अरूण शौरी, सोली सोराबजी, मेघनाद देसाई या तीन विचारवंतांनी मोदींनी राज्य ग्रहण केल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितलं आहे. भाजप-मोदींच राज्य येणार असं त्यांनी गृहीत धरलं आहे. तीनही माणसं समतोल आहेत, टोकाची पक्षपाती नाहीत. एकादी गोष्ट त्यांना आवडली असली, पटली असली तरी ते त्या गोष्टीला बौद्धिक कसोट्या लावून, तोल सांभाळून विचार करतात.
मेघनाद देसाई म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लागलेली आहे. त्याला आधीचं सरकार कारण आहे. परंतू त्यांना शिव्या देत न बसता अर्थव्यवस्था सुधारायची तर फार कठोर आणि लोकांना न आवडणारी पावलं उचलावी लागतील. खर्च कमी करावे लागतील. लोकांना खुष ठेवण्यासाठी दिलेली अनुदानं बंद करावी लागतील. यातून जनरोष होईल. पण लोकप्रियतेच्या नादी न लागता ती पावलं सरकारनं उचलावीत.
इटाली, स्पेन या दोन देशांना कठोर पावलं उचलण्यावाचून गत्यंतर न उरल्यावर जनता खवळली, सरकारं कोसळली. जनतेला सोपी आणि कमी त्रासाची उत्तरं हवी असतात. भाजपला कठोर धोरणं आखावी लागतील व ती अमलात आणावी लागतील.
मोदींची आतापर्यंतची मोहीम सुखद आश्वासनांवर आणि परपक्षावर टीका करण्यावर आधारलेली दिसते. अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी, संपत्ती निर्मिती वाढवण्यासाठी, निर्माण होणारी संपत्ती समाजात दूरवर वाटली जाण्यासाठी लागणारी अर्थरचना, अर्थविचार आणि अर्थव्यवस्था अजून भाजपकडून समोर आलेला नाही.
अरूण शौरी यांची एनडीटीव्हीवरची मुलाखत विचार प्रवर्तक होती. मोदी काम करू शकतील, विरोधक विनाकारण त्यंाच्याबद्दल शंका आणि गैरसमज पसरवत आहेत असं ते म्हणाले. त्यांनी मोदीना सल्ला दिला की त्यंानी गव्हर्नन्सकडं लक्ष द्यायला हवं. म्हणजे चोख आणि गतीमान कारभार. योग्य धोरण आणि चांगला गव्हर्नन्स यासाठी सोबत खूप माणसं लागतील, मोदी तर एकटेच दिसतात असं त्यांच्या बोलण्यातून सूचित झालं. शौरी म्हणाले की मोदींनी डाग पडलेली आणि अकार्यक्षम माणसं घेऊ नयेत.
भाजपनं काँग्रेस व इतर पक्षातून माणसं आयात केलेली दिसतात. सत्तर ऐशी माणसं तरी अशा प्रकारे घेतली आहेत. जात व इतर हिशोबात माणूस निवडून यावा ही एकच कसोटी लावण्यात आलेली आहे. धोरणं, आर्थिक विचार, कार्यक्षमता नसलेले आणि डाग पडलेले बरेच आहेत.