राजकारणासाठी धर्माचा वापर
भारतीयांनी हॅपी बर्थ डे असं म्हणून मेणबत्त्या फुंकणं बंद करावं आणि त्या ऐवजी दिवा, पणती, निरांजन, समई वगैरे लावावी असं दिनानाथ बात्रा यांचं म्हणणं आहे. या किंवा कोणत्याही समारंभात स्वदेशी कपडे ( म्हणजे?) घालून होम हवन करावं, गायत्री मंत्र म्हणावेत असं ते सुचवतात, तसं सांगणारी पुस्तकं लिहितात.
सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणाले की मी जर हुकूमशहा झालो तर गीता आणि महाभारत भारतात अनिवार्य करीन.
गायत्री मंत्र, होम हवन या धार्मिक गोष्टी आहेत. दिवा पणती लावणं ही सांस्कृतीक गोष्ट आहे. गीता आणि महाभारत या गोष्टी धार्मिक की सांस्कृतीक यावर वाद होऊ शकतात. कारण भारतात देवाला मानवी रूप देऊन त्यावर कथा आणि साहित्य रचलं जातं. कृष्ण हा देव होता की एका साहित्य कृतीतलं एक पात्रं होतं याचा निर्णय घेणं त्यात कठीण होऊन बसतं.
एकादी गोष्ट सांस्कृतीक असो की धार्मिक, ती लोकानी पाळावी असं म्हणणं, त्याचा आग्रह धरणं यात काहीही आक्षेपार्ह असायचं कारण नाही. धर्म किंवा संस्कृती या गोष्टी एका माणसाकडून दुसऱ्याकडं, एका लोकसमूहाकडून दुसऱ्या समूहाकडं जात असतात. धर्म किंवा संस्कृती आपल्या उपयोगाची आहे, त्यातून आपल्या समाजाचा विकास होतो असा अनुभव आला की त्या गोष्टी समूह स्वीकारतात.परोपकार, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्यासाठी त्याग करणं इत्यादी गोष्टी करण्यातून शेवटी आपल्या समाजाचा-मानव समाजाचा फायदा होतो हे कळल्यावर माणसांनी ही मूल्यं आत्मसात केली. याच रीतीनं समाज विकसित होत असतात.
गीता आणि महाभारताच्या लक्षावधी प्रती देशात खपत असतात. अनेक संस्था आणि संप्रदाय गीता पठण घडवून आणतात दर वर्षी गीतेवर व्याख्यानं आणि प्रवचन घडवून आणतात. करोडो लोक गीतेच्या कार्यक्रमात सामील होत असतात. गीता आणि महाभारत यातल्या साहित्य मूल्यावरही देशभर आणि जगभर नेहमी बोललं जातं, दोन्ही पुस्तकं वाखाणली जातात. या साठी ना कोणी अनुदान देतं, ना कोणी कायदा करतं.
मोकळ्या विचारांची परंपरा भारतात असल्यानं निरीश्वरवादी, अज्ञेयवादी, अकॅडमिक अशा बाजूची माणसं गीता आणि महाभारताचं विश्लेषण करत असतात. धर्मचिकित्सा ही गोष्ट भारतात प्रतिष्ठित आणि आवश्यक मानली गेलेली असल्यानं गीता, महाभारताची परखड समीक्षा भारतात होत असते.कोणीही गीता जाळा, महाभारत जाळा असं म्हणत नाही. मनुस्मृती जरूर जाळली गेली. त्यापाठी भारतातल्या वंचितांची व्यथा होती.मनुस्मृती जाळणंही भारतानं स्वीकारलं आहे.
गायत्री, होम हवन इत्यादी गोष्टी. आज असंख्य माणसं पुरोहितांकडं आपणहून जातात आणि होमहवन करवून घेतात. असंख्य म्हणजे असंख्य माणसं आज गायत्री मंत्राची अखंड वाजणारी, लूपमधे सतत वाजत रहाणारी टेप घरात, दुकानांत चालू ठेवतात. लोकं हे सारं आपणहून करतात. पुरोहितांकडं जा असं सांगावं लागत नाही. अमूक दुकानात गायत्री टेप मिळते ते सांगावं लागत नाही, जाहिरात करावी लागत नाही.
गायत्री, होमहवन, गीता, महाभारत या गोष्टींबद्दल बात्रा आणि न्यायमूर्ती यांनी आस्था बाळगणं, त्या गोष्टी इतरानी कराव्यात असं म्हणणं यात काहीच वावगं नाही. समाजाचा मूल्यविकास अशाच रीतीनं होत रहातो. जबरदस्ती झाली की लोच्या होतो. बात्रा यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व्याख्यानं देणं, पुस्तकं प्रकाशित करणं इत्यादी गोष्टी योग्य आहेत. परंतू गुजरात सरकारच्या पैशातून, म्हणजे सार्वजनिक पैशातून या गोष्टी करणं योग्य नाही. त्यांच्या विचाराचं पाठ्यपुस्तक करून ते आडवाटेन गुजराती मुलांवर टाकणं योग्य नाही. तेच न्याय मूर्तींचंही. न्याय मूर्तींना व्यक्तिगत विचारांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. हुकूमशहा होऊन या गोष्टी कराव्याशा वाटणं यात घोळ आहे. मुळात गीता आणि महाभारत या गोष्टी भारतानं कित्येक शतकं स्वीकारल्या असूनही न्यायमूर्तींना त्या लादाव्याशा वाटणं यातच गडबड आहे. भारताचा इतिहास, संस्कृती यांबद्दलच्या त्यांच्या कल्पना काय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांतून, वर्तनातून सिद्ध होतं.
राजानं किंवा सरकारनं संस्कृती आणि धर्माच्या भानगडीत पडू नये. ते राजाचं आणि सरकारचं काम नाही. तो उद्योग समाज स्वतंत्रपणे करत असतो. भारतात तीनेक हजार वर्षांच्या काळात एकाच वेळी पाच पन्नास धर्म, उपासनापद्धती, संप्रदाय, पंथ इत्यादी प्रचलित होते. धर्म, संप्रदाय इत्यादींमधे वेगळेपण होतं, मतभेद होते म्हणूनच त्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं. इतर पंथ संपवणं, त्यांना खतम करणं हे भारतीय वर्तणुकीचा मुख्य धागा नव्हता. होता होईतो एकत्र नांदायचं, एकमेकांकडून गोष्टी घ्यायच्या तरीही स्वतंत्र अस्तित्व, कार्यपद्धती आणि विचार करायचा, टिकवायचा अशी भारतातली परंपरा आहे. आपल्याला मान्य नसलेल्या गोष्टींविरुद्ध ‘ जिहाद ‘ ही भारताची परंपरा नाही. जिहाद नावाचा प्रकारही भारतात इस्लामबरोबर आला. पण भारतीय परंपरानी जिहाद पचवला, जिहादचा विचार करणाऱ्या इस्लामी नागरिकांना भारतीय परंपरानी भारतीय केलं. तरीही काही जिहादी उरलेच. ते पाकिस्तानात गेले आणि बहुसंख्य मुसलमान भारतात भारतीय परंपरेत वाढत शिल्लक राहिले.
तीनेक हजार वर्षांच्या काळात भारतात किती तरी राजे आणि सम्राट होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांनी सर्व पंथ,संप्रदाय, उपासक यांना मदत केली आणि अनुदानं दिली. मुसलमान राजांनी देवळ बांधली, वीरशैवांनी जैन मठांना मदत केली, हिंदू राजानी मशिदी बांधल्या. काही राजांनी आपलं बळ वापरून काही पंथ-संप्रदाय-उपासकांचा छळही केला. परंतू गोळा बेरीज माणसं एकत्र रहाणं अशीच झाली.
राज्य हा प्रकार सेक्युलर असतो. राज्यात असणाऱ्या प्रजेचं भलं पहाणं हे सरकारचं, राज्याचं मुख्य काम असतं. धर्म आणि संस्कृती या गोष्टी स्वतंत्र असतात, त्या स्वतंत्रपणे चालत असतात, चालायला हव्यात. विसाव्या-एकविसाव्या शतकापासून सेक्युलर या संज्ञेचे अनेक अर्थ काढले जातात. परंतू १७ व्या शतकापर्यंत राजानी आपल्या प्रजेचं भलं करावं हे राज्याचं काम असतं असं सूत्र होतं आणि मुद्दाम ठासून न मांडता राज्यांनी धर्म-संस्कृती हे विषय अमळ बाजूला ठेवले होते.देव, धर्म, उपासना, संप्रदाय, पंथ, गुरु, संत इत्यादींची संख्या खूपच मोठी असल्यानं कुठल्याही एकाच धर्म वा संप्रदायाची जबरदस्ती करणं व्यवहार्य नाही हे लोकांना कळत होतं.
एकोणिसाव्या शतकात घोळ सुरु झाला. पश्चिमेतून लोकशाही आणि आधुनिकता या गोष्टी आल्या. लोकशाही या कल्पनेचा निवडणुक हा व्यवहार भारतात आला. निवडणुक म्हटली की मतं आली. जास्तीत जास्त मतं मिळाली की राज्य करता येतं असं ठरलं. काही काळासाठी सत्ता मिळाली की तेवढा काळ काहीही करायला मोकळीक असते ही लोकशाही सरकारातली एक फट लोकांच्या लक्षात आली. निवडणुकीत शंभरापैकी पन्नासच लोक भाग घेतात आणि मतदान केल्यातल्या तीस लोकांची मतं मिळाल्यावर सत्ता हाती येते. म्हणजे तीस चाळीस लोकांनी व्यक्त केलेली मतं साठ सत्तर लोकांवर लादली जातात. बरं गंमत अशी की मतदारांची हज्जार गोष्टीवर हज्जार मतं असतात. त्यात नेमकेपणा नसतो. उमेदवार आणि पक्षही दुनियेतल्या सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यात घालत असतात. त्यामुळं वाट्टेल ते निर्णय घ्यायला सत्ताधारी पक्ष मोकळा असतो.
प्रस्थापित लोकशाही पद्धतीतला हा एक मोठ्ठा दोष आहे. तो कसा दूर करावा ते कळत नाहीये. त्या दोषाचे दुष्परिणाम मात्र आता भोगावे लागत आहेत. बात्रा, न्यायमुर्ती इत्यादी लोक सामान्यतः राजकीय हिंदुत्ववादी आहेत. हिंदू आणि राजकीय हिंदू यात फरक आहे. दैनंदिन रामरगाड्यात इतर सर्वांबरोबर जगणारा तो हिंदू. धर्माचा वापर करून राजकीय सत्ता काबीज करणारा तो राजकीय हिंदू. रस्त्यावरचा हिंदू मोदीना मत देतो आर्थिक विकास आणि चांगलं जगणं मिळावं यासाठी. आधीच्या सरकारांनी चांगलं जगणं दिलं नाही असं त्याचं मत असतं. मोदींच्या पक्षाचे लोक हे मत आपल्या राजकीय हिंदुत्वाला आहे असं मानतात. मुसलमान द्वेष, आपण बाळगलेल्या धार्मिक-सांस्कृतीक कल्पनांपेक्षा वेगळ्या कल्पना कमी प्रतीच्या मानणं, अत्यंत वैविध्य हे भारताचं वैशिष्ट्यं संपवून त्या ठिकाणी इस्लाम-ख्रिस्ती परंपरेसारखा एक निरुंद धर्म स्थापित करणं हा उद्योग ही राजकीय हिंदू मंडळी करू पहातात.
बात्रा या राजकीय हिंदू रहाटीतले आहेत हे वावगं आहे.
बात्रांनी त्यांची मतं मांडली पाहिजेत. पुस्तकं प्रसिद्ध केली पाहिजेत. त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. त्याच बरोबर त्यांच्या पेक्षा वेगळे विचार, संस्कृती, धर्म इत्यादी गोष्टीही समाजात व्हायला हव्यात. त्यासाठी इतर विचारांची पुस्तकं, नियतकालिकं, संस्था, प्रदर्शनं, साहित्य याही गोष्टी असायला हव्यात. ती तर या देशाची परंपरा आहे.इतर पुस्तकं जाळणं, इतर पुस्तकांचा लगदा करणं, इतरांनी भरवलेली प्रदर्शनं उध्वस्थ करणं, इतरांना देशद्रोही ठरवणं, इतरांना धर्मद्रोही ठरवणं, त्याच आधारावर सत्ता काबीज करणं,सत्तेचा वापर लोकांवर विचार लादण्यासाठी करणं हे योग्य नाही. काही मुघल राजांनी बात्रांसारखाच उद्योग करून पाहिला पण त्यातून ‘हिंदू’ परंपरा खंडीत झाल्या नाहीत, हिंदू समाजाचं अनेकांगी जगणं खंडित झालं नाही.
सारा घोळ राजकारणातून होतोय. राजकारणातल्या लोकांना कळायला हवं की त्यांचं खरं काम लोकांना चांगलं ऐहिक जगणं देण हे आहे. दुर्दैव असं की भ्रष्टाचार, घराणेशाही, सत्तेची अनिर्बंध लालसा यामुळं राजकीय पक्ष त्यांचं कर्तव्य, ‘ राजधर्म ‘ पार पाडू शकत नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी भावनात्मक आवाहनं करून, चिथवून, धार्मिक भावनांचा वापर करून सत्ता काबीज करतात.
महंमद अली जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली ती इस्लाम संकटात आहे या घोषणेनं. पाकिस्तान झाला तर त्यातल्या माणसांचं जगणं कसं असेल, अर्थव्यवस्था कशी असेल, तिथली न्यायव्यवस्था कशी असेल याचा वाळूच्या कणायेवढाही विचार जिनांनी केला नव्हता. पाकिस्तानचं काय होतंय ते आपण पहातोय.
पहा बुवा.
।।