वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

राम अडवाणी बुक सेलर  (लखनौ, १९५२) या दुकानाचं आता काय होईल? दुकानाचे मालक राम अडवाणी वयाच्या ९५ व्या वर्षी परवा वारले. त्यांचा मुलगा रानीखेतमधे असतो, नात लंडनमधे असते. ते राम अडवाणी पुस्तक दुकान पुढं चालवणार? समजा त्यांच्या मुलानं आणि नातीनं ते चालवायचं ठरवलं किंवा कोणी ते विकत घेतलं तरी ते  ‘ राम अडवाणींचं पुस्तकांचं दुकान ‘  रहाणार?
 राम अडवाणी यांचं पुस्तकांचं दुकान ही लखनौच्या संस्कृतीची एक लक्षणीय ओळख आहे. 
राम अडवाणी मुळातले पाकिस्तानातले. फाळणीनंतर भारतात आले.  पाकिस्तानात त्यांचं पुस्तकाचं दुकान होतं. ते टाकून त्यांना भारतात यावं लागलं. लखनौमधे अनेक जागा बदलत १९५३ मधे त्यांनी मेफेअरमधे हे दुकान सुरु केलं. 
राम अडवाणींच्या दुकानात त्यांना आवडणारी पुस्तकं असत. राम अडवाणीना फिक्शन, साहित्यात फारसा रस नव्हता. फार तर रहस्यकथा.  त्यांना राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, शहरांचा इतिहास इत्यादी विषयात रस होता. रस होता म्हणजे ते या विषयावरची ताजी ताजी पुस्तकं जगभरातून मागवत आणि स्वतः वाचत. रस्किन बाँड, विल्यम डॅलरिंपल, रामचंद्र गुहा यांच्यासारख्या वाचणाऱ्या लोकांच्या कानावर पडलं अडवाणीचं वाचन, पुस्तकं गोळा करणं. ही अलीकडल्या काळातली माणसं. त्याही पूर्वी जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी अशी वाचणारी माणसं अडवाणीना ओळखत होती, पुस्तकं घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अडवाणींकडं जात होती.
 वेचक वाचणारी माणसं फोनवरून अडवाणींच्या संपर्कात असत. नवी पुस्तकं, नवे विचार यांची चौकशी करत. ही माणसं काय बोलतात यावरून अडवाणीही अंदाज बांधत आणि नवे लेखक आणि पुस्तकं हुडकत. वाचक मग चौकशी करून पुस्तकं घ्यायला अडवाणींच्या दुकानात पोचत. ही माणसं लखनौमधे रहाणारी नसत. भारतात कुठल्या तरी दूरवरच्या ठिकाणी रहाणारी असत. पुस्तकं घेण्यासाठी मुद्दाम लखनौला जात. 
जेवण्यासाठी काही काळ अडवाणी घरी जात, बाकीचा वेळ त्यांचा मुक्काम दुकानात असे. सतत चर्चा. या चर्चा ऐकायला होतकरू लेखक जात असत. दुकानातल्या चर्चा दुकान बंद झाल्यानंतर अडवाणींच्या घरी सुरु होत. दुकानात कॉफी असे. घरी स्कॉच.
पुस्तकांची दुकानं मुख्यतः दोन प्रकारची. 
एका प्रकारात खपणारी पुस्तकं ठेवली जातात. लोकप्रिय पुस्तकं. गाजणाऱ्या कथाकादंबऱ्या, कॉफी टेबल पुस्तकं, रेसिपी पुस्तकं, प्राणी कसे पाळावेत ते सांगणारी पुस्तकं, फोटोग्राफी शिकवणारी पुस्तकं इत्यादी. पाठ्यपुस्तकांसारखीही पुस्तकं. कथा कादंबऱ्यातही न खपणारे पण चांगले लेखक अशा दुकानात नसतात. पुस्तकांचं देखणेपण आणि गाजलेपण हा मुख्य भाग.यात काही वावगं असतं असं मानायचं कारण नाही. त्याही लोकांच्या गरजा असतात. शेवटी पुस्तक कसंही असलं तरी पुस्तकच असतं.
दुसऱ्या प्रकारचं दुकान म्हणजे चोखंदळ वाचकानं उभं केलेलं दुकान. राम अडवाणी यांनी केलेलं दुकान त्या प्रकारचं. अशा पुस्तकांच्या दुकानांना स्वतंत्र पुस्तकांचं दुकान म्हणतात. इंडिपेंडंट बुक शॉप्स. बाजारात खपणारी पुस्तकं या दुकानात येत नाहीत. वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती झालेली पुस्तकं या दुकानात येतील याची खात्री नाही. माध्यमात गाजवले जाणारे लेखक या दुकानात असण्याची शक्यता कमी.  
   जगभरात अशी स्वतंत्र दुकानं असतात. कमी असतात, पण असतात. लंडनमधे, पॅरिसमधे, शिकागोत, न्यू यॉर्कमधे, मॅडिसनमधे अशी खूप दुकानं आहेत. बंगळुरू आणि चेन्नईमधेही आहेत. या प्रकारच्या काही दुकानात पुस्तकांची गिचमिड असते. बरेच वेळा पुस्तकं नीट लावलेली नसतात, जागा मिळेल तशी रचून ठेवलेली असतात. विषय, लेखक यांची संगती असेलच याची खात्री नाही. कोणतं पुस्तक कुठं आहे मिळेल ते मालकालाच माहित असतं. तिऱ्हाइताला पुस्तक शोधणं जड जातं.  
शानभाग यांचं फ्लोरा फाऊंटन जवळचं स्ट्रँड बुक स्टॉल हे एके काळी एक स्वतंत्र पुस्तक दुकान होतं. शानभाग निवडक पुस्तकं आणत. वाचकांना पुस्तकांबद्दल सांगत. त्यांच्या दुकानातले विक्रेतेही वाचक होते, ते वाचकांची चौकशी करत, त्यांना नव्या पुस्तकांबद्दल सांगत. मुंबईतले अनेक लेखक, पत्रकार, शिक्षक, संशोधक स्ट्रँडमधे जात असत.  
  लंडनमधे  ब्रिक्सटन स्टेशनला लागून एक बाजार आहे. त्या  उघड्या बाजारात भाज्या, फळं, स्वस्त कपडे इत्यादी वस्तू विकल्या जातात. त्याच गर्दीत एका बाजूला एक छोटं दुकान विसावलेलं अाहे. या दुकानात नीट मांडलेली कपाटं नाहीत. खोक्या खोक्यात   पुस्तकं भरलेली दिसतात. विस्कटलेली दाढी खाजवत वाचत बसलेला, मळकट जीन्स घातलेला हा माणूस त्या दुकानाचा मालक-चालक असतो. दिवसाच्या कोणत्याही वेळी तिथं खांद्याला पिशव्या लटकालेली माणसं येतात. चर्चा झडतात. काही चर्चा तावातावाच्या. चर्चांमधे लेखकांची मापं काढली जातात, काही लेखकांचं कौतुक होतं. आलेल्या माणसाच्या पिशवीतून पुस्तकं निघतात. त्यावर चर्चा, त्यातली काही पुस्तकं खोक्यात विसावतात. खोक्यातली काही पुस्तकं आलेल्या माणसाच्या पिशवीत. 
याच ब्लॉगमधे उल्लेख केलेल्या वेवर्ड अँड वाईजमधली परवाची गोष्ट. विराट चांडोक कुरियरनं आणलेली पुस्तकांची चळत घेऊन बसले होते. दोन अख्ख्या चळती सुझान सोंटॅगच्या पुस्तकांच्या होत्या. 
सोँटॅग ही साठ आणि सत्तरच्या दशकातली अमेरिकन लेखिका. लेखिका, चित्रपट निर्माती, संशोघक, शिक्षक, कार्यकर्ती. फोटोग्राफी हा तिचा खास  विषय. फोटोच्या खिडकीतून ती जग पहात असे. जाम बंडखोर बाई. अन्याय दिसे तिथं ती तुटून पडे. अमेरिकन समाजावर तिनं सतत आसूड चालवला. अमेरिकन जनता तिच्यावर खवळून असे.
तर अशी ही सोंटॅग मुंबईत एकदम इतकी कशी खपू लागली? पेंग्विनकडं तिच्या पुस्तकांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. विराटनं अमेरिकेतून मागवल्या. 
साठच्या आणि सत्तरीच्या दशकातले लेखक माहित असणारी म्हणजे बुढ्ढ्यांची पिढी. सोंटॅगची पुस्तकं घेणारी माणसं तरुण, तरुणी होत्या. त्यांना अचानक हे काय वेड लागलं? बंडखोरी हा तारुण्याचा एक मुख्य गुण असतो. शे गेवारा या माणसानं कायम बंडखोरांना वेड लावलंय.  शे गेवारा हा राजकीय कार्यकर्ता होता. सुझान कार्यकर्ती  होती आणि लेखक, निर्मितीक्षम कलाकारही होती. अशी एक जुनी लेखिका तरूणांना आवडते याचा अर्थ काय घ्यायचा? 
वेवर्ड अँड वाईजमधे येणारे वाचक आणि त्यांचा विराटबरोबर होणारा संवाद यामधे सोंटॅग खपण्याचं कारण दडलेलं आहे. 
एक उदाहरण. बाजी कुलकर्णी म्हणून ऐंशी ओलांडून चार वर्ष झालेला माणूस जमेल तेव्हां विराटला भेटायला येतो. येताना बाजींकडं एक स्पायरल वही असते. तिच्यावर लेखकांची नाव लिहिलेली असतात. न्यू यॉर्क रिव्ह्यू, लंडन रिव्ह्यू किंवा तत्सम ठिकाणी ही नावं कुलकर्णींना सापडलेली असतात. या लेखकांची काही पुस्तकं कुलकर्णींकडं आधीच असतात. त्यांची नवं पुस्तकं कुठली आहेत, कुठली उपलब्ध आहेत याची विचारणा कुलकर्णी करतात. विराट त्यातली काही पुस्तकं काढून देतो आणि इतर पुस्तकांची नावं लिहून ठेवतो, मागवण्यासाठी. विराट एकादं नवं पुस्तक काढून कुलकर्णींना देतो आणि म्हणतो की हे वाचून पहा आणि कसं वाटतं ते सांगा. त्या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल विराट बरंच बोलतो. बाजी ते पुस्तक विकत घेतात. अमूक एक पुस्तक अॅमेझॉनवर स्वस्त मिळू शकतं, तिथून घ्या असंही विराट सांगतो. कुलकर्णी म्हणतात की अॅमेझॉनवर विराट नसल्यानं त्यांना तिथून पुस्तकं घ्यायला आवडत नाही. पुस्तक महाग पडलं तरी विराटकडूनच घ्यायचं असा त्यांचा आग्रह असतो.
बाय द वे, वेवर्ड अँड वाईजमधे विराटनं कॉफी आणि केकची व्यवस्था केलीय परंतू त्या व्यवस्थेला अजून पालिकेनं परवानगी दिलेली नाही. वाईन आणि चीज दुकानात देण्यासाठी टेबल आणि खुर्च्या तयार आहेत. पण त्याला पालिका अजून परवानगी देत नाहीये. 
स्वतंत्र पुस्तक विक्रेता चांगल्या शिक्षकासारखाच असतो. तो वाचकाना पुस्तकाची गोडी लावतो. 
।।

One thought on “वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

  1. पुस्तकांची दुकानं हुडकून त्यांची अशी माहिती देणारे आपण किती पुस्तकवेडे असाल याची साधी कल्पना यातून आली नाही तर नवल ! राम अडवाणी यांचे पुस्तकांचे दुकान पुढे चालू राहो यापलीकडे काय इच्छा व्यक्त करू ?
    मंगेश नाबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *