अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.

अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.

 अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश. अमेरिकेचं सैन्य जगात सर्वात प्रभावी. जगातल्या हुकूमशाह्या, कम्युनिष्ट राजवटी, अमानवी कृत्यं करणाऱ्या राजवटी इत्यादी नष्ट करणं हा अमेरिकेचा आवडता उद्योग. स्वतःच नेमून घेतलेले जगाचे पोलिस. अशी ही अमेरिका अध्यक्षीय पद्धतीनं चालते. मतदार थेट मतदान करून अध्यक्षाला निवडतात. अध्यक्षाचं स्वतःचं मंत्रीमंडळ असतं. देशाच्या सेनेचा तो कमांडर इन चीफ असतो. तो संसदेसमोर जात नाही, तो संसदेला जबाबदार नसतो. त्यानं घेतलेले निर्णय संसद तपासत असते, त्याचे निर्णय मंजूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानं मांडलेलं बजेट नामंजूर करून देशाचा आर्थिक कारभार थांबवून ठेवण्याचा अधिकार संसदेला असतो. संसद अध्यक्षाची चौकशी करून त्याला हाकलू  शकते, तुरुंगात पाठवू शकते. न्याय व्यवस्थाही स्वतंत्रपणे अध्यक्षाची चौकशी करून त्याला शिक्षा करू शकते.
तर असा हा जगातल्या बलवान देशाचा बलवान (पण काढण्या घातलेला) अध्यक्ष. हा अध्यक्ष कसा असेल याकडं साऱ्या जगाचं लक्ष असतं. अध्यक्षानं आपलं भलं करावं असं अमेरिकन जनता अपेक्षित असते. डोनल्ड ट्रंप आणि हिलरी क्लिंटन असे दोन उमेदवार उभे आहेत. अमेरिकेत आर्थिक, सामाजिक, आर्थिक समस्या आहेत हे दोघांनाही मान्य आहे. त्या समस्या सोडवण्यासाठीच तर आपण अध्यक्ष होऊ पहातोय असं त्यांचं म्हणणं आहे.
ट्रंप आणि क्लिंटनमधलं कोणी तरी एक अध्यक्ष होईल. 
जो कोणी अध्यक्ष होईल त्याला अमेरिकेतल्या वास्तवाला सामोरं जायचं आहे.
  अमेरिकेतलं वास्तव काय आहे?
।।
  ५ जुलै २०१६.
एल्टन स्टर्लिंग या काळ्या माणसाला  पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं. एल्टन एका दुकानाबाहेर सीडीज विकत होता. कोणीतरी अनामिकानं तक्रार केली की एका काळ्या माणसानं सीडी विकताना आपल्यावर बंदूक उगारली. तक्रारीवरून तीन पोलिस त्या ठिकाणी पोचले. तिथं एल्टन सापडला. त्यांनी एल्टनला घेरलं. एल्टन कोणताही विरोध करत नव्हता.  तीन पोलिसांनी त्याला एका कारवर दाबून ठेवलं, नंतर खाली पाडलं.   एक जण त्याच्या छातीवर बसला, दुसरा मांड्यांवर. तिसरा दूर उभा होता. ‘ पहा, पहा हा माणूस बंदुक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय ‘  असं म्हणत एका पोलिसानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. छातीत.  तिथंच तो खलास झाला असताना काही क्षणात दुसऱ्यानं आणखी तीन गोळ्या झाडल्या.
अमेरिकाभर पोलिसांच्या निषेधाची लाट उसळली, निदर्शनं झाली. टेक्ससमधे झालेल्या  निदर्शनांमधे  मिका जॉन्सन या काळ्यानं पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारलं.
गोऱ्या पोलिसांचा बदला घेण्यासाठी  गेविन लॉंग हा कन्सासमधे रहाणारा २९ वर्षाचा काळा तरुण १६ जुलै २०१६ रोजी लुईझियाना राज्यातल्या बॅटन रूज या गावात पोचला. पूर्ण तयारीनिशी. असॉल्ट रायफल, भरपूर गोळ्या. त्याच्याजवळ बंदुक बाळगण्याचा परवाना होता.  
१७ जुलै रोजी आपल्या  वाढदिवसाच्या दिवशी  सकाळी साडेआठच्या सुमाराला काळे सैनिकी कपडे घालून, बंदूक घेऊन गेविन बाहेर पडला. एका चौकात आला. समोर पाच पोलिस होते. गेविननं गोळीबार केला. तीन पोलिस मेले, दोन जखमी झाले. मेलेल्यात दोन पोलिस गोरे होते एक काळा होता.पोलिसांनी केलेल्या प्रतीगोळीबारात गेविन मेला.
  गेविननं गोऱ्या पोलिसांना मारायचं आधीपासून ठरवलं होतं. २०१३ साली मिसुरीत फर्ग्युसनमधे काळ्या मायकेल ब्राऊनला गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्यापासून गेविन संतापला होता. गेल्या दोन तीन वर्षात अनेक काळ्या निरपराध, निःशस्त्र तरूणांना गोऱ्या पोलिसांनी पकडलं होतं, तुरुंगात ढकललं होतं, मारलं होतं. काळ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल काळ्यांच्या संघटना नुसते मोर्चे काढतात, निदर्शनं करतात याबद्दल गेविनला राग होता. गेविननं सोशल मिडियात लिहिलं, आपल्या भाषणाचे व्हिडियो टाकून आपली नाराजी जाहीर केली होती. अहिंसक पद्धतीनं काहीही साधणार नाही, गोऱ्या पोलिसांना ठार मारलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. 
गेविन. आफ्रिकन अमेरिकन, काळा. २००५ ते २०१० या काळात तो अमेरिकेच्या फौजेत, मरीन्स विभागात सैनिक होता. काही काळ तो इराक युद्धातही  होता. सैन्यात असताना वरिष्ठ अधिकाऱ्याशी गेविनचा वाद झाला. गेविननं पडतं घ्यायला नकार दिला, भांडला.  लष्करानं त्याला काळ्या यादीत टाकलं.  त्याला नोकरी मिळेनाशी झाली. 
गेविनचं लग्न झालं होतं पण त्याचा  काडीमोड झाला  होता.
गेविन सोशल मिडियात खूप सक्रीय होता. cosmo setenpenra या टोपण नावानं तो लिखाण करीत असे, स्वतःच्या  भाषणांच्या क्लिप्स वेबवर टाकत असे. सेटेनपेन्रा हे टोपण नाव कुठून आलं? आफ्रिकेतल्या रामसेस या राजाचं  ते आफ्रिकन नाव आहे. २०१५ साली गेविन काही महिने इजिप्त, इथियोपिया, केनया आणि युगांडात होता. तिथं त्यानं काय केलं याचा खुलासा झालेला नाही पण त्या प्रवासाचा परिणाम गेविनच्या विचारावर झाला असण्याची दाट शक्यता दिसते. 
पूर्व आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यावर त्यानं मिसुरीतल्या जॅक्सन काऊंटी कोर्टात जाऊन आपण Washitaw de Dugdhmoundyah Mu’ur Nation या संघटनेचे सदस्य आहोत असं नोंदवलं. ही संघटना Sovereign Citizen Movement या संघटनेचा एक फुटवा आहे. या संघटनेच मूलतत्व म्हणजे न्यायाधीश, कोर्टं, पोलीस, सैन्य इत्यादींच्या म्हणण्याप्रमाणं आम्ही वागणार नाही, आम्ही कसं वागायचं ते आमचं आम्ही ठरवणार. हे ठरवत असताना आम्ही वेळप्रसंगी न्यायाधीश, पोलिस, सैनिक यांना मारून टाकणार. आम्हीच सार्वभौम.
 ही संघटना गोऱ्या वर्णद्वेषी लोकांनी स्थापन केलीय. काळे आणि ज्यू यांच्या विरोधात. काळ्या नागरिकांना नागरीकत्व देणारी अमेरिकन राज्यघटनेतली १४ वी सुधारणा या संघटनेला मान्य नाही.ती संघटना काळ्यांचा नायनाट करण्यासाठी जन्मली हे गेविनला स्वतः काळा असून उमगलं नाही. गेविन अभ्यासात कच्चा असावा. त्या संघटनेची  मनःपूत वागण्याची मुभा या तत्वाची भुरळ त्याला पडली. 
गेविननं सॉवरिन सिटिझन सदस्य असल्याचा दावा केला तरी त्या संघटनेत तो सक्रीय नव्हता. गेविन काळ्यांच्या कुठल्याच संघटनेचा सदस्य नव्हता. इस्लामबद्दल त्यानं थोडं फार वाचलं होतं, पण मुसलमान व्हायची त्याची इच्छा नव्हती.
।।
बॅटन रूज, लुईजियाना, मिसुरी या ठिकाणाना  दीर्घ संदर्भ आहे. अमेरिकेतली सर्वात जास्त काळ्यांची वसती या विभागात आहे. अमेरिकेत काळे गुलाम याच राज्यात प्रथम आणले गेले.
बॅटन रूज हे गाव लुईझियाना राज्याची राजधानी. १८०३ साली  लुईझियाना प्रदेश अमेरिकन संघराज्यानं फ्रेंचांकडून विकत घेतला तेव्हां  आसपासचा  कन्सास, मिसुरी इत्यादी प्रदेशही लुइझियानाचा भाग होता. या प्रदेशावर एकेकाळी फ्रेंच, नंतर स्पॅनिश, नंतर पुन्हा फ्रेंच राजांची मालकी होती. स्पेनची मालकी होती तेव्हां स्पॅनिश लोक काळ्या गुलामांची खरेदी विक्री करत असत. स्पॅनिशांनी आफ्रिकेत पकडलेले, खरेदी केलेले  काळे गुलाम लुइझियानात शेत मजूर म्हणून आणले. अमेरिकन संघराज्यानं काळ्या गुलामांसह, गुलामीसह लुईझियाना विकत घेतलं होतं. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यानं या भागात काळ्या गुलामांची संख्या अमेरिकेतल्या इतर प्रदेशांपेक्षा खूपच जास्त होती.
गुलामी निर्मूलन याच मुद्यावरून अमेरिकेत १८६१ ते १८६५ अशी पाच वर्षं यादवी झाली. लुझियाना व इतर दक्षिणेतली राज्यं  गुलामी टिकवण्याचा आग्रह धरत होती, गुलामांना-काळ्यांना नागरीक मानायला तयार नव्हती. १८५७ मधे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं आफ्रिकेतून आलेल्या गुलामांच्या प्रजेला नागरीकत्वाचा अधिकार देऊ नये असा निर्णय दिला होता. तोच निर्णय दक्षिणेतली राज्य उचलून धरत होती.  यादवीत दक्षिणी राज्यांचा पराभव झाला.  १८६७ मधे अमेरिकन घटनेत १४ वी दुरुस्ती करून काळ्यांना नागरीकत्व आणि समानता दिली गेली.
 लुईझियानातल्या गोऱ्यांनी ही घटना दुरुस्ती कधीच मान्य केली नाही. गोरेवर्चस्ववादी सतत आंदोलन करून, नवनव्या संघटना स्थापून काळ्यांचा द्वेष पसरवत असतात.  जॉन एफ केनेडी यांचा खून याच लोकांनी डॅलसमधे घडवून आणला होता.  सॉवरिन सिटिझन मुव्हमेंट ही वर्णद्वेषी संघटना आजही लुईझियाना आणि आसपासच्या विभागात सक्रीय आहे.
।।
कलीफ ब्राऊडर, वय वर्षे १६, ब्राँक्समधे रहाणारा. काळा, अनाथ,  आफ्रिकन अमेरिकन. एका अनाथालयात रहात असे. अनाथालय एका महिलेनं चालवलं होतं. ती महिला म्हणजे कलीफची आई. 
१५ मे २०१० च्या रात्री ब्राऊडर घरी परतत होता. मित्रांसोबत. एका पार्टीनंतर. ईस्ट १८६ स्ट्रीटवर पोचले असताना समोरून एक पोलिसांची गाडी आली. समोर उभी राहिली. पाठोपाठ आणखी गाड्या आल्या. ब्राऊडरच्या तिन्ही बाजूनी उभ्या राहिल्या. त्यांच्या लकाकत्या दिव्यांमुळं ब्राऊडरचे डोळे दिपले.
पोलिस ब्राऊडरला म्हणाला ” एका माणसानं तक्रार केलीय की तू त्याला लुबाडलय.”
ब्राऊडर म्हणाला ” मी कोणालाही लुबाडलेलं वगैरे नाहीये. मी एका पार्टीतून आताच बाहेर पडलोय. हवं तर माझी झडती घ्या.”
पोलिसानं झडती घेतली. ब्राऊडर आणि त्याच्या मित्राकडं काहीही सापडलं नाही.
पोलिस  गाडीकडं गेला आणि गाडीत बसलेल्या माणसाशी काही तरी बोलला. तक्रार करणारा माणूसच गाडीत होता.
पोलिस परत ब्राऊडरकडं आला आणि म्हणाला ” तक्रारदार म्हणतोय की आज नव्हे पंधरा दिवसांपुर्वी त्याला लुटलंय.”
पंधरा दिवसांपूर्वी लुटलेल्या गोष्टी आता कशा सापडणार?
पोलिसानं ब्राऊडरला हातकड्या घातल्या.
” मला कशासाठी पकडलंय? माझा गुन्हा काय?” ब्राऊडरनं विचारलं.
” तुला आम्ही चौकीत घेऊन जातोय. बहुदा तुला नंतर सोडून देऊ, तू घरी जाऊ शकशील.”
मित्रासह ब्राऊडर पोलिस चौकीत. रात्रभर पोलिस चौकीत काढल्यावर   कोर्टात नेण्यात आलं. तिथं पोलिस अधिकारी आणि सरकारी वकिलानं ब्राऊडरची जबानी घेतली. ब्राऊडरनं गुन्हा नाकबूल केला. ब्राऊडरच्या मित्राला सोडून देण्यात आलं.
काही महिन्यांपूर्वी अगदी असंच घडलं होतं. ब्राऊडर एका डिलिव्हरी व्हॅनला लटकून काही अंतर गेला होता. गंमत केली होती. पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवला. व्हॅनला लटकणं आणि चोरीचा काय संबंध? पोलिसांनी ब्राऊडरला कोर्टात उभं केलं. कोर्टानं ब्राऊडरचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यानं गुन्हा केलाय असा निकाल दिला. बालवयात असल्यानं त्याला गुन्हेगार जाहीर न करता प्रोबेशनवर, परीक्षाकाळाचा उमेदवार म्हणून सोडून दिलं.
या वेळी कोर्टानं त्याचा मागला रेकॉर्ड पाहून अजून परीक्षा काळात असल्यानं तीन हजार डॉलरच्या जामिनावर सोडा असा निकाल दिला. मुळात गुन्हाच घडलेला नसतांना जामीन देण्याचा प्रश्नच कुठं येतो?
तीन हजार डॉलर ही रक्कम भरायची कोणी? अनाथ मुलाकडं पैसे कुठून येणार? अनाथालयातली आई ते पैसे आणणार कुठून?  वकील देणंही शक्य नव्हतं.
ब्राऊडरला कोर्टाच्या बाहेर काढून एका बसमधे बसवण्यात आलं. बस निघाली. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र होता. बस रायकर्स तुरुंगात पोचली.
एका मोठ्या हॉलमधे चाळीस कैदी मुलांबरोबर ब्राऊडरची व्यवस्था. प्रत्येकाला एक कॉट आणि प्लास्टिकची बादली. 
तुरुंगातून मिळणाऱ्या साबणानं कपडे धुवायचे आणि कॉटच्या टोकाच्या लोखंडी दांडीवर वाळत घालायचे. ओल्या कपड्यामुळं कॉटचे दांडे गंजलेले. कपड्यांना गंजाचे डाग पडायचे. 
अन्न मिळायचं, तेही अपुरं आणि निकृष्ट.
ब्राऊडरची आई आठवड्यातून एकदा तुरुंगात येई. मळलेले कपडे घेऊन जाई आणि धुतलेले कपडे देई. खाण्यासाठी पदार्थ देई आणि त्याला चांगलं खायला मिळावं यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडं पैसे देऊन जाई.
तुरुंगात दोन चार भाई होते. तुरुंगावर त्यांची हुकूमत चाले. ते ब्राऊडरचे पैसे हिसकून घेत, त्याचे पदार्थ खाऊन टाकत.
  एकदा एक भाई पैसे हिसकावून घेत असताना ब्राऊडरनं अटकाव केला.  मारामारी झाली. जेलर आला. ब्राऊडरची रवानगी एकांत कोठडीत झाली.
दोन आठवड्यांनी ब्राऊडर पुन्हा साध्या तुरुंगात गेला.
कोर्टात तारीख होती. ब्राऊडरनं वकील देण्याचा प्रश्नच नव्हता. एक सार्वजनिक वकील त्याच्या वतीनं उभा होता. त्या वकिलाला सरकार अगदीच कमी पैसे देत असे. त्याच्याकडं फार खटले असत. त्याला काम जमत नसे. तो तारीख मागे. एक आठवड्यानंतरची तारीख मागितली तर कोर्ट त्याला दीड महिन्यानंतरची तारीख देत असे. तारीख पडून ब्राऊडर पुन्हा तुरुंगात.
न्यू यॉर्क राज्याच्या कायद्यानुसार कोणताही खटला सहा महिने उभा राहिला नाही तर आरोपीला सोडून द्यायला हवं. सरकारतर्फे तयारी झालेली नसल्यानं कोर्ट जेव्हां सुनावणी पुढं ढकलते तेव्हां सहा महिन्यांची तरतूद लागू होत नाही. त्यामुळं दर वर्षी तीन चार हजार कैदी तुरुंगात तुंबून पडतात.
आणखी एक गोष्ट. खटले चालवण्यासाठी पुरेसे न्यायाधीश न्यू यॉर्कमधे नाहीत. पोलिस धडाधड लोकाना पकडतात परंतू खटले चालू शकत नाहीत.
तारखा पडत होत्या. दोन वर्ष त्यात गेली.
एका तारखेला ब्राऊडर कोर्टात गेला तेव्हां सरकारी वकीलानं सुचवलं ” गुन्हा कबूल केलास तर फक्त साडेतीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होईल. आपण निर्दोष आहोत असं पालुपद चालू ठेवलंस तर खटला हरशील आणि १५ वर्षाची शिक्षा होईल.”
ब्राऊडर तयार झाला नाही. पुन्हा तुरुंगात रवाना झाला. तुरूंगात गेल्या गेल्या पुन्हा एकांत कोठडीत रवाना.
एकांत कोठडीवर लक्ष ठेवणारे जेलर संधी मिळाली की कैद्यांना धोपटून काढत. काही जेलर विकृत असत. एकदा एका जेलरला हात साफ करायची खुमखुमी आली. तो ब्राऊडरकडं आला आणि म्हणाला ” मला मारामारी करायचीय. ये. ” 
मारामारी म्हणजे काय? ब्राऊडरला ठोसे मारायची परवानगी नव्हती. ब्राऊडरच्या हातात बेड्या असत. जेलर एकतरफी ब्राऊडरला ठोसे मारायचा. ब्राऊडरचं नाक फुटलं. कपाळावर आणि जबड्याला जखमा झाल्या.  रक्तबंबाळ झालातरी जवळपास तो बेशुद्ध पडेपर्यंत जेलरनं ब्राऊडरला बडवलं.
तुरुंगात शिक्षण घ्यायची सोय होती. मोठ्या हॉलमधे असताना पुस्तकं आणि उत्तरं लिहिण्यासाठी वह्या पुरवल्या जात. एकांत कोठडीत आठवड्यातून एकदा पुस्तकं दरवाजाच्या फटीतून आत सरकवली जात आणि चार दिवस गेल्यानंतर उत्तरं लिहिण्यासाठी वही, कागद सरकवले जात. तुरुंगातलं फारसं कोणी या सोयीचा वापर करत नसे. कैद्यांना आपसात मारामाऱ्या करणं, सेक्सच्या गोष्टी करणं यातच रस असे. ब्राऊडरला मात्र वाचायची सवय होती. तुरुंगात जाण्यापूर्वी शाळेतही चांगला विद्यार्थी अशी त्याची ख्याती होती. वाचन आणि परीक्षा देण्याची सोय असली तरी तुरुंगाधिकारी तिथं लक्ष देत नसत.ब्राऊडर ओरड करून पुस्तकं मागवी, परिक्षा द्यायचीय म्हणे. एकदा पुस्तकं आली नाहीत म्हणून ब्राऊडरनं चौकशी केली. तर जेलरनं त्याला बोलावून घेऊन बेदम मारलं.
रक्तबंबाळ केल्यानंतर जेलर म्हणाला ” हे बघ. तू जखमी झालायस. दवाखान्यात जाऊन तू तक्रार नोंदवून औषधं घेऊ शकतोस. परंतू नंतर तुला कसल्याशा गुन्ह्यात गुंतवणून आणखी एकांत कोठडी आणि नव्या आरोपांना सामोरं जावं लागेल, तुझी शिक्षा वाढेल. गप्प राहिलास तर यातलं काहीही होणार नाही. गप्प रहायचं की तक्रार करायची हे तुझं तू ठरव.”
गप्प बसण्यावाचून ब्रॉडला गत्यंतर नव्हतं.
दर चार दोन महिन्यांनी ब्राऊडरची एकांत कोठडीत रवानगी होई. एकदा तो सलग चार महिने एकांत कोठडीत होता. त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यानं चादरीच्या धांदोट्या करून, त्या एकत्र बांधून केलेला गळफास घेतला. फेरी मारणाऱ्या जेलरच्या लक्षात आल्यामुळं त्यानं ब्राऊडरला बाहेर काढलं. 
औषधोपचार झाले. 
पुन्हा ब्राऊडर एकांत कोठडीत रवाना.
काही दिवसांनी त्यानं प्लास्टिकची बादली तोडली. बादलीचा  एक धारदार तुकडा वापरून मनगटाची शीर कापली. बेशुद्ध अवस्थेत जेलरला सापडला. हॉस्पिटल. उपचार. बरा झाल्यावर पुन्हा तुरुंगात रवाना.
तारखा पडत होत्या. एका तारखेला पुन्हा मांडवळीचा प्रस्ताव सरकारी वकिलानं मांडला. गुन्हा कबूल कर. अडीच वर्षाची शिक्षा होईल. तुला तुरुंगात येईन येव्हाना अडीच वर्षं झालेली असल्यानं सुटका होऊन जाईल.
” मी निरपराध असताना गुन्हा कां कबूल करू?” ब्राऊडरनं भांडण सुरु ठेवलं.
कोर्टातल्या न्यायाधिशांच्या बदल्या होत, ते निवृत्त होत. ब्राऊडरची केस चालूच. सात न्यायाधीश झाले.
२०१३ सालच्या मे महिन्यात ब्राऊडर पुन्हा कोर्टात. न्यायाधीश जरा कडक. जुने खटले निकाली काढायचा सपाटा त्यानी चालवला होता. ब्राऊडरची केस पाहिल्यावर न्यायाधिशानाही आश्चर्य वाटलं. त्यानी सरकारी वकील आणि पोलिसाना फैलावर घेतलं. तेव्हां पोलिस म्हणाले की ब्राऊडरवरचा खटला चालू शकत नाही. कारण ज्या माणसानं तक्रार केली होती तो मेक्सिकोत निघून गेला आहे. त्यामुळं कोणतेही पुरावे नाहीत, फिर्यादी नाहीत. अशा परिस्थितीत खटला उभाच राहू शकत नाही.
ब्राऊडर सुटला. तीन वर्षाच्या तुरुंगवासानंतर.
ब्राऊडर आपल्या घरात परतला. आता सारं वातावरण बदललं होतं. मित्र त्याच्याशी बोलत नसत. दिवसेंदिवस ब्राऊडर पायरीवर बसून आकाशाकडं पहात असे. त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. नोकरीसाठी गेला की त्याच्या तीन वर्षाच्या तुरुंगवासावर बोट टेवलं जाई. ब्राऊडर सांगे की त्यानं गुन्हाच केला नव्हता आणि गुन्हा सिद्ध न झाल्यानं त्याची सुटका झालीय.  त्याचं कोणीही ऐकून घेतलं नाही. कधे मधे कनवाळू आणि समजूतदार माणसं त्याला नोकरी देत. परंतू नोकरी टिकत नसे.
एकांतवासाचा धक्का त्याला बसला होता. आपल्याला कोणी तरी मारेल, आपल्याला लुटेल अशी भीती त्याला वाटायची. घरात असला की तो खिडक्या दारं बंद करत असे. ट्यूबनं प्रवास करतांना मधेच त्याला भीतीचा झटका येत असे, तो किंचाळे. त्याला उपचाराची गरज होती.  खर्च कोण करणार? कंटाळून एके दिवशी त्यानं नस कापून मरण्याचा प्रयत्न केला. घरातल्या इतरांच्या लक्षात आल्यानं तो वाचला.
समाज ब्राऊडरला जगू देत नाही आणि मरूही देत नाही.
या घडीला ब्राऊडर त्याच अवस्थेत जगतोय. 
।।
(जुलै २००९)
हारवर्ड विश्वशाळेच्या परिसरातला केंब्रिज विभाग.
 पोलिसांना ९११ या नंबरवर एका गोऱ्या बाईनं फोन केला. ”  दोन काळी माणसं घराच्या दाराशी झटापट करत आहेत. कदाचित घरफोडीचा प्रयत्न असेल. कदाचित त्यांची चावी नीट लागत नसेल.” 
सार्जंट जेम्स क्राऊली त्या घरापाशी पोचला. तोवर घराचं दार उघडून ती काळी माणसं घरात पोचली होती.
क्राऊलीनं फोनवरच्या तक्रारीचा संदर्भ देऊन विचारपूस सुरू केली. दारात उभं राहून त्या दोघांना घराबाहेर यायला सांगितलं.  दोघांपैकी एका काळ्या माणसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. तो काळा माणूस होता प्रो. हेन्री लुई गेट्स. हारवर्डमधे ते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि  चीनच्या दौऱ्यावरून घरी परतले होते,  चावी नीट लागत नसल्यानं दाराशी थोडी खटपट करावी लागली होती.  
 गेट्स वैतागले. आपलं ओखखपत्र दाखवलं, आपण प्राध्यापक आहोत हे सिद्ध केलं तरी  पोलिस बाहेर यायला कां सांगतोय असं ते म्हणाले. वाद झाला.  प्रो. गेट्सनी सांगितलं की त्यानं हारवर्ड विश्वशाळेच्या पोलिस विभागाला फोन करून माहिती घ्यावी. सार्जंटनं त्या आणि शहरातल्या पोलिस विभागातल्या पोलिस कचेऱ्यांना फोन करून आणखी कुमक मागवली. दिवे लकाकत आणखी पोलिस गाड्या हजर झाल्या. गेट्स वैतागले. आपण प्राध्यापक आहोत हे ओळखपत्रावरूनही सिद्ध झाल्यानंतर आणखी पोलिस मागवणं हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी केला.
सार्जंट क्राऊलीनी प्रा. गेट्सना हातकड्या घातल्या, अटक केली आणि पोलिस स्टेशनमधे नेलं. काही तास पोलिस स्टेशनमधे अपमानास्पद वागणूक देऊन डांबून ठेवलं. विश्वशाळेतून फोन आल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. 
सार्जंट क्राऊलीनं आरोप ठेवला की गेट्स यांची वागणूक दंगलखोर होती. त्या आरोपात तथ्थ्य नसल्याचं कोर्टानं ठरवलं आणि गेट्सना आरोपातून मुक्त करण्यात आलं.
सार्जंट क्राऊली आणि त्याच्यासोबतचे पोलिस अधिकारी गोरे होते.
अमेरिकाभर ओरड झाली. प्रेसिडेंट ओबामांनीही या घटनेची दखल घेतली.
सार्जंट क्राऊली यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
।।
न्यू यॉर्क.
जुलै २०१४.
एरिक गार्नर एका दुकानासमोर उभा होता. दुपारची तीन साडेतीनची वेळ. अचानक डॅनियल पँटालियो हा पोलिस तिथं उगवला आणि एरिकला   प्रश्न विचारायला सुरवात केली.
एरिक वैतागला. म्हणाला ” आता पर्यंत तुम्ही मला तीसेक वेळा तरी अटक केलीय. मला त्रास दिलाय. माझी तपासणी केलीय. एकदा तर माझ्या गुदद्वारातही बोटं घालून तपासणी केलीत. प्रत्येक वेळी तुम्हाला माझ्याकडं काहीच सापडलेलं नाही. त्रास देता, सोडून देता. आता मी विटलोय. पुन्हा नको तो प्रकार. प्लीज मला एकटं सोडा, त्रास देऊ नका.”
कोणत्याही वॉरंटशिवाय कोणाही नागरिकाला हटकणं आणि त्याची तपासणी करणं अशी मोहिम न्यू यॉर्क पोलिसांनी सुरु केली होती. भर रस्त्यावर, भर गर्दीत पोलिस कोणालाही हटकत. स्त्री असो की पुरुष. छाती आणि जांघेची तपासणी. कॅविटी सर्च असं या तपासणीच नाव. २०११ साली पोलिसांनी ६.८५ लाख लोकांची तपासणी केली होती. एरिकची तपासणी झाली त्या वर्षी तो पर्यंत ४.५ लाख लोक हटकले, तपासले गेले होते.
  अपवाद सोडता सगळे काळे असत.
” तू सिगरेट्स विकत होतास. ” पोलिसानं आरोप ठेवला.
” तपासणी घ्या. आहेत का माझ्याकडं काही सिगरेट्स ते पहा. मला उगाच त्रास देताय.” एरिक म्हणाला.
एरिकनं नाराजी व्यक्त केल्यावर पोलिसानं त्याला धरलं, त्याचे हात पाठीमागे घेऊन हातकड्या घालायचा प्रयत्न केला. एरिक हातकडी घालून घ्यायला तयार नव्हता. पोलिसानं मागून त्याच्या गळ्यावर कुस्तीत करतात तशी पकड केली. गळा पकड. गळा दाबून धरला आणि त्याला फूटपाथवर पाडलं. 
काही सेकंदात आणखी तीन पोलिस तिथं पोचले. त्यात एक महिला पोलिस होती. महिला पोलिस काळी होती.
पोलिसानं एरिकला जमीनीवर दाबून ठेवलं आणि गळा दाबला. एका वाटसरूनं या घटनेचं चित्रण केलं, त्यात दिसलं की एरीक अकरा वेळा घुसमटलेल्या आवाजात ओरडला की मला श्वास घेता येत नाहीये, मी घुसमटतोय.
तिधे पोलीस बघ्यासारखे उभे होते.
काही सेकंदांनी पोलिसानं गळा सोडला. एरिक बहुदा घुसमटून मेला असावा.
अँब्युलन्स आली. मेडिक खाली उतरले. त्यांच्या मते एरिक श्वासोच्छवास करत होता. त्यामुळं कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एरिकला हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. तिथ डॉक्टरनी जाहीर केलं की तो मेला होता. मरणोत्तर तपासणीच्या निष्कर्षातली नोंद सांगत होती की गळा दाबल्यामुळं एरिकचा मृत्यू झाला.
एरिकच्या मृत्यूचं चित्रण प्रसिद्ध झाल्यावर देशभर गडबड उडाली. प्रे. बुश म्हणाले की हा प्रकार फार भयानक आहे. सर्व राजकीय पक्षांनी पोलिसांवर झोड उठवली. न्यू यॉर्क न्याय व्यवस्था पोलिसावर खटला भरायला तयार नव्हती. फारच ओरड झाल्यावर खटला झाला. ग्रँड ज्यूरीसमोर सुनावणी झाली. ज्यूरी आणि न्यायाधिशांनी एरिकचा खून झाला हे मान्य केलं नाही. हटकण्याच्या प्रक्रियेत बळाचा अतिरेकी वापर झाल्यानं एरिकचा मृत्यू झाला, तो खून नव्हता असं न्यायालयानं म्हटलं. पोलिस सुटला. 
एरिकच्या पत्नीनं सरकारवर खटला भरला. नुकसान भरपाईची मागणी केली. कोर्टात न जाता मांडवळ झाली. सरकारनं ५६ लाख रुपये पत्नीला देऊन खटला मिटवला.
पोलिस अधिकारी सुटला. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
।।
काळ्यांना कसंही वागवा, तुम्हाला कोणीही दोषी ठरवणार नाही असा संदेश या घटना देतात.
अमेरिकेत याला ब्रोकन विंडो इफेक्ट म्हणतात.
इमारतीत एकाद्या खिडकीची काच फुटलेली असते. कोणीही ती खिडकी दुरुस्त करत नाही. याचा अर्थ होतो की या इमारतीकडं कोणाचं लक्ष नाही. त्यामुळं आणखी काचा फोडल्यात तरी कोणी विचारणार नाही. 
खुश्शाल काचा फोडा, इमारतीची वाट लावा.
।।
फेब्रुवारी १९९९.
अमादू दियाल्लो हा गिनीतून स्थलांतरित झालेला काळा तरूण न्यू यॉर्कमधल्या ब्राँक्स या काळे बहुल विभागातल्या आपल्या घराच्या पायऱ्यांवर उभा होता. मध्य रात्र उलटून गेली होती. 
गणवेशात नसलेले चार पोलिस तिथं पोचले. दुरूनच त्यांनी अमादूला हटकलं, थांब, झडती घ्यायचीय असं म्हणाले.
अमादू मागं वळला आणि आपल्या घरात पळू लागला. पळताना त्यानं आपल्या जॅकेटमधून पैशाचं पाकीट काढलं. आपल्याजवळ काहीही नाहीये असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. पोलिस पकडतील अशी भीती त्याला होती कारण तो स्थलांतरित होता,  अमेरिकेचं नागरीकत्व मिळवण्याच्या खटपटीत होता. कामधंदा नसल्यानं तो फेरीव्यवसाय करत असे. मोजे, सिगारेट्स, कॅसेट्स इत्यादी गोष्टी रस्त्यावर विकत असे. अशी विक्री करायला न्यू यॉर्कमधे बंदी असल्यानं पोलिस वेळोवेळी अशी विक्री करणाऱ्याना पकडत असत. आपल्यालाही तसंच पकडलं जाईल अशी भीती अमादूला असावी.
पोलिसांचं म्हणणं की दुरून अंधुक प्रकाशात त्यांना अमादू खिशातून काही तरी चौकोनी वस्तू काढताना दिसला आणि ती वस्तू पिस्तूल असावी असं पोलिसांना वाटलं.
पोलिसांनी त्याला वस्तू टाकून हात वर करायला सांगितलं. अमादू पळत राहिला. चारही पोलिसांनी दूरवरून गोळीबार केला. ४१ गोळ्या झाडल्या. पैकी १९ गोळ्या त्याला लागल्या. गोळ्या लागून तो खाली पडला असतानाही पोलिस गोळीबार करत राहिले.
ब्राँक्समधे खटला झाला. कोर्टानं पोलिसांना खुनी ठरवलं. पोलिस म्हणाले की गावात भारलेल्या वातावरणात आणि प्रचारप्रभावात खटला उभा राहिल्यानं कोर्टावर परिणाम झाला. म्हणून अल्बानी या दुसऱ्या ठिकाणच्या कोर्टात खटला चालवावा. अल्बानीच्या कोर्टात खटला झाला आणि त्यात पोलिस निर्दोष सुटले.
अमादूच्या वडिलांनी सरकावर सहा कोटी डॉलरच्या नुकसान भरपाईचा खटला भरला. सरकारनं कोर्टाबाहेर मांडवळ करून तीस लाख डॉलर अमादूच्या वडिलांना दिले.
गोळ्या चालवणाऱ्या पोलिसांचा म्होरक्या पोलिस अधिकारी केनेथ बॉस पूर्वी किमान दोन वेळा याच प्रकारच्या गुन्ह्यात सापडला होता. काळ्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारणे असं गुन्ह्याचं रूप होतं. अल्बानीच्या कोर्टातून निर्दोष सुटल्यानंतर केनेथ बॉसला कालांतरानं बढती देण्यात आली.
।।
काळे ही कमी दर्जाची प्रजा आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे असं बऱ्याच-बहुतांश गोऱ्यांना वाटतं. गोऱ्यांना आपल्या शेजारी, आपल्या वस्तीत काळे नको असतात. गोऱ्यांच्या वस्तीत काळ्यांना घरं मिळत नाहीत. काही कारणानं काळ्यांचा वावर गोऱ्यांच्या वस्तीत वाढला (औद्योगीकरण) की गोरे ती वस्ती सोडून जातात. काळ्यांनाही गोऱ्यांच्या वस्तीत घरं मिळत नसल्यानं काळ्यांच्या वस्तीत जावं लागतं.
परिणामी काळे-गोरे यांच्या वस्त्या वेगळ्या होतात.
अमेरिकेत १४ टक्के काळे आहेत. म्हणजे एकाद्या  वस्तीत, विभागात १४ टक्के काळे असतील तर तो  समाज एकसंध झाला असं म्हणता येईल. एकाद्या वस्तीत जास्तीत जास्त काळे असणं आणि ही वस्ती इतर वस्तीपासून दूर असणं याचा अर्थ समाज वेगळलेला आहे असा होतो. अमेरिकेत विस्कॉन्सिन राज्यात  मिलवॉकी हे शहर सर्वात वेगळलेलं आहे. तिथं वस्तीतला काळ्यांचा हिस्सा ८० टक्के आहे. 
।।
मिलवॉकी, विस्कॉन्सिन राज्य.
विन्सटन विल्यम्स.८४.
नॉर्थ अवेन्यूतल्या एका मॅकडोनल्डमधे ते दररोज जातात. वेळ काढायला. त्यांच्या वयाचे लोक तिथं जमतात.
” मी अरकन्नासमधे जन्मलो. आठ वर्षाचा झालो आणि कापूस वेचणीच्या कामी लागलो. मरमर मेहनत. पैसे कमी दिले जात. मी जादा मेहनत करून पैसे वाचवले. एके दिवशी पैसे खिशात घेऊन थेट शेतातूनच बसमधे बसलो आणि मिलवॉकीला पोचलो. ऐकलं होतं की मिलवॉकीत उद्योग निघत आहेत, तिथं काम मिळेल.”
विल्यम्स आणि इतर दोन वृद्ध काळे गृहस्थ टेबलाभोवती कॉफी घेत बसलेले. विल्यम्स बोलतात आणि बाकीचे दोघे संमती दाखवत माना हलवतात.
विल्यमना पहिला धक्का बसला तो घराचा. रहाणार कुठं अशी चौकशी बसमधून उतरल्यावर त्यांनी केली तर  एका वस्तीकडं बोट दाखवण्यात आलं. पूर्णपणे काळ्यांची वस्ती. तिथंही भाड्यानंच रहायचं. कोणाही काळ्याला घर विकत घ्यायची परवानगी नव्हती.
काळ्यांना शाळा नव्हत्या, कॉलेजात जाता येत नव्हतं. परिणामी त्यांच्याजवळ पदव्या नव्हत्या. परिणामी सर्वांना शेतमजुरी करावी लागे, कारखाने किंवा कचेऱ्यांत चांगल्या नोकऱ्या मिळत नसत.
१९६६ च्या सुमाराला विल्यम्स व त्यांचे तरूण काळे मित्र संघटित झाले. देशभर नागरी अधिकारांचं आंदोलन उसळलं होतं. विल्यम्सनी घरं विकत घेण्याचा, मिलवॉकीत कुठंही रहाण्याचा अधिकार मागितला. गोरे खवळले. नॉर्थ अॅवेन्यूतल्या काळ्या वस्तीच्या बाहेर पडणाऱ्यांना बदडण्यात येई. काळ्या घरांवर हल्ले झाले, पेटते बोळे फेकण्यात आले. 
काळ्यांनी संघटित होऊन गोऱ्यांच्या अत्याचाराना तोंड दिलं.
काळ्यांचा त्रास नको म्हणून एओ स्मिथ, इंटरनॅशनल हारवेस्टर, अमेरिकन मोटर्स इत्यादी कंपन्यांनी माणसं कमी करत करत कंपन्या लहान केल्या आणि नंतर बंद करून टाकल्या. १९८०-९० च्या दशकात मिलवॉकीतले उद्योग बंद तरी झाले किंवा स्थलांतरित तरी झाले. गोरे लोक गाव सोडून गेले. 
उद्योग गावाबाहेर निघून गेल्यामुळं गावाचं उत्पन्न बुडालं.  पैसे नसल्यानं शिक्षण, आरोग्य, रस्ते, वस्त्या इत्यादीवर मिलवॉकी गाव पैसे खर्च करेनासं झालं. परिणामी गावाचं आरोग्य खालावलं. गाव मुख्यतः काळ्यांचं असल्यानं काळ्यांनाच सोसावं लागलं, लागतंय.  ‘ काळ्यांना नागरी अधिकार हवेत,आंदोलनं करायची आहेत ना, मग करा आंदोलनं आणि मरा ‘ असं राज्यातले गोरे म्हणतात.
।।
मिलवॉकीमधली एक बाग.
डॉंट्रे हॅमिल्टन, ३१, एका बागेत दुपारच्या वेळी बाकावर झोपला होता. कोणी तरी फोन करून हॅमिल्टनची तक्रार केली. दोन पोलिस बागेत पोचले. हॅमिल्टन झोपला होता, काहीही हालचाल करत नव्हता, कोणतीही आक्षेपार्ह हालचाल करत नव्हता. पोलिसांची तपासणी पूर्ण होत असतानाच ख्रिस्तोफर मॅनी नावाचा अधिकारी आला. त्यानं हॅमिल्टनला थोपटून जागं करायचा प्रयत्न केला. 
हॅमिल्टन म्हणाला ” या आधी तुम्ही मला खूप त्रास दिलाय, तुरुंगात घातलंय. आता मला पुन्हा तुरुंगात जायचं नाहीये. मला सोडा. मी काहीही केलेलं नाहीय. “
हॅमिल्टन हातवारे करून बोलत होता म्हणून मॅनीनं त्याचे हात धरले. हॅमिल्टननं हात झटकले. मॅनीनं दंडुका उगारला. हॅमिल्टननं दंडुका धरला. मॅनीनं कंबरेचं पिस्तूल काढलं आणि हॅमिल्टनला १९ गोळ्या घातल्या. हॅमिल्टन जागच्या जागी मेला.
हॅमिल्टन बेकार होता. त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता. तो चिडत असे पण हिंसक होत नसे. त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळं आधी दोन वेळा पोलिसांनी त्याला पकडलं, छळलं होतं.
मॅन्नीला नोकरीवरून कमी करण्यात आलं. चौकशी करण्यात आली. चौकशीनं दोन निष्कर्ष काढले. १. कोणतंही रास्त कारण नसतांना हॅमिल्टनची झडती घेतली. २. अटक आणि संरक्षण या बाबतच्या पोलिस नियमावलीनुसारच मॅनी वागला.
मॅनीवर कोणतीही कारवाई झाली नाही. ना खटला, ना तुरुंगवास.
।।
अटक झाल्यावर अटकेची जागा ते कोठडी, नंतर कोठडी ते कोर्ट, नंतरक विनाकारणच रस्त्यावर फिरवणं यासाठी पोलिस काळ्यांना गाडीत कोंबतात. पायात आणि हातात बेड्या. सीटवर बसवल्यावर सीट बेल्ट लावत नाहीत. रस्तावरून गाडी वेगानं नेतात, वेगात ब्रेक लावतात, वेगात गाडी सुरु करतात, जाम धक्के बसतात. कैदी सतत आदळतो, मानेला आणि मणक्याला धक्के लागतात. कैदी बेशुद्ध होतो. कधी कधी गाडीत किवा कधी कधी नंतर मरतो.
या पद्दतीला रफ राईड असं म्हणतात.
मिलवॉकीत दोन काळ्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. रफ राईड.
।।
मिलवॉकीत  दर पाच काळ्या तरुणात एक जण बेरोजगार असतो.
मिलवॉकीत सरासरी काळ्या कुटुंबाचं उत्पन्न २५,६०० डॉलर असतं. गोऱ्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न ६२,६०० डॉलर असतं.
काळ्या तरुणांतले तीसेक टक्के तरूण अनेकवेळा तुरुंगात जाऊन आलेले असतात. वस्तूची रस्त्यावर विक्री करणं, शस्त्रं बाळगणं, मारियुआना जवळ बाळगणं, आक्षेपार्ह वर्तणुक असे आरोप त्यांच्यावर ठेवलेले असतात. बहुतेक वेळा ते आरोप सिद्ध होत नाहीत.
।।
गार्डियननं अमेरिकेतल्या पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या लोकांचा माग ठेवलाय. सप्टेंबर २०१६ पर्यंत  अमेरिकेत ७९० माणसं पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडली. यामधे स्थानिक अमेरिकन (अमेरिकेतले आदिवासी), काळे आणि लॅटिनोंची संख्या जास्त आहे. यात १९४ निःशस्त्र काळ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. साधारणपणे दोन गोरे गोळ्यांना बळी पडले तर पाच काळे आणि सहा आदिवासी पोलिसी गोळीबारात मरतात. २०१५ मधे १२०० माणसांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. अजूनपर्यंत   एकाही पोलिस अधिकाऱ्यावर बेकायदा, पूर्वग्रहानं काळ्याना मारणं असा आरोप ठेवलेला नाही, कोणालाही त्या आरोपाखाली शिक्षा झालेली नाही.
।।
अमेरिकेत १३ टक्के काळे आहेत. २५ ते ४९ या वयोगटात ३५ टक्के काळे बेरोजगार आहेत. काळ्यांना चांगल्या शिक्षण संस्थांत प्रवेश मिळत नाही. शिकले असले तरी त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. चांगल्या वस्त्यांत त्यांना घरं मिळत नाहीत. चांगली घरं घेण्यायेवढे पैसेही काळ्यांकडं नसतात. काळी माणसं इतर कोणत्याही समाजाच्या तुलनेत जास्त तुरुंगवासी आहेत. काळ्यांना मतदानाचा अधिकार असला तरी त्यांना मतदान करता येत नाही अशी स्थिती दक्षिणेतल्या राज्यात आहे. उदा. वाहन चालवण्याचा परवाना असणं ही त्या राज्यात मतदानाचा अधिकार मिळण्याची अट आहे. अनेक काळ्यांकडं गाड्या नसल्यानं त्यांच्याकडं परवाने नसतात. काहीही गुन्हा केलेला नसताना काळ्यांचे वाहन चालक परवाने रद्द केल्यानं मतदानाचा अधिकार रद्द होतो. 
अमेरिकेत २००८ साली काळेगोरे संबंध ठीक आहेत असं म्हणणारी माणसं ६४ टक्के होती. २०१४ साली त्यांचं प्रमाण ४६ टक्क्यावर घसरलं आहे.
२०१३ मधे Black Lives Matter ही संघटना निर्माण झाली. ही संघटना मार्टिन लूथर किंग यांच्या अहिंसक वाटेनं जाण्याचा प्रयत्न करते. काळ्यांच्या आंदोलनातली ही एक नवी संघटना. २०१३ मधे फ्लोरिडात जॉर्ज झिमरमन  या गोऱ्या माणसानं ट्रेवन मार्टिन या निःशस्त्र काळ्या तरूणाला गोळ्या घालून मारलं. प्रथम त्याला अटक होत नव्हती. आंदोलन झाल्यानंतर त्याला अटक झाली. नंतरच्या खटल्यात तो सुटला. त्या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले. Black Lives Matter चा उदय या घटनेनंतर झाला. ब्लॅक पँथर ही हिंसक प्रतिकाराचा पुरस्कार करणारी संघटनाही अमेरिकेत नव्यानं तोंड वर काढत आहे.
।।
अमेरिकेत दक्षिणेतल्या राज्यात काळे गुलाम होते. गुलामी रद्द करणं यावरून दक्षिण आणि उत्तरेतली राज्यं यांच्यात लढाया झाला. हेच अमेरिकेतलं सिविल वॉर. या युद्धात गुलामी रद्द करणं या विषयाचा विजय झाला आणि १८६५ साली गुलामी बेकायदेशीर ठरवणारी तरतूद राज्यघटनेत  करण्यात आली.
१९६८ साली राज्यघटनेत कायद्यासमोर सर्व नागरीक (काळे, गोरे व इतर सर्व) समान आहेत असं सांगणारी १४वी सुधारणा करण्यात आली.
विश्वशाळांत काळ्यांना प्रवेश नव्हता, काळे गोरे अशी विभागणी होती. ती रद्द करणारा कायदा १९५४ साली करण्यात आला. १४वी घटना दुरुस्ती हा आधार घेऊन.
१९६४ मधे माणसागणीक मत हा कायदा झाला, सर्वांना मताधिकार मिळाला. १४वी घटना दुरुस्ती हा आधार.
१९६१ आणि १९६५ मधे अध्यादेश काढून  केनेडी आणि जॉन्सन या प्रेसिडेंटांनी  कोणाही माणसावर त्याचा वंश, धर्म, लिंग इत्यादी कारणांसाठी भेदभाव होता कामा नये असं  जाहीर केलं. आरक्षण किंवा कोटा असणार नाही परंतू काळा माणूस लायक असेल तर त्याला नोकरी-शिक्षण-व्यवसायात संधी नाकारता कामा नये असं या अध्यादेशांनी जाहीर केलं. अमेरिकेत याला सकारात्मक कारवाई (अॅफर्मेटिव अॅक्शन ) असं म्हणतात.
।।
  राज्यघटनेनुसार काळ्यांवर अन्याय करणं, त्यांना विनाकारण अटक करणं, त्यांना बेकायदेशीर मारणं, त्याला न्यायालयात जायला मनाई करणं, त्याला नोकरी नाकारणं बेकायदेशीर आहे.
।।
हिलरी क्लिंटन आणि डॉनल्ड ट्रंप दोघांनीही अमेरिका एकसंध ठेवली पाहिजे असं ठासून म्हटलं आहे. काळे गोरे ही दरी रुंदावत आहे, देश दुभंगत आहे हे दोघांनाही मान्य आहे. ट्रंप यांचं म्हणणं की ब्लॅक लाईव्ज मॅटर व इतर काळ्यांच्या संघटना हिंसक असून त्या विनाकारण गोऱ्यांवर आरोप करत आहेत, त्यामुळंच देश दुभंगण्याच्या वाटेवर आहे. हिलरी क्लिंटन काळे गोरे दरी बुजावी, देश एक व्हावा असं म्हणत आहेत. 
ट्रंप रीपब्लिकन आहेत. काळ्यांना गुलामीतून मुक्त करणारे अब्राहम लिंकन रीपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते.  सामान्यतः रीपब्लिकन हा पक्ष कंझर्वेटिव मानला जातो, बिझनेसवाल्यांचा पक्ष मानला जातो, गोऱ्यांचा पक्ष मानला जातो. ट्रंप यांना गोऱ्यांचा पाठिंबा आहे, काळ्यांबद्दल अढी असणाऱ्या, काळ्यांचा  द्वेष असणाऱ्या गोऱ्या समाजगटांचा पाठिंबा आहे. 
डेमॉक्रॅटिक पक्ष सामान्यतः समानता मानणाऱ्यांचा, नागरी अधिकार काळ्याना मिळाले पाहिजेत असं मानणाऱ्यांचा, काळ्यांना झुकतं माप देणाऱ्यांचा पक्ष आहे. जॉन एफ केनेडी याच पक्षाचे होते. हिलरी क्लिंटन डेमॉक्रॅट असल्या तरी काळ्यांना हिलरींबद्दल आपुलकी वाटत नाही. हिलरी   कायदे करून, आर्थिक मदत करून काळ्यांची परिस्थिती सुधारेल असं म्हणतात. काळ्यांचं म्हणणं आहे की काळ्यांची परिस्थिती कायदे करून सुधारणार नाही. शैक्षणिक संस्थामधे काळ्यांना प्रवेश, काळ्यांचे मानवी अधिकार, काळ्यांचे नागरी अधिकार इत्यादी गोष्टी १९६० नंतर कायद्यानंच ठरवून दिल्या आहेत. त्यात आता नव्यानं करण्यासारखं काहीही नाही. सारे कायदे असूनही   काळ्यांची परिस्थिती सुधारत नाही याचं कारण गोऱ्यांची मनं आणि हृदयं यातच काळ्यांबद्दलचा द्वेष आहे, गोऱ्यांच्या मनात आणि हृदयात दुरावा आहे.   अमेरिकेचं, गोऱ्यांचं मन आणि हृदय बदलत नाही तोवर काळ्यावरचा अन्याय थांबणार नाही असं काळ्यांचं मत झालं आहे. ओबामा हा काळा माणूस आठ वर्षं राष्ट्राध्यक्ष झाला खरा पण गोऱ्यांचं मन त्यांना बदलता आलं नाही असं काळ्यांना वाटतं.
।।
काळे गोरे यांच्यातला अविश्वास, राग हे वास्तव दोन्ही उमेदवारांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. दोन्ही उमेदवार प्राथमिक निवड मोहिमेत सक्रीय असतानाच अमेरिकेत गोऱ्या पोलिसांनी निःशस्त्र काळ्यांना गोळ्या घातल्याच्या घटना घडल्या. देशभर निदर्शनं उसळली. नंतर काळ्यांनी गोऱ्या पोलिसांना गोळ्या घातल्या. गेली चार पाच वर्ष धुमसत असलेला काळ्यांचा असंतोष या घटनांमधून उफाळून आला तेव्हां उमेदवार या विषयावर बोलू लागले. दोन्ही पक्षांचे पुढारी, गव्हर्नर, खासदार गेल्या आठेक वर्षात या विषयावर फारसं बोलताना किवा काम करतांना दिसले नाहीत. ओबामा भाषणं करत. या भाषणांत काळ्यांच्या स्थितीबद्दलची काळजी व्यक्त होत असे. त्यांचा सूर नेल्सन मंडेला यांच्यासारखा असे.   कोणीही कोणावरही अन्याय करू नये असा. मुख्यतः गोऱ्यांकडून काळ्यांवर अन्याय होत आहे, काळ्यांकडून गोऱ्यांवर नव्हे हे दाहक सत्य ते मांडत नव्हते.
गोऱ्यांच्या मनातला काळ्यांचा द्वेष दूर कसा होणार, दूर कसा करणार?

।।

2 thoughts on “अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.

  1. आदरणीय दामले सर आपला प्रत्येक ब्लॉग ज्ञान समृद्ध करून जातो।।। आज अमेरिकेला वाचल अखेर काय तर घरोघरी मातिच्याच चुली आहेत फ़क्त काही चुली काल्या मातीच्या तर काही ताम्बडया मातीच्या।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *