बबन घोलप इत्यादींवर आरोप करतांना अण्णांनी पुरावे गोळा केले होते. अण्णांच्या सहकाऱ्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हे पुरावे गोळा केले होते. ९८-९९ मधे अण्णा म्हणाले होते की आपण ट्रकभरून पुरावे सादर करू. शरद पवार इत्यादींनी त्यांची टिंगल केली होती. परंतू खरोखरच अण्णांजवळ पुरावे होते आणि खरोखरच ट्रकभरून कागदपत्रं होती. म्हणूनच तर घोलपांना शिक्षा झाली. ट्रकभर पुरावे मी स्वतः पाहिले होते कारण त्या वेळी मी अण्णांच्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो, अण्णा आणि त्यांचे सहकारी यांना भेटत होतो त्यांच्या मुलाखती घेत होतो. अशोक सब्बन आणि हेमचंद्र काळे हे दोन अण्णांचे सहकारी मला आठवतात. पुरावे गोळा करण्याबाबत पुढाऱ्यांनी त्रास दिला, मारहाण केली, घरावर दगडफेक वगैरे केली. दोघेही न डगमगता आजही भ्रष्टाचार विरोधी संघर्ष चालवत आहेत. दोघांचेही त्या काळातले फोटो जोडत आहे. अण्णांच्या सोबत आहेत ते अशोक सब्बन आणि फायली तपासत आहेत ते काळे. काळेंच्या घरातल्या फायली इतक्या झाल्या होत्या की त्यांची पत्नी नाराज झाली होती, घरात इतर वस्तू ठेवायला जागा नव्हती. घरावर दगडफेक झाल्यावर काळेंची पत्नी आणि मुलगा घाबरून काही काळ गावाला गेले, काळे मात्र निर्भयपणे घरी राहिले. काळे होते जळगावात आणि सब्बन होते अहमद नगरात.