गोरक्षक आणि शरीयारक्षक
गोरक्षक आणि शरीयारक्षक
गुजरातेत उनामधली घटना. परंपरेनं जनावरांचं कातडं काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या बालू सर्वैय्या आणि त्याच्या कुटुंबातल्या सहा माणसांना गोरक्षकांनी बडवून काढलं. गोरक्षकांचं म्हणणं होतं की त्या लोकांनी गाय मारली.
गाय मारली की मेलेल्या गायीचं कातडं सर्वैय्या काढत होते याची चौकशी गोरक्षक मंडळींनी केली नाही. गायी मारायला गुजरातेत बंदी आहे. गाय मारणं हा गुन्हा केल्याची तक्रार आली तर चौकशी करून खटला भरण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. गोरक्षक स्वतःच पोलिस झाले. पोलिसच नव्हे तर न्यायाधीशही झाले. खटला वगैरेच्या भानगडीत न पडता गोरक्षकांच्या न्यायालयानं सर्वैय्यांना बडवून काढण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला पोलिस म्हणवून त्यांनी न्यायालयाचा निर्णय अमलातही आणला.
गुजरातेत खरं म्हणजे पोलिस, न्यायालय या खात्याना रजाच दिली पाहिजे. कारण त्या विभागाची कामं गोरक्षक मंडळी करत आहेत, तेही विना वेतन. गुजरातेत आणि भारतात भाजपचं राज्य आहे. त्यांनी यातून धडा घेऊन देशातली पोलिस आणि न्यायालय व्यवस्था आता बंद करण्याचाही निर्णय घ्यायला हरकत नाही. अर्थात हा धडा गुजरातनं आजच दिलाय असं नाही, २००२ मधे साऱ्या भारताला आणि जगाला हा धडा नरेंद्र मोदींच्या सरकारनं दिला होता. गुजरातेतले हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या वस्त्या जाळत फिरत होते, माणसं मारत होते. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काही ठिकाणी तर पोलिस आणि मंत्र्यांनी हिंसाचारात भागही घेतला होता. जनतेची सेवा करणाऱ्या विनावेतन सेवकांची मजल इथपर्यंत गेली की त्यांनी न्यायाधिशांच्या घरावरही हल्ला केला होता. न्यायाधीश पोलिसांना विनंती करून वाचवा वाचवा असं म्हणत होते. पोलिस न्यायाधिशांकडे पोचले नाहीत. पोचले ते उशीरा. आरामात. त्यांना इतर कामं होती.
गायी किंवा म्हशींचं मांस खाणारी खूप माणसं भारतात आहेत. ती सर्व धर्मांत आहेत. हिंदूंना सामान्यपणे गायीचं मांस खायला आवडत नाही कारण गेली काही शतकं गायीचं मांस खाणं निषिद्ध ठरवल्यानं त्यांना काहीसं गुन्हेगार असल्यासारखं, काहीसं पापी असल्यासारखं वाटतं. बरीचशी माणसं गोमांस खात नाहीत कारण कित्येक पिढ्या घरात गोमांस न खाल्यानं त्यांना गोमांसाची सवय नाही. अर्थात हे सारं हिंदूमधल्या काही जातींनाच लागू आहे. काही जाती गोमांस खातात.
गोमांस खाल्लं जात असल्यानं त्याचा अर्थव्यवहाराशीही संबंध आहे, काही लोकांचा तो व्यवसाय आहे.
मांस खाणं किंवा माती किंवा दगड किंवा काहीही खाणं याचा पाप पुण्याशी संबंध असायचं कारण नाही. हे खा ते खाऊ नका असे दंडक माणसं त्या त्या काळातली अर्थव्यवस्था आणि सत्ताकारण यामधून तयार करतात आणि ते देवाच्या नावावर खपवतात. काहीही खाणं ही गोष्ट केवळ सवय, परंपरा, रूढी यात मोडते, त्याचा पाप पुण्याशी अजिबातच संबंध नाही. समजा त्यात पाप पुण्य असलं तरीही सर्वाना समान मानणाऱ्या, सर्वाना समान संधी देणाऱ्या कायद्यात त्यावर बंदी असायचं कारण नाही.कारण देव वगैरे गोष्टींचा संबंध कायद्याशी असायचं कारण नाही, तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्ण असतो.
कोणाला गायीचं मांस खायला आवडत नाही, कोणाला मासे खायला आवडत नाहीत, कोणाला डुकराचं मांस खायला आवडत नाही, कोणाला अंडीही चालत नाहीत. कोणाला दररोजच्या जेवणात एक तरी मासा लागतो, माशाचा वास असला तरी चालतो, पण मासा हवाच. कोणाला खेकडे आवडत नाहीत, कोणाला ससे आवडत नाहीत, कोणाला लॉब्स्टर आवडत नाहीत. कित्येक माणसं कोणतीही हालचाल करणारी गोष्ट खायला आनंदानं तयार असतात. त्यात झुरळं आली, सापही आले. कोणतीही हालचाल करणारी वस्तू न खाणारे लोकही आहेत.देशात. जगात. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी इतरांनी खाऊ नयेत असं म्हटलं तर बहुदा सारी मानवजात उपाशीच रहाण्याची शक्यता आहे.
वाट्टेल ते खाणारे, निवडक खाणारे, नुसत्या वनस्पती खाणारे अशा सर्व माणसांना एकेक देव असतो. कुठल्या ना कुठल्या तरी देवानं त्यांना खाण्या न खाण्याला परवानगी दिलेली असते. ख्रिस्तींचा देव वेगळा, हिंदूंचे देव वेगळे, मुसलमानांचा देव वेगळा. जैनांना देव नाहीत पण देवासमान कोणी तरी असतं. ही सगळी देव किवा देवासमान माणसं पृथ्वीपलिकडं कुठं तरी असतात म्हणे. ती कोणालाच भेटत नाहीत. ती कुठल्याही लोकसभेत जात नाहीत, पोलिस स्टेशनमधे जात नाहीत. देवळातही ती नसतात, त्यांच्या प्रतिमा असतात. ती मंडळी इंटरनेट किंवा सेलफोवरूनही पृथ्वीशी संपर्क ठेवत नाहीत.
अवकाशात ही देव व थोर मंडळी आपसात काय ठरवतात ते कळत नाही. त्यांच्यात एकमत आहे असं वाटत नाही. मराठी देवाला मासे चालत नाहीत, बंगाली देवाला ते चालतात म्हणे. अल्ला, ख्रिस्ती गॉड आणि राम वगैरेंमधेही मतभेद दिसतात.
अवकाशातल्या मंडळींचं म्हणणं पृथ्वीवरील त्यांचे प्रतिनिधी, हस्तक, नोकर, सहकारी वगैरे स्वयंघोषित लोक आपल्याला सांगतात. त्यांचं ऐकण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं. एकेकाळी अवकाशातल्या मंडळींच्या संस्था पृथ्वीवर होत्या. त्या अभ्यासवर्ग वगैरे घेऊन माणसं नेमत. अलीकडं अवकाशातल्या मंडळींनी विकेंद्रित व्यवहार करायला सुरवात केली आहे. त्यांच्या वतीनं कोणीही निर्णय घेऊ शकतो अशी स्थिती आहे.
उनामधे गोरक्षकांनी कर्तव्य पार पाडलं. अमेरिकेत ओर्लँडोमधे आणि बांगला देशातल्या ढाक्यात शरीयारक्षकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं.
अवकाशातल्या मंडळींनी आता सामान्य माणसानं कसं जगायचं तेही सांगून सामान्य माणसालाही स्वतःचं रक्षण करता येईल अशी व्यवस्था करावी.
पण ही प्रार्थना, विनंती कोणासमोर कशी करायची? तेही कळलं तर बरं होईल.
।।।
One thought on “गोरक्षक आणि शरीयारक्षक”
<<<< गुजरातेतले हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या वस्त्या जाळत फिरत होते, माणसं मारत होते. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.>>>> अशा आशयाच निपक्ष:पाती वाक्य पहिल्यांदाच वाचायला मिळालं.
.