एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
पंढरपूर या गावातल्या एका कुटुंबाच्या जगण्यातले काही दिवस या चित्रपटात आहेत. मध्यम वर्गीय कुटुंब. कुटुंबातला कर्ता माणूस वारला आहे. त्याची पत्नी, आई आणि त्याची दोन मुलं. मुलांची आई स्वेटर विणून, स्वयंपाकाची कामं करून घर चालवते, मुलांना वाढवते. मुलाच्या दिवंगत वडिलानी हौसेनं डिझाईन केलेली एक सायकल आहे. मुलगा ती जिवापाड जपतो. मोठा झाल्यावर, उंची वाढल्यावर, त्याला ती वापरायची आहे.  लोकांकडून कामाचे पैसे न आल्यानं आईचं स्वेटर विणायचं गहाण यंत्रं   बँक जप्त करायला निघाली आहे. बँकेला पैसे परत करायचे आहेत. पैशाची भरती करण्यासाठी सायकल विकायची पाळी आली आहे. कमी पडणारे पैसे मिळवण्यासाठी मुलगा, मुलगी बांगड्या विकायचं सायकलवर चादर पसरलेलं दुकान काढतात. आजी त्या कामी मदत करते, तीही यात्रेत चहा विकून चार पैसे मिळवते. नाना संकटं येतात. शेवटी सगळं ठीक होतं. अशी गोष्ट. 
पडद्यावर पहाताना ही गोष्ट अगदी खरी खरी वाटते. पंढरपूर नावाचं एक खरंखुरं गाव आपल्या समोर येतं. त्यातली इरसाल माणसं आपल्यासमोर येतात. त्यातली खूप माणुसकी असणारी माणसंही आपल्यासमोर येतात. हे सारं पंढरपूरचं आहे हे आपल्याला सिनेमा पहाताना लक्षात येतं. पंढरपुरमधले रस्ते, घरं, माणसं, त्यांचे कपडे, त्यांच्या घरांतले आतले रंग आणि भांडीकुंडी. सारं काही पंढपुरचं असतं. बोलणारी माणसं पुस्तकी बोलत नाहीत किंवा पुणं-मुंबई-मराठवाडा इथलं बोलत नाहीत. पंढरपूरचीच भाषा बोलतात. मुंबई पुण्यातली माणसं पैसे उधार घेतात, लोन घेतात, कर्ज घेतात. पंढरपुरातली स्त्री ‘हातउसने’  पैसे मागते. ती बाई आपल्या मुलांना ‘ लेकरं ‘ म्हणते.
एलिझाबेथ एकादशीत खूप बारीक बारीक तपशील आहेत. जगण्यातले, कपड्यांतले, समाजातले, धर्मातले, बोलण्यातले. जत्रा आहे. जत्रेतल्या वेश्या आहेत. तपशीलातून एक गाव डोळ्यासमोर उभं रहातं.
सत्यजित रे आणि अदूर गोपालकृष्णनच्या सिनेमांची आठवण येते. मधे बराच काळ गेल्यानंतर  चित्रपटाची ही धाटणी पुन्हा एकदा दिसतेय, लोकांना ती आवडतेय आणि देशाच्या पातळीवर या चित्रपटाला मान्यता मिळतेय. 
एलिझाबेथमधे काही संदेश बिंदेश आहे काय? असू शकेल. तो ज्यानं त्यानं शोधायचा. चित्रपटात बरीच इन्फर्मेशन आहे, बराच आशय आहे. वारकरी दिसतात. अंधश्रद्धा निर्मुलनाचा मोर्चा दिसतो. देव दिसतो. गरीबी दिसते. असहाय्य माणसं दिसतात. माणसांच्या श्रद्धा दिसतात. या साऱ्याचा  अर्थ पहाणाऱ्यानं आपापल्या कलानं लावायचा. सिनेमा कशाचाचा आग्रह धरत नाही. इंग्रजी सब टायटल्स नसली तरीही सिनेमा समजतो. कारण तो चित्रपटाच्या भाषेत बोलतो. पात्रांचं दिसणं, वावरणं, त्यांचे चेहरे सारं काही बोलत असतं. माजीद मजिदीच्या चित्रपटांची आठवण येते.छोट्या मुलांचं जग माजिदी चितारतो.माजीदचे चित्रपट ध्वनी बंद करून पाहिले तरी समजतात. माजीद मजिदीचा प्रभाव एकादशीच्या दिग्दर्शकावर असणं शक्य आहे. मजीदीच्या अनेक फिल्म गेल्या काही वर्षात मुंबईत अनेक वेळा दाखवल्या गेलेल्या आहेत. 
एकादा प्रसंग किंवा मुद्दा किंवा बिंदू प्रेक्षकाच्या मनावर ठसावा म्हणून ध्वनीचा मुद्दाम केलेला वापर एकादशीत  नाही. करूण संगित नाही. घटना वेग घेताना तबला, ड्रम इत्यादींचा वापर नाही. आनंददायक घटना घडल्यावर सतारीचे तुकडे नाहीत.  एकादी फ्रेम प्रेक्षकाच्या मनावर ठसावी म्हणून क्लोजपचे, फोकसिंगचे खेळ नाहीत. वातावरण निर्माण करण्यासाठी पिवळा, गडद निळा, शेंदरी वगैरे रंगांचा वापर नाही. 
संगित, ध्वनी, चित्रांच्या फ्रेम्स इत्यादी गोष्टी कथनाकाचा भाग असतात, कथानकाबरोबरच वाहत जातात.  
एकादशी स्थानिक आहे आणि वैश्विकही आहे. हीच तर गंमत आहे. स्थानिकतेचे तपशील खोडून काढून कथानक वैश्विक होत नाही. घसघशीत स्थानिकतेतच वैश्विकता असते. एलिझाबेथमधे नातेपुते या गावाचा उल्लेख होतो. उगाचच नातेपुते हे नाव काढून त्या ऐवजी रामपूर, गोविंदपूर असलं नाव घालण्यात मतलब नसतो. नातेपुते नावाचं एक गाव असतं. ते मुंबईतल्या माणसाला भले माहित नसेल. पण तरीही ते असतं आणि त्याचं असणंही आपल्याला समजू शकतं. सोलापूरमधल्या मुलांची नावं ज्ञाना, गण्या, झेंडू इत्यादी असतात. उगाचच ती खोडून त्याजागी अशोक, सुरेश, जान्हवी वगैरे नावं कशाला टाकायची? 
रे आणि अदूरच्या सिनेमातली गावं, त्यांची नावं इत्यादी गोष्टी स्थानिक असतात. रे किंवा अदूर आपलं गाव, आपली भाषा, आपली संस्कृती सोडून जात नाहीत.  परेश मोकाशीही महाराष्ट्राची, पंढरपूरची गोष्ट सांगतात.
थोडं मेक्सिकोत जाऊया..
गोंझालेज इनारिटो या मेक्सिकन दिग्दर्शकाच्या बर्डमन सिनेमाला चार ऑस्कर मिळाली आणि हॉलिवूडमधे भरपूर पैसाही मिळाला. गेल्या वर्षी अल्फोन्सो क्वारोन्सच्या ग्रॅविटी या मेक्सिकन सिनेमानं अनेक ऑस्करं मिळवली. जगात मेक्सिकन सिनेमांची लाटच सध्या आल्यासारखं दिसतंय. या मंडळींनी केलेले मेक्सिकन सिनेमे लोकप्रिय होत आहेत, पैसे मिळवत आहेत आणि मान्यता मिळवत आहेत. क्वारोन्सनं २००१ साली यु टू मामा तँबरीन हा सिनेमा केला. मेक्सिकन तरूणांचं जगणं, त्यांच्या व्यथा वगैरे गोष्टी या सिनेमात आहेत. त्या सिनेमात ना हॉलिवूड आहे, ना अमेरिका आहे. त्यात स्वित्झर्लंडमधे किंवा हवाईमधे केलेली चित्रणं नाहीत. त्यात विदेशांचे संदर्भ किंवा पात्रं वगैरे नाहीत. सारं थेट मेक्सिकन आहे. मेक्सिकन समाजाचं चित्रण त्यात आहे. शतकभर मेक्सिकोनं दडपशाहीचं वातावरण भोगलं. आताशा तिथं माणसं मोकळा श्वास घेत आहेत. गोंझालेझ इनारिटो म्हणतो आता कधी तरी आम्हाला हवं तसं सरकार या देशात येईल. इनारिटो, क्वारोन्स किंवा आता नव्यानं दिग्दर्शनात उतरलेला दिएगो लूना यांना काही तरी बोलायचं आहे, काही तरी सांगायचं आहे. त्यांचं सांगणं तद्दन स्थानिक आहे, त्याला स्थानिक इतिहास आहे. ही मंडळी त्यांचं सांगणं प्रवचनाच्या रुपात न मांडता गोष्टीत मांडतात. गोष्टी सांगतात. गावाकडल्या गोष्टी. दिएगो लूनानं सीझर शावेझ ही फिल्म केलीय, ती गाजतेय. तो म्हणतो “The marvel of directing films is that you can go as far as you like, but you always end up talking about the place that you come from.”
इनारिटो, लूना, सत्यजित रे, अदूर, बर्गमन, परेश मोकाशी. सगळी माणसं आपापल्या प्रदेशाबद्दल बोलतात. रे बंगालबद्दल बोलतात. अदूर, केरळबद्दल. बर्गमन स्वीडनबद्दल. ही मंडळी जिथं वाढतात तिथलीच भाषा बोलणार. इतर काही बोलणं कृत्रीम होतं, ओढून ताणून होतं. स्पीलबर्ग अमेरिकन आहे. त्याच्या सिनेमात अमेरिकाच येणार. तेव्हां परेश मोकाशींच्या सिनेमात महाराष्ट्र असायला हवा. तो गोष्टीतून प्रकट व्हायला हवा. चित्रपट माणसं चित्रांचं वस्त्रं. माणसं विणून तयार केलेलं वस्त्रं. 
गेल्या वर्षी चित्रपट महोत्सवात असगर फरहादी या इराणी दिग्दर्शकाची सेपरेशन ही फिल्म पहायला मिळाली. त्या आधी त्याचीच अबाउट एली नावाची फिल्मही भारतात पहायला मिळाली होती. दोन्ही सिनेमे गाजले, त्यांना  अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं आणि सन्मान मिळाले. दोन्ही सिनेमे तेहरानमधे घडतात. तेहरानमधल्या मध्यम वर्गीय लोकांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांभोवती सिनेमे फिरतात. सेपरेशनमधे घटस्फोट घेऊ पहाणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आहे. पुरुषाला आपल्या अल्झायमर झालेल्या बापाची काळजी घ्यायचीय. बायको घरात राहून सासऱ्याची काळजी घ्यायला तयार नाही. पुरुषाला नोकरीही करायची आहे आणि घरात वडिलांकडं लक्षही द्यायचंय. एक महिला नर्सिंगसाठी ठेवली जाते. नंतर एकामागोमाग एक घटना घडत जातात. अबाऊट एलीमधे समुद्राकाठी माणसं पिकनिकला गोळा झालेली असतात आणि त्यांच्यापैकी एली नावाची तरूणी बुडून मरते. तिच्या मरणाचं दुःख सहलकरींना नाही. त्यांच्या आपसातल्या मारामाऱ्या होतात त्या पिकनिकला हीच जागा कां निवडली, एली या तरूण मुलीला तिच्याबद्दलची माहिती नसतांना पिकनिकला कां बोलावलं इत्यादी.  
फरहादीच्या गोष्टीतली माणसं इराणी आहेत. तद्दन. सिनेमाभर इराण, तेहरान दिसत रहातं. तिथले पोलीस. तिथलं न्यायालय. तिथले कायदे. धर्माच्या चौकटीत जगावं लागण्यातली घालमेल. बुरखे आणि हिजाब. या सर्वाच्या तळात असतं तिथल्या लोकांचं जगणं. सिनेमा पहाताना आपल्याला इराणही दिसत असतं आणि आपला भारतीय वास्तवही. मधेच ती इराणी माणसं भारतीयच आहे असंही वाटून जातं.
काही वर्षांपूर्वी पोस्टमेन इन माऊंटन्स नावाचा एक चिनी सिनेमा महोत्सवात प्रदर्शित झाला होता. हुओ जियांकी या माणसानं तो दिग्दर्शित केला होता. एका कथेवर तो आधारलेला होता. पर्वतमय प्रदेशातला एक पोस्टमन. एकशेवीस किमीचा दुर्गम पर्वतीय प्रदेशात पायी फिरून पोष्टमन पत्रं घरोघरी पोचवत असतो. घरातून बाहेर पडला की महिन्याभरानं तो परतायचा. पायाचं दुखण जडल्यानं पोस्टमन निवृत्त होतो,तेच काम करणाऱ्या आपल्या मुलाला गावं आणि पत्रांचं वाटप दाखवण्यासाठी तो आपला शेवटला बटवटा करायला निघतो. त्या प्रवासात पोस्टमनचं काम, गावं, तिथली माणसं इत्यादींचं दर्शन मुलाला घडतं. गावं, माणसं, निसर्ग, त्यांचं चहा पिणं, गावठी पाईप ओढणं, गावातला चिखल आणि पायरस्ते, गरीबीनं ग्रासलेली घरं, माणसांचे विटलेले कपडे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इत्यादी गोष्टी अगदी बारीक तपशीलासह या सिनेमात येतात. सुरवातीला मुलगा बापापासून काहीसा दुरावलेला असतो. पण हलके हलके त्याला बाप कळू लागतो. एका ठिकाणी तो ओढा ओलांडताना बापाला पाठुंगळीला घेतो. एका प्रसंगात मुलगा पुढं जाता जाता बाप मागं पडलेला असतो. मुलगा आपल्याच नादात.  त्याच्या लक्षात येतं की मागं बाप दिसत नाही. तो घाबरतो. बापाला काही झालं तर नाही ना? तो मागं फिरून बापाला शोधतो. बाप सू करायला थांबलेला असतो. दुरवर तो तुमानीची बटणं लावून येताना दिसतो. मुलाचा जीव भांड्यात पडतो. एक शब्दही कोणी बोलत नाही असे कित्येक मिनिटांचे किती तरी प्रसंग. संगीतही नाही. पानांची सळसळ, वाहत्या पाण्याची खळखळ इत्यादी आवाज. बस. 
सिनेमा चिनी.  तो चिनी रहात नाही. तो केरळी, कानडी, कोकणी वगैरे सहज होतो. 
तर पुन्हा एकदा असे सिनेमे निघताहेत, मराठीत. 
एकेकाळी असे सिनेमे चित्रपट महोत्सवात दिसत. त्यांना कलात्मक चित्रपट असं म्हटलं जाई. मुख्य प्रवाहात ते येत नसत, पैसे मिळवत नसत. आता वातावरण काहीसं बदलत आहे. वर उल्लेख केलेले मेक्सिकन सिनेमे आता हॉलीवूडमधे गाजू लागले आहेत, खूप प्रेक्षक ते पहात आहेत, चित्रपटाला बरे पैसे मिळू लागले आहेत. आपल्याकडं, मराठीतही तसं घडायला हरकत नाही.
टीव्हीवर प्रोमोज दाखवून उपयोग होतो काय? कलाकारांच्या कल्पनाशून्य, विशेषणबंबाळ, पोकळ मुलाखतींचा मारा केल्यामुळं प्रेक्षक चित्रपटाकडं वळतील काय? कोणत्या प्रकारचं मार्केटिंग असायला हवं? 
चित्रपटात दम आहे, त्यात गंमत आहे, त्यात पहाण्यासारखं खूप आहे येवढ्यावरही चित्रपटाला प्रेक्षक मिळायला हरकत नाही. वारेमाप पैसा खर्च करणं, संदेशांचा मारा करणं म्हणजे मार्केटिंग आहे काय? 
या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर या चांगल्या चित्रपटांचा प्रसार व्हायला मदत होईल.

००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *