मद्य मधे मधे
व्हिस्की
व्हिस्की बायबल नावाच्या एका नियतकालिकानं स्कॉटलंडमधे तयार होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीला दर्जेदार व्हिस्कीच्या क्रमवारीत खाली ढकललं आहे.
व्हिस्की बायबल नावाचं एक गाईड निघतं. बायबल या धर्मग्रंथाच्या नावाचा वापर ब्रँडसाठी करणं, आपल्या गाईडच्या प्रचार-प्रसारासाठी करणं हा प्रकार पश्चिमेतलेच लोक करू जाणोत. भारतात असं काही करून पहावं आणि त्याची काय प्रतिक्रिया येईल याची कल्पना करावी. असो.
तर २००३ पासून हे गाईड प्रसिद्ध होतं. जगभरच्या व्हिस्क्यांचा अभ्यास या गाईडमधले जाणकार करतात. नंतर त्यांच्या ज्या काही कसोट्या असतात त्यानुसार ते व्हिस्कीला क्रमांक देतात. पहिला जपानमधल्या यामाझाकी सिंगल माल्ट या व्हिस्कीला मिळाला. ( जपान ओळखलं जातं ते साके या मद्यासाठी ) यामाझाकी तयार करणारी जपानी डिस्टिलरी १९२३ पासून वरील व्हिस्की तयार करतेय. स्कॉचच्या तुलनेत या व्हिस्कीच्या बाटल्या जगभर खपत नाहीत. भारतातल्या मद्यप्रेमी माणसांनी यामाझाकी हे नावही ऐकलेलं नाही. याचं कारण स्कॉचचं मार्केटिंग झालं, यामाझाकी व्हिस्कीचं मार्केटिंग झालं नाही. बोलणाऱ्याची माती खपते न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. असो.
नंतरचा क्रमांक अमेरिकन व्हिस्कीचा लागला. ती तर एक गंमतच आहे. अमेरिकेत जॅक डॅनियल्स ही व्हिस्की राष्ट्रीय पेय असल्यासारखी प्रसिद्ध आहे. अमेरिकेतल्या बारमधे गेल्यावर टेंडर कोणती व्हिस्की हवी असं विचारतो. भारतीय माणूस स्कॉचचं नाव घेतो. बार टेंडर तोंड आंबट करतो. कसली आलीय स्कॉच, जॅक डॅनियल्सची चव कोणत्याही व्हिस्कीला नाही असं तो म्हणतो. ते अमेरिकन लोकमत असतं.
मार्केटिंग. अगदी परवा परवापर्यंत वाईन म्हटलं की फ्रेंच वाईनचं नाव घेतलं जात असे. जगभर. लोक आता ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका इथल्या वाईन चाखू लागले आहेत. खुद्द फ्रान्समधल्या वाईन सेलरमधेही शेकडो आफ्रिकन वाईन्स डौलानं उभ्या दिसतात. आफ्रिकन वाईन उत्पादकांनी आपापलं मार्केटिंग जोरात केल्याचा हा परिणाम. भारतात नाशिकच्या वाईन्स आता लोकप्रिय झाल्या आहेत, दर्दी आणि दिखाऊ असे दोन्ही पार्टीबाज नाशीकच्या वाईन्स चवीनं घेतात. अमेरिकेतल्या कित्येक वाईन शॉपमधे नाशिकच्या वाईन असतात, भारतीय लोक त्या घेतात, हळू हळू अमेरिकन लोकही नाशीकच्या वाईन घेऊ लागले आहेत.
मार्केटिंग हे प्रकरण तसं गुंत्याचं. आमची व्हिस्की कशी दाट, स्मूथ, ड्राय आहे, ती कशी सिंगल माल्ट आहे, माल्ट कुठला आहे इत्यादी गोष्टी मार्केटिंग करणारे ठासून सांगतात. व्हिस्की परिषदा, व्हिस्की सोहळे, व्हिस्की मेळावे त्यासाठी भरवले जातात. लंडनमधे एक पुस्तकांचं दुकानं एक खास आठवडा साजरा करतं. चांगली पुस्तकं, नामांकित लेखक हजर असतात. त्या प्रसंगी ब्रीटनमधल्या नामांकित व्हिस्क्या रसिकांना दिल्या जातात ( फुकट ). वाचक, विद्वान मंडळी व्हिस्कीची लज्जत चाखत संध्याकाळी व्यतित करतात. फुकट मिळतेय म्हणून तिथं कोणी झिंगत नाही की ओकत नाही की ग्लासं ओरबाडत नाही.
सहा महिन्यांपूर्वी युरोपीय व्हिस्की उत्पादकांनी एक परिषद भरवली. या परिषदेत भारतीय व्हिस्क्यांवर बंदी घालावी अशी मागणी झाली. परिषदेचं म्हणणं होतं ” भारतातल्या व्हिस्क्या दर्जेदार, अस्सल व्हिस्क्या नसतात. त्या माल्टपासून तयार करत नाहीत. साखर कारखान्यातून निघणाऱ्या मळीपासून, मोलासिसपासून त्या तयार केल्या जातात. मोलासिसमधून अल्कोहोल निघतो. व्हिस्की उत्पादक त्यात रंग आणि स्वाद मिसळतात आणि व्हिस्की या नावानं खपवतात. खरी व्हिस्की माल्टपासून तयार होते, हा माल्ट ज्या धान्यापासून तयार होतो ते धान्य नैसर्गिक रीतीन विशिष्ट वाणापासून तयार केलं जातं. नंतर या व्हिस्क्या विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून तयार झालेल्या पिंपात ठेवल्या जातात. ही लाकडं व्हिस्कीतली घातक द्रव्यं शोषून घेतात आणि लाकडांमधे असलेला नैसर्गिक स्वाद त्या व्हिस्कीत मिसळतात. हे सारं फार सावकाशीनं घडत असल्यानं १२ वर्षं, २५ वर्षं, १०० वर्षं जुनी व्हिस्की अशा ‘ चढत्या ‘ क्रमानं व्हिस्कीचा दर्जा ठरतो. भारतात यातलं काहीच घडत नाही.”
असो.
चियर्