झु यांगकांग या एका सरकारी नोकरीतल्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला. पैसे आपल्या नातेवाईक, मित्र, चमचे, सहकारी इत्यादी लोकांकडं ठेवले. नंतर सरकार, प्रस्थापित नेते यांच्या मर्जीतून झू उतरल्यावर परवा त्याच्या नातेवाईक इत्यादी लोकांना सरकारनं पकडलं, जप्ती आणली आणि त्यांच्याकडून १४.५ अब्ज डॉलरची संपत्ती जप्त केली.
श्रीनिवासनांच्या पुतण्यानं मॅच फिक्सिंग केलं. आता म्हणे त्या बद्दल त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून जावं लागतंय. चौकशी वगैरे अजून व्हायचीच आहे. श्रीनिवासन म्हणतात की पुतण्यानं काय केलं याच्याशी त्यांचा संबंध जोडू नका.
ए राजा, कलमाडी असे कित्येक म्हणजे कित्येक लोक आज संपत्ती हडप करून सुखानं वावरत आहे. त्यांनी कोणाकोणाच्या नावावर पैसे साठवलेत कुणास ठाऊक.
या सर्वांच्या नातेवाईकांची चौकशी करून जप्ती कां होऊ नये?
कोण कोणाचा नातेवाईक आहे याचा खरं म्हणजे काही संबंध नाही. एकाद्या व्यक्तीकडं बेकायदेशीर वाटेनं पैसे गोळा झाले असतील तर देशातल्या कायद्यानुसार त्यांना तुरुंगवास आणि जप्ती व्हायला हवी. तसं होत नाही कारण हा देश, या देशातले नागरीक, या देशातले पुढारी, कायदा मानत नाहीत.
आणि चीनमधे भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला पकडून काही आठवड्यात त्याचा बंदोबस्त करून मोकळे होतात या बद्दल तमाम भारतीय म्हणतात की चीनमधे लोकशाही नाही, व्यक्ती स्वातंत्र्य नाही.
लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांबद्दल भारतीय समाज, संस्कृती हा असा विचार करते.महाराष्ट्रातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिव सेना आणि मनसे या पक्षाच्या नेते व आई वडिल, महाराष्ट्र सरकारच्या नोकरीतील हजारभर माणसं यांची चौकशी केली तर आपण कोण आहोत ते स्पष्ट होईल.