Pnopf प्रकाशनाच्या ब्लांश नॉफ
नॉफ प्रकाशनाला शंभर वर्षं झाली.
।।
The Lady with Borzoi: Blanchet Knopf, Literary Tastemaker Extraordinaire. Laura Claridge.
।।
नॉफ (Knopf) प्रकाशनाला शंभर वर्षं पूर्ण झाली. १९१५ साली ब्लांश आणि आल्फ्रेड नॉफ यांनी हे प्रकाशन न्यू यॉर्कमधे सुरु केलं. अलिकडंच डबलडे आणि नॉफ दोन्ही प्रकाशनं एकमेकात विलीन झाल्यानंतर आज नॉफ डबलडे अशा संयुक्त नावानं हे प्रकाशन चालतं. या प्रकाशनाच्या इतर फांद्याही आहेत. बर्टेल्समान या प्रकाशनाची नॉफची भागीदारी आहे. बर्टेलन्समन, रँडम हाऊस आणि पेंग्विन आता एकत्र झाले आहेत. म्हणजे नॉफ, डबलडे, बर्टेल्समन,रँडमहाऊस आणि पेंग्विन अशी टोळी झालीय.
अमेरिकेत इतर समव्यवसायी संस्था विकत घेण्याची, विलीन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक संस्थेचं एकादं वैशिष्ट्यं असतं. एकाद्या संस्थेचं संपादक मंडळ उत्तम असतं. दुसऱ्या संस्थेची वितरण व्यवस्था चांगली असते. तिसऱ्या संस्थेकडं पैशाचं पाठबळ असतं. अशा स्वतंत्र वैशिष्ट्यांच्या संस्था एकत्र आल्या की प्रकाशन अधिक प्रबळ, अधिक दर्जेदार होतं आणि त्याचा पसारा वाढत जातो. माणसं-संस्थांचे अहम अमेरिकेत बाजूला रहातात, व्यवसायाचं हित लक्षात घेतलं जातं. अनेक वेळा.
नॉफ प्रकाशनाचं वैशिष्ट्यं म्हणजे जगातल्या सर्वाधिक नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांची पुस्तकं नॉफनं प्रकाशित केली आहेत. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या विभागातले साहित्यिक जाणीवपूर्वक निवडून त्यांचं साहित्य प्रकाशित करणारं बहुदा हे जगातलं एक प्रतिष्ठित प्रकाशन आहे.
१९१५ साली प्रकाशन सुरु झाल्यानंतर लगोलग १९१६ साली नोबेल पारितोषिक विजेता स्विडीश कवी व कादंबरीकार व्हर्नर व्हॉन हीडेनस्टॅमची कादंबरी आणि कविता संग्रह नॉफनं प्रसिद्ध केला. त्यानंतर थॉमस मॅन, आल्बेर कामू, सार्त्र, मिखाईल शोलोखोव, यासुनारी कावाबाटा, मार्क्वेझ, गॉर्डिमर, गुंतर ग्रास, नायपॉल, पामुक आणि इतर अशा जवळजवळ १२० साहित्यिकांची पुस्तकं नॉफनं प्रकाशित केली. हे साहित्यिक अमेरिकेतील पुलित्झर, राष्ट्रीय पारितोषिक आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
ब्लांश वुल्फ या महिलेनं हे प्रकाशन सुरु केलं. ही महिला पुस्तकवेडी होती. १९११-१२ सालात प्रकाशनाचा किडा ब्लांशच्या डोक्यात वळवळला. त्या काळी अमेरिकेत फॅशनेबल, ऊच्चभ्रू, उथळ, गौरवर्णिय, अँग्लोसॅक्सन लोकांनी चालवलेल्या कमी दर्जाच्या प्रकाशनांचा बोलबाला, सुळसुळाट होता. पुस्तकं विकत घेणं आणि वाचणंही ऊच्चभ्रू श्रीमंत वर्गापुरतं मर्यादित होतं. प्रकाशन व्यवसायावरची फॅशनेबल लोकांची पकड संपवावी आणि दर्जेदार-अभिजात साहित्य प्रकाशित करावं असं ब्लांशना वाटलं. पण पैसेवाल्यांशी स्पर्धा कशी करायची? आल्फ्रेड नॉफ यांच्याशी ब्लांशची ओळख झाली. आल्फ्रेड सधन होता. ऊच्चभ्रू वर्गात वावरणारा होता. त्याला पुस्तकांची आवड होती. मुख्य म्हणजे त्याच्याकडं पैसा होता.
ब्लांशनं आल्फ्रेडशी लग्न केलं. आल्फ्रेडनं पित्याकडून पाच हजार डॉलरचं कर्ज घेतलं आणि नॉफ प्रकाशन सुरु केलं. छापील पुस्तकाला मरण नाही अशी आल्फ्रेडची धारणा होती. १९४० नंतर टीव्हीचा जमाना सुरु झाल्यानंतर आल्फ्रेड म्हणाला होता “टीव्ही असो की रेडियो की आणखी काही, पुस्तकांना कधीही मरण येणार नाही.”
ब्लांश स्वतः लेखकांचा मागोवा घेत, प्रवास करून लेखकांपर्यंत पोचत. लेखकाला आगाऊ रक्कम देऊन करारबद्ध करत.
न्यू यॉर्कमधे हार्लेममधे समांतर संस्कृती उभी रहात होती. काळ्यांची, झांगड लोकांची. स्वस्त दारू विकणाऱ्या, धुरानं भरलेल्या, आवाजानं गच्च झालेल्या, गरीब माणसांच्या वासानं व्यापलेल्या बारमधे जाझ संगित लोकप्रिय झालं होतं. ऊच्चभ्रू गोऱ्या लोकांना ते माहित नसल्यानं माध्यमानं आणि समाजानं या संगिताची किंवा संस्कृतीची दखल घेतली नव्हती. ब्लांश एका फोटोग्राफर मित्राला बरोबर घेऊन या बारमधे जात. तिथल्या लोकांना भेटत. त्यातूनच समांतर साहित्याचं प्रकाशन नॉफमधे सुरु झालं.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत न्युरेंबर्ग खटला झाला. या खटल्यात नाझींनी केलेल्या अत्याचारांची चौकशी झाली, आईकमन या क्रूरकर्मीला फाशी झाली. खटला ऐकायला ब्लांश जर्मनीत गेल्या. दीर्घकाळ तिथं थांबल्या. तिथल्या लेखक पत्रकारांमधे मिसळल्या. नाझी अत्याचाराचं कथन करणारी पुस्तकं ब्लांशनी प्रसिद्ध केली. त्यांचा नवरा आल्फ्रेड ती पुस्तकं प्रसिद्ध करायला तयार नव्हता. ऊच्चभ्रू समाजात वावरणाऱ्या आल्फ्रेडला अत्याचाराच्या कहाण्या ऐकवत नसत. आल्फ्रेडचा विरोध पत्करून ब्लांशनी नाझी अत्याचार अमेरिकन आणि जागतीक समाजासमोर आणले.
ब्लांश दक्षिण अमेरिकेत गेल्या. तिथल्या लेखकांना भेटल्या. उत्तर अमेरिकेतल्या लोकांना दक्षिण अमेरिका म्हणजे गुलाम वाटत असे. तिथं संस्कृती आहे असं अमेरिकन लोकांना वाटत नसे. ब्लांशनं प्रथमच दक्षिण अमेरिकेतील लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली.
ब्लांश स्वतः कॉपी वाचत, संपादन करत, लेखकांना सूचना करत. वयोवृद्ध झाल्यानंतर ब्लांशना दिसत नसे. भलं मोठं भिंग घेऊन त्या कॉपी वाचत. शेवटल्या शेवटल्या दिवसात त्यांना चालताही येत नसे. सहकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून त्या कशाबशा कचेरीत जात, दिवसभर कचेरीत बसून संपादन, लेखक संपर्क पत्रव्यवहार पहात असत.
सर्वच्या सर्व पुस्तकांचं संपादन करणं एका माणसाला अशक्य असतं. शिवाय पुस्तकांचे विषयही विविध असतात. त्या त्या विषयातला जाणकार संपादक प्रकाशनात असावा लागतो. नॉफनं हॅरॉल्ड स्ट्रॉस यांच्यावर जपानी साहित्य प्रकाशन सोपवलं. संगितकारांची चरित्र, पाककलेवरची पुस्तकं, कादंबऱ्या, कविता असे विभाग करून हरबर्ट विनस्टॉक, ज्युडिथ जोन्स, अॅन मॅकॉर्मिक यांच्या सोबत आणखी वीसेक संपादकांकडं विभाग सोपवण्यात आले. प्रमुख संपादकांमधे सॉनी मेहता असंही एक नाव आहे.
लेखक हुडकण्यासाठी स्वतंत्र माणसं नेमली.
ब्लांश यांच्या चरित्र पुस्तकात ब्लांश यांचं आयुष्य चितारलेलं आहे. ब्लांश यांचं आयुष्य खडतर होतं. प्रकाशन पार पाडत असताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात फार चढउतार झाले. आल्फ्रेड यांच्याशी ब्लांशनं लग्न केलं ते पुस्तकवेड या समाईक गुणासाठी. परंतू या पलिकडं आल्फ्रेड यांच्याशी त्यांचं जुळलं नाही. आल्फ्रेड व्यसनी होते, स्त्रैण होते. ब्लांशची आपलेपणाची, प्रेमाची, शारीरीक सहवासाची भूक आल्फ्रेड भागवू शकले नाहीत. त्यामुळं ब्लांश यांनी मित्र जमवले, त्यातून बरीच स्कँडल्सही झाली. हे सारं त्यांच्या चरित्रात आहे. परंतू ब्लांश एक संपादक म्हणून कशा होत्या याचं विवेचन पुस्तकात जवळपास नाही. उदा. सिमॉन द बुवा यांच्या फ्रेंच पुस्तकाचं सेकंड सेक्स हे इंग्रजी भाषांतर होत असताना ब्लांश यांनी व्यक्तिशः बारकाईनं लक्ष दिलं होतं. हे कसं घडलं? फ्रेंच आणि इंग्रजी भाषा यांची ब्लांश यांची समज कोणत्या प्रकारची होती? लेखनाचा अनुभव ब्लांशना कितपत होता? कोणत्या ओळी वा शब्दांचं भाषांतर होत असताना ब्लांशना काय कष्ट पडले इत्यादी तपशील कळते तर बरं झालं असतं.
ब्लांश यांचे निर्णय इंटलेक्चुअल अंगानं होत नसत, ते अंतःप्रेरणेनं, इंट्युईशननं होत असत असं लेखिकेनं नोंदलं आहे. हे गोलमटोल विधान झालं. नेमके लेखक आणि पुस्तकांच्या निवडीबाबतचे तपशील देऊन लेखिकेनं हा मुद्दा स्पष्ट केला असता तर ब्लांश अधिक समजल्या असत्या.
लेखक, लेखकांशी दुवा साधून देणारे मध्यस्थ, लेखकाबरोबर झालेला संवाद, पत्रव्यवहार, संपादनाची पद्धत इत्यादी गोष्टी कळत्या तर बरं झालं असतं. प्रत्येक संपादकाची एक स्वतंत्र पद्धत असते. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या बार्बरा एपस्टिन लेखकाची प्रत तपासून त्यावर खुणा करत. ज्या विधानाबद्दल वा माहितीबद्दल शंका असत त्यावर प्रश्नचिन्ह टाकून त्यावरचा खुलासा मागवत. पुस्तकाच्या विषयाशी संबंधित इतर पुस्तकं आणि लेखकांचे संदर्भ त्या लेखकाला सुचवत असत. प्रसंगी पुस्तकंही पाठवून देत. काही संपादक लेखकांशी प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर प्रदीर्घ चर्चा करतात. काही ठिकाणी लेखक विषय सुचवतो तर काही ठिकाणी संपादक विषय सुचवतात. ब्लांश यांची संपादनाची, प्रकाशनाची शैली, विषयांची व लेखकांची निवड इत्यादी तपशील या पुस्तकात नसल्यानं पुस्तकातली मुख्य व्यक्तीच नीट समजत नाही. ब्लांश यांचे मित्र आणि त्या मित्रांबरोबरचे व्यवहार यांची वर्णनं पुस्तकात आहेत. ती प्रमाणाबाहेर आहेत आणि उगाचच उत्तेजक केलेली आहेत. ब्लांश यांच्या व्यक्तिगत जीवनाला अनेक कंगोरे होते. ते चरित्रात आले हे चांगलं झालं. पण ब्लांश या संपादिका, प्रकाशक असल्यानं तो भाग जास्त असणं योग्य होतं, त्या भागावर भर असायला हवा होता.
।।