बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा
 बॉल डिलनना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल बक्षिसाचा गौरवोल्लेख असा  ” Having created new poetic expression within the great American song tradition.”  
यावेळी पारितोषिकासाठी अनेक नावं होती. अनेक वर्षं रांगेत असलेले फिलिप रॉथ होते. हारुकी मुराकामी तर होतेच. डिलनचं नाव कोणाच्याही डोक्यात नव्हतं. कुणकुण लागली तेव्हां न्यू रिपब्लिक या नियतकालिकानं एक लेख लिहिला. शीर्षक होतं – यंदा साहित्याचं नोबेल कोणाला मिळणार? बॉब डिलनला नक्कीच नाही.
स्विडीश कमिटीचे अॅकॅडमिक संचालक बॉबला गाठायचा प्रयत्न करत होते.बॉब दाद देत नव्हता. बॉबचा एक जलसा व्हेगसमधे झाला. तिथं स्विडीश कमिटीनं फोन लावला. बॉबनं फोन घेतला नाही.  बाबच्या मॅनेजरपर्यंत फोन अडकत होता. त्यांनी मॅनेजरकडं निरोप ठेवला ” आम्ही बॉबला बक्षीस द्यायचं ठरवलंय. बॉबकडून मान्यता  हवीय.”
मॅनेजरकडून उत्तर नाही. 
स्विडीश कमिटीनं कळवलं ” हे पहा. आम्ही बक्षीस देणारच. समारंभही होणार. बॉब डिलन नाही आले तरी. तर त्यांना तसं कळवा.”
बॉबनं स्वतः फोन घेऊन  बक्षिसाला मान्यता दिली की नाही ? की त्यानं मॅनेजरलाच परस्पर होकार कळवायला सांगितलं? माहित नाही.
।।
नोबेलची घोषणा झाल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. एका गाणी म्हणणाऱ्याला, गाणी लिहिणाऱ्याला साहित्याचं नोबेल? गीताला नोबेल? नोबेल तर कवितेला मिळायला हवं.
नोबेल कमिटीनं चाकोरी सोडायचं ठरवलंय. रहाटीतल्या व्याख्या दूर ठेवायचं ठरवलंय. २०१५ साली स्वेतलाना अॅलेक्सिविच यांच्या पत्रकारीसारख्या लेखनाला बक्षीस देण्यात आलं. स्वेतलाना यांनी युद्धभूमीवरच्या घटनाचं चित्रण केलं होतं, तिथं घेतलेल्या मुलाखती पुस्तकात नोंदल्या होत्या. साहित्याची व्याख्या कल्पित साहित्य अशी केली जाते. नोबेलनं ती व्याख्या दूर सारली.
त्याला एक कारण होतं. आधीच्या वर्षी मार्गरेट अॅटवूड यांच्या आग्रहाखातर पोलिश पत्रकार रिचर्ड कापुश्चिन्सकीच्या पुस्तकांना बक्षीस देण्याचं नोबेल कमिटीनं ठरवलं होतं. नोबेल कमिटीत घनघोर चर्चा झाली असणार. वास्तवावर आधारेल्या  मजकुराला साहित्य कसं म्हणायचं? त्यात वेळ गेला आणि कापुश्चिन्स्कीचं निधन झालं. ते पारितोषिक दिलं गेलं नाही.
गीत आणि कविता यात खरं साहित्य कोणतं यावर कसोटीजात्यावर पीठ पाडणाऱ्या लोकांमधे चर्चा चालू होती. बॉब डिलन ७५ वर्षाचे आहेत.   निर्णय झाला पण ते आधीच वारले असं म्हणायची वेळ येऊ नये असं बहुदा नोबेल कमिटीनं ठरवलं असावं.
।।
१९६४ च्या सुमाराला बॉब डिलन प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला होता. त्याच वेळी अमेरिकेतले आणि ब्रीटनमधले काही लोक म्हणत होते  ” बॉब हा ग्रीक कवी होमरच्या परंपरेतला आहे.”    
२५०० वर्षांपूर्वी लिहिलेलं होमरचं  काव्य ऐकण्यासाठी होतं, गाण्यासाठी होतं, सादर करण्यासाठी होतं. त्याची काव्यं वाद्यांची संगत घेऊन गायली जात होती. सादरीकरणासाठीच होमर लिहित होता. 
बॉब डिलनची गाणी तशीच आहेत. तो गाणी लिहितो आणि गिटार-कीबोर्ड-हार्मोनिका घेऊन स्वतः गातो. त्याच्या गाण्यांचे जलसे होतात.
१९६० च्या दशकात बॉब गाणी लिहा-गायला लागला तेव्हां त्याच्या सोबत जोन बेझही गाणी गात असे. ती पारंपरीक लोकगीतं गात असे. तिच्या गाण्यातली गंमत तिच्या आवाजात आणि सादरीकरणात असे, गाणी जुनीच असत. बॉबच्या आधी वूडी गुथ्री लोकगीतांच्या बाजावर गाणी लिहीत असे, म्हणत असे. त्याच्या गाण्यांत राजकीय विचार असे. उदा. फॅसिझम विरोध. सुरवातीला गुथ्री हे बॉबचं रोल मॉडेल होतं. बॉब वूडीचा फॅन होता. एकदा तो मिनतवारीनं वूडीला भेटायला गेला. त्याच्याशी थोडं फार बोलला. भट्टी जमली नाही. त्यानंतर बॉब वूडीला कधी भेटला नाही, बॉबनं वूडीचं अनुकरण केलं नाही. 
जोन, वूडी,बॉब ही ओळ पाहिली तर त्यात समान बिंदू कोणते? अमेरिकेतलं ब्ल्यूज संगीत.
ब्ल्यूज संगीत. युरोपियन लोकांनी काळी माणसं अमेरिकेत आणली. गुलाम म्हणून. गोऱ्यांच्या शेतावर ती राबत. वेठबिगारी. गावाबाहेर अनारोग्यगारक परिस्थितीत  रहाणं. पैसे मिळत नसत, मारहाण आणि अत्याचार. काळी माणसं  त्यांच्या आफ्रिकन परंपरेतली गाणी गात.  आफ्रिकी  ठेका, आफ्रिकी  लय, आफ्रिकी सूर. आशय मात्र एकोणिसाव्या शतकातलं चिरडलं जाणं, छळवाद, गुलामी, अत्याचार, शोषण.
ब्ल्यूज संगीत. गाणी सोपी असत. शेती व्यवहारातली, दैनंदिन जगण्यातली. ‘ डोंगरी शेत माझं म्या बेणू किती ‘  अशा पद्धतीची. किंवा ‘ माझी मैना गावाकडं राहिली ‘ सारखी. एकादंच रांगडं वाद्य हाताशी घेऊन   गायचं म्हटल्यानंतर गाण्याचा मीटर बदलतो. हाका घालणं, प्रश्न विचारणं, प्रश्नाचं उत्तर मिळवणं. एकच शब्द चार वेळा उच्चारणं. गाणं साधं सरळ, आशयगुंता कल्लोळाचा.
अमेरिकेत सिविल वॉर झालं त्या सुमारास अमेरिकन समाजाला काळ्यांचं संगीत ऐकायला मिळालं. काळ्यांचं ब्ल्यूज हे संगीत अमेरिकन समाजाच्या सर्व थरात पसरलं. गोरेही ती गाणी म्हणू लागले. हळू हळू ब्ल्यूज संगीत साधं गाणं न रहाता स्वातंत्र्याचं,  विद्रोहाचं, निषेधाचं, वेदनांचं समकालीन गाणं झालं. १९५० च्या सुमाराला अमेरिकेत विद्रोहानं मूळ धरलं. काळे, गोऱ्यातले गरीब, अमेरिकेच्या युद्धखोरीवर रागावलेले तरूण,  विद्रोहाची भाषा करू लागले. त्यांना वूडी गुथ्रीनं स्वर दिला. जोन बेजही पारंपरीक गीतामधून तेच सांगत होती. बॉब डिलननं तेच कथन पुढं सरकवलं. बॉब डिलन म्हणतो- मी काही नवं केलेलं नाही. मी जुनाच प्रवाह पुढं सरकवतोय. मी एक नवा दरवाजा उघडलाय येवढंच. १९६०मधे अमेरिकेत समांतर संस्कृती चळवळ (काऊंटर कल्चर) उफाळली. वर्णद्वेष आणि वियेतनाम युद्ध या दोन मुद्द्यांवर अमेरिकेतले तरूण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बॉब डिलनची काही गाणी त्यांचा आक्रोष मांडत असत.
।।
बॉब डिलनची एक हकीकत. 
वर्णद्वेष विरोधी गाणी त्यानं लिहिली, म्हटली. तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. त्याच्या रेकॉर्ड लक्षांच्या आकड्यांत खपत. चळवळ त्याच्यावर खूष होती.

बॉब डिलन हा चळवळीचा लोकप्रिय कवी आहे असं समाजानं ठरवलं,  त्याला टॉमस पेन पारितोषिक देण्याचं ठरलं. 
न्यू यॉर्कच्या एका आलिशान हॉटेलच्या आलिशान बॉलरूममधे समारंभ होता. जीन्स आणि जलशात वापरतात तसे हॅट आणि गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेले मित्र बॉब बरोबर होते.  दारवानांनी त्या  गावंढळ लोकांना आत जाऊ दिलं नाही.  
बॉब आत गेला. छतावर महाकाय झुंबरं आणि खाली फॅशनेबल कपडे घालून आलेली माणसं. अत्तरांचा डोकं भणाणणारा भपका.  मोटारसायकलवरून धूळ खात गावोगावी फिरणाऱ्या बॉबला सभोवतालचं वातावरण जाम काचत होतं. बॉबनं प्यायला सुरवात केली.
ऊच्चभ्रू यजमान हैराण.
बॉबनं भाषण केलं. म्हणाला की हे बक्षीस मला नको. भाषणात तो म्हणाला की मी स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. काच झाला की मी अस्वस्थ होतो.  सारी अमेरिका ली ओसवाल्डला शिव्या देतेय. त्यानं म्हणे केनेडींचा खून केलाय. मी ओसवाल्डच्या मुलाखती वाचल्यात. त्याला काही तरी सांगायचंय.  मला तो काय म्हणतो ते ऐकायचं आहे. त्याचीही काही एक बाजू आहे, ती मला समजून घ्यायचीय. 
उपस्थितांत गडबड उडाली. केनेडींच्या खुनाचं प्रकरण गाजत होतं. केनेडींना मारणारा माणूस म्हणजे काळ्यांच्या चळवळीचा विरोधक.  केनेडी काळ्यांच्या बाजूचे आणि ओसवाल्ड काळ्यांच्या विरोधात अशी वर्गवारी अमेरिकनं केली होती. माध्यमं म्हणत वेगळंच सांगत होती,  की खून तिसऱ्याच कोणी तरी केला आणि ओसवाल्डला बकरा केला. शेकडो फूट अंतरावरून गोळी बरोब्बर केनेडींपर्यंत पोचणं, शेजारच्या माणसाला गोळी न लागण हे स्नायपरचं कसब ओसवाल्डकडं नव्हतं. ओसवाल्डकडली बंदूक आणि केनेडींना लागलेली गोळी या गोष्टी जुळत नव्हत्या. ओसवाल्डच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर ओसवाल्डचाच खून करण्यात आला. सारं प्रकरण जाम गोंधळाचं होतं. 
 प्रसिद्धी पावलेल्या माणसानं पोलिटिकली करेक्टच बोललं पाहिजे   हे शहाणपण बॉबजवळ नव्हतं.
भाषणाच्या शेवटी बॉब म्हणाला ” मला कळलंय. मला बक्षीस देण्याच्या निमित्तानं तुम्हाला पैसे गोळा करायचेत.  मी घातलेल्या गोंधळामुळं तुमचे पैसे बुडणार आहेत. तुम्हाला जेवढे केवढे पैसे या कार्यक्रमात मिळणार होते तेवढे ते सांगा, मी माझ्या खिशातून देणार आहे, खुशीनं. “
एका मुलाखतीत बॉब म्हणाला ” चळवळीत गुंतलेल्या प्रश्नांचा जिव्हाळा मला आहे.पण मी कोणत्याही चळवळीचा कार्यकर्ता नाही, होऊ इच्छित नाही. चळवळीचं सदस्यत्व घेतलं की चळवळ म्हणेल तेच सतत सांगत रहावं लागतं. संघटनेत सामिल झालं की संघटनेला मान्य असेल तेच आणि तेच सतत  लिहावं लागतं. मी तर असीम स्वातंत्र्याचा चाहता.  त्यामुळं मी असा बांधूनबिंधून घेणाऱ्यांपैकी नाही.
टॉमस पेन पारितोषिक प्रकरणानंतर आजवर बॉबनं कोणतंही बक्षीस घेतलेलं नाही. बक्षीसवाले त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. घाबरतही असावेत.
।।
बॉबचं मूळ नाव रॉबर्ट झिमरमन. तो मिनेसोटाचा रहिवासी.  आईवडिल सांगतील तेच ऐकायचं, आई वडिलांची ध्येयं आणि आदर्श पूर्ण करण्यासाठी जगायचं त्याला मंजूर नव्हतं. त्याला स्वतःचं स्वतंत्र जगायचं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी तो घर सोडून पळाला. कोणाला तरी सापडला. पुन्हा घरी. असं सहा सात वेळा झालं. शेवटी एकदाचा तो पळाला तो   परतलाच नाही. मिनेसोटातून निघाला न्यू ऑर्लिन्सला पोचला.  स्वातंत्र्याकडची ही वाटचाल ६१ नंबरच्या हायवेवरून झाली. त्या प्रवासावरच त्याचा ‘ हाय वे ६१ रिविजिटेड ‘ हा खूप गाजलेला आल्बम तयार झाला. कायमचं पळून गेल्यानंतर त्यानं पहिली गोष्ट केली ती म्हणजे आपलं रॉबर्ट झिमरमन हे नाव सोडून बॉब डिलन हे नाव त्यानं अधिकृतरीत्या घेतलं.
।।
माध्यमं त्याच्या सतत मागं लागत, मुलाखतीसाठी. टीव्ही वाल्यांना तो हवा असे. बॉब त्यांना टांग मारी. बॉब लोकांत मिसळत नसे. लोक आवडत नाहीत म्हणून नव्हे. लोकं त्याला आवडत. बारमधे, दुकानात, रस्त्यावर भेटलेल्या माणसांशी तो मोकळेपणानं बोले.
 सार्वजनीक ठिकाणं बॉब टाळे. त्याची दारू प्यायचे अड्डेही आडवळणाला असत. बारमधल्या एका वेट्रेसनं दारूच्या बिलावर त्याची सही घेतली. बॉब तिच्याशी भरपूर बोलला, तिचं जगणं बॉबनं मन लावून ऐकलं. 
बॉब म्हणे ” प्रसिद्धी ही एक गोची असते. हज्जारो लोकं मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतात. ज्या माणसांना मी ओळखत नाही त्यांच्या शुभेच्छांना काय अर्थ आहे. लोकांना वाटतं की ती मला ओळखतात. त्यांना माझ्याबद्दल काहीही माहीत नसतं. त्यांनी माझ्याबद्दल काही कल्पना केलेल्या असतात, त्या खऱ्या नसतात. प्रसिद्ध गायकाच्या  रेकॉर्ड लोकं खरेदी करतात. काळ बदलतो. नवे गायक येतात, नव्या रेकॉर्ड येतात. तुम्ही शिल्लक रहात नाही. प्रसिद्धी येते आणि जाते. प्रसिद्धीत गुंतलं की सपलं.”
 ।।
बॉब स्वतःच्या घरी रहात नाही, लोक पत्ता शोधून तिथं पोचतात.  बॉब मॅनेजरच्या घरी रहातो.
बॉब फार वाचत नाही. मित्र हाती देतात ती पुस्तकं वाचतो. हेमिंग्वे मात्र त्यानं वाचलाय. हेमिंग्वे त्याला आवडतो कारण ” ..He didn’t have to use adjectives. He didn’t really have to define what he was saying. He just said it. I can’t do that yet, but that’s what I want to be able to do “.
व्याख्या बिख्या कसल्या करताय, लिहा. चर्चा कसल्या करताय, लिहा आणि गा. जलसे करा. सौंदर्याची व्याख्या करत बसण्याला अर्थ नाही, निर्मितीत सौंदर्य  असलं पाहिजे.
।।
बॉबनं टॉमस पेन बक्षीस घेतलं नाही, गोंधळ घातला.
बॉब  स्टॉकहोमला नोबेल  बक्षीस घ्यायला जाईल? तिथल्या भद्रलोकांच्या सान्निध्यात राडा न करता वावरेल?
पाहूया.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *