ऑस्कर २३. देखणा, विचार करायला लावणारा Tár
देखणा, विचार करायला लावणारा ‘टार’.
लीडिया टार असं नाव असलेलं एक काल्पनिक व्यक्तिमत्व प्रस्तुत टार या चित्रपटात रंगवलंय. टार नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वात नसली तरी आपण तिला पाहिलंय, भेटलोय असं वाटावं अशी ही टार आहे.
टार संगितकार आहे. पश्चिमी संगित विश्वात एक कंडक्टर असतो, तो वाद्यवृंदाकडून नामांकित संगितकारांच्या रचना वाजवून घेतो. बीथोवन, बाख, चायकोवस्की, माहलर इत्यादी. अनेक वाद्यं, अनेक वादक. त्यांच्याकडून रचना वाजवून घेणं हे कौशल्य असतं. कंडक्टरला समाजात प्रतिष्ठा असते.
बर्लीन फिलहार्मोनिक ही ऑपेरा-संगितातील एक नंबरची संस्था मानली जाते. तिथं जाऊन संगीत रचना सादर करणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. अशा बर्लिन फिलहार्मोनिकमधे लिडिया टार पोचते. पण सरळ नाही.वाकड्या मार्गानं.
टार टोकाची अहंमन्य आहे. उर्मट आहे. इतरांना ती तुच्छपणे वागवते.ती समलिंगी आहे. समलिंगी आकर्षणातून आवडलेल्या मुली-स्त्रियाना ती आपली सहकारी करून घेते. टारच्या वाद्यवृंदात काम करणं फारच प्रतिष्ठेचं असल्यानं मुली तिच्या समलिंगी उद्योगांनाही बळी पडत.
मी एकमेव. या एकमेवत्वाकडं ती दादागिरी करून विकृतपणे जाते. तिच्या समलिंगी इच्छेचा बळी झालेली एक वादक आत्महत्या करते. ते प्रकरण टारवर शेकतं. टारची हकालपट्टी होती. स्वतःच्या खाजगी जेटनं फिरणारी आणि सप्ततारांकित हॉटेलात रहाणारी टार शेवटी फिलिपिन्समधल्या एका अगदी सामान्य हॉटेलात उतरते आणि संगित क्लासची टीचर झाल्यासारखं तिचं करियर होतं. ती ज्या हॉटेलात रहाते तिथं थर्ड क्लास वेश्यांचा सुळसुळात असतो. एकेकाळी कलाकार स्त्रिया टारजवळ आपणहून येत; आता गिळगिळीत वेश्या. अशा वेश्यांना पाहून टारला उलटी होते.
एका कलाकाराची अवनती असं या चित्रपटाचं वर्णन एका ओळीत होऊ शकतं.
टॉड फिल्डनी पटकथा लिहिलीय, दिक्दर्शन केलंय. ऑस्करची डझनभर नामांकनं मिळवणारे फिल्ड इंटलेक्चुअल दिक्दर्शक म्हणून ओळखले जातात. उत्तर न देता ते प्रेक्षकाला विचार करायला लावतात.
टारचचं पहा ना. या चित्रपटात एक उमेदवारी करणारा तरूण दिसतो. त्याला एक नामांकित संगीतकार आवडत नाही कारण तो संगितकार स्त्रीद्वेष्टा, वर्णद्वेषी असतो. चित्रपटाची नायिकाही कमालीची समलैंगिक आहे. तिच्या व्यक्तिमत्वात कला आणि वागण्यातल्या विसंगती यांचं मिश्रण आहे. टॉड दोन्ही गोष्टी आपल्याला दाखवतात आणि दूर होतात. नीती, अनीती इत्यादींचा गुंता प्रेक्षकांनी आपापल्या पातळीवर सोडवावा.
फिल्ड यांची पदार्पण फिल्म ‘इन दी बेडरूम’. २००१ सालाच्या आसपासच्या अमेरिकन समाजाचं चित्रण या फिल्ममधे आहे. अगदी तुमच्या आमच्यासारखं जगणारा माणूस खून करून बसतो, खुनाचा बळी ठरलेल्या माणसाला अपरात्री पुरतो. तरूण माणसाचं वयस्क स्त्रीशी प्रेमप्रकरण. वयस्क स्त्रीचा नवरा आणि हा मुलगा यांच्यात संघर्ष, त्यात मुलाचा खून. नंतर मुलाचा बाप त्या वयस्क स्त्रीच्या नवऱ्याचा खून करतो. सगळाच गुंता. असं कां होतं, होतंय ते योग्य आहे काय याचा विचार प्रेक्षकांनी स्वतंत्रपणे करावा, फिल्ड त्यात पडत नाहीत.
सामान्यतः प्रेक्षक चित्रपटातल्या नायकात स्वतःला पहात असतात, जे आपल्याला जमत नाही ते नायक करून दाखवतो हे प्रेक्षकाला सुखावतं. प्रेक्षकाची स्वप्नं नायक पूर्ण करतो. टारच्या बाबतीत तसं होत नाही. लीडिया टारचं व्यक्तिमत्व प्रेक्षकाना पटत नाही. प्रेक्षक तिच्याशी एकरूप होत नाहीत. टार कितीही आक्रमक, आकर्षक असो, आपण तिच्यासारखं जगावं असं प्रेक्षकांना वाटत नाही.
प्रेक्षकांना जे पटतं तेच दाखवायचं कां? प्रेक्षकांना पटतील तशाच व्यक्तिरेखा रंगगवायच्या कां?
फिल्ड यांचं चित्रपट फार लोकप्रिय होत नाहीत याचं कारण त्या चित्रपटाचा आशय.
पण फिल्ड यांचे चित्रपट पहावतात, पहावेसे वाटतात हेही तितकंच खरं. कारण फिल्ड यांची पटकथा वेधक असते, व्यवस्थित बांधलेली, कल्पिलेली असतं. स्वतःच दिक्दर्शन करत असल्यानं पडद्यावर काय दिसेल आणि दिसावं याचा पक्का हिशोब त्यांच्याकडं असतो.
लिडिया टार आपल्याला पडद्यावर दिसते तीच एक सेलेब्रिटी म्हणून. वाद्यवृंद कंडक्ट करायला निघालेल्या टारला एका विशिष्ट उत्तम डिझाईनचाच सूट हवा असतो. त्या सूटसाठी शिंप्यानं माप घेणं, फूटभर लांबीच्या कात्रीनं कापड बेतणं, कापणं. हे सारं फिल्ड निगुतीनं दाखवतात. या सुटात नंतर टार प्रेक्षकाला दिसते तेव्हां ती भारी दिसते.
चित्रपटाची सुरवात माहितीपटासारखी आहे. न्यू यॉर्कर या साप्ताहिकातला एक लेखक, ॲडम गोपिनिक टारची मुलाखत घेतो. गंमत पहा. यातली टार हे व्यक्तिमत्व काल्पनिक आहे, फिक्शन आहे. केट ब्लॅंचेट ही अभिनेत्री असते पण मुलाखत घेणारा ॲडम गोपनिक हा एक खराखुरा पत्रकार असतो आणि चित्रपटातही तो खराखुरा हाडीमाशी ॲडम गोपनिकच मुलाखत घेतो. असणं आणि नसणं, आभासी आणि खरं, फिक्शन आणि नॉन फिक्शन याचं एक अजब मिश्रण फिल्ड या चित्रपटात करतात.
टारनं सभागृहात प्रवेश करणं, हातातल्या छडीनं वाद्यवृंद कंडक्ट करणं, टारच्या बेभान हालचाली. दिक्दर्शक सिनेमॅटोग्राफरच्या मदतीनं अजब कोनातून आणि गतीनं टार दाखवतो. पाठीमागं डोळे दिपवून टाकणारा प्रकाश आणि हात फैलावून वाद्यवृंदाला क्लू देणारी टार. देखणेपणाची कमाल दिसते.
सतत अस्वस्थ. सतत मनात भीती. सतत एक असुरक्षितता. टारला झोप लागत नाही. रात्री कोणी तरी घरात शिरलंय, काही तरी उद्योग करतंय असं टारला वाटतं. हे तपशील फिल्डनी घेतलेत. पण टारचं पूर्वायुष्य मात्र घेतलेलं नाही.
टार माहलरची पाचवी सिंफनी वाजवणार असते. चित्रपटात त्या सिंफनीचे उल्लेख अनेक वेळा येतात. परंतू फिल्ड ती सिंफनी किंवा उल्लेख आलेल्या बीथोवनच्या सिंफनी आपल्याला दाखवत नाहीत. खरं म्हणजे त्या त्या संगित रचनांचे छोटे तुकडे दाखवले असते तर चित्रपट अधिक श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाला असता. बर्लिनच्या विशाल थेटरात शे सव्वाशे वादक, त्यांची वाद्यं, त्यांचा मेळ पहाणं हा एक वर्णन करता येत नाही इतका रोमहर्षक सोहळा असतो. फिल्डनं तो टाळलाय.
चित्रपट देखणा तर करायचाच पण तो इतका देखणा करायचा नाही की त्यामुळं त्यातल्या बौद्धिक खाचाखोचा कळेनाशा होतील. असा विचार फिल्ड करत असतील?
ही फिल्ड यांची शैली.
चित्रपट, दिक्दर्शन,अभिनय, फोटोग्राफी,संकलन, पटकथा अशी सहा नामांकनं या चित्रपटाला आहेत.
केट ब्लँशेटना अभिनयाचं ऑस्कर मिळू शकेल.
।।
TÁR
Dir. Todd Field.
Kate Blanchett.