रतिगामी, समाजवादी, धर्मद्वेष्टे, इत्यादी विशेषणं आणि लेबलं आता कालबाह्य झाली  आहेत, संदर्भहीन झाली  आहेत. त्यांचा वापर भावनेच्या आहारी  जाऊन किंवा माहिती ज्ञानाच्या अभावी केला जातो. ते टळलं तर बरं होईल. 
नवीन शहरं, उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानांचा अवलंब करून नवी शहरं उभारणं योग्य आहे, एका परीनं अटळ आहे असं माझं मत आहे. शहरं या विषयावरच्या माझ्या ब्लॉगमधे मी त्या बाबत माहिती देत असतो.लवासा हे शहर मला त्यासाठी आवश्यक  वाटतं, ते  भविष्याचं निदर्शक आहे. मी शरद पवार यांचा समर्थक  नाही, उथळ विचारांची सवय जडलेल्या, जनतेच्या अगतीकतेचा, अज्ञानाचा आणि असलेल्या काही दोषांचा गैरफायदा मतांसाठी घेणाऱ्या राजकीय पक्षांचा मी समर्थक नाही, मी समर्थक आहे तो भविष्यात घडू पहाणाऱ्या मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या कल्पनांचा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *