आयसिस १
नारिंगी जंप सुट घातलेला एक मध्यम वयीन माणूस गुढग्यावर उभा. नारिंगी जंप सुट.
ग्वांटानामो बे या अमेरिकन छळछावणीतल्या माणसांना असे कपडे घालावे लागत. अफगाणिस्तान, आखाती देश इत्यादी ठिकाणी पकडलेले जिहादी ग्वांटानामो बे छावणीत दाखल केले जात.
नारिंगी सूट घातलेला माणूस आहे जेम्स फॉली. अमेरिकन पत्रकार. कित्येक महिने तो सीरिया-इराकमधील युद्ध-संघर्षाच्या बातम्या देत असे, फिल्म्स करत असे. त्याच्या मागं उभा आहे काळे कपडे घातलेला आयसिसचा जिहादी. जेम्स फॉली भाषण करतो. अमेरिकन सरकारला विनंती करतो की त्यांनी इस्लामच्या विरोधात चालवलेलं युद्ध बंद करावं. तो तणावाखाली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतं.
पाठीमागं उभा असलेला काळ्या कपड्यातला माणूस एक सुरा काढतो आणि जेम्सचं डोकं उडवतो.
यू ट्यूबवरचं दुसरं क्लिप.
आता नारिंगी जंपसुटमधे आहे स्टीवन सेटलॉफ. तोही पत्रकार आहे. तो बराक ओबामाना उद्देशून भाषण करतो.
अल्ला हो अकबर असं म्हणून मागं उभा असलेला काळ्या कपड्यातल्या जिहादी त्याचं मुंडकं उडवतो.
आणखी एक क्लिप.
ठिकाण आहे पालमिरा.
एक प्राचीन वास्तू आहे. भिंतीत तयार केलेलं एक शिल्प काळ्या कपड्यातले जिहादी हातोड्यांनी तोडत आहेत.
एका जिहादीनं चौथऱ्यावर ठेवलेला अर्धपुतळा हातोड्यानं जमिनीवर पाडला आहे. पडलेल्या पुतळ्यावर जिहादी घाव घालतो आहे.
एक जिहादी शिडीवर चढला आहे. वास्तूच्या छताजवळ काही शिल्पं आहेत, खांबांना लगडलेली. जिहादी ती शिल्पं तोडत आहेत.
दिवे लावून हे काम चाललं आहे.
आजूबाजूला अनेक माणसं उभी राहून ही तोडफोड पहात आहेत. त्यात लहान मुलंही आहेत.
एका जिहादीनं एक तीन चार फुटांचं शिल्पं कोनाड्यातून काढलं, कापडात गुंडाळलं. शिल्प घेऊन तो जिहादी बाहेर पडला.
बाहेर नाना आकाराची वाहनं उभी आहेत. गुंडाळलेली मूर्ती घेऊन जिहादी एका जीपमधे जाऊन बसला. जीपमधे आधीच आणखी दोघे जण कापडात गुंडाळलेल्या वस्तू घेऊन बसले आहेत.
एक टोयोटा पिक अप आहे. तिच्यात एक तोफ ठेवलेली आहे. या तोफांनी आताच डोंगरावर गोळेफेक करून इमारतीच्या नक्षीदार प्राचीन भव्य कमानी तोडलेल्या आहेत.
टोयोटा पिक अप हे एक सिंबॉल आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी ठिकाणी जिहादी मंडळी बंदुका घेऊन टोयोटातून फिरतात आणि बेशिस्त गोळीबार करतात.
वास्तूतली कारवाई संपली. कॅमेरे आणि लाईट्स घेऊन माणसं बाहेर आली. बघेही आपसात बोलत बाहेर पडले. मागोमाग काळ्या कपड्यातले जिहादी वाहनांमधे बसतात.
वाहनं धूळ उडवून निघून जातात.
ख्रिस्त जन्मायच्या कित्येक शतकं आधी, सभोवतालच्या असह्य वाळवंटामधे तयार झालेलं पालमिरा. भरभराटलेलं शहर. बाजार. मंदिरं. लोकांना एकत्र येण्यासाठी आणि करमणुकीसाठी तयार केलेले सार्वजनिक चौक. शहराच्या मध्यभागी कलोझियम. म्हणजे महा इवेंट साजरे करण्यासाठी तयार केलेली जागा. तलवार बहादुरी, रथांच्या स्पर्धा, राज्यारोहण इत्यादीसाठी. एका वेळी ५० हजार ते ८० हजार प्रेक्षक बसू शकत.
ख्रिस्त जन्मायच्या आधी ज्यू धर्म होता. या भागात इतर आदिधर्म-प्रोटोरिलिजन प्रचलित होते. ख्रिस्ती आणि इस्लाम हे सेमेटिक धर्म अजून विकसित झाले
नव्हते. त्या सेमेटिक आदिधर्मातला एक देव, त्याचं नाव बेल, ( Bel ). त्याचं मंदिर. मंदिराच्या भोवती सहाशे फूट लांबीची भिंत. सत्तर फूट उंचीचे आणि दहा माणसांनाही कवेत घेता येणार नाहीत अशा व्यासाचे खांब. त्यावर नक्षी आणि शिल्पं. आत मधे साठ फूट उंचीची देवाची मूर्ती.
नव्हते. त्या सेमेटिक आदिधर्मातला एक देव, त्याचं नाव बेल, ( Bel ). त्याचं मंदिर. मंदिराच्या भोवती सहाशे फूट लांबीची भिंत. सत्तर फूट उंचीचे आणि दहा माणसांनाही कवेत घेता येणार नाहीत अशा व्यासाचे खांब. त्यावर नक्षी आणि शिल्पं. आत मधे साठ फूट उंचीची देवाची मूर्ती.
पालमिरातल्या इमारती, खांब, कमानी, भिंती इत्यादींचं वास्तुशिल्प त्या काळातल्या गांधार संस्कृतीतल्या आर्किटेक्चरशी जुळणारं होतं. असं म्हणतात की इसवी पूर्व सहाव्या शतकात पालमिरा आणि गांधार दोन्ही संस्कृती समांतर पातळीवर, एकमेकांच्या संपर्कात वाढल्या.
गांधार संस्कृतीचे काही अवशेष अफगाणिस्तानात बामियानमधे होते. डोंगरात खोदलेल्या साठ सत्तर फूट ऊंचीची शिल्पं. तालिबानांनी ती शिल्पं नष्ट केलीत, अल कायदाच्या चिथावणीनं.
पालमिरातली शिल्पं, मंदिरं, कलोझियम, कमानी, खांब अगदी काल पर्यंत शिल्लक होते.
आता ते नष्ट तरी झालेत किंवा जिहादींनी ते पुराणवस्तूंचं स्मगलिंग करणाऱ्या लोकांना विकलेत, भरपूर पैसे घेऊन..
।।
अमेरिकेतल्या फ्लोरिडाचा हार्लेम सुआरेझ. वय वर्षे २३.
त्यानं फेस बुकवर पोस्ट टाकली. ” मला बाँब तयार करायचा. बंधुनो मला मदत करा. बाँब तयार करायची कृती मला पाठवून द्या. “
हार्लेमनं इंटरनेटवरच्या ऑन लाईन खरेदी यंत्रणेत एका बंदुका विकणाऱ्या कंपनीकडं एके सत्तेचाळीस खरेदी करण्याचा अर्ज भरला. पत्ता, नाव गाव, कार्ड नंबर इत्यादी तपशील दिले.
खरं म्हणजे अमरिकेत एके सत्तेचाळी खरेदी करण्यासाठी इतका खटाटोप करण्याची आवश्यकता नसते. शहरात बंदुका आणि गोळ्या विकणारी अनेक दुकानं असतात. तिथं जायचं. दुकानदाराच्या अटी पूर्ण करायच्या, माहिती भरून द्यायची, पैसे मोजायचे, बंदुका घरी घेऊन जायच्या. कितीही.
हार्लेमनं दोन खोके भरून खिळे तयार ठेवले होते. एक सेलफोन तयार ठेवला होता. स्फोटकं त्याला मिळालेली नव्हती. ती मिळाली की हार्लेम स्थानिक समुद्र किनाऱ्याच्या वाळूत खिळ्यांचा बाँब पुरुन ठेवणार होता आणि दूर उभा राहून सेल फोनचा वापर करून उडवणार होता. गर्दीच्या वेळी. म्हणजे अनेक माणसं मेली असती. मरणारी माणसं अमेरिकन असणार होती. इस्लाम नष्ट करू पहाणारी अमेरिकन माणसं.
गेले काही महिने हार्लेम इंटरनेटवर आयसिसच्या प्रचार फिल्म्स पहात होता. फिल्म पाहून आणि वाचन करून त्याला पटलं होतं की जगात इस्लामी क्रांती करणं आवश्यक होतं. त्याचा विचार पक्का झाला होता. त्यानं फेस बुकवर पोस्ट टाकली. ” भविष्यातलं खिलाफत कसं असेल, भविष्यातलं जग कसं असेल ते जाणून घ्या. आपल्या शत्रूचं डोकं कसं उडवावं, त्याचं शरीर कसं जाळून टाकावं ते शिका. अमेरिका हा आता भूतकाळ आहे. आपण अमेरिका नष्ट करणार आहोत. व्हाईट हाऊसवर आपला काळा झेंडा फडकवणार आहोत. अध्यक्षाचं मुंडकं उडवून व्हाईट हाऊसवर लटकवणार आहोत. ” हार्लेमननं काळे कपडे घालून, डोक्यावर काळ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ घेऊन आपलं जिहादी भाषणही टेप करून ठेवलं होतं.
सारी तयारी झाली होती.
योजना तडीस जाण्याआधीच पोलिसांनी त्याला पकडलं. तुरुंगात धाडलं.
।।
पोर्टस्माऊथ. इंग्लंड.
पोर्टस्माऊथ शहरातले मुहंमद मेहदी हसन, मुशुदुर चौधरी, मुहंमद हमिदूर रहमान, असद उझ्झमान आणि इफ्तेखार जमन हे पाच पाच बंगाली मुस्लीम तरूण २०१३च्या ऑक्टोबरमधे लंडनला गेले. गॅटविक विमानतळावर त्यांनी इस्तंबूलला जाणारं विमान पकडलं. त्यांच्याजवळ परतीचं तिकीट होतं. तुर्कस्तानातल्या अंतालिया समुद्र किनाऱ्यावरच्या रिसॉर्टमधे ही मुलं सुटी व्यतित करणार होती. त्यांच्याजवळ थॉमस कुक या कंपनीनं केलेलं रिसॉर्टचं आरक्षण होतं. सारे कागदपत्रं ठीकठाक होते. विमानतळावरची त्यांची हालचाल, इमिग्रेशन प्रोसिजर इत्यादी गोष्टी सीसीटीवी कॅमेऱ्यावर चित्रीत झाल्या होत्या. त्यावरून मुलं एकदम ठीकठाक दिसत होती.
मुलं सीरियात जिहाद करायला निघाली होती. आयसिसच्या जिहादात सहभागी व्हायला निघाली होती.
पोर्टस्माऊथ या इंग्लंडमधल्या गावात बांगला देशातल्या लोकांची मोठ्ठी वस्ती आहे. पाकिस्ताननं बंगाली लोकांवर अत्याचार करायला सुरवात केल्यावर बंगाली माणसं इथं स्थलांतरित झाली. ही माणसं पोर्टस्माऊथमधे टॅक्सी चालवतात, छोटी मोठी दुरुस्तीची कामं करतात, टेक अवे दुकानांतून खाद्य पदार्थ विकतात, स्टोअर्समधे विक्रेता म्हणून काम करतात. कष्ट करून बांगला देशीयांनी आपली मुलं वाढवली. त्यातलीच ही पाच मुलं.
मुलं जिहादच्या कल्पनेनं भारली होती. सीरिया, इराक या देशात अमेरिका मुसलमानांवर अन्याय करत आहे असं त्याना वाटत होतं. एकूणच जगभरात अमरिका आणि मित्र देश ( ब्रीटन, फ्रान्स, जर्मनी इ. ) इस्लाम खतम करायला निघाले आहेत असं या मुलांचं पक्कं मत होतं.
पोर्टस्माऊथमधे २५ वर्षाचा इफ्तेकार जमन दर शुक्रवारी अभ्यासवर्ग चालवत असे. इफ्तेकार एका कॉल सेंटरवर काम करत असे. सीरियात गेलेली पाच मुलं आणि इतर तरूण त्याच्या घरी भेटत. वारंवार येणाऱ्या या मुलांची खातीर करता करता इप्तेखारची आई थकत असे, तिला ते परवडतही नसे.
मसुदुरला समाजसेवेची आवड. बंगाल्यांना एकत्र करायची खटपट तो करत असे.पोर्टस्माउथची बंगाली जनता एकसंध नव्हती, त्यांच्या आपसात मारामाऱ्या होत्या. सिल्हेट गावातून आलेल्यांची एक मशीद होती. नबीगंजमधून आलेल्यांची एक वेगळी मशीद होती. सिल्हेटवाल्यांना नबीगंज मशिदीत प्रवेश नाही आणि नबीगंजच्या लोकांना सिल्हेटच्या मशिदीत प्रवेश नाही. दोघंही मुसलमान आणि सुन्नी. तेव्हां निदान ईदच्या दिवशी तरी दोघांनी एकत्र नमाज करावा अशी खटपट मसुदुर करत असे. आपसात भांडून एकमेकाचा जीव घेणारे मुसलमान, अरब जगात, पाकिस्तानात. आणि ही पाच मुलं सीरियात अमेरिकन लोकांच्या विरोधात लढायला निघाली होती.
सगळी मुलं शिकलेली होती. स्थानिक कॅथलिक कॉलेजात. पदवी घेऊन विद्यापिठात जाण्याच्या वाटेवर होती. मेहदी हसन विद्यापिठात दाखल होणार होता. एक वर्षाचा ब्रेक घ्यायचं त्यानं ठरवलं होतं. इस्लावरचा अन्याय दूर करायला निघालेली ही मुलं कुराणात
सांगितलेले पाच नमाज पढत नसत. कॉलेज करायचं, शहरात इतर उद्योग करायचे यामधे सगळे नमाज करणं कसं शक्य आहे असं त्यांचं म्हणणं.
सांगितलेले पाच नमाज पढत नसत. कॉलेज करायचं, शहरात इतर उद्योग करायचे यामधे सगळे नमाज करणं कसं शक्य आहे असं त्यांचं म्हणणं.
मेहदी हसन कंटाळला होता. त्याला दररोज उठून त्याच त्याच गोष्टी करायचा कंटाळा आला होता. त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली होती. ” कंटाळलोय. दररोज तेच तेच. पश्चिमेत कशाला आलोय, कशाला रहातोय. जेवण. अभ्यास. काम. कर भरणं. झोप. शीः. ”
आई बाप खुष होते कारण बांगला देशाच्या तुलनेत त्यांना इथं चांगलं जगणं आणि स्थैर्य मिळालं होतं. काही एक बेसिक जगणं छान चाललं होतं. बांगला देशातल्या किंवा पाकिस्तानातल्या माणसांच्या तुलनेत मुलं सुखी होती. पण त्यात त्यांना गमत वाटत नव्हती. कदाचित सभोवतालच्या गोऱ्या ब्रिटीश माणसाच्या, भारतीय माणसाच्या तुलनेत त्यांचं जगणं दोन पायऱ्या खालीच होतं, तेवढी प्रतिष्ठा त्याना मिळत नव्हती. स्थैर्यातच जन्मलेली असल्यानं त्यांना अधिक समृद्धी आणि प्रतिष्ठा हवी असावी. एक असंतोष त्यांच्या मनात असावा. न्यू यॉर्कमधले टॉवर्स पडल्यावर अमेरिका आणि दोस्त देशांनी मुस्लीम देशांत सुरु केलेल्या कारवाया करून मुसलमानांना नष्ट करायचं ठरवलं आहे असं जिहादी लोकांनी मुसलमानांच्या मनावर ठसवलं. सोशल मिडियाचा वापर करून. तो प्रभाव या पाच मुलांवर पडला होता.
निघाले.
तुर्कस्तान. तिथून सीरिया-तुर्कस्तानच्या हद्दीवरचं कबाने हे गाव. तिथं एका हॉटेलात मुक्काम. आधीपासून त्यांच्या संपर्कात असणारा माणूस त्यांना हॉटेलात भेटला. दुसऱ्या दिवशी टॅक्सीनं हद्दीवर जायचं.
वाटेत कबाने गावातच त्यांच्यावर हल्ला झाला. स्नायपर्सनी गाडीवर गोळ्या झाडल्या. टॅक्सीतून उतरून पळावं लागलं. चौघे हद्द पार करू शकले.
सीरियात पोचल्यावर मुलांचा भ्रम निरास सुरु झाला. त्यांना लढाईचा थरार हवा होता. तो मिळेना. कुठं इमारतीवर पहारा दे, कुठं स्वयंपाक कर, कुठं झाड लोटाचं काम अशी कामं करावी लागली. या कामाना प्रतिष्ठा नाही. खाणं पिणं, कपडा लत्ता या गोष्टी मिळत होत्या पण पगार मिळत नव्हता, खिशात पैसे नसत. ब्रिटनमधल्या सुखसोयी तर अजिबातच नाहीत. दररोज हाणामारी असे. त्यात एकेकाचा बळी पडत गेला. कोणी पोटात गोळी लागून मेला, कोणी बाँब स्फोटात गेला.
मेहदी हसन कंटाळला होता. तो स्काईपवरून आई वडिलांशी बोलत असे. परत यायचं म्हणत असे. आई वडिल ब्रिटीश पोलिसांशी बोलत. त्यांनी आई वडिलांना तुर्कस्तानात नेण्याची सोय केली. तिथं मेहदी हसन त्यांना भेटणार होता आणि नंतर सर्वजण पोर्टस्माउथला परतणार होते. मेहदी हसनचा पासपोर्ट आयसिसच्या लोकानी जप्त केला होता. त्यामुळं त्याच्याजवळ पासपोर्ट शिल्लक नव्हता. स्पेशल केस म्हणून त्याला नवा पासपोर्ट देण्याचं ब्रिटिश पोलिसांनी ठरवलं. सारं काही ठरलं होतं.
पण एके दिवशी मेहदी हसन पोटात गोळी लागून मेला.
।।
नेटवर आयसिसच्या कारणी मेलेल्या लोकांचे, मृत देहावरच्या हसऱ्या चेहऱ्याचे फोटो दाखवले जातात. हौतात्म्य प्रेक्षकांवर ठसवण्यासाठी. त्या चेहऱ्यासोबत आयसिसचा सलाम असतो. हा सलाम म्हणजे उजव्या हाताचं अंगठ्यानंतरचं बोट आकाशाकडं करून ” वर, स्वर्गाचा ” निर्देश.
एका ब्रिटीश मुस्लीम स्त्रीचा संदेश ट्विटरवर आपल्याला दिसतो. ” माझ्या पतीनं स्वतःचा जीव दिला आहे, देव त्याला हौतात्म्य देवून स्वर्गात स्विकारो. “