शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद
महाराष्ट्र भूषण प्रकरणाचे कंगोरे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिव चरित्र लिहिलं. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या शैलीत शिवचरित्र सांगितलं. शिवचरित्राचं नाटक किंवा इवेंट या रुपात ‘जाणता राजा’ सादर केला. शिवाजी मांडताना त्यांनी इतिहासाचा आधार घेतला. त्यासाठी अकॅडमिक इतिहास, बखरी, आठवणी, पोवाडे, स्तोत्र, काव्यं इत्यादी साधनं अभ्यासली.
बाबासाहेब पुरंदरे शिवाजीच्या प्रेमात होते. शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर मांडायचा ध्यास त्याना होता. शिवाजीचा येवढा प्रभाव त्यांच्यावर होता की दैनंदिन जगण्यातही ते मुजरा करत, रोजमर्रा घटनांमधेही शिवाजीचे दाखले देत.
कोणाही व्यक्तीबद्दल सामान्यतः पन्नास ओळींपुरतीच माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचते. अमूक माणूस महान होता, त्यानं अमूक अमूक अमूक केलं इत्यादी. बस. त्या व्यक्तीच्या कार्याचे तपशील फार थोड्या लोकांना माहित असतात. तपशिलात जाण्यासाठी सामान्य माणसाकडं वेळही नसतो. पुरंदरेंच्या शिवचरित्रामुळं राजे शिवाजींबद्दलचे बरेच तपशील लोकांपर्यंत पोचले.
शिवाजीबद्दल पुरंदरेंची एक समज, एक प्रतिमा पक्की झाली होती. ती समज भक्तीच्या रूपात होती. शिवाजीचं मोठेपण शोधणं आणि मांडणं हा त्यांचा शिवाजी इतिहासाचा अभ्यास करण्याचा हेतू होता. भक्तीला बळ देणारे इतिहासातले पुरावे त्यांनी वापरले.
पुरंदरे यांचं चरित्र हा पोवाडा होता, अभ्यासपूर्वक केलेली स्तुती होती.
इतिहास लिहित असताना, संकलित करतांना साधनांचा वापर केला जातो. घटना, विचार, व्यक्ती इत्यादींबद्दलची माहिती मांडताना पटतील असे पुरावे गोळा केले जातात. परस्परांना छेद देणारे पुरावे हाताशी येतात तेव्हां तेही मांडले जातात. विविध पुराव्यांच्या आधारे काही तरी निष्कर्ष काढला जातो. कागदपत्रं, पत्रं, आदेश, संभाषणांच्या नोंदी, करार, प्रत्यक्षदर्शीनी नोंदलेली निरीक्षणं, फोटो, ठसे, वापरलेल्या वस्तू इत्यादी साधनं तपासली जातात. आधुनिक विज्ञानानं उपलब्ध करून दिलेली साधनं वापरून पुराव्यांचा काळ निश्चित केला जातो.
काळाच्या ओघात नवनवी साधनं उपलब्ध होतात, तपासणीची नवी तंत्रज्ञानं उपलब्ध होतात. ज्ञानेश्वरांनी खरोखरच समाधी घेतली होती की नाही हे तपासण्याचं एकमेव साधन एकेकाळी खणणं येवढंच होतं. समाधी खणणं मराठी माणसाच्या भावनांत बसत नव्हतं. समाज परवानगी देईना. न खणता विविध सेन्सिंगची उपकरणं वापरून समाधीच्या आत काय आहे ते आता तपासता येतं. मराठी समाजाच्या ज्ञानेश्वरावरच्या श्रद्धा कोणालाही समाधी तपासू देत नाहीत.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असणं हा इतिहासाचा भाग. श्रद्धेला इतिहास मान्य असेलच याची खात्री नसते.
बाबासाहेबांनी शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर रंजक स्वरूपात, आकर्षक स्वरूपात ठेवलं. कथन करतांना त्यांनी साहित्याची शैली वापरली.
साहित्यामधे पात्रं, घटना काल्पनिक असतात, त्याना खऱ्या व्यक्ती व घटनांचा आधार असो वा नसो. पुरंदरे यांनी पात्रं खरी वापरली आणि संवाद-घटना काल्पनिक तयार केल्या. हना आपटे यांनी गड आला पण सिंह गेला ही कृती तयार केली. त्याची रचनाही पुरंदरे यांच्या शिवचरित्रासारखीच होती. शैली साहित्याची, नावं खऱ्या व्यक्तींची.
साहित्यात स्पेसेस असतात. संदिग्ध जागा तयार होतात. अशा जागा हेच साहित्य कृतीचं, कवितेचं, कादंबरीचं, सिनेमाचं मर्म असतं. स्पेस जितकी मोठी तितका रसीक त्या स्पेसेसमधे स्वतःला कल्पितो, स्वतःचा काळ आणि परिसर कल्पितो. वाचक कोणत्याही काळात ती स्पेस स्वतःच्या कल्पनाशक्तीनं भरून काढतो. स्पेस जेवढी मोठी व समावेशक तेवढा लेखक मोठा, साहित्य कृती मोठी. ते साहित्य टिकतं. महाभारत ही अनेक शतकांतून अनेक लोकांनी रचलेली साहित्यकृती. जगातला कोणीही माणूस कोणत्याही काळात महाभारत वाचत असताना आपला काळ आणि आपली समकालीन माणसं त्या कृतीत पहातो.
बाबासाहेबांच्या शिवचरित्र रचनेत काही स्पेसेस तयार झाल्या. त्या स्पेसेसचा वापर राजकारणातल्या माणसांनी केला.
शिवाजी हिंदू राजा होता, मुसलमानांचा नायनाट करणारा राजा होता असा अर्थ काहींनी काढला. शिवाजीचं मोठेपण त्याच्याभोवती असलेल्या ब्राह्णणांमुळं आलं असं काही लोकांनी मानलं. ब्राह्मणांचा शिवाजीच्या मोठेपणाशी काहीएक संबंध नाही, ब्राह्णणांनी कपटीपणा केला, शिवाजीला त्रास दिला असं काहींचं म्हणणं पडलं. काहींना शिवाजी हा मराठ्यांचा राजा होता असं वाटलं. काहींना तर मार्क्स निर्माण व्हायच्या कित्येक शतकं आधी शिवाजी पुरोगामी, सेक्युलर, आधुनिक वाटला.
शिवकथनातल्या स्पेसेस राजकारणातल्या लोकांना स्वतःच्या राजकीय हितासाठी वापरावीशी वाटली. बहुतेक राजकारणी लोकांना (आपलं कर्तृत्व सिद्ध न करता आल्यानं) शिवाजीचा उपयोग करून घ्यावा असं वाटलं.
दोष शिवाजीचा नाही, दोष बाबासाहेब पुरंदरेंचा नाही.
।।
अमळ शांतपणानं विषय समजून घेता येतात. बाजारात सहज मिळणारी चांगली पुस्तकं, नेटवर मिळणारी पुस्तकं आणि लेख, जगात विचार करून लिहिणारे किती तरी अभ्यासू लोक नागरिकांना समतोल विचार करायला मदत करतात.
शिवाजींची उत्तम चरित्रं बाजारात उपलब्ध आहेत. इंग्रजीत, मराठीत. शिवाजीच्या समकालीन इतिहासावर यू ट्यूबवर असंख्य फिल्म्स पहायला मिळतात. खूप मज्जा आहे. खूप आनंद आहे.
।।
सरकारनं पुरस्कार देणं ही परंपरा जुनी आहे. अभ्यासात व्यग्र असणाऱ्या माणसांना राजाश्रय दिला जात असे, कारण त्यांना अर्थार्जन जमत नसे. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत असं म्हणायची प्रथा होती. समाजातर्फे मान्यता देणं हाही उद्देश असे. मान्यता मिळाली, मान मिळाला, गुणांची कदर झाली की कुणालाही बरं वाटतं. कोंदट वातावरणात ग्रंथ वाचत बसणारा अभ्यासक जगाच्या दृष्टीस पडण्याची शक्यता नसते. पुरस्कार मिळाल्यावर अभ्यासकाचं काम – महत्व लोकांसमोर येतं, अभ्यासकाच्या अंगावर मूठभर मांस चढतं, अभ्यासाचं महत्व समाजाला पटतं.
ब्रिटीश लोक व्यापारी वृत्तीचे. ते लांबलचक पदव्या देत, छातीवर लावायला बिल्ले देत आणि भिंतीवर टांगायला सर्टिफिकिटं देत. पैशाचं नाव काढत नसत. भारतानं पद्म पुरस्कार देऊन ती परंपरा सुरु ठेवली.
नंतर कधी तरी पुरस्काराबरोबर रक्कम द्यायला सुरवात झाली. सुरवातीला रक्कम अगदीच किरकोळ असे. जाण्यायेण्याचं भाडं, शाल-श्रीफळ, पत्नीसह हॉटेलमधे वास्तव्य आणि चार पाच हजार रुपये. पुरस्कार देण्यातून आपली छबी लोकांसमोर आणता येते हे सरकारला उमगलं. जेवढी पुरस्कारांची संख्या जास्त तेवढी सरकारची टामटूम जास्त.
सरकार आपल्या मुख्य कामात फेल जाऊ लागल्यावर पुरस्कारांची संख्या वाढू लागली. दुष्काळ वाढले, महागाई वाढली, रोजगार निर्मिती मंदावली, शेतकरी आत्महत्या करू लागले तसे पुरस्कार फोफावले. खेळाडूला पुरस्कार. संघाला पुरस्कार. कोचला पुरस्कार. असं प्रत्येक खेळाबाबतीत. राज्य पातळीवर, देशाच्या पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्यावर विशेष पुरस्कार. पोलिसांना पुरस्कार. लेखकाना, साहित्यिकांना, चित्रकारांना, संगितकारांना पुरस्कार. संख्याही मोजता येणार नाही इतके पुरस्कार.
समारंभ, पुढाऱ्यांचं मिरवणं, चार दोन दिवस वर्तमानपत्रं-माध्यमांतून गवगवा. पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या मुलाखती, सत्कार, त्यांच्या कर्तृत्वाचा गवगवा.
पाच सात हजारांवर माणसं सुखी होईनात. पन्नास हजार, लाख, पाच लाख अशी रक्कम वाढू लागली. नाही तरी पैसा जनतेचाच असतो. पुढाऱ्याच्या खिशातला छदामही खर्च होत नाही.
पुरस्कार घेणाऱ्याचा धर्म, भाषा, राज्य, तो गरीब असणं, तो अनाथ असणं, त्याची जात इत्यादी नाना कसोट्यांवर पुरस्कारांची वाटणी. आपोआप त्या त्या वर्गातली पाचपन्नास हजार माणसं मिंधी होतात. आपल्याला किंवा आपल्या कोणाला तरी पुरस्कार मिळावा यासाठी पुढाऱ्यांच्या दारात खेटे घालणारी आणखी पाच दहा हजार माणसं. आशाळभूत, मिंधी, मतांच्या हिशोबात कधी तरी उपयोगी पडणारी अशी आणखी काही हजार माणसं तयार होतात.
पुरस्काराचे निकष पातळ होतात, कधी कधी गायब होतात. लायकी हा मुद्दा दूर रहातो. वशिला, राजकीय फायदे, सत्तेची जवळीक, दबाव इत्यादी घटक वरचढ होऊ लागतात. लाखभराचं बक्षीस मिळवण्यासाठी वीस लाख रुपयेही पुरस्कारइच्छुक खर्च करतात.
पुरस्काराच्या निमित्तानं माणसं अलिकडं पलिकडं बोल बोल बोलतात. पुरस्कार देणारे, घेणारे. वाट्टेल त्या विषयावर बोलतात. बक्षीस असतं कादंबरीचं. बोलतात मात्र त्यांना माहित नसलेल्या समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयावर. बक्षीस मिळालेलं असतं माहिती तंत्रज्ञानासाठी. बोलतात मात्र ज्ञानेश्वर, अद्यात्म इत्यादी गोष्टींवर.
।।
साहित्य,इतिहास, कला इत्यादि प्रांतात सरकारनं न जाणं बरं.
सरकार तयार करणाऱ्या राजकारणी माणसांचा अगदीच अपवाद सोडले तर साहित्य-कला-संस्कृती यांच्यात अगदीच दूरवरचा संबंध असतो. ते ज्या समाजात रहातात त्या समाजात पुस्तकं वगैरे छापली जातात, संगित आणि चित्रकला वगैरे घडत असते येवढाच त्यांचा संबंध. राजकारण हा व्यवहार सिद्ध करतांना पुढाऱ्यांना वाचन, विचार, चिंतन करायला वेळ नसतो. अलिकडच्या काळात तर स्वतःसाठी आणि पक्षासाठी पैसे गोळा करणं आणि जाती गोळा करणं हे जटिल काम करण्यातच सारा वेळ जातो.
अशा माणसांनी पुरस्काराचे निर्णय घेणं, पुरस्कार घेणाऱ्याच्या अंगावर शाल पांधरणं इत्यादी उद्योग न केलं तर बरं.
काही वेळा ज्याच्या अंगावर शाल पांधरली जाते ती व्यक्ती पुरस्काराला लायक असते.
काही वेळा ते वस्त्रं म्हणजे शाल नसते, झूल असते, यशस्वी बैलाला पांघरलेली.
।।
या प्रांताना लागणारं इन्फ्रा स्ट्रक्चर सरकारनं पुरवावं, अनुदानं द्यावीत. त्यांचे निकष राजकीय वगैरे असू नयेत. त्या त्या व्यवहारातल्या माणसांकडूनच व्यवहार व्हावेत, संस्था चालवल्या जाव्यात.
।।
राजकारणी लोकांनी वादग्रस्त ठरवली असली तरी बाबासाहेब पुरंदरे ही व्यक्ती पुरस्काराला लायक आहे.
पुरस्कार देणारे आणि त्यावर वादंग घडवून आणणारे लोक बंडल आहेत.
।।
2 thoughts on “शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद”
Correct comment……. but Why You Are so late ?
निळूजी, हा लेख उशीरा वाचण्यात आला, याची खंत वाटते. ते असो, म्हणजे नसो.
हा लेख फारच भावला. उत्तम शब्दबंध !