झुंपा लाहिरींचं नवं पुस्तक
झुंपा लाहिरी यांचं दी अदर वर्ड नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकावर खूप चर्चा चाललीय. पुस्तक आहे इटालियन भाषेत. त्याची एक इंग्रजी आवृत्ती निघालीय. या आवृत्तीत डावीकडलं पान इटालीयन भाषेत आणि समोरचं पान इंग्रजीत आहे. इटालियनचं इंग्रजी भाषांतर गोल्डस्टीन या इटालियन भाषांतरकारीनं केलंय.
पुस्तकावर भरपूर चर्चा होतेय.
अनेकांनी या पुस्तकाचं स्वागत केलंय. एकाभाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्याच्या प्रयत्नामधे लेखिकेला झालेला त्रास आणि आलेलं अपयश लेखिकेनं प्रामाणिकपणे मांडलंय. अनेक वाचक आणि समीक्षकाना पुस्तक आवडलेलं नाही. त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्या आणि कथांमधला कस त्यांच्या या नव्या पुस्तकात नाही असं अनेकांनी म्हटलंय.
झुंपा लाहिरी इंग्रजी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह प्रकाशित झालेत. त्यांच्या पहिल्या कादंबरीला (नेमसेक) पुलित्झर पारितोषिक मिळायलंय. बूकर पारितोषिकासाठी त्यांचं नाव किमान दोन वेळा तरी घेतलं गेलं.
झुंपा लाहिरी बंगाली आहेत. त्या जन्मल्या आणि वाढल्या अमेरिकेत. शिक्षण इंग्रजी, वातावरण इंग्रजी, परिसर इंग्रजी, अभ्यास इंग्रजी. घरामधे आई वडिलांमुळं बंगाली भाषा कानावर पडत असणार. आई वडिलांमुळं आणि जन्मामुळं झुंपाच्या रक्तात बंगाली, भारतीय संस्कृती आहे. जगण्यामुळं त्यांची संस्कृती अमेरिकन झालीय. बंगाली आणि अमेरिकन अशा दोन संस्कृतींच्या प्रभावात झुंपा हेलकावे खात असतात. त्यांच्या साहित्यातही दोन संस्कृतीतला संबंध, संवाद, विसंवाद, संघर्ष उमटत असतात. त्यांची पात्रं भारतीय-बंगाली असतात. ती पात्रं सभोवतालच्या अमेरिकन वातावरणाशी जुळवून घेण्याच्या खटपटीत असतात. लाहिरी यांच्या साहित्यात ही संस्कृती श्रेष्ठ आणि ती संस्कृती कमी प्रतीची अशी भूमिका मांडलेली नाही. त्या तटस्थ आहेत.
लािहरी रोममधे स्थलांतरित झाल्या. इंग्रजी सोडून इटालियन भाषेत लिहायचं आहे असं ठरवून इटालियन भाषेचा अभ्यास त्यांनी सुरु केला. (त्यांचा नवरा इटालियन आहे). दोन वर्ष वेगानं इटालियन भाषेचा अभ्यास करणं, इटालियन होणं आणि इटालीयन भाषेत लिहिणं या खटापोमामधे आलेले अनुभव त्यांनी अदर वर्डस या पुस्तकात लिहिलेत. पुस्तकात त्यांचं दोन संस्कृतींमधे हेलकावे खाणं व्यक्त झालंय. धड अमेरिकन नाही धड बंगाली नाही अशा अवस्थेत आपण आहोत असं कबूल करत लेखिकेनं एका नव्या इटालियन संस्कृतीत-भाषेत प्रवेश केला. त्रांगडं झालं. बंगाली, अमेरिकन आणि इटालियन भाषा-संस्कृती.
हे पुस्तक फिक्शन नाही, त्यांचे अनुभव आणि संस्कृती-भाषा विषयक विचार आठवणींच्या रुपात मांडलेले आहेत.
फिक्शन नसलं तरीही त्यात फिक्शनसारखे तुकडे आहेत. लेखिकेचा एक स्वेटर हरवतो. शोधाशोध. एक स्वेटर समोर येतो. ‘हा तुझाच स्वेटर आहे कां’ असा प्रश्न विचारल्यावर लेखिका घोटाळ्यात पडते. फिजिकल स्वेटर आणि भावनेतला,कल्पनेतला,मनातला स्वेटर यात लेखिकेचा गोंधळ होतो.
इंग्रजीत लिहिण्याची सवय असताना, इंग्रजीत स्थिरावलेल्या असतानाही त्यांना नवी भाषा कां हवीशी वाटली? इंग्रजी शब्द त्याना व्यक्त व्हायला पुरेसे वाटत नाहीत? इटालीत गेल्यानंतर त्यांना जे सांगावंसं वाटतं ते इंग्रजीत त्यांना व्यक्त करायला त्रास होतोय? अमेरिकेत त्यांचा वावर अमेरिकन अमेरिकन आणि बंगाली वातावरणात होता. इटालीत कदाचित दोन्ही प्रकारची माणसं त्यांना कमी भेटत असतील, इटालियन आणि युरोपीय माणसं भेटत असतील. त्यामुळं त्यांचं अनुभव विश्व, विचार विश्व बदललं असेल आणि तिथं इंग्रजी भाषा अपुरी वाटत असेल?
रोममधे असंख्य छोटे छोटे पूल असतात. प्रत्येक पुलावरून जाताना पुलाच्या मध्यावर आल्यावर लेखिकेला मानसिक त्रास सुरु होतो. आपण पुलाच्या याही बाजूला नाही आणि त्याही बाजूला नाही, आपण मधेच आहोत असं त्या बिंदूवर त्याना वाटतं.
मोठ्या तलावात आपण उतरलो आहोत अशी कल्पना लाहिरी करतात. आपल्याला तलावाच्या मध्यावरची खोली अस्वस्थ करते, आपण बुडू अशी भीती त्यांना वाटते. संकट आलं तर मदतीला त्यांचा मुलगा, नवरा आहे. तरीही तलावाच्या मध्यावर, खोलवर जायला त्या घाबरतात. तलावाच्या कडेकडेनं पोहत त्या पलिकडं जातात, मध्यामधून नाही.
अमेरिकेत आपण राहिलो पण परिघावरच राहिलो असं त्यांना वाटतंय? ना अमेरिकेची खोली अनुभवली ना बंगाली संस्कृतीची असं त्यांना वाटतंय?
भाषेच्या बाबतीत त्या एक मुद्दा मांडतात. भाषा वरवर हाताळून हाती लागत नाही. भाषा संस्कृती हाडात असते, हाडाच्याही आतल्या अस्थिमज्जेत असते. आपण हाडापर्यंत गेलो नाही, अस्थिमज्जेपर्यंत गेलो नाही असं (खंत?) लाहिरी सूचित करतात.
लाहिरी प्रामाणिकपणानं, सरळपणे साहित्य निर्मितीच्या प्रश्नाला सामोरं जाताहेत. पुस्तकाच्या शेवटी त्या सूचित करतात की त्या कदाचित पुन्हा इंग्रजीकडं परततील, अमेरिकेत परततील.
टिम पार्क या लेखक समीक्षकानं मुद्दा उपस्थित केलाय. आपण ज्या भाषेत वाढलो ती भाषा सोडणं. लेखक काही कारणांसाठी परागंदा होतात पण लेखन मातृभाषेत करतात. काही लेखक आपली मातृभाषा सोडून इतर भाषेत लिहू लागतात. मातृभाषा सोडून गेलेले लेखक यशस्वी ठरत नाहीत, सकस लिखाण करू शकत नाहीत, त्यांच्या वाचकांच्या पसंतीस उतरत नाहीत असं टिम पार्क यांनी अनेक उदाहरणं देऊन म्हटलंय. त्यानी दिलेलं एक उदाहरण आहे प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते कादंबरीकार मिलान कुंडेरा यांचं. कुंडेरा झेक भाषेत लिहित असत. त्याच पुस्तकांसाठी त्यांना नोबेल मिळालं. झेकोस्लोवाकियावरच्या जाचक कम्युनिष्ट राजवटीतून सुटण्यासाठी कुंडेरा फ्रान्समधे स्थलांतरित झाले. फ्रान्समधेच ते वसले. तिथं त्यांनी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला, फ्रेंचमधे लिहिलं. वाचक आणि समीक्षकांचं म्हणणं असं की कुंडेरांचं फ्रेंचमधलं लिखाण त्यांच्या झेक लिखाणापेक्षा कमी सकस आहे.
लेखक मातृभाषेत भाषेत वाढतो. परिसर, परिवार, मित्र, वातावरण, शाळा यातून लेखकाची भाषा घडते. वीसेक वर्षाचा होईपर्यंत. नंतर लेखक इतर भाषा शिकतो, त्यात प्राविण्यही मिळवतो. काही कारणानं माणूस लिहिण्याची भाषा बदलतो. कधी राजकीय कारणासाठी. कधी अधिक पसरलेल्या भाषेत अधिक वाचक, कीर्ती आणि पैसे मिळतील या आशेनं माणूस इंग्रजी, जर्मन किंवा तत्सम भाषेत लिहू लागतो. मातृभाषेइतकी सहजता इतर भाषेत येत नाही, काही तरी राहून जातं. म्हणूनच अनेक लेखक देश सोडून दुसऱ्या देशात गेले तरी स्वतःच्या भाषेतच लिहीत रहातात.
इथे अरूण कोलटकर यांची आठवण येते.
कोलटकरांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत कविता लिहिल्या. स्वतंत्रपणे दोन भाषात लिहिणारी माणसं अगदीच कमी. दोन्ही भाषेतल्या त्याच्या कवितेला साहित्यात अव्वल स्थान मिळालं. जागतिक साहित्यातला शतकातला नंबरी कवी म्हणून कोलटकरांना मान्यता मिळाली.
कोलटकरांचा घडणीचा काळ कोल्हापूर, मुंबईतला. वातावरण पूर्णपणे मराठी. सभोवतालची माणसं आणि वातावरण मराठी. मग अचानक त्यांना इंग्रजीत कां लिहावंसं वाटलं?
एकदा एका मुलाखतकारानं त्यांना विचारलं की मराठी-इंग्रजीपैकी कोणती भाषा तुम्हाला अधिक जवळची वाटते. त्यावर कोलटकरांनी त्यांच्या शेैलीत उत्तर दिलं “असले प्रश्न विचारू नका. मी काय लिहिलंय ते पहा, ते वाचा, त्यावरून तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा.”
एका मुलाखतकारांनी त्याना विचारलं “तुम्ही काय वाचता?”
कोलटकर त्यांच्या तिरकस, छान शैलीत प्रसन्न हसले. “तुम्हाला मी काय वाचलं ते जाणायचंय? मग घ्या तर ही यादी.” त्या यादीत जगभरचे लेखक, कवी होते.अमेरिकन, ब्रिटीश. त्यात आईनस्टाईन, मंडेला, तुकाराम आणि एकनाथही होते.
कोलटकरांची मराठी भाषाच अगदी वेगळी होती. ती रुढ मराठी भाषा नव्हती. माणसं, वातावरण, शब्द, रचना इत्यादी रूढ मराठी माणसाचं-मराठी संस्कृतीतलं नव्हतं. माणसांचे व्यवहारही रूढ मराठी जीवनातले नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर मुंबईतलं जगणं बदललं. बाहेरच्या राज्यातली नाना प्रकारची माणसं मुंबईत आली. ती मुंबईला माहित नसलेले नाना व्यवहार करू लागली. “खाली पिली” काहीही करायला लागली. मुंबईत ‘मादरचोद’ माणसं दिसू लागली, ‘गांडू’ लोक दिसू लागले. माणसं एकादी गोष्ट ‘कायकू करनेका’ असा प्रश्न विचारू लागली. संप होऊ लागले. भोसका भोसकी होऊ लागली. इराण्याकडे लोक बनमस्का खाऊ लागले. आँटीकडे जाऊन दारु पिऊ लागले.
अनेक शतकं तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल-रखुमाईच्या भोवती वावरलेल्या समाजात यंत्रं आली, यात्रेत रांडा फिरू लागल्या. आंघोळ करायला नकार देणारे, केस वाढवणारे, मुक्त सेक्सचा ओढा असलेले, ड्रग्जमधे मुक्त झालेले, हिंदू नावाच्या कठल्यातरी परिभाषित न झालेल्या व्यवहाराकडं वळलेले तरूण गळ्यात माळा घालून हरेरामा भजनं करत मुंबईत पोचले.
तुकाराम ते हिप्पी.
हे सारं कोलटकरानी पाहिलं, त्यांच्या पद्धतीनं. हे सारं कोलटकरांच्या कवितेत आलं. यच्चयावत गोष्टींबद्दल उत्सुकता. प्रत्येक गोष्टीला भिडणं पण तरीही एक अंतर. सर्व गोष्टींकडं गंभीरपणे पण मिश्कीलथट्टेकोरपणं पहाणारा हा पहिला माणूस मराठी भाषेत निपजला.
त्यांची भाषा. दरक्षणी दृष्टीस पडणाऱ्या गोष्टी, त्यातली छुपी अंगं दाखवणारी. कोलटकर त्यांच्या परिसरातल्या भाषेत कंफर्टेबल नक्कीच नसणार. त्यांनी त्यांची स्वतःची भाषा शोधली. ती येवढी प्रत्ययकारी होती की झक मारत जाणत्या माणसांना ती मान्य करावी लागली.
एका मित्राबरोबर ते जेजुरीला गेले होते. जेजुरी त्यांच्या मेंदूत घुसली. बराच काळ ती त्यांच्या मेंदूत गोंधळ घालत होती. मग एकदा धाडकन जेजुरी इंग्रजीत उतरली. कोलटकर मराठीत मजेत असताना इंग्रजीत कां लिहावंसं वाटलं? जेजुरी इंग्रजीत कां लिहावी वाटली? असा प्रश्न कोलटकरांना विचारला असता तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं?
ते हसले असते.
सकाळी उठून दाढी कां करावीशी वाटली किंवा आंटीकडं जाऊन दारू कां प्यावीशी वाटली या प्रश्नाला काय उत्तर असणार?
जे मराठी भाषेबाबत तेच इंग्रजीबाबतही झालं. अमेरिका, इंग्लंड इत्यादी इंग्रजी देशातल्या माणसांना परिचित असलेलं इंग्रजी कोलटकरांच्या कवितेत नाही. शब्द, रचना, घटना, माणसं. ज्या गोष्टी मराठी माणसालाही दिसल्या नव्हत्या त्या इंग्रजी माणसाला कुठून दिसणार? भारतात इंग्रजीत वाढलेल्या लोकांनाही अमेरिकन-ब्रिटीश प्रतिमा, शब्द, वाक्यरचनांची सवय झाली होती. कोलटकरांच्या कवितेत ते रूढ इंग्रजी नव्हतंच. इंग्रजीत लिहिलेला अभंग कधी कोणी वाचला होता? कोलटकरांचं इंग्रजी हे कोलटकरांचं होतं, ते इतर कोणाचंही नव्हतं.
म्हणूनच ते टिकलं. न्यू यॉर्क रिव्ह्यूनं कोलटकरांच्या कवितेचा संग्रह प्रसिद्ध केला आणि शतकातला कवी म्हणून त्याचा उल्लेख केला.
झुंपा लाहिरींनी इटालियन भाषेत लिहिल्यानंतर ब्रिटीश आणि अमेरिकन साहित्य जगतात चर्चा सुरु झालीय. एका परीनं भाषा या विषयावर परंपरेनं आखून दिलेल्या परिघात समीक्षक मंडळी विचार करत आहेत. परिसर-परंपरेनं दिलेली भाषा, प्रयत्नपूर्वक तयार केलेली-मातृभाषा नसलेली भाषा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होतेय.
काही अभ्यासक म्हणतात की कोणत्याही भाषेत विचार करण्याची क्षमता, व्यक्त होण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत वायर्ड आहे. भाषा वरवर वेगळ्या असल्या तरी आतून सगळ्या भाषा एकमेकांना चिकटलेल्या असतात. कुठल्याही भाषेतून दुसऱ्या कुठल्याही भाषेत जाता येतं. प्रश्न असतो तो ही क्षमता वापरण्याचा. ते बहुतेकांना जमत नाही, फारच थोड्यांना जमतं. कोलटकरांना ते जमलं. लाहिरींना ते जमलं नसावं.
माणसाजवळ काही तरी सांगण्यासारखं असावं लागतं. नंतर येते भाषा. नंतर येते मेंदूची अनेक भाषांत व्यक्त होण्याची क्षमता.कोलटकरांकडं तिन्ही गोष्टी होत्या.
।।
One thought on “झुंपा लाहिरींचं नवं पुस्तक”
भाषा आणि अभिव्यक्तीह्या ह्याबद्दलचं खूप सकस चिंतन