हेब्रॉन हे गाव पॅलेस्टाईनमधे आहे. तिथं पॅलेस्टिनी अरब मुस्लीम वस्ती आहे. कित्येक शतकं. १९४० च्या आसपास जगभरचे ज्यू या विभागात येऊन वसती करू लागले. १९४७ मधे तर स्थानिक अरबांना हाकलून या विभागात इझरायल नावाचा देश स्थापन झाला. त्यानंतर इसरायल दर वर्षी पॅलेस्टाईनमधे अरबांच्या गावांत वस्त्या वाढवत चाललं आहे. गावात अरब माणसं आणि गावाच्या सभोवतालच्या टेकड्यांवर ज्यूंची वस्ती. ही वस्ती भिंती, शस्त्रं इत्यादींनी वेढून सुरक्षित केलेली असते. या वस्तीतले लोक गावातल्या अरबांची कोंडी करतात, त्यांना वेढतात, त्यांना जीणं मुश्कील करून टाकतात. हेब्रॉनमधे हेच घडतंय. इसरायली सैनिक गावात घुसतात, मारझोड करतात, दुकानं बंद करतात, अरबांच्या घरावर दगडं फेकून शिवी गाळ करतात. अरब तरुण सैनिकांवर दगडफेक करतात, जळते टायर टाकून सैनिकांची वाट अडवतात. हे सारं सतत चालू असतं. गेली कित्येक वर्षं.
इसरायली ज्यू म्हणतो की उत्खननात सापडलेल्या पुराव्यानुसार हेब्रॉन या गावात चारेक हजार वर्षांपासून ज्यू वस्ती होती, हिब्रू भाषेतला मजकूर दगडांवर, कागदांवर सापडतो . तेव्हां हा विभाग त्यांचाच. अरब म्हणतात की गेली दीड दोन हजार वर्षं अरब इथं वसती करून असल्याचे पुरावे त्यांच्याजवळ आहेत.
म्हणजे आधी कोण आले असा एक मुद्दा. नंतर आले असले तरी कित्येक शतकं असणाऱी माणसं हा दुसरा मुद्दा. दोन्ही मुद्दे त्या त्या लोकांच्या दृष्टीनं महत्वाचे. दोन्ही समाज एकमेकाला मारण्यात गुंग आहेत. त्या पायी फार पैसा, रक्त, वाया जातय. यातला काही पैसा जरी शिक्षण, आरोग्य या कामी लागला असता तरी जग सुखी झालं असतं.
आधी कोण होतं? असं म्हणतात की आफ्रिकन वंशातलीच माणसं जगभर पसरली. झालं. म्हणजे झांबिया, मोझंबिक, इथियोपियोतली माणसं जगभरात जाऊन कुठंही तंबू गाडून हक्क मागू शकणार. तरी बरं झुरळांना अजून बोलता येत नाही. नाही तर माणसाच्या किती तर कोटी वर्षं आधीपासून निसर्गात असलेल्या झुरळांनी आर्य, अनार्य, वेदकालीन माणसं इत्यादी सर्वांना हाकलून भारतावर हक्क सांगितला असता.
जग जसजसं तंत्रज्ञानात पुढं चाललंय तसतसं नवनवे पुरावे पुढे येतायत आणि नवे पुरावे आले की इतिहास कायच्या काय बदलून जातो. तेव्हां इतिहास हा प्रकार अमळ सांभाळून आणि विनोदानंच घ्यायला हवा, त्यात भावनांनी गुंतणं उपयोगाचं नाही.आजचं इथून पुढलं जगणं सुखाचं होईल याचा विचार करायला हवा.