ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण
रोहित मित्तल यांची ऑटोहेड ही फिल्म यंदाच्या मामी चित्रपट उत्सवाच्या स्पर्धेत दाखवली गेली.राम गोपाल वर्मा यांच्या सत्या या फिल्मनं हिंदी चित्रपट जगात एक नवं दालन उघडलं होतं. ऑटोहेडनंही हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी शैली प्रस्तुत केलीय.
नारायण नावाचा एक ऑटो चालवणारा माणूस हे मुख्य पात्र. नारायण सहा खून करतो. ते खून तो कॅमेऱ्यासमोर करतो. एक सनसनाटी खरी गोष्ट चित्रीत करून टीव्हीवर नाव कमवायच्या खटपटीत असलेल्या दोघांसमोर नारायण आपली कहाणी सांगतो, आपले विचार मांडतो आणि आपण कसे खून करतो तेही दाखवतो.
नारायण मुंबईतल्या रस्त्यांवर रिक्षा चालवतो. दिवस रात्र. प्रवाशांची ने आण करतो. त्या भानगडीत त्याला कधी कार चालकांकडून मार खावा लागतो. कधी एकादा मराठी अभिमानी प्रवासी त्याला बिहारी आहे म्हणून बदडून काढतो. कधी प्रवासी खुष होऊन जास्त पैसे देतात कधी कटकट करतात, पैसे न देता निघून जातात. नारायण एका सेक्सवर्करच्या प्रेमात असतो आणि तिची भडवेगिरीही करतो. तिच्यासाठी गिऱ्हाईकं शोधतो आणि तिची गिऱ्हाईकांकडे ने आण करतो.
नारायण बिहारचा. बिहारमधे त्याच्या कुटुंबाकडं जमीन आहे. बिहारमधलं वास्तव आणि टीव्हीच्या प्रभाव यामुळं मर्यादित साधनांमधे रहाण्यात नारायणला गंमत वाटत नाही. त्याला मुंबई-दिल्लीतले धनिक, तिथली चैन दिसते. श्रम करायची त्याची तयारी नाही, त्याला शॉर्टकट सुख हवं असतं. त्याच नादापायी तो गावात दोन खून करतो आणि मुंबईला पळून येतो. त्याच्या आईला वाटत असतं की लग्न करून दिलं की तो सुखी होईल. खून करणाऱ्या, काम न करणाऱ्या मुलाचं लग्न करून एका मुलीचा जीव धोक्यात घालणं चूक आहे असं माउलीला वाटत नाही.नारायण मुंबईतल्या एका अतीदाट रोगट वस्तीत दाखल होतो. एका अरूंद खोलीत इतर पाच जणांसोबत रहातो. त्याच दाटीवाटी खोलीत त्याची आईही येतो, मुलाचं मन वळवून त्याचं लग्न लावण्यासाठी.
नारायण आणि खोलीसोबती. त्यांची मुळं मुंबईत नाहीत. मुंबईच्या संस्कृतीशी त्यांचं देणंघेणं नाही. महाराष्ट्र त्यांना माहित नाही. हिंदी चित्रपटानं तयार केलेली कोणाचीच नसलेली आणि केवळ भासमान अशी संस्कृती ही त्यांची संस्कृती. हिंदी सिनेमात दिसणारा शृंगार, तिथं दिसणारी श्रीमंती, तिथली गाणी, तिथलं संगित, तिथली व्यसनं हे नारायणचं जीवन. सलमान खान हे त्याचं दैवत. सलमानची गाणी – संवाद हे त्याचं साहित्य. राजीव गांधी आणि मोदी यांची फिल्मी भाषणं हे त्याचं राजकारण. सभोवतालचं क्रूर वास्तव आणि फिल्मी संस्कृती-राजकारण यांच्या तावडीत घडलेला शहरी माणूस.
अशा माणसांची कोणतीही मोजदाद सरकारकडं किंवा समाजाकडं नाही. त्यांनी गुन्हे केले, कायदे पाळले नाहीत, समाजाचा एक भाग म्हणून कर्तव्यं पार पाडली नाहीत तरी त्यांच्या कृत्यांची ना नोंद, ना त्यांच्यावर कोणतीही कारवाई. सभोवतालाचे फायदे ही माणसं घेतात पण सभोवतालाप्रती कर्तव्य पार पाडत नाहीत.दिल्लीत बलात्कार करणारी माणसं नेमकी याच प्रकारातली होती.
दिद्गर्शकानं नारायणची गोष्ट डॉक्यूमेंटरीच्या शैलीत सांगितलीय. अलीकडं चित्रपटी लोकांना डॉक्युमेंटरीचं आकर्षण वाटू लागलंय. ऑटोहेड या शैलीला मॉक्यूमेंटरी असं नाव पडलंय. चित्रण मुंबईतलं आहे. मुंबईतल्या टपऱ्या, कटिंग चहाचे अड्डे, दाटवस्तीतली निरुंद घरं, खिडकीतून डोकावणारी माणसं, माणसांची आणि वाहनांची गर्दी, कलकलाट या साऱ्या गोष्टी चित्रपटात आहेत. जशाच्या तशा. स्टुडियोचा, सेटचा वापर केलेला नाही. कृत्रीम दिवे नाहीत. सध्या भरपूर वापरला जाणारा गोप्रोसारखा छोटा कॅमेरा ऑटोमधे पुढल्या बाजूला ठेवून ऑटो चालवणारा आणि प्रवाशांचं चित्रण आहे. दुसरा कॅमेरा एकूण चित्रण करतो. बहुतेक वेळा चित्रण ऑटोमधून केलेलं असल्यानं दृश्य काहीशी थरथरतात. चित्रणासाठी कॅमेरा ट्रायपॉडवर, ट्रॉलीवर, क्रेनवर ठेवायची पद्धत आहे. त्यामुळं दृश्यं नाना कोनांतून दिसतात. या चित्रपटात त्यातलं काहीही केलेलं नाही. रात्रीची दृश्यं अंधुक प्रकाशातली आहेत. रूपा या सेक्सवर्करशी नारायण भांडतो आणि शेवटी तिचा खून करतो हे दृश्य शेदोनशे फुटावरून आहे आणि एकाच शॉटमधे चित्रीत केलंय. दोघांमधलं संभाषण दुरून असल्यानं हलक्या आवाजात आहे. आवाज आणि दृश्यं चकचकीत रुपात पहायची सवय झालेल्या प्रेक्षकाला हे नवं असेल, कदाचित आवडणार नाही.
चित्रपटात गाणी नाहीत. सेक्सची निकटदृश्यं नाहीत.
चित्रीकरण आणि सादरीकरणाच्या या पद्धतीमुळं आपण खरीखुरी घटना पहातोय असं वाटत रहातो. Suspsnsion of disbelief. समोरचं दृश्य खोटं आहे हे आपल्याला नाटक (सिनेमा) पहातांना कळत असतं. समोर जे घडतंय ते मुद्दाम घडवलेलं आहे, त्यातली पात्रं हे नट आहेत हे आपल्याला माहित असतं. पडद्यावर दिसतय ते सारं खोटं आहे हे सिनेमा पहाताना नजरेआड करतो. चित्रपट निर्मितीचं हे प्राणतत्व ऑटोहेड सिनेमात अधिकाधीक चितारण्याचा प्रयत्न आहे.
सत्या सिनेमानं मुंबईतलं अपराध जग व्यवस्थित मांडलं. सत्या सिनेमा हिंदी चित्रपटातलं एक महत्वाचं वळण आहे. ऑटोहेडमधे गाणी नाहीत, नाच नाहीत, शृंगाराचे संकेत नाहीत. तरीही हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक नवं वळण आहे. सत्यानं गुन्हाजगताचं प्रोफाईल मांडलं, ऑटोहेड समकालीन भारतीय-शहरी जीवनाचं प्रोफाईल त्यातल्या अनेक पदरांमधून दाखवतो.
ऑटोहेड या नावाशी ऑटोशंकर या १९८८-९० मधे गाजलेल्या एका नावाशी साम्य आहे. ऑटोशंकर हा तामिळनाडूतला एक भाई होता, अंडरवर्ल्डमधला एक डॉन होता. दारू, वेश्या, चोरट्या वस्तू, ड्रग्ज, खून इत्यादी सर्व प्रकारचे गुन्हे त्याच्या राज्यात होत असत. पोलिस, तुरुंग, सरकार आणि राजकारणी अशा सर्वांशी त्याचं घट्ट नातं होतं. सारा मामला बटबटीत होता, त्यात कोणतीही तरलता नव्हती. त्याच्यावर त्याच नावाचा सिनेमा कानडी भाषेत निघाला आणि तो तामिळमधे डब झाला. ऑटोशंकरची भूमिका उपेंद्र या बदबदीत नटानं, ऑटोशंकरची व्यवसाय शत्रू माया हिची भूमिका शिल्पा शेट्टीनं केली होती. अगदीच बटबटीत दक्षिणी सिनेमा. काय ती उघडी शरीरं, काय त्यांचे क्लोज अप्स, काय ते एकमेकांना घामट चिकटणं, काय ते एक थप्पड मारल्यावर माणूस पन्नास फूट हवेत उडणं. काय अन् काय.
ऑटोहेड आणि ऑटोशंकर यांच्यात तुलना होऊ शकत नाही.
१९९२ साली man bites dog नावाची एक फ्रेंच फिल्म झाली. गुन्हेगार नायक, टीव्हीच्या कॅमेऱ्याला साक्षी ठेवून गुन्हे करणं आणि स्वतःची कहाणी सांगणं, भीषण खून. खास फ्रेंच भीषणता. नायकाची एक मैत्रिण आहे, ती बासरी वाजवते. तिचा खून होतो तो तिच्या गुदद्वारात बासरी घुसवून. हा सिनेमा काळापांढरा होता. त्यात गाणीबिणी नव्हती. हा सिनेमा पश्चिमी सिनेमातलं एक वळण मानला जातो. यू ट्यूबवर तो पहाता येतो. ऑटोहेड आणि man bites dog या दोन सिनेमात फार फार साम्य आहे.
रोहित मित्तलची ही पहिलीच फिल्म. रोहितनं अमेरिकेतून चित्रपट निर्मितीची पदवी घेतली आहे. अमेरिकेतला अभ्यास साधारणपणे हॉलिवूड, फ्रेंच, ब्रिटीश, पोलिश इत्यादी फिल्मवर आधारलेला असतो. त्याच अभ्यासात कदाचित रोहितनी man bites dog ही फिल्म पाहिली असावी. १९३० च्या दशकात हॉलिवूडमधे डॉक्युमेंटरी आणि फीचर फिल्म यांच्या संकरातून मॉक्यूमेंटरी शैली तयार झाली. त्याच शैलीतली man bites dog ही फिल्मही त्या दिग्दर्शकाची पहिलीच फिल्म होती.
ऑटोहेड मुंबईतल्या रस्त्यांवर आणि पडक्या एकांत ठिकाणी चित्रीत झालीय. फक्त १४ दिवसांत. केवळ १२ जणांनी ही फिल्म केलीय. मुंबईच्या गर्दीत चित्रीकरण करणं ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी रोहितनी काटेकोरपणे सर्व स्थळांचा अभ्यास केला, कोणते त्रास आणि कोणते अडथळे येऊ शकतात ते हेरलं. उपकरणं इतकी लहान आणि कमीत कमी ठेवली की सिनेमाचं चित्रीकरण होतंय असं वाटू नये. शूटिंग चाललंय असं कळलं की लोक फार गर्दी करतात आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते.
चित्रपटामधे व्यक्तींना असलेलं महत्व मर्यादित आहे. मुंबई, मुंबईतलं जगणं, बकालपणा, आवाज, मुळं नसलेली अधांतरी माणसं, वास्तवात नसलेलं भासमान जगणं आणि त्यात अडकलेली माणसं अशा गोष्टी चित्रपटात महत्वाच्या आहेत. त्यामुळं एकादी भूमिका, एकादा नट, एकादी नटी फार ठळक आणि आकर्षक होणं चित्रपटाच्या एकूण प्रारूपाशी विसंगत ठरतं. नारायण हा माणूस नट वाटता कामा नये तो अगदीच साधा माणूस, म्हणजे कोणीही दिसायला हवा. त्याचे हावभाव, त्याचे शब्दोच्चार, त्याचा वावर nondescript असायला हवा, stylize असता कामा नये. nondescript रहाण्याचं कौशल्य फार कमी कलाकारांना जमतं. नसिरुद्दीन शहा हे त्या प्रकारचे दुर्लभ नट आहेत. नारायण ही भूमिका करण्यासाठी व्यावसायिक नट घेतला तर त्याच्यावर दिद्गर्शकाला फार मेहनत घ्यावी लागते कारण तो व्यावसायिक नट आपली कला दाखवण्याच्या खटाटोपात असतो. व्यावसायिक, स्टार, नावाजलेल्या नटांमधलं नटपण खुडून नटाला भूमिकेत शिरायला लावायचं हे फार कठीण काम असतं. नटालाही दिद्गर्शकाचं म्हणणं समजून घेऊन भूमिका पार पाडावी लागते. अमिताभ बच्चन हा एक त्या वर्गातला कलाकार आहे. पिकू असो की पिंक, अमिताभ स्वतःचे सगळे कंगोरे दूर सारून भूमिकांत शिरतो. ऑटोहेडमधे दिद्गर्शकानं माहित नसलेले कलाकार घेऊन मामला सोपा करून टाकला. सर्व भूमिकांसाठी अभ्यासू, गवगवा न झालेले कलाकार दिद्गर्शकानं निवडलेले आहेत. डोक्यात हवा गेली नसल्यानं ते कलाकार समंजसपणे भूमिका निभावतात.त्यात आणखी एक फायदा असा की कलाकारांच्या तारखा मिळवणं, त्याना भरमसाठ पैसे मोजणं यातूनही दिद्गर्शकाची सुटका झाली. दिद्गर्शकानं सगळी पात्रं, सगळे कलाकार छान हाताळले आहेत.
चित्रणाची हाताळणी मजेशीर होती. जान्हवी द्विवेदी या कलाकारानं नारायणच्या आईची भूमिका केलीय. नारायण आणि आई यांच्यात वादावादी झाल्याचा प्रसंग चितारला तेव्हां जान्हवीला माहितही नव्हतं की चित्रीकरण चाललंय. जणू तालीमच चालली होती. तो सीन फार खरा उतरला आहे.
दीपक संपत या नटानं नारायणची भूमिका केलीय. रोंजिनी चक्रवर्तीनं रूपा या सेक्सवर्करची भूमिका केलीय. रोंजिनी पुण्यातल्या फिल्म इन्सटिट्यूटची विद्यार्थिनी. दीपक हा रंगमचावरचा नट. दीपकचा चेहरा निर्विकार. तीन पत्ता जुगार खेळणाऱ्या माणसासारखा. जुगारीच्या हातात तीन एक्के असले तरी तो मख्ख् असतो आणि फालतू तीन पानं असली तरी तितकाच मख्ख असतो. दीपकचा चेहरा प्रसंगानुसार जशी मागणी असेल तसा आकार घेतो. त्यातही स्टायलायझेशन नाही. हळूहळू दारू चढत जाते आणि नंतर अती झाल्यावर नारायण ओकतो, हे दृश्य स्टायलाईज्ड नाही.
हा चित्रपट भारतात आणि बाहेर महोत्सवांत दाखवला गेला. साधारण सिनेमाघरात तो चालला नाही. याचं कारण काय असेल? बहुतांश प्रेक्षकांना सिनेमा हा स्वप्नासारखा हवा असतो. त्यांना वास्तव किंवा वास्तवावरचं चिंतन सिनेमात पहायचं नसतं. वास्तव तर दररोजच जगतो, ते पुन्हा पडद्यावर कशाला पहायचं असं त्यांना वाटतं. सिनेमा असो की सीरियल लोकांना झक्कास कपडे, दागिने, छान घरं, सुखावणारे संवाद इत्यादी गोष्टी हव्या असतात. ऑटोहेड ते देत नाही.
सत्या आणि कंपनी या सिनेमांनी गुन्हेगारी वास्तव दाखवलं. पण त्या पटांत गाणी, विनोदी दृश्यं, रिलीफ इत्यादी गोष्टींची पेरणी केली. अब तक छप्पन थोडा वेगळा होता. त्यात गाणी आणि रिलीफ नव्हता. परंतू त्यातला हीरो इन्सपेक्टर ध्येयवादी दाखवला होता. इन्सपेक्टर दणादण एनकाऊंटर करत असे पण त्यात पाप विरुद्ध पुण्य, मंगल विरुद्ध अमंगल अशी लढाईही होती. त्यातला हीरो लोकांना आवडेल अशा रीतीनं बेतलेला होता. वास्तव काही कां असेना एक थोर मनुष्य इन्सपेक्टरच्या रुपात समाजाचं कल्याण करतांना दाखवला होता. सिनेमात लोकांच्या फलद्रूप न होणारी स्वप्नं दाखवली जातात. ऑटोहेडमधे त्यातलं काहीही नाही. म्हणूनच तर ऑटोहेड या फेस्टिवलमधून त्या फेस्टिवलमधे असा फिरतो.
।।
One thought on “ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण”
Its too nice to read!!